आयपीएलपाठोपाठ पावसावरही सट्टा लागतो आहे.. सट्टा, जुगार, लाचखोरीसारखी कृत्ये लाजिरवाणी असली तरी कळत-नकळत त्यांचा प्रभाव मनामनात भिनलेला आहे की काय?
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्याच्या काहिलीचं काहूर माजलं असतानाच आकाशाच्या कोपऱ्यात एखादा चुकार काळा ढग अवतरावा, आणि उन्हाच्या झळांनी शिणलेल्या, मलूल झाडांच्या फांद्यांनी खुशीने स्वत:भोवती गिरक्या घेत आनंदाचे झोके घ्यावेत, वाऱ्याची ती हलकी झुळूक तल्खलत्या शरीराला चहूबाजूंनी सुखाचा वेढा देऊन पुढे सरकावी.. पाठोपाठ, नेमेचि येणाऱ्या त्या पावसाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या बातम्यांचा पाऊस सुरू व्हावा आणि अवघं मन वेडावून जावं, असं काहीसं सुरू झालं आहे. शब्दांचे ताटवे ताजेतवाने होऊन पावसाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत, फेसबुकपासून ट्विटपर्यंत आणि टीव्हीपासून वर्तमानपत्रापर्यंत सगळी माध्यमंही पाऊसवेडी होऊन गेली आणि जणू धरतीवरचा पहिला पाऊस यंदा अनुभवायला मिळणार अशा आनंदाचे फुलोरे मनामनांत फुलू लागले आहेत.
 असं झालं, की पावसाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करायला गद्य शब्द उणे होतात आणि शब्दांच्या कविता होऊन जातात. पाऊस आणि कविता यांचं नातंच तसं अतूट, अपूर्व. पावसाची सर आणि निरागसतेनं लपेटलेलं बालपण, धसमुसळेपणानं अंग झोडपून काढणारा वेडा पाऊस आणि मुसमुसती तरुणाई, धुंद भाव, कुंद हवा आणि झोकलेले बंध, पावसाच्या पहिल्या थेंबाच्या आसक्तीने आकाशाकडे डोळे लावून ताटकळणारी तप्त धरणी, तहानलेले पशुपक्षी, अंकुरण्याच्या प्रतीक्षेत तग धरून आपापल्या रुजण्याची जागा पकडून धरणीवर लपलेली असंख्य बीजं पावसासोबतच्या या कवितेतून व्यक्त होतात, तर कुणाला आकाशात धसमुसळेपणा करत दाटलेल्या काळ्याकभिन्न ढगांच्या रांगांमध्ये प्रेमदूत दिसतात. पण अशी ही पाऊसगाणी फक्त हळव्या मनांच्या कोपऱ्यातच मोहरतात असेही नाही. पावसाची ही पहिली चाहूल रूक्ष, एकलकोंडय़ा किंवा अरसिक मनांवरही अलवार फुंकर मारते आणि अशी मनंदेखील पावसाच्या प्रेमात पडतात. मग आपल्याआपल्या पावसाच्या कविता गाताना, गुणगुणताना, कुणाला लज्जतदार खमंगपणा आठवून ‘पापडगाणी’ सुचतात, तर कुणाला घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या चौकोनी निसर्गाच्या तुकडय़ातून आकाशातले ढग न्याहाळताना सोबतीला खमंग कांदाभजी हवीहवीशी वाटू लागतात. कुणी काठोकाठ भरलेल्या प्याल्यात भराभर उसळणाऱ्या फेसासोबत पहिल्या पावसाचा आनंद अनुभवतात, तर कुणी चक्क घराबाहेर पडून पावसाच्या सरी अंगावर झेलत आनंदात चिंब न्हाऊन निघतात. पावसाच्या पहिल्या धारा आणि सोबत वाहणारा सुसाट वारा हेदेखील नेहमीचंच दृश्य असलं, तरी पहिल्या पावसासोबत हे दृश्य, प्रत्येक वेळी नव्या रूपांनी सजलेले भासू लागते. म्हणूनच, या अनुभवासाठी आसुसलेल्या मनांना, पावसाची नुसती वर्दीसुद्धा मोहरून टाकते..
यंदाही पावसानं अंदमानाच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवलं आणि दुष्काळाच्या भयानं काळवंडलेल्या गावागावांना नव्या उमेदीचे, आशांचे अंकुर फुटले. दुष्काळामुळे यंदाच्या पावसाची प्रतीक्षा नेहमीपेक्षा जराशी अधिकच आसुसलेली होती. पावसाच्या पहिल्या सरीच्या अनुभवाचा अधीरपणाही अधिकच होता. मग पाऊसगाण्यांचे आनंदमय सूर सर्वदूर उमटणार हेही साहजिकच होतं. बालकांच्या बडबडगीतातला पाऊस असो, नाही तर तरुणाईला जिंदगीभर अविस्मरणीय ठरणाऱ्या अशा एखाद्या धुंद रात्री कोसळणारा धुवाधार पाऊस असो, या पावसासोबतच्या मृद्गंधी सुरांना आणखी एक धंदेवाईक किनारही असल्याचं पावसाच्या पहिल्या सरीआधीच भासमान होऊ लागलं आहे.
पाऊस हा जसा पिढय़ापिढय़ांच्या आनंदाचा सोबती, तशाच आनंदाच्या अनेक छटा आणखीही कशाकशात माणसानं कधीपासून शोधून काढल्या आहेत. फळाची अपेक्षा न धरता कर्म करत राहण्याचा ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ संदेश देणारी भगवद्गीता हे प्रमाणवाक्य ठरवणाऱ्या संस्कृतीतच, कोणत्या स्तोत्रपठणात फळ काय याची जंत्रीच उत्तरार्धातही असते. सांस्कृतिक संभ्रमावस्थेच्या गर्तेत गुरफटवून टाकणाऱ्या अशा अनेक संकल्पनांनी भारलेल्या भारतात, भक्तिभावाइतकेच जिव्हाळ्याचे नाते पावसाशी जडलेले असते, आणि पावसाइतक्याच प्रेमाचे झरे क्रिकेटसारख्या खेळाच्या मैदानावर पडणारा धावांचा पाऊस पाहतानाही जिवंत होत असतात. या क्रिकेटमध्ये बेटिंग नावाचा किडा शिरला आणि त्या किडय़ाने हा उमदा खेळ गेल्या काही वर्षांपासून पुरता पोखरून काढला. सामान्य क्रिकेटशौकिनाला पडद्यावर किंवा मैदानावर दिसणाऱ्या या खेळाच्या प्रत्येक चेंडूमागे आणि प्रत्येक मिनिटामागे बेटिंगच्या वळवळत्या किडय़ाच्या शंकेने शौकिनांच्या मनामध्ये काहूर माजले आणि बेटिंगने क्रिकेट खराब केल्याची उदासवाणी काजळी मनांवर धरली. बेटिंगपाठोपाठ या खेळात फिक्सिंगही शिरले आणि पैजांच्या खेळाचा एक नवा शोभादर्शक समोर आला. पैजांचा खेळही आपल्याकडे नवा नाहीच. कित्येक शतकांपासून ‘अमृताते पैजा’ जिंकणाऱ्या मराठीच्या मायभूमीत आता आयपीएलपाठोपाठ पावसाच्या नावाने पैजा लावण्याचा आणि जिंकण्या-हरण्याचा नवा खेळ रंगात आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्या खेळाच्या लहानमोठय़ा लहरी क्षणाक्षणाला शौकिनांच्या मनावर स्वार होऊन हेलकावे घेत असतात. नेमक्या याच स्थितीमुळे मैदानावर पडणाऱ्या धावांच्या पावसाबरोबर, मैदानाबाहेरच्या बुकींच्या दालनांतील पैजांचे डाव रंगत गेले, आणि पैशाचा पाऊस पडला. या वादळातच आयपीएलचे वादळ शमले आणि पैजांचे ते एक नकोसे पर्वदेखील संपले. आता आकाशात काळ्या ढगांमध्ये दडलेल्या वास्तवाचा शोध घेण्यासाठी पैजांचे नवे सत्र सुरू झाले आहे. पावसाचे नेमके अंदाज वेधशाळेत शास्त्रीयदृष्टय़ा वर्तविले जातात, अशी सर्वसाधारण समजूत असते. शेताच्या काठावरून आभाळाकडे बघूनच पावसाचे आडाखे बांधत शेतीचे वेळापत्रक आखणाऱ्या शेतकऱ्याचे अनुभवाचे अंदाजही लहरी पाऊस अनेकदा खोटे पाडत असतो. अशा बेभरवशाच्या पाऊस-वेळा हा पैजेचा नवा विषय न ठरता, तरच नवल. आता पावसाच्या पैजांवर कोटय़वधींची उलाढाल होईल आणि पैशांचा पाऊस पडेल.. आयपीएल सामन्यांच्या पैजांवर पोलिसी कारवाईमुळे पाणी पडले आणि अनेकजणांचे खिसे धुतले गेले. त्याची भरपाई करण्यासाठी पाठोपाठ येणाऱ्या पावसाची पर्वणी साधून पावसावर सट्टेबाजीचा खेळ रंगू लागला आहे. सट्टा, जुगार, लाचखोरीसारखी कृत्ये लाजिरवाणी मानली जात असली तरी कळत-नकळत त्यांचा प्रभाव मनामनात भिनलेला असतो.
लहानपणी काऊ चिऊच्या गोष्टी शिकणाऱ्या आणि बडबडगीतांच्या बोबडय़ा सुरात रमणाऱ्या कोवळ्या जिभांवरील पाऊसगाण्यांनीदेखील असंच काहीतरी शिकवलंय. रिमझिमणाऱ्या पावसाने अंगणात बागडावे, आणि आईच्या कडेवर बसून या अल्लड सरींचे शिंपण झेलणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव न्याहाळताना त्या आईचेही भान हरपावे, इतकं अनुपम सौंदर्याचं लेणं ल्यालेल्या पावसासाठी, लाच म्हणजे काय हे कळण्याआधीच पैशाची लालूच दाखवणाऱ्या ‘तुला देतो पैसा’ या बालगीतांनाही आपण जपले आणि पुढे जोपासलेदेखील! चिमुकल्या हातातून देऊ केलेली ही पैशाची लाच पावसासाठी मोठी नसली आणि लाचेपोटी देऊ केलेला हा पैसासुद्धा खोटाच निघाला तरी पाऊस मात्र प्रेमानेच, भरभरून बरसणार असतो.

Story img Loader