पावसाच्या कृपावृष्टीने रोमांचित होण्याचे समाधान लाभू नये असाच कालच्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा संदेश होता. उद्योगांची घबराट, रुपयाची घसरण, अमेरिकेची घुसमट आदींनी आपल्या सगळ्यांच्याच अर्थकारणातील घालमेल वाढवली आहे. भरगच्च पावसाने येणारे आषाढी समाधान यंदा नाही असे वातावरण घनदाटले आहे.
एके काळी आषाढाचा पहिला दिवस गोडगुलाबी भावना रुजवत असे. कवी कुलगुरू कालिदासाने या दिवसाच्या मुहूर्तावर आपल्या प्रेयसीस मेघांच्या माध्यमातून संदेश दिल्यापासून तर आषाढ आणि मेघदूत हे अद्वैतच बनून गेले. त्याचा परिणाम आधुनिक गद्य कालिदासांवरदेखील इतका की मिळेल त्या मार्गाने.. आणि वाहनाने.. हा दिवस साजरा करण्याची स्पर्धाच लागते. आजही लोणावळ्याच्या वळणवाटांवर वा माळशेज वा अन्य ठिकाणी बेचव मक्याच्या कडब्यास भुट्टे म्हणून खात आषाढ साजरा होतो. नंतर येणाऱ्या श्रावणाच्या आधी जिभेचे चोचले पुरवून घेण्याची संधी या अर्थानेही आषाढाकडे पाहिले जाते. परंतु गेली काही वर्षे हा आषाढ काही तितकासा गोडगुलाबी राहिलेला नाही. गेल्या वर्षी तर कालिदास जिवंत असता तर त्याला निरोप पाठवण्यापुरतादेखील काळा ढग आकाशात सापडला नसता. कालिदासाच्या रामटेकातही आषाढ कोरडाच गेला. मराठवाडय़ाचे तर विचारायलाच नको. गेल्या वर्षीचे करपलेले पीक मराठवाडाकरांनी आसवांवरच काढले. कोकणात तसा तो बऱ्यापैकी बरसला. पण कोकणच्या मातीत काव्य असले तरी ते भूगोलात नाही. त्यामुळे तिकडे पडलेला पाऊस तसा समुद्रातच वाहून जातो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर बरसूनही प्रगतीच्या बाबत कोकण कोरडेच राहते. पश्चिम महाराष्ट्राचे तसे नाही. इतरांच्या भूभागांवर बरसणारा पाऊस आपल्या अंगणात खेचून घेण्याची ताकद काळ्या मातीत ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती असल्याने ढग कोणत्याही प्रदेशावर असले तरी पाऊस मात्र प. महाराष्ट्रात पडतो. हे त्या प्रांताच्या नेतृत्वाचे यश. तेव्हा प. महाराष्ट्राला दुष्काळातही अगदीच ओलावा मिळाला नाही, असे म्हणता येणार नाही. यंदाचे मात्र तसे नाही. आषाढच काय पण मृग मुहूर्त गाठायच्या आधीच या वर्षी पावसाने महाराष्ट्रावर कृपावृष्टी केली. त्यामुळे आषाढ लागेपर्यंत सगळे राज्यच तसे हिरवेगार बनून गेले. आकाशातून शतधारांनी बरसणारे हे कृपादान इतके भरभरून मिळाले की, विदर्भातील रामटेकच्या परिसरास तर पुराचाच तडाखा बसला. तेव्हा यंदा कालिदास असता तर आकाशातील ढगांऐवजी त्याने पाण्याच्या सुबक, निर्मळ ओहोळासच आपला निरोप्या बनवले असते. या वर्षी मराठवाडय़ाचा जन्मजात कुपोषित असा काही प्रदेश सोडला तर राज्यात सर्वत्र पावसाची चांगलीच कृपा आहे, असे म्हणावयास हवे. गेली काही वर्षे आषाढी एकादशीला पांडुरंगास सरकारी इतमामात अभिषेक करताना आशीर्वाद म्हणून राज्यात चांगले पीकपाणी होऊ दे, असे मुख्यमंत्र्यांनी मागायची प्रथा होऊन गेली आहे. यंदा तिला छेद द्यावा लागेल असे दिसते. कारण पुंडलिक वरदा वारीच्या आधीच राज्यात चांगल्यापैकी पाऊसपाणी झाले आहे. परंतु तरीही ठिकठिकाणांच्या कालिदासांचे तोंड काळवंडलेले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर भरगच्च पावसाने येणारे आषाढी समाधान नाही.
याचे कारण अर्थव्यवस्था. आषाढाच्या पहिल्याच दिवशी अर्थव्यवस्थेचे जे काही निरोप आलेले आहेत ते आषाढआशेवर पाणी टाकणारेच आहेत. देशातील सर्वात मोठी मोटारनिर्मिती करणारी कंपनी असलेल्या मारुतीला मागणीअभावी आपला कारखाना काही दिवस बंद ठेवावा लागणार आहे. मुळात गेले काही महिने मारुतीने आपला उत्पादन वेग काहीसा कमीच केला होता. परंतु तेवढय़ाने भागलेले नाही. आता काही दिवस ही कंपनी बंद ठेवावी लागणार आहे आणि त्यामुळे किमान २०० जणांच्या रोजगारावर गदा येणार आहे. म्हणजे आषाढाच्या पहिल्याच दिवशी या मंडळींना आपापल्या घरी नोकऱ्या गेल्याचा संदेश द्यावा लागलेला आहे. टाटा कंपनीच्या वाहनविक्रीतही कमालीची घट झालेली आहे. तिकडे अमेरिकेत होंडा आणि टोयोटा या मोटारनिर्मिती कंपन्यांचीदेखील अशीच अवस्था झालेली आहे. या कंपन्यांचे अधिक उत्पादन झालेले असल्याने आणि त्या प्रमाणात मागणी नसल्याने या कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांच्या निर्मितीचा वेग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच अमेरिकेच्या रिझव्र्ह बँकेचे.. म्हणजे फेडरल रिझव्र्हचे प्रमुख बेन बर्नाके यांनी उद्योगांना दिली जाणारी आर्थिक सवलत मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने उद्योगांच्या मनांतही भवितव्याबाबत साशंकता निर्माण झाली असून या उद्योगांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपापली मूठ अधिकच घट्ट केली आहे. भविष्यावर काळे ढग जमा झाले की माणूस खर्चाच्या बाबत हात आखडता घेतो. वेळप्रसंगी चार पैसे गाठीस असलेले बरे, असा त्यामागचा विचार. त्यामुळे अमेरिकी नागरिकाने काटकसरीस सुरुवात केली तर ते नैसर्गिकच म्हणावयास हवे. परंतु त्यामुळे जगातील अनेक देशांच्या रोजगारांवर परिणाम होऊ लागलेला आहे. धनवानाने हात सैल सोडला नाही तर गरिबाची उपासमार होते, हे साधे तत्त्व. जगाच्या बाजारात हा धनवान अमेरिका असल्याने त्या देशाने चार पैसे वाचवायचा प्रयत्न केला तर ते आपल्यासारख्याचे चार पैसे हिरावून घेणारे आहे. त्याचमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेची दिशा काय राहील हे अमेरिकी मध्यमवर्गीय किती काटकसर करतो त्यावर अवलंबून राहील, असा अहवाल आषाढाच्या पहिल्याच दिवशी जागतिक अर्थवृत्तसंस्थांनी दिलेला आहे. त्यात या आषाढाच्या पहिल्याच दिवशी रुपयाने चांगली आपटी खाल्ली आहे. भरपावसात निसरडे झालेल्या रस्त्यावर पाय घसरल्यास ज्याप्रमाणे तोल सांभाळता येत नाही आणि पडणे टाळता येत नाही तसे रुपयाचे झाले आहे. किती आणि कशावर आपटणार हेच तेवढे पाहायचे. आषाढाच्या पहिल्याच दिवशी तो इतका जोरात आपटला की डॉलरच्या किमतीने पहिल्यांदाच ६१ रुपयांचा टप्पा पार केला. आता तर समग्र आशियाई खंडातील अत्यंत अशक्त चलन म्हणून रुपयाचा उल्लेख होऊ लागला आहे. म्हणजे चांगल्या पावसाच्या प्रसादाने जमिनीतून सर्वत्र हिरवे कोंब उगवून येत असताना त्याचा आनंद मिळण्याऐवजी सर्दीपडसे आणि ज्वराने बेजार होऊन एखाद्यावर अंथरुणास खिळून राहण्याची वेळ यावी तसे रुपयाचे झाले आहे. एरवी चांगला पाऊस म्हणजे चांगले पीकपाणी आणि जमिनीत आनंदकंद असे समीकरण असे. यंदा ते खोटे ठरताना दिसते. डॉलर वाढून रुपया घसरला की तेलाच्या किमती वाढतात. याचा थेट परिणाम असा की, तेल आयात करणाऱ्यांच्या तिजोरीचे भोक अधिकच मोठे होते. त्यामुळे आपल्याकडेही इंधनाच्या भावात आता आणखी वाढ होणे अपरिहार्य असून आषाढाचे बोट धरून येणाऱ्या श्रावणातील सणसमारंभांचा प्रवासखर्च अधिकच वाढणार हे उघड आहे. याचा दुसरा अर्थ असा की रिझव्र्ह बँक आपल्या पुढील पतधोरणात व्याजदरात कपात करणार नाही. रुपया गुरुत्वाकर्षणाने भारलेला, त्यामुळे चालू खात्यात वाढलेली तूट आणि त्यात अन्न सुरक्षा विधेयकाने वित्तीय तुटीचे वाढवलेले भगदाड इतके सगळे मुद्दे लक्षात घेता रिझव्र्ह बँक व्याजदरांत कपात करून पतपुरवठा सुलभ करण्याची सुतराम शक्यता नाही. तेव्हा या नकारात्मक वातावरणात आता अधिकच भर पडेल.
अशा तऱ्हेने आषाढाच्या पहिल्याच दिवशी या अशा अशुभवर्तमानाच्या धारा जनसामान्यांवर बरसल्या आहेत. तेव्हा या पिचलेल्या सामान्य माणसास मेघदूत कुठले सुचायला. खिशात चार पैसे असले तरच प्रेयसीला निरोप पाठवण्याचा आनंद परवडू शकतो आणि फाटक्या खिशाच्या प्रियकराकडे प्रेयसीदेखील ढुंकून पाहात नाही. तेव्हा सामान्य भारतीय आषाढस्य प्रथम दिवसे.. असे म्हणत ढगालाच निरोप्याचे रोमँटिक काम सांगण्याऐवजी आषाढस्य प्रथम अर्थे या जाणिवेने खिशाकडेच हात नेण्याची शक्यता अधिक.
आषाढस्य प्रथम ‘अर्थे’
पावसाच्या कृपावृष्टीने रोमांचित होण्याचे समाधान लाभू नये असाच कालच्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा संदेश होता. उद्योगांची घबराट, रुपयाची घसरण, अमेरिकेची घुसमट आदींनी आपल्या सगळ्यांच्याच अर्थकारणातील घालमेल वाढवली आहे. भरगच्च पावसाने येणारे आषाढी समाधान यंदा नाही असे वातावरण घनदाटले आहे.
First published on: 10-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beginning of positive things