समीक्षक आणि सर्वसामान्य रसिक यांच्यात एखाद्या कलाकृतीसंदर्भात सहसा एकमत नसते. निवडणुकांचेही तसेच आहे. राजकीय विश्लेषकांना जे वाटते ते मतदारांसाठी ग्राह्य असतेच असे नाही, किंबहुना ते तसे नसतेच. मतदार हा बऱ्याचदा भावनेच्या वा तात्कालिकतेच्या आहारी जाऊन मतदान करीत असतो. परंतु अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीने आतापुरता तरी हा समज खोटा ठरवला. जागतिक राजकारणाकडे तटस्थ आणि चिकित्सक वृत्तीने पाहणाऱ्यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी ओबामाच यावेत, असे वाटत होते. तीच भावना अमेरिकेतील सामान्य मतदारांनीही उचलून धरली. यातील अध्याहृत अर्थ असा की अध्यक्षपदी कोणत्याही परिस्थितीत मिट रोम्नी येता नयेत, यावर जनतेचे एकमत झाले. रोम्नीविरोधात सुजाणांमध्ये नाराजी असण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य म्हणजे रोम्नी यांचे पूर्वसुरी जॉर्ज बुश यांची आठ वर्षांची राजवट. बुश यांच्या या आठ वर्षांच्या कालावधीत जग किमान पन्नास वर्षांनी मागे लोटले गेले. क्षुद्र राजकारणासाठी ज्यांना आपण पोसले, जोपासले त्यांचा बंदोबस्त करताना समस्त इस्लामी जगतास दहशतवादी ठरवण्याचे हीन आणि बेजबाबदार राजकारण बुश यांनी केले. याच राजकारणाचा भाग म्हणून तद्दन खोटय़ा कारणांसाठी इराकवर त्यांनी युद्ध लादले आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेस खिंडार पाडले. या काळातील अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी अमेरिकेस प्रचंड प्रमाणावर कर्ज घ्यावे लागले आणि त्याचमुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील पत घसरली. त्यातही रिपब्लिकनांची नादानी इतकी की, या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी अतिरिक्त कर्ज काढण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला. अमेरिकेचे अध्यक्षपद जरी डेमोक्रॅट पक्षाचे ओबामा यांच्याकडे असले तरी प्रतिनिधी सभेत बहुमत रिपब्लिकनांचे आहे. या रिपब्लिकनांनी राजकारणाची पातळी आणखी एका पायरीने खाली उतरवत प्रतिनिधी सभेतील बहुमताचा उपयोग सरकारची आणि पर्यायाने देशाचीही आर्थिक अडवणूक करण्यासाठी केला. हे लाजिरवाणे होते.
अशा राजकारणाने अमेरिकेसमोरचे आर्थिक संकट अधिकच वाढले आणि त्यातच आलेल्या निवडणुकांत रिपब्लिकन रोम्नी यांनी पुन्हा एकदा युद्धज्वर वाढविण्याचा अगोचरपणा केला. आपल्या निवडणूक प्रचारांत ते उघड उघड इराणविरोधात युद्ध छेडण्याची भाषा करीत होते आणि यहुदी धर्मीय इस्रायलसाठी कोणत्याही थराला जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. हे रिपब्लिकनांचे वैशिष्टय़. हडेलहप्पीचे असांस्कृतिक राजकारण हा त्यांचा पिंड. त्याचमुळे भारत आणि पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला चिथावणी देत भारताविरोधात आपले आरमार पाठवण्याचा अघोरी खेळ रिचर्ड निक्सन यांच्या रिपब्लिकन राजवटीतच खेळला गेला आणि रिपब्लिकन रोनाल्ड रेगन यांच्याच काळात इराणचे अयोतोल्ला खोमेनी आणि इराकचे सद्दाम हुसेन या दोघांनाही युद्धाची चिथावणी दिली गेली. तेव्हा अशा बेजबाबदार राजकारणासाठी ओळखले जाणारे रिपब्लिकन्स अमेरिकेत सत्तेवर आले असते तर पुन्हा एकदा युद्धखोरीची हवा तापू लागली असती यात शंका नाही. २००८ सालात मुक्कामास आलेला मंदीचा फेरा पुरता कधी उठेल याची शाश्वती नाही. तेव्हा अशा वेळी रोम्नी यांच्याकडे अमेरिकेची सूत्रे गेली असती तर पश्चिम आशियाच्या आखातातील वाळवंट तापले असते आणि त्या तप्त वाळूच्या झळांत समस्त जग होरपळले असते. रोम्नी यांच्या पराभवाने हे टळले. त्यामुळे ओबामा यांचा विजय समस्त विश्वासाठी महत्त्वाचा आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रचारात ओबामा यांची भूमिका संयतच होती. विरोधी पक्ष नेतेपदी असताना दिलेली वचने सत्तेवर असताना पाळता येत नाहीत, याची जाणीव अनेकांना होते. ओबामा यांनाही ती झाली होती. परंतु त्यांचे वेगळेपण हे की, हे आलेले अर्थभान त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले आणि त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. रिपब्लिकन बुश हे सत्तेवर असताना अमेरिकी अर्थव्यवस्थेचा फुगा फुटू लागला होता. अमेरिकेतील प्रचंड बँकांत गणली जाणारी लेहमन ब्रदर्स बँक बुडालेली होती आणि त्या नकारघंटेने त्यांचे सत्ताग्रहण झाले होते. सर्वसाधारणपणे अशा परिस्थितीत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादास हात घातला जातो. ओबामा यांना ती संधी होती. परंतु त्यांनी कायमच संयत भूमिका घेतली. एका बाजूला बेजबाबदार इस्रायल आणि दुसरीकडे तितकाच बेजबाबदार इराण असताना ओबामा यांनी आपला तोल ढळू दिला नाही. त्याच वेळी जागतिक दहशतवादाच्या केंद्रस्थानी असलेल्या ओसामा बिन लादेन यास टिपण्याची कामगिरीही ओबामा यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली होती. ओबामा यांचा मोठेपणा हा की एकाही निवडणूक प्रचारसभेत ओबामा यांच्याकडून ओसामा हत्येचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला नाही. १९७१ च्या बांगलादेश युद्धातील विजयाचे श्रेय अजूनही खरवडून खरवडून काढण्याचा उद्योग आपल्याकडे होत असताना ओबामा यांचे हे प्रगल्भ राजकारण आपण लक्षात घ्यायला हवे. त्याच वेळी कृष्णवर्णीय, पददलित अशा समाजाचे असूनही ओबामा यांच्यासाठी त्यांची जात ही कधीच भांडवल झाली नाही. या त्यांच्या वेगळेपणामुळेच मोठय़ा प्रमाणावर गोऱ्या मंडळींनी गेल्या वेळी त्यांना पाठिंबा दिला आणि याही निवडणुकीत तसेच झाले असणार यात शंका नाही. याचे कारण असे की आपली चार वर्षांची राजवट ओबामा यांनी अत्यंत संयतपणे हाताळली. पोखरत गेलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या अपेक्षा अशा कात्रीत अडकलेल्या ओबामा यांचा समजूतदारपणा कधीच ढळला नाही, ही कौतुक करण्याजोगीच बाब यात शंका नाही. जे आपल्याला जमणार नाही आणि त्याहीपेक्षा देशाच्या हिताचे नाही ते करण्याची आश्वासने देता येणार नाहीत, अशी त्यांची स्वच्छ आणि प्रामाणिक भूमिका होती. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली.
रोम्नी यांच्या आगलाव्या वक्तव्यांच्या पाश्र्वभूमीवर ओबामा यांचे संयमी नेतृत्व डोळ्यात भरण्यासारखेच होते यात शंका नाही.ओबामा यांच्या विजयास आणखी एक महत्त्वाचा पदर आहे. तो आहे इस्रायल. अध्यक्षपदी निवडून आल्यावर संपूर्ण चार वर्षांच्या कालावधीत एकदाही इस्रायलला भेट न देणारा हा एकमेव अध्यक्ष असेल. निवडून आल्यावर ओबामा यांनी भेट दिली ती इस्रायलपासून शब्दश: हाकेच्या अंतरावर असणाऱ्या इजिप्तला. नंतर सौदी अरेबिया, तुर्कस्तान, इतकेच काय इराक येथेही वारंवार जाण्यास त्यांना वेळ मिळाला. परंतु एकदाही त्यांनी इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवले नाही. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टनला भेट देणाऱ्या इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेत्यानाहू यांना ते भेटलेदेखील नाहीत आणि त्या देशाच्या पॅलेस्टाइनविषयक भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यास ते कचरले नाहीत.
इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांनी त्या देशाच्या भेटीवर असणाऱ्या अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बायडन यांचा जाहीर उपमर्द केला. तरीही ओबामा बधले नाहीत. या उलट रिपब्लिकन पक्ष. रोम्नी यांचा कर्ताकरविता धनी हा जेरुसलेममध्येच आहे की काय असे वाटावे असे त्यांचे वर्तन होते. त्यामुळे ओबामा यांच्यावर यहुदीविरोधक असल्याची राळ उडवली गेली. रोम्नी यांच्या भूमिकेमुळे अमेरिकावासी यहुदी काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. यहुदींचा प्रचंड मोठा सामथ्र्यगट अमेरिकेत उद्योग आणि अर्थक्षेत्रात आहे. त्यांचा पाठिंबा अध्यक्षपदी येण्यास आवश्यक असतो. तो गमावण्याचा धोका ओबामा यांच्यापुढे होता. परंतु तसे झाले नाही आणि अमेरिकेतील सर्वसामान्य मतदाराने भावनेच्या आहारी न जाता समजूतदारपणे मतदान केले. तेथील लोकशाही ही शहाणी आणि समंजस झाल्याचे हे लक्षण मानावयास हवे.     

Story img Loader