वयाची नव्वदी पार केलेल्या कुलदीप नायर यांनी आपल्या सुमारे सहा दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ‘स्टेटसमन’चे संपादक, यूएनआय या वृत्तसंस्थेचे प्रमुख, इंडियन एक्स्प्रेस वृत्त सव्र्हिसचे संपादक, ‘लंडन टाइम्स’चे भारतातील प्रतिनिधी अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या निभावल्या. पत्रकार म्हणून ते यशस्वी तर झालेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांना स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आणि राजकारण अगदी जवळून बघायला व अनुभवायला मिळाले. त्यातून त्यांची ‘इंडिया-दि क्रिटिकल इयर्स’ (१९७१), ‘इंडिया आफ्टर नेहरू’ (१९७५), ‘दि जजमेंट : इनसाइड स्टोरी ऑफ दि इमर्जन्सी इन इंडिया’ (१९७७), ‘इंडिया हाऊस’ (१९९२) यांसारखी ग्रंथसंपदा सिद्ध झाली. पंडित नेहरू, गोविंद वल्लभ पंत, लाल बहादूर शास्त्री यांच्यासमवेत त्यांनी काम केले. नंतर व्ही. पी. सिंग यांच्या राजवटीत ते भारताचे ब्रिटनमधील राजदूत झाले. १९९७ ते २००३ या कालावधीत ते राज्यसभेवरही होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार हा नायर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि लेखनाचा स्थायिभाव होता. त्यामुळे आणीबाणीच्या काळात त्यांना ‘मिसा’खाली अटक झाली होती. या अशा बहुस्पर्शी आणि अनुभूतीसमृद्ध व्यक्तिमत्त्वाचे ‘बियाँड दि लाइन्स’ हे आत्मचरित्र वाचनीय आहे.
पाकिस्तानातील सियालकोट येथे १४ ऑगस्ट १९२३ रोजी नायर यांचा जन्म झाला. १९४० मध्ये लाहोर येथील अधिवेशनात बॅ. जीना यांनी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडला, त्याला शाळकरी वयातील नायर उपस्थित होते. या ठरावामुळे पाकिस्तानातील हिंदू आणि मुस्लीम यांनी वर्षांनुवर्षे जोपासलेली सौहार्दाची भावना नष्ट झाली आणि तिची जागा परस्परविषयक अविश्वासाने घेतली. लाहोरमधील फोरमन ख्रिश्चन कॉलेजमधून बी.ए. झाल्यावर त्यांनी एलएल. बी.ची पदवी घेतली. याच सुमारास फाळणी झाली आणि नायर यांना भारतात यावे लागले. नंतर त्यांनी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आणि एका उर्दू वृत्तपत्रात ते काम करू लागले.
नायर यांच्या कर्तृत्वाचा परीघ विस्तारला तो ते भारत सरकारच्या माहिती आणि सूचना मंत्रालयात अधिकारी म्हणून काम करू लागल्यावर. या नोकरीच्या निमित्ताने सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या राजकारणी मंडळींशी त्यांचा निकटचा संबंध येत गेला. त्या अनुषंगाने पंडित नेहरू ते मनमोहन सिंग असा राजकीय कालखंड त्यांनी या आत्मचरित्रात तपशिलात जाऊन सांगितला आहे. नेहरूंविषयी नायर लिहितात की, स्वातंत्र्योत्तर भारतात त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही पुढाऱ्याला नव्हती आणि सरदार पटेलांच्या निधनानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोध असा फारसा झालाच नाही. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी आवश्यक तेवढे आक्रमक नव्हते. परिणामी भारतीय राजकारणावर त्यांचे बराच काळ वर्चस्व राहिले. त्यांच्या राजवटीत देशाचा विकास संथ गतीने झाला, गरिबी वाढली, पण देश एकसंध राहिला. पंडित नेहरूंनंतर पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाईंप्रमाणेच इंदिरा गांधीही उत्सुक होत्या. इंदिरा गांधींना काँग्रेस पक्षाची सहानुभूती होती, पण त्यांना राजकारणाचा आणि प्रशासकीय कामाचा पुरेसा अनुभव नव्हता, तर मोरारजींना त्यांच्या स्वभावातील दोषांमुळे पक्षांतर्गत विरोधक बरेच होते. अशा परिस्थितीत लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले.
कुलदीप नायर यांनी आत्मचरित्रात शास्त्रींविषयी अतिशय जिव्हाळ्याने आणि विस्ताराने लिहिले आहे. ते सांगतात की पूर्वायुष्यात शास्त्रींनी कल्पनातीत दारिद्रय़ भोगले होते. ते १९४२च्या आंदोलनात तुरुंगात गेले, तेव्हा विषमज्वराने आजारी असलेली त्यांची मुलगी औषधोपचाराशिवाय मरण पावली. पण आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दु:खाचे त्यांनी कधीच भांडवल केले नाही. त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या एकोणीस महिन्यांची, अनेक आवर्ती घटनांनी भरलेली. त्यांचा मृत्यूही तसाच. अनेक प्रश्नचिन्हे उमटवणारा. नायर यांनी शास्त्रींच्या मृत्यूविषयी तपशीलवार लिहिले आहे. रशियातील ताश्कंद येथे त्यांचे निधन झाले. ही घटना १०-११ जानेवारी १९६६ ची. नायर त्या वेळी तेथेच होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदल्या रात्री त्यांना शास्त्रीजींच्या निधनाचे स्वप्न पडले होते. ताश्कंद करार त्याआधी झाला होता. रशियन पंतप्रधान अलेक्सी कोसीजिन यांच्या उपस्थितीत पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख अय्युब खान आणि शास्त्रींच्या करारावर सह्य़ा झाल्या. त्या वेळी शास्त्रीजींची शारीरिक अवस्था मुळीच ठीक नव्हती. त्यांच्या पत्नी ललिता यांना ताश्कंद करार योग्य वाटला नाही, म्हणून त्या रात्री शास्त्रींनी केलेला फोन त्यांनी घेतला नाही. त्यातच भर म्हणजे, दिवसा झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना काही अडचणीत टाकणारे प्रश्न विचारण्यात आले. त्याआधी हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेलेल्या शास्त्रीजींना हे सगळे असह्य़ झाले होते. त्यातूनच मध्यरात्री केव्हा तरी त्यांचा मृत्यू ओढवला. त्यानंतर शास्त्रीजींच्या कुटुंबाने त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला. कारण मृतदेह दिल्लीत आणला गेला, तेव्हा तो निळसर पडला होता.
शास्त्रींच्या निधनानंतर अनपेक्षित वळणावर गतिमान झालेल्या भारतीय राजकारणाचा वेध नायर यांनी घेतला आहे. इंदिरा गांधींचा उदय, बांगलादेश युद्ध, आणीबाणीचा काळ, जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जनता पक्षाची स्थापना व त्याची वाताहत, पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींचे झालेले पुनरागमन व त्यांची हत्या, ऑपरेशन ब्ल्यू स्टार या घटना आणि नंतरच्या काळातील राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द याविषयी त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी गौरवोद्गार काढणाऱ्या नायर यांनी इंदिरा गांधींवर टीका करताना वरच्या पट्टीत सूर लावला आहे. असेच काहीसे राजीव गांधी, चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्याबाबतही घडले आहे. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर टीका करून नायर पुढे सांगतात की फक्त चाळीस दिवस सत्तेवर असलेले चंद्रशेखर यांचे सरकार हे देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार होते. बाबरी मशीद प्रकरणाला नरसिंह राव जबाबदार होते, असे मत ते व्यक्त करतात. गांधी-नेहरूंच्या ‘आदर्श सरकार’ या संकल्पनेच्या गृहीतकांवर डॉ. मनमोहन सिंग यांची सरकार चालवण्याची पद्धत अयोग्य होती, असे मूल्यमापन ते करतात.
भारत-पाकिस्तान संबंध हा नायर यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याविषयी त्यांनी बारकाईने लिहिले आहे. नायर स्वत: पाकिस्तानला अनेक वेळा जाऊन आले. अय्युब खान, झुल्फिकार अली भुत्तो आणि बेनझीर भुत्तो तसेच जनरल मुशर्रफ यांच्याशी त्यांचा संपर्क होता. भारत-पाक संबंध मैत्रीपूर्ण राहावेत म्हणून नायर नेहमीच प्रयत्नशील होते.
फाळणीचा दाहक अनुभव घेतलेल्या नायर यांनी देशात वारंवार उद्भवणाऱ्या सांप्रदायिक तणावांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांचे झालेले हत्याकांड, बाबरी मशीद पाडल्यावर उद्भवलेला धार्मिक हिंसाचार आणि गुजरातमधील दंगल यांचा संदर्भ देऊन ते सांगतात की, अशा प्रकारचा सांप्रदायिक तणाव देशाची एकात्मताच खिळखिळी करतो. भारताच्या आजच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना नायर म्हणतात, की देशाची तरुण पिढी चंगळवादाकडे आकर्षित होत आहे. केवळ आर्थिक प्रगती म्हणजे विकास नव्हे, भारताची सांस्कृतिक परंपरा जतन करणेही आवश्यक आहे. त्यांचे हे म्हणणे अर्थातच रास्त आहे.
एकंदर काय, तर भारताचा स्वातंत्र्योत्तर सहा दशकांचा राजकीय इतिहास बारीकसारीक तपशिलानिशी जिवंत करणारे हे आत्मचरित्र काहीसे खळबळजनक आहे.
बियाँड द लाइन्स : कुलदीप नायर
रोली बुक्स, नवी दिल्ली
पाने : ४२०, किंमत : ५९५ रुपये.
सहा दशकांचा खळबळजनक मागोवा
वयाची नव्वदी पार केलेल्या कुलदीप नायर यांनी आपल्या सुमारे सहा दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ‘स्टेटसमन’चे संपादक, यूएनआय या वृत्तसंस्थेचे प्रमुख, इंडियन एक्स्प्रेस वृत्त सव्र्हिसचे संपादक, ‘लंडन टाइम्स’चे भारतातील प्रतिनिधी अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या निभावल्या.
First published on: 18-10-2014 at 03:47 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beyond the lines by kuldip nayar