प्रदीप आपटे

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

ह्यूएनसांग, मेगास्थेनिस यांनी वर्णिलेला भारत एकोणिसाव्या शतकात कनिंगहॅमने पुन्हा शोधला, बौद्ध शिलालेख आणि स्तूपांचाही शोध या अभियंत्याने घेतला…

‘आपल्याला मोठा आणि अभिमानास्पद वारसा आहे’ अशा जाणिवेमध्ये एक सुख असते. व्यक्तीप्रमाणेच समूहालादेखील रोमन आणि ग्रीक संस्कृतीइतकाच आपल्यालादेखील वारसा होता, असा दावा रोमन साम्राज्याच्या पडझडीनंतर ब्रिटनसह अनेक युरोपीय समाजांत उद््भवला. त्याचे एक रूप म्हणजे अतिप्राचीन काळाचा इतिहास, वस्तू, वाङ्मय यांना येणारी मातब्बरी. इंग्लंडमध्ये दोन मोठ्या प्राक्कालिक संस्था होत्या. एक लंडनमध्ये १७५१ साली राजश्रयाने उभी राहिलेली ‘सोसायटी फॉर अँटिक्वेरिज ऑफ लंडन’ आणि दुसरी १७८० मध्ये स्थापन झालेली ‘सोसायटी फॉर अँटिक्वेरिज ऑफ स्कॉटलंड’. प्राचीन इतिहासाबद्दलच्या जिज्ञासेची ‘लागण’ झालेले काही जण ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी/ न्यायाधीश/ डॉक्टर म्हणून भारतात आले होते. विल्यम जोन्स त्यातला मेरुमणी. त्याने कोलकात्यामध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. या संस्थेभोवती अशा जिज्ञासूंचे मोठे मोहोळ उभे राहिले. भारतातील भाषा, त्यांचे वाङ्मय/ व्याकरण, इतिहास, धर्म, चालीरीती/ समजुती, भूगोल, ज्योतिर्गणित, आयुर्वेद अशा कितीएक विषयांवर हे जिज्ञासू लोक माहिती गोळा करायचे. तिची छाननी करायचे. अन्वय लावायचे. जोन्सचा समकालीन संस्कृत विद्वान विल्किन्स प्रिन्सेप याच्यासारखे सदस्य त्याचे तेजस्वी नमुने.

प्रिन्सेपपेक्षा पंधरा वर्षांनी लहान असा एक अभियंता कोलकात्यामध्ये दाखल झाला. त्याचे नाव अलेक्झांडर कनिंगहॅम. मूळचा स्कॉटिश. प्रख्यात कवी आणि प्राक्कालप्रेमी वॉल्टर स्कॉट हा त्याच्या वडिलांचा मित्र. कनिंगहॅम कोलकात्यात आला आणि प्रिन्सेपशी त्याची गाढ मैत्री झाली. पाली-संस्कृत भाषा, ब्राह्मी लिपी यांमध्ये रमून जाऊ लागला. त्याचबरोबरीने कंपनीच्या कामात त्याला युद्धमोहिमांवर जावे लागे. कब्जात घेतलेल्या संस्थानांच्या रेसिडेंटला मुख्य सहायक म्हणून काम बघावे लागे. अभियंता म्हणून गरज पडतील तशी वाहने, तोफा आदींची दुरुस्ती, पुलांची बांधकामे, रस्त्यांची आखणी करावी लागे. विशेषत: मोठ्या नद्या किंवा तलाव पार करताना सपाट बुडाच्या होड्यांची माळ बांधून पूल उभे करणे (पॉन्टॉन) अशा कामांची त्याच्यावर जबाबदारी होतीच. त्याचा कामाचा उरक मोठा होता. राजकीय जाण उत्तम होती. पंजाब-सिंध प्रांतांतील लढाया, काश्मीर ते लडाखमधील कंपनी सरकारच्या हद्दींची आखणी त्याच्याकडे सोपविली होती. सैन्यप्रमुख किंवा गव्हर्नरला छावणी सहायक असे. त्याला एड दे काम्प- ‘एडीसी’ म्हणत. (ती परंपरा आजही अंशत: जिवंत आहे. उदा. राष्ट्रपतींच्या मागे पिळाची सोनेरी दोरी छातीवर रुळणारा त्यांचा सहायक अधिकारी म्हणजे ‘एडीसी’). कनिंगहॅम हा १८३६ ते ४० या काळात ‘एडीसी’ होता. डोळे उघडे ठेवून नेमके तपशील नोंदणारा प्रवासी अधिकारी म्हणून त्याचा लौकिक होता. एवढ्या घालमेलीच्या रणधुमाळी जबाबदाऱ्यांतही प्राचीन इतिहास, लोकजीवन आणि शिलालेखांचे वाचन हा त्याचा ध्यास कधीच उणावला नाही. उलटपक्षी मध्य भारत, सिन्ध, पंजाब, काश्मीर, लडाख भागांत त्याची सतत वर्दळ झाली. त्याचे लडाख प्रांतातले काम होते हद्द आखण्यासाठी अहवाल करण्याचे. त्या भेटी आणि लडाखमधले वास्तव्य या अनुभवावरून त्याने ‘लडाक : फिजिकल, स्टॅटिस्टिकल अँड हिस्टॉरिकल’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या वेळी छायाचित्राची उपकरणे तुरळक; म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या दिमतीला चित्रकार असायचे. तेथील लोकांची आणि इमारतींची चित्रे तर आहेतच. जोडीला त्या-त्या भागातल्या माणसांचे वांशिक वैशिष्ट्य उंची कपाळ/ कवटीचा घेर, कान, नाक लांबी, डोळ्यांची खोबण यांनी वर्णिले जायचे. नंतर साठसत्तर वर्षांनी तर संख्याशास्त्रात ‘मनुष्यमापन’ जीवमापन (अ‍ॅन्थ्रोपोमेट्री बायोमेट्री) अशी मोठी उपशाखा उद््भवली. त्याचे प्राथमिक रूप या लडाखी लोकांच्या वर्णनात वापरलेले आढळते. त्यांचा पोशाख, आहार, सण, कौटुंबिक, सामूहिक प्रथा, बुद्ध धर्माचा प्रभाव, इमारती, धर्मस्थळे या सगळ्यांचे मोठ्या बारकाईने नोंदलेले वर्णन या पुस्तकात बघायला मिळते. ‘लडाक’ (शब्द कनिंगहॅमचा) हद्दींचे चौफेर दिशांकडून वर्णन त्यामध्ये आहे.

आसपासच्या देशांबद्दलही त्याने माहिती घ्यायचा प्रयत्न केला. लडाखच्या सीमा सांगताना त्याच्या भाषिक रेखाटनाचा धागा सुटत नाही. तो सांगतो : ‘‘लडाखच्या उत्तरेला, पश्चिमेला आणि दक्षिणेला असणाऱ्या ‘देशांत’ लोक निदान चार वेगळ्या भाषा बोलतात. त्या सगळ्या तिबेटीपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. उत्तरेला यारकंद आणि कोतानमधले लोक तुर्की भाषा बोलतात. पश्चिमेला बाल्टीपलीकडे अस्तोर, गिलगिट, हुंजानागरमध्ये दार्दू भाषेच्या बोली बोलल्या जातात आणि काश्मिरी तर त्यांची खास भाषाच बोलतात. दक्षिणेला चंबा, कुल्लु, बिसाहरमध्ये हिंदीच्या बोली चालतात आणि हिन्दवी ही मुख्यत: संस्कृतची उपज आहे. मात्र पूर्व आणि आग्नेय दिशेला रुडोक चांगथांग एन्गारी भागात फक्त तिबेटीच बोलली जाते.’’

मूळची तुटपुंजी माहिती आणि स्थानिक लोकांची स्वत:पेक्षा भलतीच निराळी समज यामुळे परकीय निरीक्षकावर काय आफत ओढवते याचे काही नमुनेही या पुस्तकात आहेत. भौगोलिकदृष्ट्या लडाखची समुद्रसपाटीपासूनची उंची निश्चित नव्हती. त्रिकोणमिती सर्वेक्षण अजून तेथपर्यंत भिडलेच नव्हते. मग या उंचीचा अंदाज कसा बांधायचा? मग बरोबरच्या स्थानिक सहायकांनिशी त्याने काराकोरम पुढच्या प्रांतांची काही माहिती मिळते का असा प्रयत्न करून बघितला. तेथून पुढे डोंगरांचा चढ वाढतो. मग वर माल नेणाऱ्या गाड्यांना पुढून ओढणारे घोडे वाढतील! किती लागतात घोडे? याचे उत्तर आले दोन, तीन, कधी कधी चार! एवढ्या घोड्यांची गाडी डोंगरी वळणातून पसार व्हायला रस्ते तेवढे रुंद तर पाहिजेत! त्याने रुंदीबद्दल विचारले तर काही म्हणाले दहा यार्ड, कुणी म्हणाले वीस यार्ड! मग त्याने हताशेने जमिनीवर ‘रुंदी’ दाखवा असे फर्मावले. तो सांगतो – प्रत्येकाने जरा वेगवेगळे रुंदीचे माप दाखवले, पण एकाही पठ्ठ्याचे उत्तर प्रत्यक्षात २५ फुटांपेक्षा जास्त नव्हते! शेवटी त्याला वाटले याचे उत्तर निसर्गातून मिळवावे! त्याला यारकन्द, कोतान, अक्सू या भागांत कोणती धान्ये, भाज्या, फळझाडे आणि वृक्ष आढळतात याची माहिती विल्यम मूरक्रॉफ्टकडून मिळाली होती.

त्यानुसार पाच हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर देवदार तरारत नाही; सहा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर भात क्वचितच तगतो. काश्मीर अदमासे इतक्या उंचीवर आहे आणि यारकन्द, काशाघर अक्षांशाने किमान चार अंश वरती आहे; तर मधल्या प्रदेशाची सरासरी उंची किती? अशा माहितीचा वापर करत त्याने उंचीचा सरासरी अंदाज बांधला!

