प्रदीप आपटे

जॉर्ज एवरेस्टचे नाव ‘माउंट एव्हरेस्ट’ला कसे मिळाले याचीच ही गोष्ट नसून, हिमालयाविषयी वाटणाऱ्या कुतूहलाची आणि मोजमापाच्या जिद्दीचीही आहे..

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
Loksatta anvyarth Science Culture India Nuclear Testing and Use of Atomic Power
अन्वयार्थ: विज्ञान संस्कृतीचा मेरुमणी
India redflags Chinas 2 new counties
चीनने गिळंकृत केला लडाखचा एक प्रदेश, काय आहे प्रकरण?

हिमालयातल्या काही शिखरांना पारंपरिक नावे आहेत : गौरीशंकर, धवलगिरी, कांचनजंगा! आणि पहिल्या क्रमांकाचे? एव्हरेस्ट! हिमालयामधल्या उच्चतम ‘सरळ अजस्र नाकाडा’ला असे नाव का?

हिमालय पर्वतरांगेबद्दल जेवढे औत्सुक्य होते तितकेच अज्ञानही होते. टॉलेमीने हिमालयाचा उल्लेख ‘इमौस’ आणि ‘एमोदी’ असा केला आहे. दोन्ही शब्दांत ‘ह’कार हरवलेली ‘हिम’ची रूपे आहेत. कॅस्पिअन समुद्राच्या पूर्वेला पसरलेला कॉकेशस पर्वतरांगांचा सलग भाग असा त्याचा समज होता. काही युरोपीय लोक तो एक जागृत ज्वालामुखी आहे असे समजत. तेराव्या शतकातल्या मार्को पोलोने हिन्दुकुश कुनलुन पामीर पठार आणि रेशीम मार्गाच्या अनुषंगाने हिमालयाचे वर्णन केले आहे.  १७१५ साली इप्पोलितो देसीदरी नावाचा इटालिअन येशूसेवक कश्मिरातून ल्हासाला गेला होता. त्याने नोंदले आहे ‘एकावर एक रास रचल्यागत असलेले थोराड पहाड आणि त्यावरून घसरत्या बर्फाचे आणि सोसाट वाऱ्याचे धडकी भरवणारे आवाज यांनी पांथस्थ भेदरूनच जाईल.’

प्रदेश दुर्गम आणि प्रवेश तेवढाच दुर्गम. चीन, नेपाळच्या राजवटींना अपरिचित युरोपीयांबद्दल संशयी आकस असे. यामुळे या भूभागात शिरकाव करणे आणि तिथला भूगोल वा इतर काही पैलूंची जाण प्राप्त करणे यासाठी काही निराळेच मार्ग अवलंबावे लागले. त्याची कहाणी नंतर बघू. परंतु तिकोनी साखळ्या रचतरचत सर्वेक्षण वारीच्या दिंडय़ा ७८ ते ८८ अंश अशा ११ मध्यान्हरेखांची वाट पुसत ईशान्य भागातल्या हिमालय पायथ्याशी पोहोचल्या होत्या. या सगळ्या मूळ ७८ अंशांच्या रेखेशी ढोबळपणे समांतर होत्या. हिमालय क्षेत्राच्या आसपास येऊन थबकत होत्या. उत्तर भारतात, सपाट विस्तीर्ण मैदानवजा भाग ओसरत जाऊन पर्वतराजीच्या दिशेने उंचावत होता. अशा ठिकाणी शिखरांची टोके त्रिकोण बिंदू खुणावत; पण त्याकरिता थिओडोलाइटची दुर्बीण व चकती शहामृगाने मान उंचावल्यागत रोखावी लागे. विंध्य, सह्य़ाद्रीची शिखरेही उंच असली तरी हिमालय त्याहीपेक्षा उंच. युरोपिअनांच्या कल्पनेत आणि भाषेत उंचपणाचे लोकप्रिय गमक होते ते स्पेनच्या कॅनरी बेटावरचे ‘टेनेरिफ शिखर’! त्याची उंची १२१९५ फूट; यापेक्षा उंच तुर्कस्तानातले आरारात शिखर (१६९४६ फूट) किंवा फ्रान्समधला विख्यात ‘मों ब्लां’ (१५७८१ फूट) होते. पण ‘टेनेरिफ’ची नैसर्गिक ठेवण सोपी- खलाशांच्या साठअंशी कोनमापकाने निरपवाद मोजायला आयती समुद्रसपाटी पायाशीच! इतर पर्वतांमध्ये ही आयती पातळीरेखा नव्हती. अमेरिका खंडातल्या अँडिज पर्वतातील अतिउच्च शिखर ‘चिंबोरासो’ हे समुद्रसपाटीपासून २०७०० फूट आहे. फ्रेंच घुमक्कडांनी हे शिखर शोधले आणि मोजले होते. परिणामी चिंबोरासो शिखर उंचपणाचा मेरुमणी आणि मापदंड ठरले होते.

भारतात पोहोचलेल्या ब्रिटिशांना हिमालय जवळून नजरेस आला तो बिहार, बंगाल प्रांतातून. भूतानमधले ‘चोमो ल्हारी’ शिखर चिंबोरासोपेक्षा ३,००० फूट अधिक उंच होते. जेम्स रेनेलने ही शिखरे पाहिली होती, पण त्यांचे ‘उंचपण’ मापले नव्हते. पण रेनेल भारतात होता त्याच काळात विल्यम जोन्स नावाचा बहुविद्वान न्यायाधीश भारतात होता. त्याने ५ ऑक्टोबर १७८४ ला लिहिले- ‘भागिलपुरातून (भागलपूर)  ‘चिमुलरी’ शिखर मला साफ दिसले. माझ्या अंदाजाने चिमुलरी तेथून २४४ ब्रिटिश मैल दूर असावे.’ हे शिखर बरेच उंच आहे आणि त्याची उंची मुद्दाम जोखावी अशा पात्रतेचे आहे असा त्याचा अभिप्राय होता. जोन्सच्या मताला मान देऊन त्याचे म्हणणे पुढे शोधत राहणारे दोघे बंधू होते. रॉबर्ट कोलब्रुक आजि हेनरी कोलब्रुक. हेनरी कोलब्रुक पूर्णिया जिल्ह्य़ात १७९० मध्ये उपजिल्हाधिकारी झाला तेव्हा त्याने तेथून दिसणाऱ्या बर्फाच्छादित शिखरांची अनेक मापे घेऊन उंची मोजण्याचा खटाटोप केला. त्याचे शिखरांपासूनचे अंतर अदमासे १५० मैल (म्हणजे जोन्सपेक्षा बरेच कमी) होते. त्याच्या अदमासानुसार ती उंची २६००० फूट इतकी होती.

रेनेलनंतर त्याच पदावर रॉबर्ट कोलब्रुकची नेमणूक झाली होती. रॉबर्टने गोरखपूर गोग्रा रप्तीसारख्या गंगेच्या उपनद्यांचे तीर, तराई प्रदेश अशा अनेक ठिकाणांमधून बर्फाच्छादित शिखरांची न्याहाळणी/ मोजणी केली. आजारी पडून तो अकाली मृत्यू पावला. पण रॉबर्टच्या नोंदी आणि वासऱ्यांआधारे हेन्रीने शिखरांची उंची मोजण्याचा ध्यास जारी ठेवला. त्याच्या मोजमापाच्या रीतीत अनेक कच्चे दुवे होते.

मात्र कालांतराने तिकोनी साखळ्या हिमालय पायथ्यांशी अनेक ठिकाणी भिडल्या. तेथून दिसणाऱ्या या शिखरांची उंची अदमासण्याचे कार्य बंगाल-सर्वेक्षणाचा प्रमुख चार्ल्स क्रॉफर्डनेही गांभीर्याने घेतले. जॉर्ज एवरेस्टला जेवढी मध्यान्हरेखा, त्याचे बृहत् वक्र यांचे मोल होते तेवढे या शिखर उंचीचे वाटत नसावे. डेहराडूनजवळच्या हाथीपाँवमधल्या त्याच्या कचेरीतून नंदा देवी शिखरे दिसत. पण त्याला त्यांची साद पोहोचत नसावी! जवळपास ११ मध्यान्हरेखा आणि अंशत: त्यांची पूर्व ते पश्चिम तिकोनी साखळी उभी केल्यानंतर उत्तरेकडील निरनिराळ्या पायारेषांवरून हिमालय शिखरे विलसत दिसायची. पश्चिमेस डेहरा ते पूर्वेकडे दार्जिलिंगनजीकचे पूर्णिया जिल्ह्य़ातले सोनखडा अशी ही १६९० मैलांची तिकोन साखळी पाच वर्षांत आरेखली गेली. मूळ आराखडय़ानुसार ती अवघी हिमालय परिसरातून शिखरे कवेत घेतच रेखायची होती. पण नेपाळच्या राजवटीने परवानगी नाकारली. त्यामुळे तिथला प्रवेशच खुंटला. गढम्वाल आणि कुमाऊँपासून त्रिकोणमाला बरैली आणि जवळील तराई प्रांतातून हिमालयाच्या कडेकडेने ओढत घ्यावी लागली. हा प्रदेश जंगलग्रस्त, दलदलीचा होता. त्यात अनेक सर्वेक्षण कर्मचारी, चौघे ब्रिटिश अधिकारी प्राणास मुकले.

जॉर्ज एवरेस्टनंतर त्याचा उपअधिकारी अ‍ॅण्ड्रय़ू स्कॉट वॉ त्याच्या पदावर आला. अतिउंच शिखरांचे निरीक्षण मोठे कठीण काम होते. ही शिखरे पाहता पाहता सर्दावलेल्या थंड ढगांनी वेढून दिसेनाशी होत. वॉ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कांचनजंगाच्या डाव्या अंगाला नेपाळ-तिबेट सीमेपासून सुमारे १२० मैल अंतरावर एक शिखर हेरले होते. पण वॉने अलिप्तपणे आपल्या नोंदीत लिहून ठेवले आहे. ‘कांचनजंगाच्या पश्चिमेला असणारे शिखर किमान २८१७६ फूट उंचीचे आढळते. आतापर्यंत केलेल्या कल्पनांपलीकडे जाणारी ही उंची आहे.’ वॉ अतिशय मख्ख धीराचा अधिकारी होता. कितीही अद्भुत भासली तरी कुठली गोष्ट पुरेशी खातरजमा झाल्याखेरीज जाहीर करायला तो बिलकूल उतावीळ नसे. तो आणि त्याचा सहायक विल्यम रोझेनरोड हे शिखर टायगर हिल, सेनचेल ,तोंगलु आणि दार्जिलिंगमधील अनेक जागांवरून निरखले होते. वॉने दोन-तीन वर्षे सलग निरीक्षणे घेतली. १८४७ च्या नोव्हेंबरात पुन्हा ती पडताळली. त्या शिखराचे नोंदीसाठीचे सांकेतिक टोपणनाव ‘गॅमा’ हे ग्रीक अक्षर होते. त्याच महिन्यात बिहारमधल्या मुझफ्फरपूर येथे ईशान्य मध्यान्हरेखेवरून जॉन आर्मस्ट्राँगने तेच शिखर न्याहाळून त्याचे तीन वेळा क्षितिजकोन आणि लंबरूप कोन मोजले होते. आर्मस्ट्राँगने त्याची नोंद स्वत:च्या वहीत ‘बी’ या इंग्रजी अक्षराने केली होती. त्याच्या मोजनोंदीतून त्या शिखराची उंची २८७९९ फूट येत होती. पण हे मोजमाप अधिक दूरस्थ अंतरावरचे होते. म्हणून वॉला पुरेसा विश्वास आणि समाधान वाटत नव्हते. तो आणखी एक वर्ष थांबून पुन्हा मोजणीला उत्सुक आणि तयार होता! जेम्स निकोलसन या अधिकाऱ्याने जरा अधिक जवळून पूर्वेकडून ईशान्य मध्यान्हरेखेवरून मोजनोंदी केल्या. त्याच्या नोंदीत त्या शिखराचे संकेतनाव होते ‘ए’! अशी नोंद, पडताळणी चांगली पाच वर्षे चालली. अशी किती तरी शिखरे होती. त्यांना अधिकृत दप्तरी रोमन क्रमांक दिले होते. या शिखराचा रोमन क्रमांक होता ‘XV’ म्हणजे १५! वेगवेगळ्या ठिकाणी निरीक्षणे घेतलेली असायची. त्याची लक्ष्य शिखरांपासूनची अंतरे निरनिराळी असत. समुद्रसपाटीपासूनची उंची निरनिराळी असे. त्रिकोण साधताना लंबकोन आणि क्षितिजकोन यामध्ये फरक पडे. प्रकाशाचे वक्रीभवन झाल्याने तो ‘वाकुडेपणा’ मोजणीत उतरे. अशा तफावतींनी गजबजलेले संख्याजंजाळ हाताळायचे आणि त्याला समान सूत्राने सुसंगतपणे गुंफायचे! असे गणिती रूप मांडायला तगडा समर्थ गणितीच हवा. एवरेस्टला तो अगोदरच गवसला होता. एवरेस्टने कोलकाता मुख्यालयात ‘संगणक’ म्हणून राधानाथ सिकधर या भारतीयाची नेमणूक कधीच केली होती. या सिकधरने सर्व गणिती पारख करून निर्वाळा दिला की या शिखराची उंची २९००२ फूट आहे!

या निर्वाळ्यानंतर वॉने अखेर आपला अधिकृत अहवाल सर्वेक्षण खात्याच्या उच्च अधिकाऱ्यांना दिला. त्याने लिहिलेला शेलक्या चौदा परिच्छेदांचे सार असे :

माझे वरिष्ठ आणि पूर्वसूरी एवरेस्ट यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार भौगोलिक वस्तू वा स्थानांना स्थानिक प्रचलित नामाभिधान देणे उचित आहे. परंतु या सर्वोच्च शिखराला कोणतेही स्थानिक नाव सापडले नाही. नेपाळात प्रवेश करून तेथे पोहोचल्याखेरीज असे नाव आहे का नाही हेदेखील पडताळणे शक्य नाही. या उत्तुंग शिखराला भूगोलतज्ज्ञ वापरासाठी आणि सर्व सुसंस्कृत जगाच्या माहिती व सोयीसाठी त्याला नाव देणे हे माझे पदसिद्ध कर्तव्य आहे. माझ्या या विशेष अधिकाराने माझ्या वरिष्ठांप्रति असणारा प्रेमादर व्यक्त करण्यासाठी या महान शिखराचे  नाव एवरेस्ट पर्वतशिखर करीत आहे..

मोंत् एवरेस्ट अर्थात हिमालय शिखर XV

अक्षांश उत्तर २७ अंश ५९’१६.७’’

रेखांश ग्रीनीचच्या पूर्वेस ८६अंश ५८’५.९’’

या नामकरणाला काही आक्षेप घेतले गेले, पण भारत सचिवांनी आणि रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने आपल्या संमतीने त्यावर शिक्कामोर्तब केले. फक्त एक फरक केला रोमन-फ्रेंच ‘मोंत’ ऐवजी इंग्रजी तोंडावळ्याचा ‘माऊंट’ शब्द आला!

हे नाव बदलून देवधांग असे नेपाळी नाव द्यायचा प्रस्ताव येऊन तोही विरळला. आणखी एक तिबेटी नाव सुचविले गेले असे म्हटले जाते ‘मि-सिग् गु-सिग् ज्य-फर्ु लोङ्-ङ’ याचा ढोबळपणे अर्थ असा समजतात. ‘‘(हे शिखर) तुम्ही जवळ वरती जाऊन बघू शकत नाही (पण) शेकडो दिशांनी बघू शकता. जोपरी इतका उंच उडून बघू पाहील तर तो आंधळा होईल.’’ हे नाव तिबेटी लोकांतदेखील फार रुळले- प्रसारले नाही! परिणामी शिखरावर बर्फ साठत राहावे तसे एव्हरेस्टचे नाव सर्वतोमुखी रुळले!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

Story img Loader