प्रदीप आपटे

Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
Many youths participated in the Wardha bodybuilding competition
शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘ यांनी ‘ मारली बाजी, पिळदार शरीराचे दमदार प्रदर्शन.
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
minor boy murder , boy Chandrapur murder ,
चंद्रपूर : क्रौर्याची परिसीमा… क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या
Agra Mubarak Manzil
Agra Mubarak Manzil : आग्र्यातील ‘औरंगजेब हवेली’ बिल्डरकडून जमीनदोस्त; पुरातत्व खात्याचे निर्देश धाब्यावर

केवळ औत्सुक्य म्हणून सुरू झालेला प्राक्काळाचा अभ्यास आजघडीला ‘कार्बन डेटिंग’सारख्या तंत्रांमुळे पुढारला आहे, पण वसाहतकाळपूर्व स्थिती काय होती?

भौगोलिक वास्तवाचा काव्यसुलभ अलंकार करण्याचे कसब कुसुमाग्रजांना लाभले होते. त्यांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’मध्ये मंगळ ‘लाजून लाल’ होतो, ध्रुव निराशेने उत्तरेला ऋषिकुळात जाऊन बसतो. खुद्द पृथ्वी ‘विझोनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे’ असे स्वत:च्या ‘थंडावण्याचे’ वर्णन करते. बहुधा अशीच कधी तरी कुसुमाग्रजांची पुरातत्त्वशास्त्राची ओळख झाली आणि त्यांनी लिहिले ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’.

पण मातीचे असे एकावर एक चढत गेलेले थर कोण, कधी खणून बघणार? विहीर खणायला घ्यावी किंवा खाणीमध्ये खनिज खणायला घ्यावे आणि अचानक पुरून ठेवलेला नाण्याचा हंडा मिळावा! किंवा एखादी स्वयंभू म्हणून मिरवावी अशी अवघी मूर्ती मिळावी! असा काही लोभ असल्याखेरीज असा खटाटोप मुद्दाम कोण करणार? आणि केला तरी जाणूनबुजून किती खोलवर करणार?

चोवीस ऑगस्ट सन एकोणऐंशी. इटालीतला वेसुवियस पर्वत एकाएकी ज्वालामुखी स्फोट होऊन उधळला. लालबुंद लाव्हारस, राख आणि छिन्न पाषाणखंडांचे एक भले मोठे भीषण कारंजे उडाले. बर्फवृष्टी पसरावी तशी सभोवतालच्या प्रदेशात राख आणि गरम चिखलाच्या लाटा उसळल्या आणि त्यांचे जाड आवरण पसरले. वातावरण अतिउष्ण वायूंनी व्यापून गेले. पर्वतउतारावरून पाषाणखंड घरंगळत आसपास वाहात राहिले. या स्फोटक आवरणाखाली हक्र्युलेनियम आणि पॉम्पेई या दोनही रोमन नगरी गाडून गेल्या. पॉम्पेईमधल्या उंच इमारतींची मोजकी छपरे त्या आवरणातून नाक आल्यागत राहिली. या घटनेची नोंद ठेवणारा साक्षीदार ‘दुसरा- तरणा प्लाईनी (अलेक्झांडर काळातला तो पहिला प्लाईनी!) त्याने लिहिले आहे की ‘काही काळ फक्त महिलांचे आणि लहानग्यांचे विव्हळणे आणि पुरुषांचा आरडाओरडा वातावरणात ऐकू येत होता. नंतर काही काळातच फक्त स्तब्ध शांतता अवतरली.’ त्यानंतर १६०० वर्षे लोटली… १७०९ साली इटालीमध्ये अशाच काही रोजरहाटी खणण्यातून अपघाताने एक आश्चर्यकारक ‘घबाड’ दिसले. शेतकरी विहीर खणायला गेला आणि त्याला कोरीव काम केलेला संगमरवरी पाषाणखंड मिळाला. त्याच्या या घबाडाची वाच्यता झाली. स्थानिक राजाने आणखी खोदून पाहाण्यासाठी मजूर धाडले. त्यांनी जरा खोल खणले तर त्यांना तीन अभंग स्त्री-पुतळे मिळाले. मग खोदकामाला आणखीच चेव आला… अनेक घरे, वाडे, रस्ते दिसू लागले. त्यातल्या उचलत्या येण्याजोग्या वस्तू हातासरशी येतील तशा उचलल्या गेल्या! कुठून अवतरले होते हे घबाड? तर १६३० वर्षांपूर्वीं चेतलेल्या ज्वालामुखीने बहाल केलेल्या मातीच्या थरातून. कुसुमाग्रजांच्या शब्दांत, ‘शेकडो ताजही जिथे शोभले काल। ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी’.

अर्थातच अशा पुराकालीन कोड्यांसाठी दर वेळेला जमिनीखाली खोल खणावे लागे असेही नव्हे! नाईल परिसरातले ‘जमिनीवर’चे पिरॅमिड, इंग्लंडातील विल्टशायर सॅलिसबरी पठारावरचे विशाल मरणशूळ पाषाणांर्चे ंरगण (स्टोनहेन्ज) अशा किती तरी चमत्कारिक रचनांनी विस्मयी वेड लावले होतेच. न्यूटनसारखा  प्रज्ञावंत ‘पूर्वजांना फार काही जास्त ज्ञान होते पण ते सांकेतिक रीतीने लिहिले आहे’ या समजुतीने झपाटला होता. त्याचा साधारण समकालीन विल्यम स्टुकेले हा स्टोनहेन्ज आणि पिरॅमिड ही कोडी सोडवायला आसुसला होता.

पण या ‘मातीच्या दर्पोक्ती’मध्ये भूतकाळाच्या म्हणजे अवघ्या इतिहासाच्या किती तरी उक्ती दबा धरून आहेत याची फार तीव्र जाणीव तुलनेने अलीकडे झाली. खोदकामात आढळलेल्या वस्तू, कोरीव कामे, मासे किंवा छोटे प्राण्यांच्या कुळातच जन्म घेतल्यागत हुबेहूब दिसणारे दगड ऊर्फ ‘जीवाश्म’, भांडी, माती वा धातूचे दागिने… हे सारे जमविणारे, त्यांचे औत्सुक्याने/ कौतुकाने जतन करणारे महाभागदेखील होते. अशा पुरातन पूर्वज वारशाचा पदराला खार लावून संग्रह करणारे ‘श्रीमंत’ही होते. त्यांना प्राक्भक्त (अँटिक्वेरिअन) म्हटले जायचे. कधी आदराने तर कधी हेटाळणीने!

प्राक्कालीन वस्तूंबद्दल असणाऱ्या औत्सुक्याला एक उपजत बाजू होतीच. मनुष्याची स्मरणशक्ती हे शाप आणि वरदानाचे गाठोडे आहे. स्मरण नसते तर भूतकाळ कुठून अनुभवणार? (आणि बहुधा/ बरीचशी भविष्यकाळाची जाणसुद्धा!) आपले पूर्वज आणि त्यांचे चालत आलेले पूर्वसंचित याबद्दल औत्सुक्य आणि अभिमान असतोच. आणि पूर्वजांप्रमाणेच मातीचा पुढचा थर होण्याची सदासुप्त भीतीसुद्धा! अनेक औध्र्वदेहिक प्रथांमध्ये याचे बिंब आढळते. पुरलेल्या देहाशेजारी अन्नपाणीवस्त्रादी ‘पुरवठा’ही उत्खननात सापडतो. श्राद्धपक्षात त्याची ‘दाने’ असतात. मध्य अमेरिकेत पूर्वजांच्या वस्तूच नाही तर घरांत त्यांची कवटी जपून ठेवायची प्रथा होती. (धर्मांतरांचा बडगा चालविणाऱ्या ‘येशुदासां’नी त्याचाच पुढे ‘हॅलोवीन’ सण आत्मसात केला.)

पण ‘मातीखाली दडलेल्या जगामध्ये निव्वळ इमारती आणि वस्तूंपलीकडे पुरातन सृष्टीचे बरेच काही चरित्र लिहिलेले असते. याची जाण वेगळ्याच अपघाती साक्षात्काराने घडली. समुद्रतटीचे कडे समुद्राच्या पाण्याने खपत गेले. त्यांचे अर्धवट तुटून उघडे पडलेले वेगवेगळे थर दिसू लागले. तेही निरनिराळ्या रंगछटांचे. त्यात दडलेल्या अवशेषांमध्ये फरक दिसत होता. वेगवेगळ्या थरांमध्ये आढळणाऱ्या अवशेषांमध्येदेखील काही विशेष क्रम आहे असे जाणवू लागले. जे अगदी तळच्या थरात आहेत ते पुढे आढळेनासे दिसतात. काही पदार्थांचा, धातूंचा किंवा वस्तूंचा पहिल्या काही थरांमध्ये मागमूस नसतो. पण पुढच्या थरांत त्या अधिक ठळकपणे आणि संख्येने विपुल आढळतात. अशा निरीक्षणांमुळे एकीकडे डार्विनच्या उत्क्रांती विचाराचे बीज रुजले. दुसरीकडे दगडामातीच्या प्रकारांबरोबरच माणसाला गवसलेल्या धातुकलेनुसार भासणारा आढळ आणि त्यांची विपुलता बदलत गेलेली आढळली. त्यातून लोहयुग, ताम्रयुग, ब्राँझयुग अशा कालखंडांची कल्पना मूळ धरू लागली.

वस्तू, इमारती, चित्रधारी गुंफा, लेणी शिल्पे, मूर्ती यांच्या जोडीने दगड किंवा धातुपत्र्यांवर कोरलेला चिन्हरूपांनी गजबजलेले स्मृतिसंदेशवजा लेखन दृष्टोपत्तीस येऊ लागले. हे संकेती खुणांचे संदेश ऊर्फ ‘लिपी’सदृश नोंद उलगडणे हे एक नवे आव्हान सामोरे आले. पूर्वी कधीकाळी निराळा समाज होता; त्याची धाटणी जडणघडण, निसर्गाशी नाते प्रचलित घडीपेक्षा भिन्न होते. पूर्वीचे भूवर्णन प्रचलित रूपापेक्षा निराळे होते याचेही भान येत होते. ते कधी अस्फुट असे. कधी लोकप्रिय समजांमध्ये किंवा दंतकथात विरघळून पसरलेले असे. उदा. नद्याांचे लुप्त होणे त्यांचे प्रवाह दिशा पालटून वाहू लागणे. मुळात भूतकाळातील सृष्टीचे इतके विविध पैलू! आणि त्यांच्या तोकड्या खुणांनी पुढे ठाकलेले प्रश्नांचे रान! त्यात ज्ञातापेक्षा जटिल अज्ञाताची मातब्बरी जास्त! त्यातला हरेक पैलू उलगडायला कोण्या नवीन शोधरीती आणि ज्ञानशाखेची आराधना करावी लागे.

‘प्राचीन’ किंवा ‘प्राक्’ हे अगदी ढोबळ वर्णन झाले! ‘प्राचीन’ म्हणजे किती जुने? किती वर्षांपूर्वी? अगदी नेमके नसतील पण त्यांचा काही विश्वसनीय अदमास तरी कसा रचायचा? चार हजार वर्षांपूर्वी म्हणावे की दहा हजार वर्षांपूर्वी? भूगर्भी घडामोडी उमजू लागल्यावर इतिहासाचे मोजमाप ‘दशलक्ष’, ‘कोटी’च्या भाषेत अवतरू लागले. भूगर्भी काळ नावाचे मोजमाप रुढावले. त्याची जीवसृष्टीशी सांगडदेखील अतोनात पालटू लागली. युरोपीय येशपूजक संस्कारांत वाढलेल्या अभ्यासकांच्या मेंदूभोवती कॅथोलिक चर्चप्रणीत समजुतींचा जीवघेणा काच होता. चर्चने जगाची व्युत्पत्ती कधी झाली याचे जुन्या कराराआधारे ईश्वरी वेळापत्रक ठरवून टाकले होते. त्या कालगणनेला काटशह देणे म्हणजे स्वत:ला येशूगत लटकून घेणे! याउलट इतर अनेक समाजांमध्ये जीवसृष्टीच्या पुरातन काळाचे मोजमाप भलतेच वेगळे होते. उदा. भारतीय परंपरेतील युगवर्षांचे हिशोब करणारे आकडे युरोपीयांना चक्रावून टाकीत. काही त्याची उघड हेटाळणी करीत. काही ‘सखेद आश्चर्य’ करीत तर काही त्यामागचा विचारविकार समजून घ्यायला धडपडत!

कालांतराने युरोप-अमेरिकेत अणुविज्ञान पुढारले. वस्तूतले कर्बाचे अणू प्रायोपवेशन केल्यागत ठरावीक कालावधीत ठरावीक वेगाने लोप पावतात. त्याआधारे काळ निश्चित करण्याची तंत्रे उपजली. भूविज्ञान रसायनी-जैवविज्ञान अशा विविधांगी वैज्ञानिक फौजफाट्याने आता पुराजीवींची पारख होते. एकोणिसाव्या शतकात साधने मर्यादित होती. पण आजचे प्रगत पुरातत्त्व विज्ञान त्यांची जगभरच्या कानाकोपऱ्यात चिवट भ्रमंती आणि चिकाटीची खोदकला या खांद्याांवर उभे राहिले.

या नवजात विज्ञानाचे काही स्वयंप्रेरित पाईक होते. ते आपल्या औत्सुक्याचा प्रकाश पाजळत कधी समजून-उमजून तर कधी अभावितपणे हिंदुस्तानचा प्राक्कालिक नकाशा रेखाटू लागले.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

Story img Loader