‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान. ही अशी जाणीव मनुष्याकडे आहे म्हणून नीतिशास्त्र निर्माण होऊ शकते, ‘योग म्हणजे चित्तवृत्तीनिरोधन’याचा अर्थ माणसांना कळू शकतो, धर्म- धर्माज्ञा आणि राज्यघटनाही निर्माण होऊ शकते..
‘भान’ म्हणजे सावधपण किंवा जाणीव होणे. आकलन, समजणे, शुद्ध येणे हे काही इतर समानार्थी शब्द. भान हा फारसा प्रचलित शब्द नाही. जाणीव हा मात्र अधिक वापरात असलेला शब्द आहे. जाणीव म्हणजे समजूत, ज्ञान.
या लेखात ‘जाणीव’ ही संज्ञा मराठीतील अथवा कोणत्याही भाषेतील विशिष्ट शब्द म्हणून नाही तर ‘एक तात्त्विक संकल्पना’ या अर्थाने आणली आहे. ‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. तिचे उत्तर मानसशास्त्र, मज्जातंतूशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांकडून दिले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र तर हा स्वत:चा क्षेत्रसिद्ध अधिकार समजते. उदाहरणार्थ, जाणीव-राणीव-नेणीव किंवा बोध-अबोध मन, इत्यादी. पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. प्रश्न तात्त्विक असल्याने उत्तर तात्त्विक शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
या विश्वाविषयी माणसाला अपार कुतूहल आहे. विश्वाचे निरीक्षण करताना माणसाला दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. काही गोष्टी निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. जिवंत असणे ही सजीवता आणि जिवंत नसणे ही निर्जीवता.
माणूस, प्राणी हे सजीव तर दगड, धोंडा निर्जीव. सजीवता ही विशिष्ट घटना आहे. काही वेळा तिची मिसळण झाल्याचे वाटून निर्जीव वस्तूही सजीव असल्याचा भास होतो. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा विश्वास होता. रेल्वेचा शोध लागला त्या काळात सुरुवातीला ‘हा माणसांना खाऊन टाकणारा राक्षस आहे’, असे वाटून रेल्वे ओस पडली होती. वनस्पतींनाही सजीव मानले जाते, पाणी जिवंत समजले जाते. आज संगणकाला ‘विचार करणारे यंत्र’ हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंत्रमानव, उपमानव या अत्याधुनिक; तर यक्ष, किन्नर या जीवयुक्त मानवाच्या प्राचीन कल्पना आहेत. वनस्पती सृष्टी, पाणी यांना सजीव मानल्यामुळे निसर्गही सजीव बनतो. एवढेच काय, पण अखिल ब्रह्मांडात पृथ्वी हाच एकमेव सजीव ग्रह मानला जातो.
या साऱ्या ठिकाणी सजीवतेचा अर्थ चेतना असणे असा समजला जातो. पण चेतना आणि जाणीव यात फरक करणे गरजेचे आहे. खुर्ची आणि खुर्चीत बसलेला माणूस यात फरक काय? खुर्ची जिवंत नाही, माणूस जिवंत आहे; माणसात चेतना आहे. चेतना ही काय गोष्ट आहे? ती देहाशिवाय स्वतंत्र असणारी की देहाशीच निगडित असणारी गोष्ट आहे? या चेतनेचे स्वरूप काय? बेशुद्ध माणूस आणि मृत माणूस यांच्यात चेतनाचे स्वरूप काय?
येथे चेतना (consciousness) आणि जाणीव (awareness) असा फरक शक्य आहे. मृतात चेतना नसते आणि बेशुद्ध माणसात चेतना असते, पण ‘जाणीव’ नसते. येथे मृताविषयी विचार करावयाचा नसून जिवंत माणसाविषयी विचार करावयाचा आहे. बेशुद्धावस्थेतील माणसातील चेतना ही ‘जीवशास्त्रीय चेतना’ आणि शुद्धीवर असलेल्या माणसातील चेतना ही ‘ज्ञानशास्त्रीय चेतना’ होय. या दुसऱ्या ज्ञानशास्त्रीय चेतनेलाच ‘जाणीव’ (awareness) म्हणता येईल.
आता, दुसऱ्या चेतनेबद्दल- ज्ञानशास्त्रीय जाणिवेबद्दल अधिक विचार करावा लागेल. बेशुद्धावस्थेत माणसाला कळत नसतेच, पण ‘आपल्याला कळत आहे की नाही’ हेही त्याला कळत नसते. म्हणून कळणे आणि आपल्याला कळणे, यात फरक करता येतो. या दुसऱ्या गोष्टीलाच बहुधा स्वजाणीव म्हटले जाते. अर्थात प्रत्येक वेळी ‘आपल्याला कळत आहे’ हे स्पष्टपणे कळलेच पाहिजे, असे नाही. काही वेळेला तरी ‘आपल्याला कळत आहे’ किंवा ‘आपल्याला कळत नाही’ हे त्याला नक्कीच कळत असते. हे दुसरे कळणे, हेच माणसाचे मुख्य सामथ्र्य आहे. ते ज्ञानाचे ज्ञान होय. स्वजाणिवेची जाणीव अशी पुढची पायरी असू शकते.
माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. ‘मी’ ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: ‘मी’च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. ही ज्ञानशास्त्रीय जाणीव प्राण्यांमध्ये नसते. प्राणी आणि माणूस यांच्या आहार, निद्रा, भय, मथुन या प्रेरणा सारख्याच असतात. पण प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
काय कळते आहे, यात स्वत:ची जाणीव समाविष्ट असल्याने माणूस ‘स्व’चा शोध घेतो. हा ‘स्व’ म्हणजे भाषिक पातळीवर ज्याला ‘मी’ म्हटले जाते ते आत्मभान असते. बुद्धिमान प्राणी ते भक्त किंवा ‘मी ब्रह्म’ हा आत्मभानाचा कल्पनाविस्तार असतो.
आत्मभानाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीव कोणते मानवी कार्य घडवून आणते? ही जाणीव अनघड, भरड अशा निसर्गातून मानवी जगाची निर्मिती करण्याची प्रेरणा माणसाला देते. हे सामाजिक जग असते. पृथ्वी या खगोलशास्त्रीय जगावर सामाजिक जगाचे आरोपण होते. अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, साहित्य, सौंदर्य, नीती, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान या मानवी निर्मिती रूपात आत्मभानाचे प्रकटीकरण घडते.
लक्षात हे घेतले पाहिजे की, रोज अन्नाची गरज असली तरी प्राणी पाकशास्त्र निर्माण करीत नाहीत, माणूस निर्माण करतो आणि माणूस पाकशास्त्र, कामशास्त्र निर्माण करतो तसा धर्मशास्त्र, धर्मग्रंथही निर्माण करतो. धर्माज्ञाही माणूसच निर्माण करतो, लिखित-अलिखित भाषा माणूसच निर्माण करतो. संयम बाळगण्याची क्षमताही ‘माझी’च असते, हेही ‘माझे’च भान आहे.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे. खगोलीय जगाची निर्मिती आणि तिचा संहार ‘मी’ करीत नाही, ते ‘माझ्या’ पलीकडचे आहे; बेभान झालो की सामाजिक जगाचा संहारही ‘मी’च करतो. तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी ‘योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध’ असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते ‘निरोध’ या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. ‘निरोधनाचे’ भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे ‘निरोध’ सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही ‘दु:खनिरोध’ आढळतो, तो याच भानातून.
हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे. ‘धृ’ म्हणजे धारण करणे (धारयति इति धर्म:) म्हणून धर्म म्हणजे लोकधारणा करणारे तत्त्व. लोकशाही हा आजचा धर्म, ‘युगधर्म’ आहे. संविधान हीच माझी ‘धर्माज्ञा’ असते. लोकशाही हा अत्याधुनिक, व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची संधी देतो. संविधान ही ‘धर्माज्ञा’ ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही ‘धर्माज्ञा’ कालसुसंगत करता येते.
भानावर येण्यापूर्वी या रीतीचे आत्मभान आपण जागे करू शकलो तर आणखी काही गोष्टींचे भान विकसित करणे सहजी जमेल.
* लेखक संगमनेर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आणि तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत. ई-मेल : madshri@hotmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा