इराकमधील मोसुल हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर सुन्नी दहशतवाद्यांच्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड अल शम्स (इसिस) या संघटनेने ताब्यात घेतले, ही घटना इसवी सनाच्या सातव्या शतकातील इस्लामी धर्मयुद्धाची आठवण करून देणारी आहे. तितकीच ती अमेरिकेचे (माजी) अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या तथाकथित क्रुसेडने मध्यपूर्वेतील राजकारणाचा कसा विचका केला, याचेही प्रतीक आहे. इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला चढवून आपण कोणत्या आग्या मोहोळावर दगड मारला, याची जाणीव कदाचित आता बुश यांना होईल. त्या वेळी बुश यांचे लक्ष्य इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन, अफगाणिस्तानातले मुल्ला ओमर आदी तालिबानी नेते आणि अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन हे होते. ते तिघेही आज नामशेष आहेत. सद्दाम यांनी महासंहारक अस्त्रे बनविली असून त्यामुळे संपूर्ण जगाला- म्हणजे खरे तर इस्रायलला धोका आहे, असे बुश आणि त्यांच्या टोनी ब्लेअर यांच्यासारख्या पाठीराख्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून सांगितले होते. सद्दाम यांच्या पाडावानंतर इराकची इंच न् इंच भूमी तपासूनही ती अस्त्रे सापडली नाहीत. मात्र त्या युद्धाने वेगळ्याच ‘महासंहारक अस्त्रा’ला जन्म घातला. गेल्या काही वर्षांत अल कायदाला संपविण्यात अमेरिकी सैन्य व गुप्तचरांना यश आल्याचे मानले जाते. पण त्यात तथ्य नाही. अल कायदा हा अमीबा आहे आणि तो जिवंत आहे. या संघटनेचे विविध गट आणि अफगाणिस्तानातील तालिबानी यांच्यावर अमेरिकेची स्वयंचलित विमाने क्षेपणास्त्रे डागत असताना, दुसरीकडे इजिप्त, लिबिया, सीरिया आदी राष्ट्रांत सत्तापालट करण्याची खेळीही ओबामांचे प्रशासन खेळत होते. इसिस हे त्या खेळीचे अपत्य आहे. सद्दाम यांच्या पाडावानंतर, २००३ मध्ये इराकमधील तौहिद आणि जिहाद हा सुन्नी बंडखोरांचा गट हे इसिसचे पूर्वरूप. या गटाने आरंभी अल कायदाशी हातमिळवणी केली होती. इराकमधील अल कायदा म्हणून तो ओळखला जाऊ लागला होता. या गटाने २००६ नंतर स्वत:स इस्लामिक स्टेट ऑफ इराक अशी ओळख दिली. नंतर अल कायदाचा हात सोडून या संघटनेने सीरियाकडे मोर्चा वळविला. आजमितीला अबू बक्र अल बगदादी याच्या नेतृत्वाखालील या संघटनेच्या ताब्यात सीरियाचा मोठा भाग आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी इराकमधील फलुजा हे सुन्नीबहुल शहर ताब्यात घेतले आणि गेल्या मंगळवारी मोसुलमधील इराकी फौजांना पळवून लावून त्या शहरावरही कब्जा मिळविला. आज इराक आणि सीरिया यांच्या सीमेवरील मोठा भाग या संघटनेच्या ताब्यात आहे. नवी खिलाफत स्थापन करणे हे या संघटनेचे ध्येय. ते पूर्ण करण्यासाठी आता इसिसच्या फौजांनी बगदादकडे मोहरा वळविला आहे. लोकशाहीचे नाव घेत बुश यांनी इराकवर चढविलेल्या हल्ल्याला आणि ओबामा यांनी सीरियात चालविलेल्या हस्तक्षेपाला आलेले हे कडू फळ आहे. इसिसची ही नवी खिलाफत रुजण्यापूर्वीच ती उखडून टाकावी लागेल. तेवढी ताकद इराकमध्ये नाही. त्यामुळे अमेरिकेला तेथे पुन्हा फौजा पाठवाव्या लागतील. ते ओबामांपुढचे आव्हानच असेल. सीरियातील बशर-अल-असद हे इराणचे मित्र. त्यांच्या विरोधातील सुन्नी संघटनेच्या हातात इराकची सत्ता जाणे हे शियाबहुल इराणला खपणारे नाही, हे स्पष्ट आहे. आणि इराणचा इराकमधील हस्तक्षेप ओबामा प्रशासनाला मान्य होणारा नाही. एकंदर अमेरिकी राजकारणाची परिस्थिती आपल्या पायात आपणच पाय घालून तोंडावर आपटावे अशी झाली आहे. पण यातून अमेरिकी मुत्सद्दय़ांचे हसे झाले म्हणून कोणी टाळ्या पिटता कामा नये. इसिस हा जागतिक शांततेपुढचा सर्वात मोठा धोका असणार आहे. मोसुल पडले या घटनेचा अर्थ एवढा भयाण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा