प्रदीप आपटे
‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणा’ची पायाभरणी करणाऱ्या पहिल्या काहींपैकी एक म्हणजे अलेक्झांडर कनिंगहॅम. त्याच्या सर्वेक्षणांचे त्याने लिहिलेले सर्व अहवाल हे त्याचे मोठेच ग्रंथकर्तृत्व ठरले. यापैकी ‘एन्शन्ट जिओग्राफी ऑफ इंडिया’ वगळता, त्या अहवालांचे मराठी/ हिंदी अनुवाद झालेले दिसत नाहीत…
चौकस बुद्धी, कष्टाळू हात आणि साहसी पाय असे तिहेरी वरदान असलेले लोक विरळा असतात. त्यांच्या उठाठेवींना बळ देणारी परिस्थिती त्यांना सुखेनैव मिळणे त्याहून दुरापास्त! तरीही औत्सुक्याची इंगळी डसली की ती सहजी उतरत नाही. मिळेल तो प्रवासी मार्ग, पडेल ते काम, लाभेल ते अन्न पत्करून केलेले प्रवास आणि त्यातले अनुभव लिहिणारे लोक ही एक दुर्मीळ प्रजाती आहे. त्या दुर्मिळांमधले, अनुकूल परिस्थितीचे पाठबळ लाभलेले भाग्यवंत संख्येने आणखी कमी. उदा. गेल्या शतकातली टीम सेव्हरिन ही वल्ली. त्याने काही अद्भुत सफरी केल्या. कोलंबसच्या फार अगोदर सहाव्या शतकात ब्रेन्डान नावाचा आयरिश येशुप्रवचक आइसलँड ते ग्रीनलँडहून वळून येत कॅनडातील आताच्या न्यूफुंडलँडपाशी जाऊन आला होता. सेव्हरिनने तो प्रवास करून पाहिला. तोदेखील त्याच सहाव्या शतकात असायचे तसलेच जहाज वापरून! दुसरे अजब साहस म्हणजे या टीम सेव्हरिनने ‘सिन्दबादच्या सफरी’ची केलेली पडताळणी. त्याहीसाठी त्याने सिन्दबादकालीन जहाजासारखे जहाज बांधून घेतले आणि तेच वापरून सिंदबादच्या सफरी केल्या.
ब्रिटनहून नोकरीसाठी भारतात आलेला अलेक्झांडरकनिंगहॅम अशा भाग्यवंतांपैकी एक ठरला. लष्करी अभियंता अधिकारी म्हणून त्याला अनेक मोहिमांवर कूच करीत फिरावे लागे. स्वत:चा लष्करी अधिकार आणि साथीला हाताशी दोन अधिकारी, चार सहायक असायचे. कुणा चिनी बुद्ध भिक्षूने नोंदवून ठेवलेली परिक्रमा पडताळण्याची उठाठेव त्याच्या पेशामुळे सुकर झाली. १८६१ ते १८६५ या वर्षांत अशा चौकस उद्योगाला सरकारी पाठबळ मिळाले. पण नंतर पुन्हा निधीचा झरा आटला. कनिंगहॅम इंग्लंडला परत गेला. त्याचा प्रस्ताव सर्वेक्षणाचा होता. ते बरेच पार पडले होते. पण पूर्ण तडीला गेले नव्हते. तत्कालीन गव्हर्नरने मंजूर केले होते ते फक्त सर्वेक्षण. अशा प्राचीन स्थळांचे जतन आणि संरक्षण ही एक स्वतंत्र आणि मोठी समस्या होती. सर्वेक्षण अधिकाऱ्याच्या अखत्यारीत जतन आणि संरक्षण नव्हते. स्थानिक सरकारांनी या जबाबदाऱ्या पार पाडाव्या असा सर्वसाधारण सूर होता. पण त्यासाठीची वित्तीय तरतूद अगदी तुटपुंजी होती. सर्वेक्षण पार पडले तरी या प्रश्नाचे लटकतेपण तसेच चर्चेत राहिले.
अखेरीस पुन्हा एकदा, अपूर्ण राहिलेल्या सर्वेक्षणाला चालना मिळाली. सन १८७१ मध्ये कनिंगहॅम पुन्हा भारतात आला. आल्यावर अगोदर त्याने, १८६१ ते १८६५ या काळात केलेल्या सर्वेक्षणाचे चार अहवाल लिहून प्रसिद्ध केले. फक्त हे चार अहवालदेखील त्याच्या उद्योगी चिकित्सक झपाट्याची पुरेशी झलक देतात. बुद्ध धर्माचा इतिहास, तत्कालीन स्थळे, त्यांचे अवशेष याची भरगच्च माहिती आणि विवेचन या चार अहवालांत मिळते. त्यातही विशेषकरून पहिल्या खंडामध्ये! हा-फॅन आणि ह््युएनत्सांग यांची प्रवासवर्णने आणि त्यात उल्लेखलेले अनेक संदर्भ हा कनिंगहॅमचा मुख्य प्रेरणास्राोत होता. त्यांचा माग पुन्हा पडताळणे ही त्यातली सुप्त प्रेरणा होती. जे अवशेष मिळत गेले त्यातल्या अनेक नमुन्यांची रेखाटने, त्यातल्या नक्षींची सजावट यांचे तपशील या अहवालात मिळतात (सोबतचे चित्र त्याच अहवालांतले, सौजन्य : विकिमीडिया कॉमन्स).
हे अवशेष टिकविण्याची अधिक सघन साधन व्यवस्था पाहिजे आणि तशी उभी करायची तर काय करणे संभव आहे, याचे विचारदेखील या खटाटोपामुळे आकार घेत होते. देहली आणि आग्रा हे दोन मुघली साम्राज्याच्या प्रदेशांचे सर्वेक्षण काही प्रमाणात त्याने अगोदरच्या टप्प्यात केलेच होते. अब्रामी परंपरा कमालीची मूर्तिद्वेष्टी आणि आपल्या कल्पनेतल्यापेक्षा अन्य सर्व देवांना द्वेषाने अव्हेरणारी. जुन्या करारात त्याचे कडकडीत जळते हुकूम आणि शेरे आढळतात. इस्लाम त्याचेच पराकोटीचे कडवे द्वेषांध रूप. देहली- आग्रा परिसरांतल्या अनेक मशिदी अन्य धर्मीयांची उपासना स्थाने पाडून उभ्या केल्या गेल्या. तेही मूळ वास्तूंचे खांब आणि कोरीव दगड वापरून. तसे वापरताना होणारी अडचण, रचनेतले वेडेबागडेपण, तुळयांची जुळवाजुळव, स्तंभांच्या मूळ रूपात फेरफार, प्रवेशद्वाराशीच पूज्य प्रतिमा गाडणे अशा ‘इस्लामी शैली’चे नमुनेही या भागात कनिंगहॅमने केलेल्या उत्खननांमुळे स्पष्ट होऊ लागले. उदाहरणार्थ, सुलतानगढी हे दिल्ली परिसरातले पहिले मोठे राजेशाही कबरस्तान समजले जाते. दिल्लीचा इतिहास लिहिताना कनिंगहॅमने सुलतानगढी कबरीचा एका तळटिपेत उल्लेख केला आहे. तो लिहितो, ‘‘सुलतानगढीच्या प्रवेशद्वाराच्या आणि नंतरच्या स्तंभ रांगांमध्ये असलेले संगमरवरी आणि तांबड्या वालुकाश्माचे खांब हे शिवमंदिरातून उखडून आणलेले आहेत. शिवलिंग ज्यामध्ये स्थापतात ते पिंडीपात्र दरवाजाशी पुरून बसवले आहे.’’ दिल्ली-आग्रा परिसरातले काही उर्वरित सर्वेक्षण त्याने १८७१ सालात पुन्हा आरंभले.
