आल्बेर कामू याचा तत्त्वचिंतक- लेखकाचा जन्म ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झाला, म्हणजे हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष, परंतु ते साजरे करण्यासाठी कुणी पुढाकार घेईल असे नव्हे. काही विद्यापीठांनी कामूच्या विचारांचा आंतरशाखीय अभ्यास वाढीस लागावा, म्हणून चर्चासत्रे आधीही आयोजित केली होती, तशी यंदाही होतील. कामू मानवतावादी की अस्तित्ववादी यावरला जुना वाद त्यानिमित्ताने पुन्हा कंगोरे दाखवील. स्मृतीचे सोहळे घालण्यासाठी माणसाला वेळ नसतो, नसायला हवा, असे कामूविचार सांगतो. तो आपातत: का होईना, पण पाळला जाईल! फ्रान्झ काफ्का (जन्म १८८३) आणि ज्याँ पॉल सार्त् (जन्म १९०५) यांचेही असे सोहळे झाले नव्हते. मानवी जीवनाबद्दलच्या विचाराला नवे, आधुनिक तत्त्वचिंतन देऊ करणाऱ्या या त्रयीचा अभ्यास खूप झाला आणि प्रभावही निश्चितपणे पडला, पण मृत्यूनंतर काही ‘साजरे’ होणे या तिघांनाही अपेक्षित नव्हते.
तरीही कामूची आठवण आज करण्यासाठी, मराठीत त्याच्यावर एखादा परिचयलेख लिहिण्यासाठी जन्मशताब्दी वर्षांरंभाचे निमित्त पुरेसे ठरेल. कामूने कादंबऱ्या, नाटके आणि वैचारिक निबंध असे विविधांगी लेखन केले. त्याची पुस्तके अनेक देशांत, अनेक आवृत्यांनी खपली. ‘आउटसायडर’ या नावाने अधिक प्रसिद्ध असलेली त्याची ‘द स्ट्रेंजर’ ही कादंबरी किंवा ‘रिबेल’ या निबंधाचे पुस्तक अधिक लोकप्रिय झाले आणि त्याखालोखाल ‘द फॉल’ (कादंबरी), ‘मिथ ऑफ सिसिफस’(निबंध) यांना लोकप्रियता लाभली. यापैकी बहुतेक सारे लिखाण कामूने तिशीत असताना केले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांच्या मधल्या काळात- म्हणजे साधारणपणे १९१४ ते १९४० या वर्षांत- कला आणि विचारांचे क्षेत्र झपाटय़ाने आधुनिकतेकडे झेपावत होते. हे झेपावणे साधे नव्हते. यंत्रक्रांतीने सिद्ध झालेली आधुनिक ‘प्रगती’ साजरी न करता, तिचे मानवी जगण्यावर झालेले परिणाम पाहण्याची जबाबदारी तत्त्वचिंतक निभावत होते. किंवा, कामूसारखे काही साधे लोक निभावत होते, जे पुढे तत्त्वचिंतक ठरले! कामूचे वडील गरीब शेतमजूर होते आणि तो एक वर्षांचा होण्याआधीच पहिल्या महायुद्धात ते मारले जाऊन, त्या धक्क्याने आई मूकबधिर झाली, हे तपशील पाहिल्यावर कामू एवढा मोठा कसा झाला, असा प्रश्न पडावा. एकापरीने, ‘रिबेल’ आणि ‘आउटसायडर’मध्ये याच प्रश्नाचे तात्त्विक उत्तर कामू आपल्याला देतो. ते कसे, हे पुढे पाहू. शिष्यवृत्त्यांवर शिकलेला, अभ्यासात हुषार, भाषेत निपुण आणि खेळांतही थोडीफार प्रगती साधणारा हा चुणचुणीत गरीब मुलगा अत्यंत गलिच्छ वस्तीत आणि पराकोटीच्या कष्टी, उदासवाण्या कुटुंबात वाढला. संधी मिळताच पत्रकारिता करू लागला आणि कधी साम्यवादी, कधी अराजकतावादी तर कधी स्वप्नाळू समाजवादी विचारांच्या पत्रांशी एकनिष्ठ राहिला. वैचारिक निष्ठा एका ठिकाणी राहूच नये, इतके बदल बाहेर होत असताना कामूच्या नोकऱ्या बदलत होत्या आणि नोकरीगणिक विचारही! पण हे अगदी ‘टीनएज’मधले झाले. पुढे पंचविशीनंतर त्याला भांडवलशाही आणि साम्यवाद, यांपैकी कशातच अर्थ नाही, हे दिसले आणि कळू लागले. समाजवादी असले पाहिजे, असे त्याला वाटे. पण या समाजवादाची नेमकी छटा त्याला शोधता आली नाही. अगदी त्याने स्वतचा निराळा समाजवादी पक्ष काढण्याचे ठरविले होते, परंतु हा पक्ष कधीच कामूच्या खोलीबाहेर आला नाही.
संघर्ष ही कामूच्या जीवनाची वाट होती. हा संघर्ष कुणासाठी आहे, हा प्रश्न त्याला विशीतच पडू लागला आणि एक हुषार, चुणचुणीत मुलगा तत्त्वचिंतक झाला!
‘आउटसायडर’ लिहिली, तेव्हा तो २९ वर्षांचा होता, तर ‘रिबेल’ हा निबंध त्याच्या ३८ व्या वर्षी प्रकाशित झाला. त्याने तो आधी लिहिला असणार, असे अंदाज त्याच्या अभ्यासकांनी बांधले आहेत. या वयात कुणाही माणसाला आपण कुणासाठी जगतो आहोत, हे जग किती अनाकलनीय आहे आणि तरीही आपण इतका आटापिटा कुणाच्या भरवशावर नि कुणासाठी करतो आहोत, देवाला आपण फसवतो का, असे नाना प्रश्न पडतच असतात. कामूने तसे प्रश्न पाडून न घेताही त्यांच्या सोडवणुकीचे पाऊल उचलले. माणूस समजेल, जगही समजेल पण व्यक्ती आणि जग यांचा मेळ नेहमीच ‘अॅब्सर्ड’ असतो, अतार्किक आणि म्हणून अनाकलनीय असतो. या मेळात अर्थ नसतो असे नाही; पण तो व्यक्तीने समजून घ्यावा लागतो! जगाशी आपला मेळ निर्थक आहे असे व्यक्तीला वाटले तर आत्महत्येची पावले उचलली जातील. फार अर्थ आहे आणि तो कळण्यास आपण कपदार्थ असून देवाला सारे काही ठाऊक आहे असे वाटल्यास देवभोळेपणा हीदेखील ‘वैचारिक आत्महत्या’ ठरणार नाही का, असा कामूचा प्रश्न आहे. या दोन्ही मार्गाऐवजी, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी संघर्षशील राहणे, हा मार्ग त्याने ‘आउटसायडर’मध्ये मूर्साँ या न-नायकामार्फत सुचवला आहे. हा अल्जेरियात जन्मलेला, पण वंशाने फ्रेंच नायक कामूशी मिळताजुळता असल्याने कादंबरीत आत्मपर भाग असल्याचे मानले जाते. मूर्साँ स्वत:ला ‘उपरा’च मानतो.
‘रिबेल’ या सर्वाधिक गाजलेल्या पुस्तकात कामूने हा संघर्ष कुणासाठी करायचा, कोणत्या भूमिकेतून करायचा, याचे दिग्दर्शन केले आहे. हीच वाक्ये एखाद्या कादंबरीतील नायकाच्या तोंडी घालून, महायुद्ध तोंडावर आले असतानाही धीरोदात्त राहणारे पात्र कामू निर्माण करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. लेखक म्हणून लोकांना दिपवणे त्याच्या स्वभावात- तत्त्वांतही नव्हते. ‘एकटय़ाने संघर्ष करायचा तो अख्ख्या जगासाठी.. मानवतेसाठी’ अशी वाक्ये त्याने निबंधातच ठेवली आणि लोकांना विचारप्रवृत्त केले. या निबंधातील ‘बंडखोरी’ची चर्चा अधिक झाली असली, तरी सामान्य माणूस हाच मानवी जीवनसुधारणेच्या संघर्षांतला कार्यकर्ता आहे आणि आपापले कार्यकर्तेपण टिकवण्यासाठी कशाविरुद्ध बंड करायचे हे माहीत हवेच, असा कामूच्या म्हणण्यातील आजही टिकून राहणारा अर्थ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा