गर्दी जमविण्यासाठी आरपीआयला किंवा दलित संघटनांना कधीच मनोरंजनाचे कार्यक्रम करावे लागले नाहीत. लाखाच्या सभा आणि लाखाचे मोर्चे या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. मग रामदास आठवले किंवा त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांना  गर्दीसाठी ठाण्यात ऑस्ट्रेलियातून बाला आणून नाचवाव्या लागल्या.  लढाऊ बाण्याच्या आठवले यांच्या नेतृत्वाचे हे यश समजायचे की अपयश?
दिवस पहिला. शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१३. वेळ दुपारचे रखरखते ऊन. स्थळ मंत्रालय, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे दालन. रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेता म्हणून ज्यांचा महाराष्ट्राला परिचय आहे, ते माजी खासदार आणि पुन्हा संसदेत जाण्यासाठी अहोरात्र धडपडणारे आणि त्यासाठी धडधडीत कुणाशीही हातमिळवणी करणारे रामदास आठवले  २२ नोव्हेंबरला गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटले. मंत्रालयात मग रीतसर एक बैठक झाली. आठवले यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी होते. विषय होता, महाराष्ट्रात दलितांवर वाढणाऱ्या अत्याचारांचा. राज्यात २०१२ मध्ये दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या १०८९ घटनांची नोंद झाली आहे. २०१३ या वर्षांत १३६५ गुन्हय़ांची नोंद झाली आहे. दलितांवर वाढणाऱ्या अत्याचारांबद्दल आठवले यांनी तीव्र चिंता व्यक्तकेली. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत, अशी इशारावजा मागणीही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली.
दिवस दुसरा. शनिवार. स्थळ सेंट्रल मैदान, ठाणे. वेळ थंड-प्रसन्न सायंकाळ. रिपब्लिकन पक्षाचा ठाणे जिल्ह्य़ाचा संकल्प मेळावा. भव्य-दिव्य राजकीय मंच. मोठय़ा फुग्यातून मंचावर अवतरलेल्या ऑस्ट्रेलियन नर्तकांचा सुरू होता दंगा-नाच. प्रमुख उपस्थिती रामदास आठवले आणि त्यांचा नेहमीचा संच. सोबतीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे सहकारी. शिटय़ा, टाळ्या आणि एकच धिंगाणा. रामदासही त्यात रमले. त्यानंतर आठवले यांनी रीतसर राजकीय भाषण केले. ते आता सर्वाना ठाऊक झाले आहे. मात्र सदान्कदा काहीतरी खुसपट काढणाऱ्या काही कुजकट लोकांना असा प्रश्न पडला की, खरे आठवले कोणते, २२ नोव्हेंबरला दलितांवरील अत्याचाराबद्दल चिंता व चीड व्यक्त करणारे की सेंट्रल मैदानावर दंगा-नाचात रममाण होणारे? खरा रिपब्लिकन पक्ष कोणता, दलितांच्या-उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी लढणारा की दंगा-नाचात रंगून जाणारा? खरा भीमसैनिक कोणता, अन्यायाच्या विरोधात छातीचा कोट करून लढणारा की दंगा-नाचात दंग होणारा?
त्यावर उत्तरादाखल प्रतिप्रश्न असा की, सभेला गर्दी जमविण्यासाठी सारेच राजकीय पक्ष आणि नेते असे इव्हेंट-मनोरंजनाचे कार्यक्रम करीत असतात, त्यात रिपब्लिकन पक्षाने वेगळे काय केले, शिवसेनेने मायकल जॅक्सनला मुंबईत आणून नाचविले नव्हते का? आता त्यांच्याबरोबर दोस्ती असलेल्या आरपीआयने फुगेबंद चार ऑस्ट्रेलियन पोरी आणून नाचविल्या तर त्यात काय बिघडले? तास-दोन तास लोकांना तिष्ठत बसवून ठेवण्यासाठी आणि सभा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोरंजन करायला नको का, हा शुद्ध हेतू संयोजकांनी आधीच जाहीर केला होता. त्यावर आता एवढे आकांडतांडव कशासाठी?
अर्थात रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरी चळवळ आणि इतर राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणात, विचारसरणीत मूलभूत फरक आहे, म्हणूनच काही प्रश्न पुढे आले आहेत. दलित-आदिवासींवरील अन्याय-अत्याचार थांबविणे, हा कोणत्या राजकीय पक्षाचा अजेंडा आहे? स्वत:ला धर्मनिरपेक्षतावादी किंवा अर्धपुरोगामी म्हणविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात मागासवर्गीयांच्या काही खऱ्या तर काही नकली कल्याणाच्या घोषणा असतात. पण त्यात दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी काही ठोस पावले उचलली जातील, असा गेल्या साठ वर्षांत कधीही उल्लेख पाहायला मिळाला नाही. शिवसेना-भाजपचा अजेंडा आणि झेंडा पुन्हा वेगळाच आहे. इतर पक्ष ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. आरपीआय ज्यांचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करतो, त्या दलित-मागास समाजाचे प्रश्न निराळे आहेत. गावखेडय़ात अजूनही हा समाज कोणत्या अवस्थेत जगतो आहे, हे आरपीआयच्या नेत्यांनी पुन्हा एकदा जाणून-समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
आता रामदास आठवले असे वारंवार सांगतात की, महागाई, भ्रष्टाचार आणि दलितांवरील अत्याचाराच्या मुद्दय़ांवर म्हणे त्यांनी शिवसेना-भाजपशी युती केली आहे. त्याचे त्यांच्या इतर मित्रपक्षांना किती सोयरसुतक आहे, त्याचा एक घडलेला किस्सा. गेल्या महिन्यात सेना-भाजप-आरपीआय या तीन पक्षांच्या समन्वय समितीच्या सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे कार्यालय असलेल्या शिवालयात पत्रकार परिषद झाली. त्या वेळी सेनेचे सुभाष देसाई म्हणाले की, यापुढे महागाई, भ्रष्टाचार आणि अत्याचाराच्या प्रश्नावर महायुती एकत्र आंदोलन करील. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी तीच री ओढली. त्यात त्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबद्दल सरकारवर टीका केली. देसाई यांनी नुसता अत्याचार असा शब्द वापरला, तर तावडेंना फक्त महिलांवरील अत्याचार आठवले. परंतु या दोघांपैकी कुणालाच दलित हा शब्द सापडला नाही. तो अस्पर्शीतच राहिला, असो. तरीही आठवले म्हणतात की आम्ही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर एकत्र आलो आहेत, मान्य.  
बरे, मग ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर झालेल्या सभेतून काय संदेश दिला. एका सभेसाठी लाखो रुपयांचा नुसता स्टेज उभारला जातो, ही महागाईविरुद्धची लढाई आहे का? लाखांची उधळपट्टी, ही माया आली कुठून, असा संशयाचा भोवरा भोवती फिरावा, हे काही भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन आहे का, आणि ऑस्ट्रेलियन नर्तिकांचा दंगा-नाच ही दलितांवरील अन्याय-अत्याचारावरील फुंकर आहे का?
खरे म्हणजे गर्दी जमविण्यासाठी आरपीआयला किंवा दलित संघटनांना कधीच मनोरंजनाचे कार्यक्रम करावे लागले नाहीत. गर्दी हेच आंबेडकरी चळवळीचे वैशिष्टय़ आहे. लाखाच्या सभा आणि लाखाचे मोर्चे या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. मग रामदास आठवले किंवा त्यांच्या तालमीत तयार झालेल्या रामभाऊ तायडे किंवा त्यांच्यासारख्या शागिर्दाना गर्दी जमविण्यासाठी ऑस्ट्रेलियातून बाला आणून नाचवाव्या का लागतात. लोक तुमच्या सभेला आता येईनासे झाले आहेत का, विश्वासार्हता कुठे हरविली गेली आहे का?
आंबेडकरी चळवळीला, कार्यकर्त्यांना किंवा समाजाला मनोरंजनाचे वावडे आहे, असे मुळीच नाही. परंतु त्याची परंपरा वेगळी होती आणि काही प्रमाणात आजही ती टिकून आहे. सभेच्या आधी आणि नंतरही आंबेडकरी जलशांचे कार्यक्रम होत. प्रबोधन आणि मनोरंजन ही आंबेडकरी जलशांची खास खासियत. चळवळीला उभारी देणारी, कार्यकर्त्यांच्या मनात स्फुलिंग पेटविणारी ती गाणी, म्हणजे शब्दांचे जणू स्फोटच. वामनदादा कर्डकांच्याच शब्दात सांगायचे तर-
विळे, कुऱ्हाडी, भाले, ना तलवारीचे पाते,
तरी जोडले होते, रणमैदानाशी नाते.
असे रणमैदानाशी नाते असलेला रिपब्लिकन पक्ष आणि त्यांचा आजचा चंगळवादी कार्यकर्ता कोणत्या दिशेने चालला आहे?
राजकीय पक्ष चालवायला पैसा लागतो. मात्र मत्ता आणि नीतिमत्ता यांची फारशी फारकत होऊ नये, याचे निदान बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पक्ष चालविणाऱ्यांनी भान ठेवले पाहिजे. खुद्द बाबासाहेबच राजकीय नीतिमत्तेचा आग्रह धरतात. बाबासाहेबांनी १४ एप्रिल १९५३ ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या अनुयायांना एक मोलाचा संदेश दिला. जनता पत्रात तो प्रसिद्ध झाला. त्या वेळी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष होता. त्याबद्दल बाबासाहेब म्हणतात, फेडरेशन बळकट करण्यासाठी दर एक वयात आलेल्या स्त्री-पुरुषाने चार आणे भरून तिचे सभासद झाले पाहिजे. असे शेकडय़ांनी किंवा हजारोंनी नव्हे, लाखांनी सभासद होऊन तिचा निळा झेंडा फडकावत ठेवला पाहिजे. बाबासाहेब पुढे असेही म्हणतात की, हजारो बाजारबुणग्यांचे सैनिक असण्यापेक्षा मला दहाच शिस्तीचे प्रामाणिक सैनिक असले तरी बस्स झाले. नुसती संघटना आम्हाला नको तर तिच्यात ईर्षां आणि स्वाभिमानाचा अग्नी सारखा प्रज्वलित राहिला पाहिजे.  ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर ऑस्ट्रेलियन बालांच्या दंगा-नाचाने गाजलेल्या सभेचे आयोजन करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा किंवा संयोजकांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वरील विचारांचा काही संबंध आहे का? त्यांना राजकीय शक्तिप्रदर्शन करायचे होते की संपत्तीचे प्रदर्शन करायचे होते, ते भीमशक्तीचे प्रदर्शन होते की धनशक्तीचे? आणि लढाऊ बाण्याच्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचे हे यश समजायचे की अपयश?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा