परिणीता दांडेकर

सरकारी यंत्रणा आहेत, त्यांची संकेतस्थळे आहेत, ‘अ‍ॅप’सुद्धा आहेत आणि काही हिंदीतही आहेत; पण ती अधिक चांगली चालावीत, खरोखर उपयुक्त व्हावीत, यासाठी नागरिकांनीही सक्रिय राहाणे आवश्यक ठरते..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भात पाऊस आणणार असे हवामान विभागाने १२ ऑक्टोबरला सूचित केले. पुढे याचे रूपांतर चक्रीवादळसदृश परिस्थितीत झाले; त्यातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागांत काय होत आहे आपण पाहात आहोत. ‘निसर्ग’ वादळाने प्रभावित झालेल्या कोकणासाठी हा दुसरा आघात. या वेळी भात कापणी सुरू होता-होताच आंध्र व तेलंगणात या पावसाच्या तडाख्याने ३२ लोक मृत्युमुखी पडले. हैदराबादसारख्या शहरात रस्त्यांच्या चिडक्या नद्या झाल्या, डोळ्यासमोर लोक वाहून गेले. पंढरपुरात चंद्रभागेच्या कडेने जलसंपदा विभाग बांधत असलेला निकृष्ट कुंभारघाट कोसळून सहा जण मृत्युमुखी पडले. शेतकरी जीवाच्या आकांताने आपले काढलेले सोयाबीन वाचवायचा प्रयत्न करत होते, पण जेव्हा अख्ख्या रानात धुवाधार पाऊस आहे, शेताची नदी झाली आहे तेव्हा सोयाबीनसाठी कोरडी जागा कुठे शोधणार? कोकणात सव्वा लाख हेक्टरवरचा, म्हणजे जवळपास अर्ध्या लागवडीखालच्या क्षेत्राचा भात संकटात आहे. वरी, नाचणी या पिकांची तीच अवस्था. सांगलीमध्ये गेल्या तीन दिवसांत ३५००हून अधिक शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. ऑक्टोबरमधल्या आणि तेही गेल्या काहीच दिवसांच्या पावसाने बरेच विक्रम मोडले.

बार्शीत ऑक्टोबरमध्ये जेमतेम ३७ मिमी पाऊस अपेक्षित असताना १७६ मिमी झाला. मोहोळमध्ये ४० मिमी सरासरी असता १९६ मिमी, करमाळ्यात ४३ मिमी असता २०३ मिमी. पुणे शहरात जेमतेम ३९ मिमी अपेक्षित असताना १४७ मिमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ऑक्टोबर सरासरीच्या २६२ टक्के झाला. ही माहिती महाराष्ट्र शेतकी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा ‘महारेन.गोव्ह.इन’वर मिळते. तिथे सर्कल, तालुका, जिल्हा, विभाग यांचे दररोजचे आकडे मिळतात. यात आणि हवामान विभागाच्या आकडय़ांत अनेकदा तफावत असते, पण तो वेगळा विषय.

देशभरच यंदा ‘समर मॉन्सून’ सरासरीपेक्षा ८.७ टक्के जास्त पाऊस झाला. १९५८-५९ पासून पहिल्यांदाच. जयपूर असो की देहरादून, अनेक नद्यांनी आपली उच्चत्तम पातळी : जी आजवर नोंदली गेलेली नाही, पार केली. उत्तर प्रदेशमधल्या तीन, आसामातल्या दोन, बिहारमधल्या नऊ तर ओडिशातल्या चार ठिकाणी विक्रमी नदी पातळ्यांची नोंद झाली. या नद्या आहेत राप्ती, गंडक, बुढी गंडक, बागमती, सुबर्णरेखा आणि महानंदा. हेच मध्य भारतात १३ ठिकाणी झाले : मध्य प्रदेशमध्ये सात, महाराष्ट्रात दोन तर छत्तीसगढमध्ये चार ठिकाणी. यात वैनगंगा, नर्मदा, कालीसिंध, कन्हान यांचा समवेश आहे. दक्षिण भारतात कृष्णा आणि कावेरी दोघींनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली कमाल पातळी पार केली. एकटय़ा ऑक्टोबरात या आकडय़ात अनेक नद्यांची भर पडली; जशी हैदराबादमधली कृष्णेची उपनदी मुसी.

