भूमी-अधिग्रहण कायद्यात बदल करून, मूळ भूधारकांना बाजारभावाच्या चौपट किंमत द्यावी, असे विधेयक पारित झाले. त्याच्याही किती तरी पुढे जाऊन, महाराष्ट्र सरकारने दिलेली ऑफर, जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या बऱ्याच आंदोलकांनी व त्यांच्या नेत्यांनी घेतलीसुद्धा! तरीही विरोधासाठी विरोधवाले राजकारणी आणि विकासविरोधी ‘सादगी-लादेन’ मंडळींचे काडय़ा घालणे चालूच आहे. यामागील काही अपधारणांचे खंडन.  
बाजारभावाच्या चौपट हे ठीक आहे, पण कोणत्या तारखेचे बाजारभाव? हे फारच महत्त्वाचे. चौपटीचे सूत्र, अधिग्रहणाच्या वेळी असणाऱ्या बाजारभावांनाच लावले गेले पाहिजे. नाही तर, खातेदारांना सुटणाऱ्या अमर्याद लोभापुढे झुकून, साराच कारभार ‘चौपट’ होईल. कारण, अधिग्रहण होतानाचे बाजारभाव, ‘रखडवलेला’ प्रकल्प सुरू होईपर्यंत, प्रकल्प येणार या बातमीने वाढत जातात. ही झाली एक उघड स्वार्थ-प्रेरित अडचण. पण प्रकल्पात मोठ्ठा खोडा घालतात ते, ‘वैचारिक-स्वार्था’पायी वा स्वयं-उदात्तीकरणाच्या भरात, प्रकल्प रखडवणारे ‘तळमळ’वंत! ‘पर्यायी विकास नीती’ (पविनी), या नावाने ओळखला जाणारा, एक नकारघंटा समुच्चय, बऱ्याच मंडळींच्या डोक्यात घुमत असतो. पविनी हे विकासाचे पर्यायी प्रारूप (मॉडेल) नाही. व्यवहार्यता सिद्ध करता येईल, असे एकूण व समष्टीय(मॅक्रो) गणित मांडणे, हेच पविनीवादाला मान्य नाही. त्यामुळे पविनीवाद म्हणजे काय काय? हे आपल्याला सुटय़ा सुटय़ा टिपिकल आग्रहांवरून ओळखावे लागेल.
प्लॅस्टिक व कृत्रिम रबराचा शोध लागल्याने, अनेक गरिबांच्या वाटय़ाला चपला, ‘इरले’ सोडून ‘पोंचू’ (रेनकोट), बादल्या, घागरी, टमरेले, दप्तरे, पाण्याच्या बाटल्या अशा भरपूर गोष्टी आल्या, ज्या त्यांना एरवी परवडल्याच नसत्या. पण पविनीवादी मात्र, प्लॅस्टिककडे फक्त ‘अविघटनीय कचरा संकट’ म्हणूनच पाहतात. हेच प्लॅस्टिक, रस्ते बनवताना घातले तर, रस्ते पहिल्याच पावसात उखडणार नाहीत! अशा विधायक मार्गाकडे हे वळतही नाहीत. माइकपाशी बिसलेरी ठेवून ते प्लॅस्टिकविरोधी भाषणे रंगवतात. वृक्षशेतीला प्रोत्साहन मिळावे अशा व्यापक धोरणासाठी न भांडता, ऐन हमरस्त्यातले एखादे झाड तोडायला घेतले, तर तिथे हे मिठय़ा मारायला पुढे असतात. (स्वत:च्या घरात वूडन फ्लोअिरगही चालते.) अचानक पावसामुळे झालेला केदारनाथ भागातील जलप्रलय यांना जागतिक तापमानवाढीमुळे (ज्यात भारताचे योगदान किरकोळ आहे) झालेला दिसतो. ज्या टिहरी धरणाला आयुष्यभर विरोध केला, त्याने जर, पुराचा पहिला ओघ झेलला नसता, तर हाच प्रलय किती तरी जास्त विनाशकारी ठरला असता, हे यांच्या लक्षातही येत नाही. जैविक शेती शेतकऱ्याला का परवडत नाही? हे न पाहता, पविनीवादी जैविक शेतीचा आग्रह धरतात. यांना जहाल विषारी कीटकनाशके चालतात, पण बोंडअळीरोधक बियाण ‘जनुकीय’ म्हणजे अब्रह्मण्यम! मोन्सेंटो घालवली म्हणून विजयोत्सव, पण प्रत्यक्षात भारतीय कंपनीचे (मोन्सेंटोकडून चोरीव डिझाइनवाले) बीटी-बियाणेच सर्व शेतकरी वापरतायत, याचा यांना पत्ताच नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संशयाची सुई बियाणाकडे, पण ‘कापूस एकाधिकार खरेदी’त गडबड असू शकते, ही शंकाही नाही. अमुक प्रकल्पामुळे झालेले विस्थापन दिसते, पण ‘प्रकल्पांच्या अभावी’ जे अखंड विस्थापन चालू आहे, ते दिसत नाही.
सरदार सरोवरापासून लाभान्वित होणाऱ्या, गुजरातच्या शेतकऱ्यांकडून किंमत वसूल करून, मध्य प्रदेशच्या हानीग्रस्तांना दिली पाहिजे, ही व्यवहार्य मागणी केली, तर हे म्हणतात, ‘गुजरातचे शेतकरी, लाभान्वित कसले? ते तर ‘लाभग्रस्त’!’ का? तर श्रीमंतीमुळे मुले बिघडतात व शहरी बनतात! सरदार सरोवराचे स्वप्न गुजरातने, चिमणभाई पटेलांपासून पाहिले होते. इकडे पविनीवादी, ‘डुबेंगे पर हटेंगे नही’ म्हणत, कधीच न डुबता हटत गेले. तिकडे विकासवादी गुजरातने मात्र, धरणाची उंची किती वाढेल? याची चिंता न करता, पार कच्छपर्यंत कालवे खणून तयार ठेवले होते.
पविनीवादाची अनतिहासिकता
इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर आपण असायचे, ही एक ऐच्छिक बाब असल्यासारखे, पविनीवाद्यांना वाटते. आपण कोणती मूल्ये मानायची हे ठरवायचे, तसे जगायचे आणि असेच सर्वानी केले की परिवर्तन होतेच, अशी त्यांची समजूत असते. इतिहासाच्या कोणत्या टप्प्यात कोणत्या सुधारणा अपेक्षिणे वास्तववादी ठरते याला काही नियम आहेत. काही आदर्श जरी, आज आपल्याला शिरोधार्य वाटले, तरी ते आजच प्रत्यक्षात आणायला जाणे, हे अनतिहासिक असते. ‘अति घाई संकटात नेई’ हा नियम रस्त्यावरील प्रवासाप्रमाणे, ऐतिहासिक प्रवासालाही लागू असतो. ‘श्रमातच धन-मूल्य माना!’ हा उपदेश फारसे श्रम न करणारे लोकच करू शकतात. खऱ्या श्रमिकांना, श्रम ही गोष्ट तापदायक, खर्ची पडणारी व ऋण-मूल्यात्मकच वाटत असते. पविनीवादी, कष्टकऱ्यांची बाजू घेण्याच्या मिषाने, प्रत्यक्षात ‘कष्ट करण्याची’ बाजू घेत असतात. अंगभूत आनंद छंदात असतो, श्रमात नव्हे. कमीत कमी श्रमांत जास्त फल मिळण्याच्या नवनवीन युक्त्या शोधणे, हे मानवाचे आदिम स्वभाववैशिष्टय़ नेहमीच होते व आहे. ते मध्ययुगात काहीसे दबले गेले, पण आधुनिकतेने मुक्त केले. हे वैशिष्टय़, विशेषत: दुíभक्ष्य असताना बदलणे अशक्यप्राय आहे. तसे नसते तर पविनीवाद्यांसकट आपण सगळे आज जंगलात िहडत असतो!
सरंजामशाहीतून थेट समाजसत्तावादात उडी घेण्याची जी चूक स्टॅलिन-माओ यांनी केली होती, तशीच चूक पविनीवादी करू पाहतायत. भारतात सध्या औद्योगिक क्रांतीचा, विसाव्या शतकातील टप्पादेखील पार पडलेला नाही. तो पार केल्यानंतर जो टप्पा शक्य होईल, त्यातले आदर्श अमलात आणण्याचा पविनीवादी आत्ताच आग्रह धरत आहेत. ग्रस्तांचे पुनर्वसन यात वाद नाही, पण चालू टप्प्यावरील ‘प्रकल्पच नकोत’ या भूमिकेबाबत पविनीवाद्यांनी एका प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. तुमचा मार्ग सक्तीचा आहे की हृदयपरिवर्तनाचा? सक्तीचा असेल तर तुम्ही नक्षलवाद्यांत सामील व्हा व क्रांत्युत्तर सक्ती करा. हृदयपरिवर्तनाचा असेल तर ते करत राहा, पण कोर्टबाजी (लिटिगेशन) ही करणाऱ्याला सोपी म्हणून, राज्यसंस्थेचा सोयीस्कर व अर्धवट वापर करून, प्रकल्प फक्त महाग बनवत नेऊन, तुम्ही काय मिळवता? मूर्ख कायदे आणि एखादा चमकढवळा मंत्री/अधिकारी, प्रस्थापित-विरोधाची नशा चढलेले पत्रकार/विचारवंत, देशी व विदेशी ‘गिल्ट’ मार्केट (देणग्या द्या, अपराधगंडमुक्त व्हा) यांना हाताशी धरून, ना तुम्ही पर्याय देत, ना तुम्ही आहे असा विकास चालू देत. नवे न देता, चालू असेल ते अडवणे ही विघ्नसंतोषी वृत्ती ठरते.
चिरस्थायी ‘विकासदर’ नकोच आहे
विकासदर जास्त राखण्याची गरज, दारिद्रय़-लोकसंख्या-दारिद्रय़, हे दुष्टचक्र तुटेपर्यंतच आहे. हे दुष्टचक्र म्हणजे एक सतान आहे व आपली त्याच्याशी शर्यत चालू आहे. ही शर्यत एकदाच जिंकावी लागेल. एकदा का दुष्टचक्र तुटले की मग, अगदी कमी विकासदर चालू शकेल. आजही जे विकसित आणि स्थिर लोकसंख्यावाले देश आहेत, त्यांचा विकासदर कमीच आहे. भौतिक विकास संपृक्त झाल्यानेच, आत्मिक विकासाचे युग येणार आहे. अति-भोगामधील वैयथ्र्य मनापासून उमगणे ही गोष्ट, भोगाचा अनुभव आल्यानंतरच घडू शकते. ज्यांनी एकदाही (भौतिक) सुस्थिती भोगलेली नाही, असे लोक जोवर आहेत, तोवर त्यांची मागणी, आम्हालाही सुस्थिती मिळालीच पाहिजे, हीच राहणार.
मुख्य मुद्दा असा की, ज्या उधळपट्टीवादी मार्गाने बडे देश गेले, त्याच मार्गाने सर्व देश जातील आणि मग हे सारे अशक्य होऊन सगळेच जग कोसळेल, असे काहीही घडणार नाहीये!
जर दाखवेगिरी, तोरा मिरवणे यासाठी लागणाऱ्या अतिमहाग वस्तू सोडल्या, तर सुखावह (कम्फर्टेबल) होईल इतपत सुस्थिती, नव्या व कमी संसाधनांनिशी शक्य होणार आहे. कारण तंत्राचे, अल्प-भांडवली पण जास्त उत्पादक स्वरूप, सापडत चालले आहे. पुनíनर्मिणीय व अल्प-प्रदूषक ऊर्जास्रोत विकसित होत आहेत. वाहतूक-सघन व्यापाराच्या जागी माहिती-सघन व्यापार, द्रव्ये व ऊर्जा जास्त सूक्ष्म (नॅनो) तऱ्हेने नेमक्या जागी कामी आणणे, या सर्व आघाडय़ा पुढे जात आहेत. नव्या प्रकारची, जिला ‘सौम्य-औद्योगिक’ म्हणता येईल अशी क्रांती शक्य आहे आणि तीही आपल्याला ‘नेहमीप्रमाणेच’ विकसित देशांकडून आयतीच मिळणार आहे! जसजसे आपणही एकीकडे आपला बॅकलॉग भरून काढत, या नव्या क्रांतीत शिरू, तसतसा आपला ‘विकास’ही होईल व तो ‘पर्यायी’ही असेल!
विकसित देशांत एकीकडे जीवनपद्धतीविषयक आत्मपरीक्षण        व प्रयोगही चालू झालेत व सौम्य-वादी तंत्रांकडे वाटचालही सुरू आहे, पण या बडय़ा देशांचे आंतरराष्ट्रीय राजकीय धोरण अद्याप दादागिरीचेच आहे. उदयोन्मुख देशांच्या स्पध्रेला भिऊन, त्यांचा विकास कसा    रोखता येईल, याचा प्रयत्न ते करीत आहेत. स्वत:च्या बेलगाम   संसाधन-उधळपट्टीवर आवर घालायचा सोडून, विकसनशील देशांत मात्र ते, तुम्ही ‘चिरस्थायी-गरीब’ राहा असा संदेश आपल्या एजंटांद्वारा भिनवत आहेत.
खरे तर पविनी ही ‘पर्यायी विकास नीती’ नाहीच. ‘नैतिकता असेल की विकास हवाच कशाला?’ असा तो प्रकार आहे. म्हणजे असे, की जर माणूस ‘पविनीवादी नतिक’ बनला तर तो, गरिबीला ‘सादगी’, दुसऱ्याचे पाय ओढण्याला ‘समता’ आणि श्रमविभागणी-नामक मनुष्यधर्म त्यागण्याला ‘स्वावलंबन’ मानून, थेट संतुष्ट होईल.    
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल -rajeevsane@gmail.com

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Story img Loader