भारतीय ऑलिंपिक संघटनेबाबतची बातमी कितीही वाईट असो, ब्रिटनमध्ये २०१४ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांच्या आयोजक मंडळावर एका भारतीयाची नुकतीच झालेली नियुक्ती उत्साहवर्धकच ठरते! भानू चौधरी हे ब्रिटनमधील तरुण उद्योगपती, त्यांना राष्ट्रकुल खेळांच्या नियोजन मंडळाचे सदस्यत्व देण्याचा निर्णय ब्रिटिश राष्ट्रकुल समितीने घेतला आहे. भानू यांनी केवळ पैसाच कमावला असे नव्हे तर कीर्ती आणि समाजमान्यताही मिळवली, याची मोठीच खूण म्हणजे ही नियुक्ती, असे मानले जाते. तसे चौधरी कुटुंबच उद्योगी, त्यामुळे पैसा कमावणे त्यांना नवे नाही. भानू यांचे पणजोबा आजच्या ‘पंजाब नॅशनल बँके’च्या संस्थापकांपैकी एक होते. आजोबाही या बँकेवर होते, परंतु १९६९ च्या राष्ट्रीयीकरणानंतर या कुटुंबाने अन्य उद्योगांवर लक्ष केंद्रित केले. भानू यांचा जन्म १९७८ चा, दिल्लीतच झालेला. वडील सुधीर चौधरी हे ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आणि तेथेच भानू यांचे शिक्षण झाले. भानू यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात घेतले, त्यानंतर जेपी मॉर्गन कंपनीत उमेदवारी करून त्यांनी घरच्या ‘सी अँड सी अल्फा ग्रूप’ या उद्योगसमूहात लक्ष घालण्यास सुरुवात केली. दहा वर्षांपूर्वी भारतात स्पा-हॉटेल या नव्या पद्धतीच्या हॉटेलांची साखळी त्यांनी स्थापली. हा पसारा आज भारतासह अन्य आशियाई देश, युरोप आणि अमेरिकेतही वाढला आहे. याखेरीज आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही भानू चौधरी उतरले आणि अन्य क्षेत्रांतील गुंतवणुकींतून ‘सी अँड सी अल्फा ग्रूप’ची भरभराट होत गेली. या प्रवासात एक वादग्रस्त प्रसंगही आला. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला एकंदर पाच लाखाहून अधिक पौंडांच्या देणग्या त्यांच्या आरोग्यसेवा कंपनीने दिल्या होत्या, परंतु त्या बेकायदा नाहीत, असे तेथील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. पैसा मिळवणे आणि समाजाचा विचार करणे या दोन्ही बाजू महत्त्वाच्या असतात, हे भारतीय मूल्य आपल्यावर बिंबवले गेले आहे, याचा खास उल्लेख भानू चौधरी करतात आणि वयाच्या बाराव्या वर्षांपासून काम करूनच पैसा कमावण्याची सवय आपल्याला लंडनमध्ये ‘मोती महाल रेस्तराँ’ चालवणाऱ्या वडिलांनी लावली, हेही भानू आवर्जून सांगतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा