कधी मनाजोगते उत्पादन होते, पण बाजारात पदरी निराशा येते. हंगामाच्या सुरुवातीला मांडलेले आडाखे आणि जुळवलेले गणित पार विस्कटून जाते. तरीही पुन्हा उमेद गोळा करून माणसे पेरणीच्या तयारीला लागतात. पेरलेले उगवेल का? उगवलेले पिकेल का? आणि पिकलेले चांगल्या किमतीत विकेल का? अशी प्रत्येकच टप्प्यावर वर्षभर धास्ती वाटायला लावणारी परिस्थिती. तरीही मृगाच्या आगमनप्रसंगी सगळ्या परिस्थितीवर पाय रोवून माणसे पुन्हा उभी राहतात.
पाहता पाहता आभाळात काळ्या ढगांची तटबंदी दिसू लागते तेव्हा लोक बोलू लागतात, आभाळाने कोट केलाय. त्याच्या येण्यासाठी सारेच आसुसलेले असतात आणि ढगांच्या वाटेवर डोळे अंथरलेले असतात. तो जेव्हा सुसाटय़ाच्या वाऱ्यासह येतो तेव्हा झाडे-पाने एकच गलका करतात. धुवाधार पावसात जवळचे माणूस दिसत नाही. तो कोसळत राहतो आणि माणसे जगण्याच्या आशा-आकांक्षा त्याच्या आधाराने पेरूलागतात. आभाळात ढग दिसत नाहीत तेव्हा तगमग चाललेली असते. वारंवार माणसे वर डोळे रुतवून पाहतात, पण तो एकदा बरसू लागला की झाडे जशी निथळतात तसे माणसांच्या, गुराढोरांच्या चेहऱ्यावर समाधान निथळू लागते. रोहिण्या धायधाय कोसळू लागतात, पण खरी भिस्त असते ती मृगावर.
पाळणा हलतो भावाआधी बहिणीचा
पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा
ही पूर्वापार चालत आलेली लोकश्रद्धा. मृगाआधी रोहिण्या कधी बरसतात तर कधी रुसतात. पाऊस पेरणीआधी कोसळतो तेव्हा तो सगळीकडे सारखा बरसत नाही. अध्र्या शिवारात बरसतो तर अध्रे शिवार कोरडेच ठेवतो. अशा पावसाच्या बेभरवशाचा अनुभव जुन्या माणसांनी घेतलेला असतो. म्हणूनच तर ते म्हणतात, ‘हा पाऊस बलाच्या एका िशगावर पडला तर दुसऱ्या िशगावर पडेल असे नाही’ इतका हा बेभरवसा. पाऊस हा नाना रूपांनी येतो, त्याच्या येण्याच्या तऱ्हा प्रत्येक वेळी वेगळ्या. गावाकडच्या पावसाची रूपेही अनेक. तो जर िशतोडे पडल्यासारखा असेल तर ‘सडा िशपल्यावानी’ असतो. पेरणीआधी नांगरून, मोगडून तयार केलेल्या रानात हा पाऊस जेव्हा  दमदार हजेरी लावतो आणि पाणी साचते तेव्हा ‘चांदण्या साचल्या’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. पेरणीच्या दिवसांत माणसे त्याची जी वाट पाहतात तेवढी कोणाचीही पाहत नाहीत. तो येतो तेव्हा जिवाभावाचा माणूस धावून आल्यासारखेच वाटते या लोकांना.
हा पाऊस कधी दिवसाढवळ्या अंधार करतो, सारा आसमंतच अंधारून येतो. गार वारे सुटू लागते. काही थेंब सुटतात आणि त्यानंतर सुरू होतो पावसाचा ताल. कधी तो महामूर कोसळतो तर कधी चकवा दिल्यासारखा क्षणार्धात गायब होऊन जातो. सगळीकडे अंधारून आलेले आभाळ मोकळे दिसू लागते तर कधी मोकळ्या आभाळातच ढगांचा गडगडाट सुरू होतो. पाहता पाहता पावसाचा जोर वाढू लागतो. आता आता कोरडे दिसणारे रान काही वेळाने पावसाने चिंब भिजू लागते.