आता प्रश्न हा आहे की, सामान्य नागरिकाने- जो कदाचित सोलापूरमध्ये सोयाबीन वाळत घालत असेल, कोकणात भात कापायचा की नाही याचा विचार करत असेल, पुण्यात आपल्या बिल्डिंगमधून वाढणारे पाणी बघत असेल किंवा मुंबईत लोकल प्रवास करायचा की नाही हे ठरवत असेल- या नागरिकाने निर्णय कसा घ्यावा? यांच्यापर्यंत नद्यांची, पावसाची, पुराची विश्वासार्ह माहिती कुठून पोचणार? फक्त टीव्हीवरून? व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातून?

हा बऱ्याच अर्थाने आपल्या जगण्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न असूनही याचे उत्तर सरळ नाही. पावसाची आणि पुराची माहिती अनेक ठिकाणी विखुरलेली आहे. मग अशा प्रसंगी आपण ती स्वत:हून कशी शोधू शकतो?

पहिले महत्त्वाचे संकेतस्थळ आहे हवामान खाते वा आयएमडी. https://mausam.imd.gov.in  तिथे आकडेवारी बघून संभ्रम वाटला तर सरळ ‘प्रेस रिलीज’ मध्ये जाऊन सोप्या भाषेत महत्त्वाच्या बातम्या समजून घ्या. हवामान विभाग दैनंदिन हवामान वृत्त प्रकाशित करत असते. त्यात पुढील सात दिवसांचे अनुमान असते, पण ते बऱ्यापैकी ढोबळ आणि जिल्हा पातळीवर आहे.

हवामान खाते आणि इतर विभागांनी विकसित केलेली काही अ‍ॅप्स आपल्या फोनवर जरूर असावीत जसे ‘आयएमडी’चे मौसम (हिंदीतही) ज्यात सद्य:स्थिती आणि सात दिवसांचा अंदाज मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी काहीसे उपयोगी अ‍ॅप म्हणजे ‘मेघदूत’; ते विकसित करण्यात ‘आयएमडी’सह ‘इक्रिसॅट’ आणि उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेचा (आयआयटीएम) सहभाग आहे. यात हवामान आणि शेतीविषयक माहिती हिंदी आणि थोडय़ाफार मराठीतही मिळते. किंवा, ‘दामिनी’ नावाचे – हवामान खाते आणि ‘आयआयटीएम’ने विकसित केलेले – अ‍ॅप तुमच्या भोवताली २० ते ४० किमी परिघात वीज कोसळणार असल्यास पूर्वसूचना देते आणि काय करू शकतो हे सुचवते. हेदेखील हिंदीत आहे. ही कोणतीच अ‍ॅप मराठीत आणि इतर भाषांत नाहीत हे अत्यंत चुकीचे आहे.

केंद्रीय जल आयोगाचे पूर पूर्वसूचना संकेतस्थळ महत्त्वाचे आहे : http://ffs.tamcnhp.com. या पूर्वसूचना-पद्धतींत दोन प्रकार आहेत. एक तर ‘लेव्हल फोरकास्ट’, म्हणजे नदी शेजारच्या एका विशिष्ट ठिकाणी पाणी पातळी किती आहे आणि ती चढणार की उतरणार हे; तर दुसरे ‘इनफ्लो फोरकास्ट’ म्हणजे एका धरणात पाणी किती आहे, येवा किती होऊ शकतो आणि ते धोक्याचे आहे वा नाही हे. भारतभरात केंद्रीय जल आयोगाची ३२५ ‘स्टेशन्स’ आहेत : १९७ पातळी दर्शविणारी आणि १२८ धरणांचा येवा दर्शविणारी. ती अत्यंत कमी आहेत हे स्पष्ट आहेच, पण ही माहिती फक्त इंग्रजीत आहे. तरीही ती महत्त्वाची, प्राथमिक माहिती आहे. ‘स्टेशन’वर क्लिक केल्यास आत्ताची पातळी, चढणार की उतरणार हे अनुमान, धोक्याची पातळी, उच्चतम पातळी आणि आत्तापर्यंतचे या ठिकाणचे पाऊसमान हे कळते. यातील रंग-वर्गीकरण असे की, पिवळा म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पूर, नारिंगी म्हणजे धोकादायक पूर आणि लाल म्हणजे अति-धोकादायक पूर. १५ ऑक्टोबर रोजी, भीमा नदीवरील सोलापूर नरसिंगपूर स्टेशनची पातळी ‘धोकादायक’ (४५९ मीटरच्या वर) ४६०.६ मीटर होती, हे नारिंगी रंगात दिसले.

याखेरीज जलसंपदा विभागाचे संकेतस्थळ (https://wrd.maharashtra.gov.in) ज्यात ‘नागरिक सेवा’अंतर्गत पूरस्थितीचा अहवाल, धरणांची आत्ताची पातळी आणि कृष्णा-भीमा पूर बुलेटीन यांचा समावेश आहे. अर्थात, महाराष्ट्र राज्याचे बरे आणि चालणारे आपत्ती व्यवस्थापन संकेतस्थळ असेल तर नक्की सांगा! म्हणून, ‘आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र कक्ष’चा ०२२-२२०२७९९० हा संपर्क क्रमांक जवळ असावा.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंडळाचे कमल किशोर म्हणतात : खरी पूर्वसूचना तीच जी ऐकणाऱ्याला सुटकेसाठी पुरेसा वेळ देते, जी त्या नेमक्या जागेसाठी आहे, योग्य स्थानिक भाषेत आहे आणि जी सगळ्यात गरजू माणसापर्यंत पोचते. या सगळ्या निकषांवर आपल्या आपत्ती सूचना ‘फेल’ आहेत, मग व्यवस्थापन पुढची गोष्ट झाली.

अमेरिकेत वायरलेस इमर्जन्सी अ‍ॅलर्ट या संदेश योजनेने शेकडो प्राण वाचवले आहेत. अमेरिकी केंद्रीय (फेडरल) सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच तिथला दूरसंचार आयोग (आपल्या ‘ट्राय’सारखा) आणि खासगी मोबाइल कंपन्यांच्या विद्यमाने महत्त्वाचे हवामान इशारे सगळ्यांच्या फोनवर येतात. फोन सुरू असेल तर तो वाजतोच. शेतीचे नुकसान जरी याने रोखले नाही तर शेकडो जीव वाचले आहेत. तरीही नुकसान आणि जीवितहानी होतेच, पण आपल्यासारखे संकट अगदी दारात उभे राहात नाही.

आपत्ती निवारणाचा अजून एक भाग म्हणजे मागच्या आपत्तीतून बोध घेणे. म्हणून या संबंधीचे अहवाल अत्यंत महत्त्वाचे. २०१३च्या उत्तराखंड पुराचा अहवाल आपण अद्याप बनवला नाही, महाराष्ट्रात इतके दुष्काळ झाले पण शंभर वर्षांपूर्वी दुष्काळाचे अहवाल ‘पुणे सार्वजनिक सभे’ने बनवले होते तसे आपण आजही बनवत नाही. शासनाने काढलेला २०१९ पूरस्थिती अहवाल शुद्ध कातडी-बचाव होता. यातून कसले बोध आणि कसले धडे. या अहवालात नद्यांची पातळी वाढली तर नक्की कोणता भाग बुडणार, इतकी प्राथमिक माहितीदेखील नाही.

सरकारने यात लक्ष घालणे गरजेचे आहेच; पण प्रभावित किंवा संभाव्य बाधित नागरिक म्हणून आपणसुद्धा स्थानिक संस्थांच्या, विद्यापीठांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन माहिती सोप्या भाषेत, एकत्रित उपलब्ध करून देणे, महत्त्वाच्या कामाचा आणि अहवालांचा पाठपुरावा करणे आणि यंत्रणेला उत्तरदायी बनवणे यात सक्रिय असणे अत्यंत गरजेचे आहे.

लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात.

ईमेल : parineeta.dandekar@gmail.com