पुढच्या १८७२च्या मोसमात त्याने राजपुताना, बुन्देलखण्ड, मथुरा, बोधगया व गौरचे सर्वेक्षण पार पाडले. १८७३ मध्ये पंजाब प्रांत धुंडाळला. बरीच हिन्दू-ग्रीक शिल्पे आणि मूर्ती त्यात गवसल्या. त्यानंतर पुन्हा भारहुत, बोधगया आसपासचे विभाग! त्यापाठोपाठ बंगाल प्रांत असे करीत त्याने १८८५ पर्यंत जे जे त्याने आधी सुचविले होते त्या सगळ्या प्रदेशांचे सर्वेक्षण संपविले. त्याने लिहिले आहे, ‘‘प्राचीन भारतातील सर्व मोठी शहरे आणि प्रसिद्ध स्थळांचे सर्वेक्षण आम्ही पुरे केले आहे. आर्नोसचा पाषाण, तक्षशिला नगरी, संगलाचा किल्ला यांसारख्या सिकंदराशी संबंधित जागा, बुद्धाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रेखाटणारा भारहुतचा स्तूप, सांकाश्य ऊर्फ संकिशा, श्रावस्ती, कोशांबीसारखी बुद्धचरित्राशी संबंधित नगरे आम्हाला गवसली. काळाचा स्पष्ट उल्लेख असलेले अशोकाचे तीन शिलालेख लाभले. अशोकाचा एक नवीन स्तंभ, बॅक्ट्रिअन अक्षरचित्रे असलेला आणि बाराव्या आज्ञापत्राचा संपूर्ण मजकूर असलेला पाषाणलेखदेखील मिळाला’’
त्याने अनेक स्थळांचे असेच परिशीलन केले. मिळतील त्या सर्व पुराव्यांचा आणि वाङ्मयीन संदर्भाचा आधार घेत त्याने ‘एन्शन्ट जिओग्राफी ऑफ इंडिया’ असे स्वतंत्र पुस्तक लिहिले. याचे मराठी रूपांतर -प्राचीन भारताचे भूवर्णन- उपलब्ध आहे! ते केले आहे ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ नावाचा ‘विषय सर्वसाक्षी’ ग्रंथ रचणाऱ्या थोर शं. बा. दीक्षितांनी! (त्यात खास दीक्षित शैलीत ‘कनिंगहॅमला उपलब्ध नसलेल्या माहितीची भर घालत पुस्तक केले’ अशी टिप्पणी आहे!)
कनिंगहॅमचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे तोपर्यंत उपलब्ध झालेल्या सर्व प्रकारच्या पट, पट्टिका, शिलालेखांचे एकत्रीकरण आणि त्यांचे ‘उकललेले’ वाचन आणि सटीक अन्वय असलेले संकलन. तोपर्यंत हे साहित्य निरनिराळ्या संशोधकांनी केलेले सुट्यासुट्या ‘संशोधन टिपणे’ वा निबंधरूपात होते. अर्थातच कनिंगहॅमचे सर्वात मोठे ग्रंथकर्तृत्व म्हणजे त्याच्या सर्वेक्षणांचे त्याने लिहिलेले सर्व अहवाल!
प्राचीन वास्तू, नगरे यांच्या शोधांचा हा अचाट खजिना आहे. त्याचा भौगोलिक व्याप फार मोठा आहे. जवळपास सर्व मध्य भारत, उत्तर भारत, पूर्व आणि वायव्य भारत त्यात सामावलेला आहे. त्या त्या स्थानाबद्दलची उपलब्ध माहिती आणि त्याची संभाव्य तार्किक संगती असे त्यांचे रूप आहे. बहुतेक स्थळांची रेखाचित्रे, नकाशे, मोजमापे, अंतरे तपशीलवार दिलेली आहेत. अगदी मोजके सर्वेक्षण अधिकारी हाताशी घेऊन केलेले हे अगडबंब काम आहे. याचे कुणी सुगम संपादित मराठी वा हिन्दी रूपांतर केलेले नाही.
कनिंगहॅम हा विल्यम जोन्स- जेम्स प्रिंसेप या पूर्वसुरींच्या परंपरेत घडलेला विचक्षण अभ्यासक होता. भाषा शिकून घेणे, लिखित इतिहास आत्मसात करणे, लिपी उलगडणे, वाचणे हा त्या परंपरेचा गडद धागा होता. त्यातल्या त्रुटी, मर्यादा दूर करतच पुढील काळातला पुराशास्त्रीय विकास झाला. भारतातील पुरातत्त्वशास्त्राची ही पहिली मोठी दिंडी!
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.
pradeepapte1687@gmail.com