शेतकरी सगळी तयारी करून ठेवतात, पण जोवर पाऊस येत नाही तोवर काहीच करता येत नाही. जणू पाऊलच अडखळलेले असते. पायात पाय घुटमळत असतात. पावसाच्या दिवसांत जर केवळ भणाण वारे सुटू लागले तर माणसे सरभर होतात. पेरणीच्या दिवसांत खरीखुरी लगबग असते ती बायांची. सकाळची घरची सगळी कामे आवरून पेरणीला लागावे लागते. दिवस उजाडण्याआधीपासून कामांचा डोंगर पार करायचा असतो. कधी कधी भाकरी खायलाही फुरसत मिळत नाही सकाळच्या कामांच्या धबडग्यात. अशा वेळी शेताच्या वाटेवर पायी चालता चालता हातात भाकरी घेऊन खाणाऱ्याही बाया दिसू लागतात. शेतात गेल्यानंतर कंबरेला ओटी बांधून तिफणीच्या मागे दिवसभर धावावे लागते. ओटीतल्या धान्याची एक एक मूठ चाडय़ावर मोकळी करताना बलांच्या चालण्याचा वेग पकडावा लागतो. मुठीतून सुटणारे धान्य काळ्या मातीच्या पोटात गाडून घेते. पाऊस नाममात्र झाला तर या मातीत गाडलेल्या ओलसर बियाण्याला किडे-मुंग्या लागतात. दमदार पावसानंतरच त्याला अंकुर फुटतात आणि तेव्हाच कळते पेरणी दाट झाली की पातळ. पेरणी चांगली झाली तर पेरणाऱ्या बाईला चार चांगले शब्द ऐकायला मिळतात. तिचा हातगुण चांगला आहे अशी भलावण होते घरात आणि पेरणी जर फिसकटली तर बिचारीला वर्षभर बोलणी खावी लागतात. तसे या बायाबापडय़ांचे आणि पेरणीचे खूपच जवळचे नाते. धान्य बाईच्या मुठीतून सुटून थेट मातीत जन्म घेते. अंकुरल्यानंतर पुन्हा कैक पटीत उगवून वर येते.
पेरणीच्या दिवसांत पावसाच्या बारीकसारीक सरी दिवसभर येत राहतात. अंगावरचे कपडे अंगावरच वाळतात. दिवसभर हे भिजणे, वाळणे सुरूच असते. काही ठिकाणी पावसाच्या तडाख्यातून वाचायला शेतात आडोसा नसतो. चुकून एखाद्या झाडाचा आडोसा मिळालाच तर तो पाऊस कमी आहे तोपर्यंतच. एकदा पावसाचा जोर वाढला की झाडही सगळीकडून टपकायला लागते. अशा वेळी झाडाचा आधारही मग उरत नाही. काही शेतांत झाडझुडूप नसल्यानंतर तिफन थांबवून उभ्या असलेल्या बलांच्या पोटाखालीच आधार घ्यावा लागतो. पाऊस जेव्हा चहूबाजूंनी झोडपायला सुरुवात करतो तेव्हा त्याला कोणतीच दिशा राहत नाही. वाऱ्याच्या उभ्या-आडव्या तांडवातून पावसाला वाटते स्वत:ची सुटका करून घ्यावी. मग हाच पाऊस सगळीकडून छडीमार करायला लागतो.
..वर्षभर किती कटकटी झेललेल्या असतात. बी-बियाणे, खतांची तडजोड करताना किती नाकीनऊ आलेले असतात. कधी रासायनिक खतांची मारामार होताना दुकानासमोरच्या झुंडीत लाठय़ाकाठय़ा खाल्लेल्या असतात तर कधी पावसाने ताण दिल्याची असहायता असते. कधी मनाजोगते उत्पादन होते, पण बाजारात पदरी निराशा येते. हंगामाच्या सुरुवातीला मांडलेले आडाखे आणि जुळवलेले गणित पार विस्कटून जाते. तरीही पुन्हा उमेद गोळा करून माणसे पेरणीच्या तयारीला लागतात. जुना विस्कटलेला सगळा हिशोब विसरून नव्याने कामाला लागतात. नवे काही मिळविण्यासाठी म्हणण्यापेक्षा गेलेले परत मिळविण्याच्या आशेवरच ही धडपड सुरू असते. एकदा डावात हरल्यानंतरही पुन्हा दुसऱ्या डावासाठी तयार. याच पेरणीच्या भरवशावर काय काय स्वप्ने पाहिली जातात. हंगाम चांगला गेला आणि हाताशी काही शिल्लक उरले तर कोणाला कोरडवाहू शेती परवडत नाही म्हणून पाण्याची सोय करायची असते. कोणाला वर्षांनुवष्रे घरावरचे छप्पर नीट नाही किंवा िभती खचल्यात म्हणून घराची डागडुजी करायची असते, कुठे नव्या घराच्या बांधकामाची स्वप्ने पाहिली जातात. कोणाला लेकीबाळींचे लग्न तर कोणाला पोराबाळांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविण्याची आशा. डोळ्यांत अशी स्वप्ने आणि वास्तव मात्र कायम काळवंडून टाकणारे. पेरलेले उगवेल का? उगवलेले पिकेल का? आणि पिकलेले चांगल्या किमतीत विकेल का? अशी प्रत्येकच टप्प्यावर वर्षभर धास्ती वाटायला लावणारी परिस्थिती. तरीही मृगाच्या आगमनप्रसंगी सगळ्या परिस्थितीवर पाय रोवून माणसे पुन्हा उभी राहतात. झाले-गेले विसरून नव्या कल्पनांची जुळवाजुळव मनाशी बांधत राहतात. सरत्या वर्षांतल्या सगळ्या कटकटी विसरून पुन्हा सावरतात, नवीन बळ संचारते त्यांच्यात. केवळ बियाणे किंवा धान्यच नाही तर इथे जगणेच पुन्हा नव्याने पेरले जाते, नव्या आशा-आकांक्षांसहित..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा