ऑस्ट्रेलियातील सत्ताधारी मजूर पक्षातील राजकीय खंजीरबाजीचे एक वर्तुळ काल पूर्ण झाले. मजूर पक्षाच्या नेत्या आणि पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी त्यांचे कट्टर शत्रू केव्हिन रूड यांची नियुक्ती झाली. कालच त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच महिन्यात गिलार्ड यांनी रूड यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना पक्षनेतेपद सोडण्यास भाग पाडले होते. रूड हे तेव्हा पंतप्रधान होते. त्यांची जागा गिलार्ड यांनी घेतली. या खांदेपालटानंतर काही महिन्यांतच, २०१०मध्ये ऑस्ट्रेलियात सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात गिलार्ड यांनी कशीबशी सत्ता राखली. आता येत्या सप्टेंबरमध्ये तेथे पुन्हा निवडणूक होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर रूड यांनी आपले खंजीर परजले आणि पक्षबैठकीत गिलार्ड यांचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतांनी पराभव केला. एकंदरच इतिहासाला पुनरावृत्तीची खोड असते, असे म्हणतात. त्यानुसार हे सर्व झाले. तेव्हा त्याबद्दल कोणी फार वाईट वाटून घेण्याची गरज नाही. शिवाय गिलार्ड यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने आगामी निवडणूक लढविली असती, तर पक्षाला किमान ३५ जागांवर पाणी सोडावे लागले असते, असा निवडणूकपूर्व मतचाचण्यांचा अंदाज आहे. तेव्हा कोणताही पक्ष अशा परिस्थितीत जे करील तेच मजूर पक्षाने केले, असेही यावर म्हणता येईल. तेव्हा या खंजीरखेळावर टीका करण्याचे काही कारण नाही. सत्ताकारणाचा एक भाग म्हणून त्याकडे दुर्लक्षही करता येईल. पण त्याला असलेला पुरुषी वर्चस्ववादाच्या कंगोऱ्यांकडे कसे दुर्लक्ष करणार? ऑस्ट्रेलिया हा तसा प्रगत वगैरे म्हटला जाणारा देश आहे. त्यामुळे तेथे राजकारणात महिलांप्रती किमान समानता, आदर अशा भावना असण्यास हरकत नाही. परंतु भौतिक प्रगतीने सामाजिक वैचारिक धारणा बदलतातच असे नाही. आपण हे नित्यदिन अनुभवतो आहोत. ऑस्ट्रेलियातील अनुभवही याहून वेगळा नाही. एडवर्ड नेड केली हा रॉबिनहूडचा ऑस्ट्रेलियन अवतार ज्यांचा राजकीय आयकॉन आहे अशा या देशात एका महिलेची पंतप्रधानपदी निवड होणे हा खरे तर एक सुखद धक्का होता. मध्ययुगीन मानसिकतेतून हा देश बाहेर आला की काय असा संशयही तेव्हा अनेकांना आला होता. परंतु नंतर तेथील विरोधकांनी, पक्षातील हितशत्रूंनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांनी गिलार्ड यांना ज्या प्रकारे लक्ष्य केले ते पाहता या देशाला पंतप्रधानपदी एका महिलेचे असणे हे कधी मानवलेच नव्हते असे म्हणावे लागेल. गिलार्ड या विनापत्य आहेत. अशी वांझ बाई देशातील नागरिकांचा काय सांभाळ करणार, असा प्रश्न ज्या देशातील खासदार विचारू शकतो, वर त्याचे समर्थनही करतो आणि त्यामध्ये काही वावगे आहे असे ज्या देशातील बहुसंख्यांना वाटत नाही, त्या देशात राजकारणातील महिलेची प्रतिष्ठा ती काय असणार? यावर कडी म्हणजे गिलार्ड यांच्या पक्षातील एका नेत्याने निधीसंकलनासाठी आयोजित केलेल्या भोजन समारंभातील एका खाद्यपदार्थाला ज्युलिया गिलार्ड यांचे नाव देताना असभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या आणि यावर ज्या प्रसारमाध्यमांनी आवाज उठवायचा, ती चवचालपणे गिलार्ड यांच्या कपडय़ांची फॅशन कशी वाईट आहे, यावर चर्चासत्रे घडवत होती. देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली आहे, गिलार्ड यांनी प्रदूषण करासारखे कर लादून लोकांचा रोष ओढवून घेतला आहे म्हणून त्यांना जावे लागले, असे असते तर त्याबाबत कोणाचेही काही म्हणणे असण्याचे कारण नव्हते. पण गिलार्ड यांना त्यांचे बाईपण नडले. ही वस्तुस्थिती फारच क्लेशदायक आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा