प्रदीप आपटे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…त्या गवताआड दडलेल्या गोलाकार उंचवट्याकडे आणि वाटेच्या वर्तुळी हिश्शाकडे बघून र्कंनगहॅमला चटकन् जाणवले की ‘इथे काही तरी दडलंय’!

हा स्तूप कनिंगहॅमने लंडनला जाऊ दिला नाही, हेही विशेष…

भारतात प्राचीन वास्तुकलेच्या अनेक परंपरा आणि शैली आहेत. त्यामध्ये बुद्धधर्मी परंपरेच्या वास्तू हा एक लक्षणीय प्रकार आहे. मौर्य काळापासून शृंगकाळ ते सातवाहन काळापर्यंत या शैलीतल्या अनेक नमुनेदार वास्तू आहेत. त्यात मुख्यत: चार वास्तुप्रकार आहेत : स्तंभ, चैत्य, विहार आणि स्तूप. स्तंभ हा स्मरण चिन्हासारखा उभा केलेला खांब असतो. त्यात कोरलेली शिल्पे, मूर्ती, चित्रे आणि त्यावर कोरलेले ‘लेख’ असतात. सारनाथपाशी सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभशिल्पाच्या शिखरावर चार दिशांना सन्मुख असे चार सिंह आहेत. हेच चार सिंह स्वतंत्र भारताची अधिकृत मुद्रा म्हणून आपण वापरतो.

महाराष्ट्रात अधिक परिचित आहेत ती ‘लेणी’. जुन्नर, नाणेघाटापासून एकीकडे नाशिक, खानदेश- औरंगाबादकडे आणि पश्चिमेकडे घारापुरी, कान्हेरीकडे पसरलेली ही ‘लेणी’. त्यातील बरीच लेणी (सर्व नव्हे) पर्वतांच्या पाषाण रांगांमध्ये कोरलेले चैत्य आणि विहार आहेत. चैत्य म्हणजे बुद्ध भिक्षू आणि भिक्षुणींचे पूजा-अर्चनेचे ठिकाण. जी जागा मुख्यत: त्यांच्या रहिवासाकरिता उभारली जाते तो ‘विहार’. ज्या प्रदेशात बुद्धधर्मी उपासक खूप होते तिथे विहारांचा आढळही मोठा! म्हणून त्या प्रदेशालाच लोक उच्चार पालटून ‘बिहार’ म्हणू लागले! नालंदा विद्यापीठात जवळपास दहा हजार विद्यार्थी होते. त्यांची वस्ती असलेले विहार म्हणजे त्या वेळची विद्यार्थी वसतिघरे.

‘स्तूप’ हा खास बुद्ध परंपरेचा वास्तुप्रकार आहे. मुळात स्तूप म्हणजे मातीचा ढीग. मृत व्यक्तीच्या रक्षा-अस्थी पुरून रचलेला ‘संस्मरण’ ढीग! पाण्यात विसर्जनाप्रमाणेच ही परंपरा जगात (आणि भारतात) अनेक भागांत होती.

बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्याचे ‘अंत्येष्टी-अवशेष’ आठ प्रमुख ठिकाणी (उदा. राजगृह, वैशाली, कपिलवास्तु, रामग्राम, कुशीनगर, पिपलीवन इ.) विभागून जतन केले गेले. हे अजातशत्रूच्या काळात घडले. असा संस्मरणी उंचवटा बांधून अवशेष जतन करण्याला बुद्धधर्मीयांनी निराळे वास्तुरूप दिले. भाजे विहारापाशी असे फार सजावट नसलेले स्तूप आहेत. ते तेथील भिक्षूंच्या निर्वाणानंतर बांधलेले आहेत. संस्मरणीय व्यक्तीच्या अस्थींचे सन्मान्य जतन ही त्या वास्तूंमागची प्रेरणा आरंभी होती. पुढे त्याचे रूप विस्तारले. बुद्धाच्या प्रमुख शिष्यांचेदेखील अवशेष जपण्याचा प्रघात उपजला. ज्या स्तूपांमध्ये बुद्ध किंवा तशा ‘अधिकारी भिक्सु’च्या अस्थी जतन केल्या आहेत त्याला म्हणतात ‘शारीरिक स्तूप’. ज्या ठिकाणी अस्थिऐवजी बुद्ध किंवा त्याच्या महान शिष्यांनी वापरलेल्या वस्तू (त्याला म्हणतात ‘प्रयुक्त वस्तू’ उदा. भांडे वा पात्र,) जतन केल्या आहेत अशा स्तूपांना पारिभौतिक स्तूप म्हणतात. बुद्धाने जिथे धर्मप्रचारार्थ भेट दिली आणि वास्तव्य केले त्या जागांवरदेखील स्मृतिस्तूप बांधले गेले (उदा.- श्रावस्ती). ‘प्रसार-प्रचारा’च्या उद्देशांमुळे त्यांना उद्देशिक स्तूप म्हणतात. याखेरीज श्रद्धेपोटी काही अनुयायी स्वत:हून दान देतात आणि धर्मापर्ण म्हणून स्तूप बांधतात. त्याला संकल्प स्तूप म्हणतात. ह््येनसांग (ह््युएनसांग)ने आपल्या ‘सूयूकी’ या ग्रंथात म्हटले आहे की सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले. पण त्यातले बरेचसे साधे मातीच्या अध्र्या अंडाकृती घुमटाचे होते. ते ºहास पावले. त्यातले काही नंतर पक्क्या विटांनी आणि दगडांनी बांधले गेले. सांची, सारनाथ येथले ख्यातनाम स्तूप त्यापैकी आहेत. स्तूपांचे अनेक आकार-प्रकार आहेत. त्याचे प्रतीक म्हणून सांगितले जाणारे अर्थ आणि अन्वयदेखील बरेच आहेत (उदा. स्तूपाकाराला ध्यानस्थ बुद्ध मानतात). पण ते तपशील आपण तूर्तास बाजूला ठेवू. ढोबळमानाने सांगायचे तर मोठ्या स्तूपांची ठेवण मुख्यत: पाच भागांत असते. एका वर्तुळाकार मेढीवर (पायावर) एक अर्ध-घुमटाकार गोल बांधलेला असतो. त्या गोलावर एक पेटीवजा रचना असते. त्याला म्हणतात हर्मिका. हा स्तूपातील पवित्रतम भाग! त्यामध्ये पवित्र मानलेल्या अस्थी, रक्षा किंवा स्मरणवस्तू ठेवलेल्या असतात. त्यावर एक यष्टी किंवा काठी असते. या डौलदार यष्टीमध्ये बुद्धाचा आशीर्वादपर अधिवास असतो अशी श्रद्धा आहे. त्या यष्टीवर एकावर एक तीन छत्रे असतात. सर्वात वरचे छत्र बुद्ध, त्याखालचे छत्र म्हणजे ‘धम्म’ आणि त्याखालचे छत्र म्हणजे ‘संघ’! या अर्धघुमटाकार वास्तूभोवती दोन प्रदक्षिणापथ असतात. एक मेढीवरचा घुमटालगत आणि दुसरा मेढीखाली पण मेढीभोवतीचा प्रदक्षिणापथ. या सगळ्याभोवती बाहेर एक कुंपण असते. त्याला वेदिका म्हणतात. वेदिका अनेक आकृतींनी मढवलेली असते. या बहुधा पौराणिक जातक प्रसंग, त्यातील सूचक प्राणी, वनस्पती, देवता, यक्ष, मनुष्याकृती यांची शिल्पे/ उत्थितशिल्पे असतात. कुंपणातून आत शिरायला चार बाजूंनी चौकटी द्वार असते. त्याला म्हणतात तोरण. ही तोरणेदेखील नक्षीदार, चित्रमय संकेत- सजावटीने खुलविलेली असतात.

शाबूत असलेले मोठे स्तूप आणि त्यांची ठेवण कनिंगहॅम आणि त्याच्या चमूला परिचित होती. बिहारचा पूर्व भाग ते पश्चिम आणि वायव्य दिशेपर्यंतची बहुतेक संभाव्य स्थळे त्याच्या यादीत होतीच. उज्जैन आणि विदिशा ते पाटलीपुत्र असा जुना व्यापारी हमरस्ता आहे. तो पुढे उत्तरेकडे महियरच्या खोऱ्याकडून कौशंबी आणि श्रावस्तीकडे जातो. कनिंगहॅमला हा भिलसा प्रदेश म्हणून परिचित होताच. त्याच रस्त्यावर आहे ‘भारहुत’. पण तेथे कोठे स्तूप नव्हता! म्हणजे त्याचा काहीच मागमूस शिल्लक नव्हता. तेथील टेकडी उतारावर गवत माजलेले होते. त्या गवताआड काही उंचवटे होते. गोलाकार पायवाट अर्धवट दडली होती. कनिंगहॅमच्या नजरेला ते पुरेसे होते. शेरलॉक होम्सची ‘सिल्व्हर ब्लेझ’ नावाची गोष्ट आहे. गुन्ह््याची जागा पोलिसांनी तपासून झालेली असते. होम्स नंतर उशिरा येतो. त्याला स्कॉटलंड यार्ड इन्स्पेक्टर छद्माीपणे म्हणतो, ‘‘आम्ही सगळं पाहून घेतलं आहे अगोदरच!’’ तेवढ्यात होम्स एक काचेचा तुकडा उचलतो. इन्स्पेक्टर तो तुकडा पाहून दचकतो आणि म्हणतो, आम्हाला नाही दिसलं! तुम्हाला कसं दिसलं? त्यावर होम्स म्हणतो, ‘‘मी तेच शोधत होतो म्हणून तर मला दिसलं!’’ तसेच इतर बघ्यांचे झाले! त्या गवताआड दडलेल्या गोलाकार उंचवट्याकडे आणि वाटेच्या वर्तुळी हिश्शाकडे बघून कनिंगहॅमला चटकन् जाणवले की, ‘इथे काही तरी दडलंय!’ गावच्या लोकांना वाटत होते, ‘गोरा साहेब’ काही तरी गुप्त धन शोधायला खोदतो आहे! पण त्याच्या नजरेसमोर वेगळाच खजिना तरळत होता.

खोदकाम सुरू झाले आणि वेदिकेचे, तोरणांचे अप्रतिम कोरीव काम असलेले चितारलेले अर्धेमुर्धे खांब दिसू लागले. त्यातल्या अनेक खांबांवर मजकूर नोंदलेला होता. अनेक गोल पदकांसारखी चित्रे, त्यात निरनिराळे प्राणी, पक्षी, यक्ष, यक्षिणींची चित्रमालिका होती. काही अवशेषांतील कोरण्याची शैली लाकडी नक्षीकाम केल्यागत होती. फलकावर गोल पदकांचे समूह होते. त्यात निरनिराळे प्रसंग आणि वस्तू चितारले होते. विशेष म्हणजे एक जातक कथा त्यातल्या एका पदकावर रेखलेली आहे. त्या कथेनुसार मायादेवीला (म्हणजे बुद्धाच्या मातेला) बुद्धाच्या जन्माआधी स्वप्न पडले. तिला स्वप्नात दिसले की एक शुभ्र हत्ती तिच्या उदरी सामावला गेला! ‘शुभ्र हत्ती’ हे उदात्त ईश्वरी आत्म्याचे चिन्ह! त्या स्वप्नाचे सूचक चित्र या वास्तुशिल्पात रेखलेले आहे. या उत्कीर्ण रेखाटनात एक श्वेत हत्ती, एक तेवता ज्योतीदीप आणि डोईपाशी एक पाण्याने भरलेला घडा दिसतो. तसेच किन्नर जातकातील किन्नर युग्माचे कमरेभोवती झाडाची पाने गुंडाळलेले चित्रणही आढळते. दुसऱ्या एका गोल पदकावर ‘श्रावस्ती’मध्ये अनंत पिंडकाने जेतवन खरेदी केल्याचा प्रसंग नाण्यांसकट रेखलेला आढळतो.

पण हे सगळे खंडित तुकड्या-तुकड्यांत मिळाले होते! आणखी आसपास खोदकाम करताना ध्यानात आले की तेथे नंतर उभा केला गेलेला आणखी एक स्तूप होता. खेरीज स्तूपाजवळ एक बुद्ध मंदिर होते. नंतरच्या कालावधीतली एक भग्न शिरविहीन बुद्ध मूर्ती त्यात होती. त्या मूर्तीवरून आणि त्यात सापडलेल्या लेखांवरून बराच उशिरापर्यंत म्हणजे बाराव्या शतकापर्यंत बुद्ध धर्माचा प्रभाव तगल्याचा पुरावा लाभत होता. एका ग्रीक सैनिकाची कोरीव प्रतिमाही त्यात होती.

परंतु सलग अवघे म्हणावे असे तोरण किंवा वेदिकेचा मोठा सलग भाग शिल्लक राहिलेला सापडला नाही. एवढे मोठे शिल्पाकृती असलेले त्याचे खंड कुठे आणि कसे नाहीसे झाले? कुणी गायब केले? उत्तर सोपे होते. जवळपासच डोळ्यासमोर होते. त्यातले अनेक दगड, खांब आसपासच्या घरांवर विसावले होते! पण जे काही सापडले त्यातून त्याच्या मूळ रूपाचा भास व्हावा इतपत त्यांची संख्या होती. हे उरलेसुरले भग्नावशेष आहेत तसेच उघड्यावर सोडले तर? त्यांचीदेखील तीच गत होणार! चोरापोरी उचलून नेले जाणार! म्हणून कनिंगहॅमने उचल खाल्ली. बचावलेले खंड उचलून कोलकात्याला नेले आणि सुसंगतपणे त्यांचे प्रदर्शन घडेल असे रचून संग्रहालयात सुरक्षित ठेवले! ते अवशेष लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये धाडावे असाही बूट निघाला. पण कनिंगहॅमने तो निश्चयाने फेटाळला. ‘‘ब्रिटिश म्युझियममध्ये ते एखाद्या कोपऱ्यात इतर शेकडो ऐवजांसारखे धूळ खात पडतील. कुणी त्याकडे ढुंकून बघणार नाही. त्यापेक्षा इथल्या लोकांकडे त्यांचा असा वारसा इथेच राहू देत! तो त्यांच्या नजरेसमोर असू देत,’’ असे त्याचे म्हणणे. म्हणून हे अवशेष मूळ रूपाचा भास व्हावा अशा रीतीने कोलकात्यामधील संग्रहालयात विशेष दालन उभे करण्यात आले. आता कोलकात्याबरोबरीने त्यातला काही भाग अलाहाबाद, दिल्ली अशा संग्रहालयांतही बघायला मिळतो. पण जिथे हा अनमोल वारसा आढळला त्या भारहुतमध्ये काहीच स्मारक उरले नव्हते. म्हणून खुद्द भारहुतमध्ये आता त्यांची प्रतिकृती केलेले त्रिमिती प्रदर्शन उभे केले जाते आहे!

 

pradeepapte1687@gmail.com

मराठीतील सर्व भारतविद्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on ancient architecture in india abn