त्याच वर्षी त्याचे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले. ते निराळ्याच विषयावर होते. मध्य भारतात अनेक छोटे घुमटाकार (उंचवटे) आढळले होते. ते होते बुद्धधर्मी स्तूप. या भेलसा जवळच्या ‘लघुटेकाडां’खालचे बौद्ध धर्मीय शिलालेख आणि त्याचे संभाव्य अन्वयार्थ हा या पुस्तकाचा एक विषय आहे. प्रिन्सेपने केलेला ब्रह्मी लिपीचा उलगडा त्याला चांगलाच अवगत होता. तेथील लेखन तर त्याने वाचलेच. परंतु भेलसा येथील ‘लेखां’इतकेच हे पुस्तक बुद्ध धर्माचा उदय, प्रसार व ºहास यांबद्दल आहे. त्याने त्या काळातील उपलब्ध पुरावे व धारणांवरून हा धर्म-इतिहास रेखाटला. त्या काळात जातक वाङ्मय उपलब्ध नव्हते. चित्रांतली काही चित्रणे कशाची द्योतक आहेत याचे अनेक सांकेतिक पैलू धूसर होते.

युरोपियनांना प्राचीन म्हणून रोमन आणि ग्रीक परंपरा अधिक ज्ञात होत्या. भारतातील परंपरा नुसती अधिक प्राचीन नव्हे तर त्याची मुळे आणि पडसाद दूरवरच्या संस्कृतींमध्ये आढळतात असा प्रवाह अगोदरच उदयाला आला होता. प्रस्तावनेत बुद्ध धर्मीयांची वृक्षपूजा-स्तंभांची गोलाकार साखळी आणि केल्टिकांची ओक वृक्षपूजा आणि पाषाणसाखळी (स्टोनहिन्ज) याचे साधम्र्य नोंदले आहे. ‘द्रुईडांची वृक्षपूजा’ याबद्दल सांगताना संस्कृतातला ‘द्रु’ (द्रुम) ग्रीक द्रुस, वेल्श देर्व, आयरिश देअ्र (ओक वृक्ष) ही भाषिक साम्ये त्याने नोंदली आहेत. एका तळटिपेत केल्टिक भाषा संस्कृतोद््भव आहे असे म्हटले आहे. हा ‘प्राच्यासुरी’ जोन्सप्रणीत इंडोयुरोपीय भाषासमूहाचा उघड प्रभाव आहे.

असा हा उद्योगप्रवण अभियंता! या कनिंगहॅमने या सगळ्या उद्योगात आणखी दोन मोहिमा स्वयंप्रेरणेपोटी केल्या. दोन चिनी बुद्ध ‘भिकसु’ बुद्ध वाङ्मयाच्या शोधात भारतात येऊन गेले. फा हाईन पाचव्या शतकात आणि ह्यूएनसांग सातव्या शतकात. त्यांचे ‘भारतभ्रमण’ वर्णन उपलब्ध होते. कनिंगहॅमने त्यांच्या यात्रेचा मागोवा घेतला. ती ठिकाणे पडताळली. तसाच खटाटोप मेगास्थानिस या ग्रीक प्रवाशाचा वृत्तांत फिरून बघितला! त्यातली ठिकाणे, त्यांची तत्कालीन आणि सद्य:कालीन वर्णने पारखून घेतली. याचा व्याप नंतर ओघाओघाने रुंदावतच राहिला!

लष्करी मोहिमांत त्याने अनेक प्रांत पाहिले. पायी तुडवले. त्या जागरूक भटकंतीत त्याने अनेक ‘घुमटाकार ऊर्फ टेकाडे’ पाहिली. पण त्यांचे भाग्य उजळायला अजून वेळ होता. अशी शोध घ्यायची संधी हेरली की कनिंगहॅम त्यासाठी त्या-त्या स्थानापुरती परवानगी आणि आर्थिक खर्चाची तरतूद मागत असे. असे प्रसंग ओढवेल तसे आणि तेवढेच शोध घेण्यापेक्षा त्यासाठी स्वतंत्र कामकाज वित्तीय तरतूद असलेली संस्था वा विभाग चालू करावा. असा प्रस्ताव त्याने दिला होता. बांधकामापूर्वीची उकराउकरी करताना त्याला अनपेक्षित गोष्टी आढळल्या होत्या. त्या औत्सुक्याचा त्याने जमेल तसा पिच्छा पुरविला. भारतवर्षातील इतिहासाचे एक नवे दालन त्यातून उघडणार होते. भाषा, आर्षकाव्ये यांच्या जोडीला निराळे परिमाण साकारणार होते. पण १८५७ च्या बंडामुळे त्याचा प्रस्ताव थंड पडला. पण त्याची ईर्षा नामोहरम झाली नाही… त्याची कहाणी पुढच्या आठवड्यात!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com