जीवसृष्टीचे रंग-रूपापासून ते विवाहसंस्थेपर्यंतचे वेगवेगळ्या पातळीवरचे आविष्कार निसर्ग निवडीतून परिस्थितीशी कशी नेटकी मिळणी-जुळणी साधली जाते त्याची साक्ष देतात..
बेडूकतोंडय़ा एक अफलातून प्रेमिक आहे. या निशाचर पक्ष्याची लला-मजनूची जोडी दिवसभर एकमेकांना बिलगून असते. याचे एक खासे वसतिस्थान आहे केरळातले तट्टेकाड. मला या तट्टेकाडमध्ये िहडवत होते पक्षिशास्त्रज्ञ सुगतन. त्यांना तिथल्या साऱ्या बेडूकतोंडय़ा जोडय़ा कुठे ठाण मांडतात ते ठाऊक आहे. म्हणाले, चल, बघायला. झाडोऱ्यातून अचूक वाट काढत एका झाडापाशी घेऊन गेले. सांगायला लागले, ते बघ पक्षियुगुल. मी चक्रावलो. कुठे आहे? मग डोळे फाडून पाहिल्यावर दिसली- अगदी नाकासमोर, तीन फुटांवर, गुपचिप बसलेली बेडूकतोंडी जोडी. पाने मध्ये येत होती म्हणून जरा सरून पाहायला गेलो, तर पुन्हा गायब. मग लक्षात आले की अगदी नि:स्तब्ध आमच्याकडे टक लावून बघताहेत. सुगतन् म्हणाले, गेली तीन वष्रे जोडी याच जागी ठिय्या देऊन आहे.
याला म्हणावे जबरदस्त कामुफ्लाज. निसर्ग निवडीतून शत्रूंपासूनचा धोका कमी करीत आयुष्याची दोरी बळकट करणारे, परिसरात मिसळून हरवून टाकणाऱ्या कामुफ्लाजसारखे गुणधर्म जोपासले जातात. दुसऱ्या पातळीवर प्राण्यांची प्रजनन प्रणाली, विवाह संस्थाही, निसर्ग निवडीतूनच साकारते. अशा निवडीत उतरते जास्तीत जास्त पिल्ले पोसण्याला अनुकूल अशी विवाह संस्था. कधी ही असते बेडूकतोंडय़ांप्रमाणे एकनिष्ठत्वाची, तर कधी बहुपत्नीकत्वाची किंवा बहुपतित्वाची. अनेक पक्षिजाती एकनिष्ठ आहेत, पण सस्तन पशूंमध्ये अगदी विरळा. सस्तन पशूंच्यात पिल्ले वाढवण्यासाठी माद्या अपार कष्ट घेतात, प्रथम पोटात वाढवताना, मग दूध पाजताना. उलट काळतोंडय़ा वांदरांसारख्या पशूंच्यात नर माद्यांना मदत करणे सोडाच, अनेकदा छळतातही. सस्तन पशूंच्यात माद्यांना एकापेक्षा जास्त जोडीदार मिळवून प्रजोत्पादन वाढवणे अशक्य, उलट नरांच्या बाबतीत जितके जास्त जोडीदार, तितके जास्त प्रजोत्पादन. यामुळे निसर्ग निवडीतून सस्तन पशूंच्यात बहुपत्नीकत्व पोसले गेले आहे. तरस, हूलक अशा अगदी मोजक्या जातीचे सस्तन पशू एकपत्नीव्रती आहेत. परिणामत: नरांच्यात माद्यांसाठी जोरदार स्पर्धा असते, आणि अशा स्पध्रेत सरशी होण्यासाठी तरसांसारख्या काही जाती सोडल्या तर इतर साऱ्या जातींत नर माद्यांहून आकाराने मोठे, जास्त बळकट असतात.
पक्ष्यांमध्ये नर व माद्यांच्या प्रजोत्पादना-साठीच्या योगदानात काही खास नसíगक फरक नसतो. पिल्ले वाढवण्यासाठी मुख्य कष्ट पडतात त्या पिल्लांना अन्न पदा करून आणून भरवण्याचे, त्यांचे िहस्र शत्रूंपासून रक्षण करण्याचे. काही जातींत याची मुख्य जबाबदारी नरच पेलतात.
सह्य़ाद्रीच्या वर्षांवनांचा खास आकर्षक रहिवासी आहे भला मोठा अबलख धनेश, अथवा ग्रेट पायिड हॉर्नबिल. हा विणीसाठी एखाद्या उत्तुंग वृक्षातली मोठी ढोली निवडतो. त्यात मादी अंडी घालते, आणि मग स्वत: जाऊन बसते. त्या ढोलीचे प्रवेशद्वार एक छोटे भोक सोडून बाकी पुरे िलपून बंद केले जाते. मग सबंध अंडी उबवण्याचा, पिल्ले वाढण्याचा काळ नर आधी मादीला व मग मादी-पिल्लांना अन्न गोळा करून आणून भरवत राहतो. अशा एकपत्नीव्रती पक्ष्यांत माद्यांसाठी खास स्पर्धा असू शकत नाही आणि अशा जातींत नर-माद्या साधारण एकाच आकाराचे, रंग-रूपाचे असतात.
पक्ष्यांमध्ये दोन मुख्य जीवनप्रणाली आहेत. पहिली आहे खग अथवा आकाशगामी. हे पक्षी उडण्यावर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असतात. यातले आभोळी, वेडे राघूंसारखे काही उडत उडत भक्ष्य पकडतात, गिधाड, ससाण्यांसारखे काही उडत उडत भक्ष्य हेरतात, तर मना- राघू- कावळे- चिमण्यांसारखे अनेक जरी खूपसा वेळ जमिनीवर, झाडांवर भक्ष्य शोधण्यात घालवतात, तरी ते मधून मधून उडत असतात. असे खग जमिनीहून उंच अशा एखाद्या जागी झाडांवर, दगडकपारींवर घरटी बांधतात, पिल्ले पोसतात. त्यांची पिल्ले जन्मतात अगदी असहाय. पहिले काही आठवडे भरपूर खाल्ल्या-प्यायल्यावरच त्यांचे पंख बळकट होतात आणि ती स्वतंत्रपणे उडू लागतात. या काळात खगांच्या पिल्लांचा वाढण्याचा वेग इतर कोणत्याही प्राणिजातींच्या मानाने मोठा झपाटय़ाचा असतो आणि असे भराभर वाढण्यासाठी त्यांना सारखे भरपूर भरवत राहणे आवश्यक असते. हे एकटय़ा मादीला सामान्यत: जमण्याजोगे नसते. म्हणून अशा आकाशगामी जातींत निसर्ग निवडीत मादीला नीट मदत करणाऱ्या अबलख धनेशच्या नरांसारख्या नरांची सरशी होते.
पक्ष्यांची दुसरी मुख्य जीवनप्रणाली आहे भू-जलगामी; लावे, तित्तर, तणमोरांसारखी मुख्यत: जमिनीवर तुरुतुरु चालत राहणाऱ्यांची अथवा बदक, पियू, तुतवारांसारखी पाण्यात पोहत, पाणथळ जागेत िहडत राहणाऱ्यांची. यांची घरटी कोरडय़ा किंवा पाण्यालगतच्या जमिनीवर असतात. यांची पिल्ले अंडय़ातून बाहेर येतात ती आकाशगामींच्या पिल्लांसारखी असहाय नाही तर चुटपुटीत असतात. ती िहडू, फिरू, पोहू शकतात. त्यांना अतोनात अन्न भरवत भराभर वाढवण्याची निकड नसते. तेव्हा नर किंवा मादी, माय-बापांतील कोणीही एक यांच्या पिल्लांना यशस्वीरीत्या वाढवू शकतो. सस्तन पशूंच्यात ही जबाबदारी सक्तीने मादीवरच पडते, तसे यांच्यात काहीच नाही. तेव्हा भू-जलगामी पक्ष्यांच्यात एकाच जोडीदाराशी निष्ठेने राहण्याची आवश्यकता नाही, आणि अनेक जोडीदार शोधायचे तर ते नरांनीच असेही नाही. या भू-जलगामी पक्ष्यांच्यात मोरांसारख्या काही जातींत नर अनेक जोडीदार पटकावतात, तर पियू अथवा फेजन्टटेल्ड जसानांसारख्या दुसऱ्या जातींत माद्या अनेक जोडीदार पटकावतात. तेव्हा कधी नरांच्यात माद्यांसाठी स्पर्धा जुंपते, तर कधी माद्यांच्यात नरांसाठी स्पर्धा जुंपते. या स्पध्रेत आकर्षक बनवण्यासाठी निसर्ग निवडीत डोळ्यात भरणारे रंग-रूप उभारले जाते. मोरांत जसा नर लांडोरींहून देखणा आहे, तसेच पियूंच्यात माद्या नरांहून रंगील्या, एका सुबक बाकदार शेपटीचा दिमाख दाखवणाऱ्या, खूपच जास्त देखण्या आहेत.
आकाशगामी एकनिष्ठ, तर भू-जलगामी बहुपत्नीक अथवा बहुपतिक या नियमाचे अपवादही मूळ प्रतिपादनाला दुजोरा देतात. असा एक अपवाद आहे सुगरण. बहिणाबाई चौधरी गातात, ‘‘खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला। देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। सुगरीण सुगरीण अशी माझी गं चतुर। तिले जन्माचा सांगाती मिळे गम्प्या गम्प्या नर।’’ पण हे खरे नाही, सुगरणीतले नर बहुपत्नीक आहेत. सुगरिणींच्या गवताच्या तंतूंनी विणलेल्या, लांब नळीच्या प्रवेशद्वारांच्या, पिल्लांच्या गोलसर बंद खोलींच्या घरटय़ांची रचना खास असते. या मोठय़ा सुरक्षित घरटय़ांत पिल्ले जरा हळूहळू वाढली, तरी चालते. सुगरिणींच्यात हळूहळू वाढणाऱ्या पिल्लांना एकटी आई पुरेसे भरवू शकते. म्हणून सुगरणींचा पिवळी जर्द छाती, गलमिशीवाला देखणा नर, एका मादीचा संसार सुरू होताच दुसरे घरटे बांधायला लागतो. गात गात त्यावर दुसऱ्या बायकोला आकर्षति करतो. एकापाठोपाठ एकाच पावसाळ्यात अशी तीन-चार घरटीसुद्धा पुरी करू शकतो. एकेका घरटय़ातल्या तीन-तीन अशा दहा-बारा पिल्लांचा जनक बनू शकतो.
अशी आहे निसर्ग निवडीची बहुआयामी, रंग-रूपापासून विवाह संस्थेपर्यंत नानाविध गुणवैशिष्टय़ांना घडवणारी किमया. पण तिचे एक सूत्र पक्के आहे : जगण्याची दोरी बळकट करण्यासाठी, भरपूर पिल्ले पोसण्यासाठी परिस्थितीशी नेटकेपणे मिळते-जुळते घेणे हीच उत्क्रान्तियात्रेतील यशाची गुरुकिल्ली आहे.
लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.
मिळती मिसळती परिस्थितीशी
जीवसृष्टीचे रंग-रूपापासून ते विवाहसंस्थेपर्यंतचे वेगवेगळ्या पातळीवरचे आविष्कार निसर्ग निवडीतून परिस्थितीशी कशी नेटकी मिळणी-जुळणी साधली जाते त्याची साक्ष देतात..
First published on: 28-03-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व उत्क्रांतियात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds ecology nature