उत्तर प्रदेशात सध्या बेनी प्रसाद वर्मा यांनी शाब्दिक धुळवड सुरू केली आहे. बेनी प्रसाद गुलाल थेट डोळ्यात फेकत असल्याने मुलायम व अखिलेशसिंह यांचा चरफडाट होतो. मुलायमसिंह हे पूर्वीचे लोहियावादी आणि दिल्लीत मधू लिमये यांच्या पायाशी बसणारे. बाबरी मशिदीवरून त्यांनी भाजपला जरब बसविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री म्हणून केला तेव्हा अनेकांना त्यांच्याबद्दल भरते आले होते, परंतु मुलायमसिंह यांनी नंतर बुद्धीपेक्षा शक्ती श्रेष्ठ म्हणत मनगटशाही आपलीशी केली आणि सत्तेसाठी निधर्मी तत्त्वापेक्षा अल्पसंख्याकांचा अनुनय उपयोगी पडतो हा रोकडा व्यवहारवाद मान्य केला. लोहियांच्या वारसापेक्षा ही व्यवहारनीती उपयोगी पडली व उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा गढ सपाकडे आला. त्यांची सत्ता कायम टिकली नसली तरी काँग्रेसला त्यांनी राज्यातून हुसकावले ते जवळपास कायमचे. उत्तर प्रदेशातील जागांच्या बळावर देशाला नाचविणाऱ्या काँग्रेसला आता तेथे अस्तित्वाची लढाई करावी लागते. गांधी घराण्याचे दोन मतदारसंघ त्या राज्यात असूनही काँग्रेस राज्यात कोठेही नाही. मुलायमसिंह यांनी काय राजकारण केले ते बेनी प्रसाद यांनी आता उघडपणे मांडले. मुलायमसिंह यांचे दहशतवाद्यांशी संबंध होते, असे बेनी प्रसाद आधी म्हणाले. आता बाबरी मशिदीवरून त्यांनी मुस्लिमांची दिशाभूल केली व प्रत्यक्षात भाजपचा फायदाच करून दिला, असे आरोप बेनी प्रसादांनी केले आहेत. या संदर्भात सोनिया गांधींना पंतप्रधानपदासाठी मुलायमसिंह यांनी पाठिंबा नाकारल्याचा दाखला दिला आहे. मुलायमसिंह यांचे ते कृत्य त्या वेळी अनेकांना धक्का देऊन गेले होते. विशेषत: महाराष्ट्रातील डाव्या व समाजवाद्यांना, परंतु मुलायमसिंह यांच्या स्वभावाची ओळख असणाऱ्यांना त्यामध्ये आश्चर्य वाटले नव्हते. सोनिया गांधी यांचा परदेशी जन्माचा मुद्दा शरद पवार यांच्यापेक्षाही मुलायमसिंह यांच्यासाठी महत्त्वाचा होता. त्याबाबत त्यांच्या काही निष्ठा होत्या व त्या अद्यापही कायम आहेत. हे माहीत असल्यामुळेच गांधी घराण्याला मुलायमसिंह हे कधीच आपलेसे वाटत नाहीत. सत्तेसाठी काँग्रेस व समाजवादी पार्टी एकत्र येत असले तरी सत्तेपलीकडे ते एकमेकांकडे कमालीच्या संशयाने पाहतात. दिल्ली एकहाती काबीज करण्याचा मार्ग उत्तर प्रदेश व बिहारमधून जातो हे काँग्रेसचे जुने मॉडेल. ते कालबाह्य़ झाले व आता दिल्लीचा मार्ग आघाडय़ांतून जातो हे अद्याप काँग्रेसच्या अंगवळणी पडलेले नाही. आधी सोनिया गांधी व आता राहुल गांधी हे अद्याप उत्तर प्रदेश व बिहारकडे डोळे लावून बसलेले असतात, पण दुर्दैवाने दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून त्यांना दिल्लीतील सत्ता टिकवावी लागत आहे. तरीही त्या मुख्यमंत्र्यांना स्वस्थपणे कारभार करू देणे काँग्रेसच्या कूटनीतीत बसत नाही. म्हणून बेनी प्रसादांसारख्या वाचाळांच्या मार्फत शाब्दिक बाण सोडत मुलायमसिंह व अखिलेश यांना घायाळ करीत राहण्याची नीती काँग्रेस अवलंबीत असते. बेनी प्रसादांच्या मागील उद्गारानंतर सोनिया गांधी यांनी मुलायमसिंह यांची स्वत: हात जोडून माफी मागितली, पण राहुल गांधींच्या घरी बेनी प्रसादांचे कौतुक झाले व आणखी कुठले मंत्रिपद हवे आहे काय, अशी विचारणाही झाली. त्यानंतर बेनी प्रसाद आणखी बाण सोडू लागले. त्याविरोधात सपाने आवाज उठविला असतानाच सीबीआयचा धाक काँग्रेस घालते, अशी कबुली अखिलेश यांनी दिली. या सर्व घटनांची संगती लावली की बेनी प्रसादांचा बोलविता धनी कोण व त्यामागचे राजकारण कोणते हे ध्यानात येईल. मुख्य कुस्तीला सुरुवात करण्यापूर्वी पैलवान एकमेकांचा अंदाज घेतात. तोच प्रकार सध्या देशात सर्वत्र सुरू आहे, उत्तर प्रदेश असो वा दक्षिणेत तामिळनाडू.
बोलविता धनी कोण?
उत्तर प्रदेशात सध्या बेनी प्रसाद वर्मा यांनी शाब्दिक धुळवड सुरू केली आहे. बेनी प्रसाद गुलाल थेट डोळ्यात फेकत असल्याने मुलायम व अखिलेशसिंह यांचा चरफडाट होतो. मुलायमसिंह हे पूर्वीचे लोहियावादी आणि दिल्लीत मधू लिमये यांच्या पायाशी बसणारे. बाबरी मशिदीवरून त्यांनी भाजपला जरब बसविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री म्हणून केला तेव्हा अनेकांना त्यांच्याबद्दल भरते आले होते
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-04-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beni prasad verma targeted mulayam singh