निष्क्रिय व भ्रष्ट सरकारी यंत्रणेमुळे गरीब संधीपासून वंचित राहतात, प्रस्थापित मात्र सहजगत्या संधी हस्तगत करतात. या विषम संधीला कॅथरीन बू यांचं ‘बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर्स’ हे पुस्तक वारंवार अधोरेखित करीत राहतं. बुद्धी, गुण असूनही कित्येक वंचितांना संधी मिळत नाही, हे समाजासाठी अतिशय घातक लक्षण आहे. वरकरणी शांत भासणाऱ्या समाजातील अशांततेचा दाह या पुस्तकातून पोळत राहतो.

का हे बांधकाम सुंदर, फक्त नश्वरतेचे मखर
अथवा दर्शनी महाद्वार, मिथ्यत्वाचे ?
बा. सी. मर्ढेकर
महानगरी मुंबईला संपूर्ण जगाशी जोडणाऱ्या सहार आंतरराष्ट्रीय विमानतळालगत अनेक सप्ततारांकित हॉटेलांची दुनिया आहे. सदासर्वदा लखलखाटात वावरणाऱ्या या जगाला साजेशा वस्तूंच्या जाहिराती तिथे विराजमान असतात. तिथून काही अंतरावरील प्रदीर्घ लांबीच्या िभतीवर ‘निरंतर सुंदर’ राहणाऱ्या गुळगुळीत फरशांची आकर्षक जाहिरात आपले लक्ष वेधून घेतेच. या िभतीपलीकडे एकमेकांना खेटलेल्या ३३५ झोपडय़ांच्या वस्तीत मुंबईचा शेकडो टन कचरा उंदीर, घुशी, शेळ्या, म्हैशी, डुकरं यांच्यासह ३,००० माणसं राहतात. त्यांना भूक भागवण्यासाठी इतर काही न मिळाल्यास उंदीर किंवा बेडूक उपयोगी पडतात. झोपडपट्टीच अनधिकृत असल्यामुळे तिथल्या रहिवाशांची दारिद्रय़रेषेखाली नोंद नाही. अशा झोपडपट्टीवरून आपण अनेक वेळा जातो. कित्येक वेळा असे दरिद्री लोक आपल्याला दिसतात. त्यांचा  विचार आपल्याला त्रास देत नाही. त्या प्रतिमा आपल्याला छळत नाहीत. आपल्या विश्वाशी ‘त्या’ गरीब जगाचा स्पर्शसुद्धा होऊ न देण्याची खबरदारी आपल्या मनाच्या ‘निवडक’ संवेदना घेत असतात. त्यामुळे झटकन धूळ झटकल्यागत त्यांना बाजूला सारून आपण ‘पुढे’ जात राहतो. ‘निरंतर सुंदर’ देखावा करणारी िभत ‘ते जग’ दिसू नये याची दक्षता घेत राहते. जागतिक आणि अगतिक भारताची फाळणी दाखवणारी ही िभत आहे.
देशाची वा संस्कृतीची माहिती नाही, भाषा येत नाही तरीही अण्णावाडी वस्ती पाहून ‘न्यूयॉर्कर’च्या अमेरिकन पत्रकार कॅथरिन बू यांना अतोनात प्रश्न पडले. गेली वीस वष्रे त्या सातत्याने विकासापासून दूर राहणाऱ्या समाजाविषयी अभ्यासपूर्ण लिखाण करत आहेत. २००० साली त्यांनी लिहिलेल्या मतिमंद मुलांच्या घराचे अवलोकन करणाऱ्या लेखमालेला ‘पुलित्झर’ पुरस्काराचा सन्मान लाभला होता. वंचिंतांविषयीची त्यांची आस्था व जिज्ञासा कमी न होता उलट वाढत गेली. अण्णावाडीतील समाजजीवन, अर्थव्यवहार, गुन्हेगारी, राजकारण पाहून त्या अस्वस्थ झाल्या. साडेतीन र्वष वस्तीतील अनेकांना भेटत गेल्या. मुंबईत असंख्य लोकांच्या भेटी घेऊन अभ्यास केला. कॅथरिन यांची नतिक शोधयात्रा ‘बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर्स – लाइफ, डेथ अँड होप इन ए मुंबई अंडरसिटी’ या पुस्तकातून आपल्याला भिडत जाते.
वर्षांनुवष्रे घालवलेल्या त्यांच्या गावात भविष्य नसल्याची खात्री झाल्यावर हजारो लोक दररोज मुंबईकडे धाव घेतात. या मायावी नगरीत कुठे तरी संधी मिळेल, सरकारमुळे आपली अवस्था बदलेल ही आशा टिकून राहते. असह्य वस्तीत आणि विलक्षण विपरीत परिस्थितीतही उद्याची आशा तगून राहते. ही आशा आणि संधीचा शोध यातून त्यांचे रहाटगाडगे चालू राहते. पूर्वीच्या अनेक पिढय़ांना पुन्हा कधीतरी गावाकडे परत जाण्याची उमेद होती. परंतु अलीकडे दाखल होणारे गावाची नाळ पूर्णपणे तोडून येत आहेत. लेखिकेला या आशेचा आणि संधीचा मागोवा महत्त्वपूर्ण वाटतो. ‘‘सत्तेजवळच्या वर्तुळामध्येच संधी फिरत राहते. गरिबांनी लाच दिली तरच संधीची काही अंशी शक्यता निर्माण होते. हे सामाजिक-राजकीय पर्यावरण केवळ मुंबईपुरते मर्यादित नाही. वॉिशग्टन, न्यूयॉर्क, नरोबी, आदिस अबाबामध्ये अशीच परिस्थिती आहे,’’ हे  मर्म पुस्तकाच्या अखेरीस मनोगतामध्ये लेखिका सांगते.
अण्णावाडीतील बहुसंख्य मुलांचं स्वप्न पलीकडील झगमगाटी हॉटेलात वेटर होण्याचं आहे. एकोणीस वर्षांचा अब्दुल त्याचे वडील अंथरुणावर खिळल्यामुळे त्यांच्या व्यवसायात  शिरलाय. आठ मुलांना वाढवणारी अब्दुलची आई झेरून्निसा त्याला व्यवसायाचं  प्रशिक्षण देते. रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या अब्दुलला कचरा व भंगार निवडून पुनर्वक्रिी व्यवसायाचं गणित गवसलं आहे. काच, कागद, पत्रा व प्लॅस्टिक यातून उपयुक्त वस्तू बाजूला काढून त्यांची पुन्हा विक्री करण्याचं कौशल्य त्यानं मिळवलं आहे. शेकडो टन कचऱ्यातून नेमक्या वस्तू सहज हेरण्याची दृष्टी त्याला आली आहे. अब्दुलची वाढती कमाई अण्णावाडीच्या डोळ्यांवर येत आहे. झेरून्निसाला तिची स्वप्नं साकार करायची आहेत. ती घराचं नूतनीकरण चालू करते. घरात नवे फनिर्चर, फरशा, धूर जाण्यासाठी खिडकीसह स्वयंपाकघरात नव्या सुविधांची कामं चालू करते. अब्दुलच्या प्रगतीचा शेजारच्या अपंग फातिमाला कमालीचा मत्सर आहे. ‘‘तुमच्या दुरुस्तीमुळे आमच्या घरात तुमची घाण येतेय. जेवणात खडे येताहेत. घण बसल्याच्या आवाजात आम्हाला जगणं अशक्य आहे.’’ फातिमाचा आरडाओरडा नेहमीप्रमाणे चालू होतो. अब्दुलची आई झेरून्निसा तिला तितक्याच इरसाल भाषेत उत्तर देते. सवाल-जवाबातून भांडण कडाक्याचं होतं. तावातावात फातिमा सर्वासमक्ष अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेते. झोपडपट्टीवासीयांसाठी अब्दुलच्या मिळकतीतून काहीतरी हाताला लागण्याची ही संधी आहे. पोलिसांकरिता आयती पर्वणी आहे. अब्दुलच्या कुटुंबावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होतो. झेरून्निसा खुनाचे कलम रद्द करण्यासाठी पोलिसांना लाच द्यायला नकार देते. परिणामी अब्दुल, वडील हुसेन आणि झेरून्निसा यांना बेदम मारहाण करून तुरुंगात रवानगी होते. सज्ञान नसल्यामुळे अब्दुलला बाल सुधारगृहात पाठवले जाते. घरातील मोठे अचानक तुरुंगात गेल्यामुळे अब्दुलच्या धाकटय़ा भावावर सहा भावंडांची जबाबदारी धाडकन येऊन पडल्याने तो शाळा सोडून कामाला लागतो. पावलापावलावर लाच दिल्याशिवाय गत्यंतर नाही  हे अनुभवताना अब्दुलला अशी ‘पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था ही कचऱ्याच्या बाजारासारखीच’ वाटते. अतिशय लहान वयात प्रचंड कष्ट करणाऱ्या अब्दुलला बाल सुधारगृहात विश्रांती मिळते, विचार करायला सवडदेखील मिळते. आत्मकेंद्रित असलेला अब्दुल पूर्णपणे बदलून उदार आणि क्षमाशील होऊन बाहेर पडतो. व्यवसायात सचोटीने वागण्याचा, चोरीचा माल विकत न घेण्याचा निर्णय घेतो.
ग्रामीण दारिद्रय़ात पिचून गेलेला आशाचा नवरा अट्टल दारूडा आहे. लहान वयात भीषण अनुभवांतून आशाला धर्य प्राप्त  झाले आहे. धाडसासोबत तिच्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या आहेत. समस्या निर्माण कराव्यात आणि त्या सोडवण्याकरिता पसे घ्यावेत याचे तिला अचूक भान आहे. झोपडपट्टीचे नेतृत्व खेचून आणण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. बचत गटातील पसे काढून कर्ज देत मधल्या मध्ये व्याज खावे. अनेक योजना आणून पसे कमवावेत. बालवाडी चालवणे हादेखील आशाचा एक उपव्यवसाय आहे. आशाची मुलगी मंजू अशा वातावरणात बालवाडीत अतिशय मन लावून शिकवत आहे. अण्णावाडीतील मुलांनी शिकावे अशी तिची कळकळ आहे.
अब्दुल, आशा, फातिमा या व्यक्तिरेखांभोवती अनेक घटना फिरत राहतात. बाल सुधारगृहांची स्थिती, तिथे दाखल होणारी मुले, न्याय यंत्रणा, गुन्हेगारी जग, झोपडपट्टीतील मृत्यू असे प्रसंग पाहून कॅथरीन यांना त्यांचे स्वरूप जाणून घेण्याची गरज वाटली. सरकारी अहवाल, आकडेवारी त्या क्षेत्रामधील अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेत सखोल अभ्यास केला असला तरी तो विनाकारण घुसडला जात नाही. स्वत: पत्रकार असूनही निवेदनातून डोकावत नाही. कुणाला झुकतं माप नाही. अनेक भावनिक प्रसंगदेखील संयमाने सादर केले आहेत. ही समस्या वैयक्तिक नसून व्यापक पातळीवरील आहे याचे वाचकाला सतत भान येत राहते.
भूक, भीती, दारिद्रय़, गुन्हे, मरण पाहणाऱ्या लहानांना ‘सक्षम तोच जगेल’ हा डार्वनिचा सिद्धान्त अनुभवत मोठं व्हावं लागतं. तरीही त्यांना भविष्याविषयी आशा असते. आशेमुळे व कल्पकतेमुळे त्यांना त्यांचे जीवन सुसह्य होते. संधी मिळत नाही यासाठी आपण गरिबांना दोष देतो. गरीब एकमेकांना जबाबदार ठरवतात. निष्क्रिय व भ्रष्ट सरकारी यंत्रणेमुळे गरीब हे संधीपासून वंचितच राहतात. सरकारला व बाजारपेठेला त्यांच्या क्षमता समजत नाहीत. प्रस्थापित मात्र सहजगत्या संधी हस्तगत करतात. या विषम संधीला कॅथरीन वारंवार अधोरेखित करत राहते. बुद्धी, गुण असूनही कित्येक वंचितांना संधी मिळत नाही, हे समाजासाठी अतिशय घातक लक्षण आहे. जागतिकीकरणाची ही लंगडी बाजू आहे. त्यामुळे वंचितांमध्ये तीव्र असंतोष आहे. वरकरणी शांत भासणाऱ्या समाजातील अशांततेचा दाह या पुस्तकातून सतत पोळत राहतो.

बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर्स –
लाइफ, डेथ अँड होप इन ए मुंबई अंडरसिटी :
कॅथरिन बू,
प्रकाशक :  पेंग्विन बुक्स,   
पाने : २५४, किंमत : २७५ रुपये.

Story img Loader