अर्धविकसित समाज व्यक्तींना नायकत्व बहाल करतात आणि मग हे नायक यशस्वी व्हावेत यासाठी खलनायक तितक्याच हिरिरीने शोधले जातात. अशा स्थितीत मोदींचा सरळ सामना केजरीवाल यांच्याशी होऊ नये, यासाठी किरण बेदी यांचा शोध भाजपने लावला, परंतु तोच आता डोईजड ठरू लागला आहे..
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशिबालाच हात घातला आहे. आपण सत्तेवर आल्यापासून तेलाच्या किमती घसरल्या त्यामुळे काहींना वाटते मी नशीबवान आहे, असे मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत म्हणाले. त्यांचे म्हणणे असे की मी जर भाग्यवान आहे असे वाटत असेल तर अन्यांना संधी देण्याची गरजच काय? ‘तुमच्यासाठी हा मोदी नशीबवान ठरला असेल तर कमनशिबींना तुम्ही संधी का द्यावी?’ असा मोदी यांचा मतदारांना प्रश्न होता. परंतु ज्या समाजात व्यवस्थेपेक्षा नशीब, पुण्य, भाग्य आदी बाबी महत्त्वाच्या ठरतात तो समाज प्रगत म्हणता येत नाही. विकसित समाजाचे वैशिष्टय़च हे असते की हा समाज व्यक्तिकेंद्रित नसतो. त्यात व्यवस्थाप्रधानता असते. अशा समाजात एखाद्या व्यक्तीचे असणे वा नसणे यास वृत्तमूल्यापेक्षा अधिक काही किंमत नसते. असे समाज प्रगतीची नवनवी शिखरे काबीज करीत असतात. याउलट परिस्थिती अर्धविकसित देशांत असते. अशा समाजांत व्यवस्थेपेक्षा व्यक्तीस अधिक महत्त्व असते. हे समाज व्यक्तींना नायकत्व बहाल करतात आणि मग हे नायक यशस्वी व्हावेत यासाठी खलनायक तितक्याच हिरिरीने शोधले जातात. मोदी हे अशा समाजाचे प्रतिनिधी. एके काळी खलनायक ठरवले गेलेले मोदी हे सध्या नायकाच्या भूमिकेत असून त्यांचे नायकत्व अबाधित राहावे यासाठी शोधला गेलेला ताजा खलनायक म्हणजे अरिवद केजरीवाल. हे केजरीवाल किती बेभरवशाचे, नतद्रष्ट आणि विकासविरोधी आहेत, हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सांगण्यात मोदी यांचे चेले सध्या मग्न आहेत. इतके दिवस ही लढाई मोदी आणि केजरीवाल यांच्यात होती. परंतु तसे करणे बरे दिसणार नाही कारण त्यात केजरीवाल यशस्वी ठरले तर भलतीच नामुष्की ओढवेल हे लक्षात आल्याने भाजपने मोदी आणि केजरीवाल यांच्यात किरण बेदीबाईंना आणून बसवले. केजरीवाल आणि मोदी असा सामना होणे ही भाजपसाठी उलटय़ा अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती ठरली असती. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना नरेंद्र मोदी यांनी सातत्याने सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टीकेचे लक्ष्य करून भावी संघर्ष आपण आणि सोनिया-मनमोहन यांच्यात आहे असे चित्र यशस्वीपणे निर्माण केले. परिणामी एका मध्यम आकाराच्या राज्याचे मुख्यमंत्री होते तरी मोदी यांची प्रतिमा एक राष्ट्रीय नेता अशी बनली. तेव्हा दिल्ली निवडणुकीत केजरीवाल यांना थेट मोदी यांच्याशी लढू दिले असते तर केजरीवाल यांचेच प्रतिमावर्धन होण्याची शक्यता होती आणि त्याउलट मोदी एका अगदीच लहान राज्याच्या संभाव्य मुख्यमंत्र्याशी लढत असल्याचे चित्र तयार झाले असते. तसे होण्यात मोदी यांचा प्रतिमासंकोच होता. त्यामुळे किरण बेदी यांना मध्ये घेण्यात आले. आता आपली लढाई एकदम सोपी होत असल्याचा भाजपचा होरा होता. परंतु सध्या जे काही तेथे घडत आहे त्यामुळे तो सहज यशस्वी ठरताना दिसत नाही.
याचे कारण भाजपने शोधून शोधून शोधलेल्या या किरण बेदी या व्यक्तीत आहे. केजरीवाल हे आत्मकेंद्रित असतील तर या बाई त्यापेक्षा तसूभरही वेगळ्या नाहीत. किंबहुना त्या केजरीवाल यांच्याही पेक्षा कर्कश आहेत हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. केजरीवाल यांनी निदान पक्ष तरी उभारला, पण अशी कोणतीही संस्थात्मक उभारणी बेदीबाईंनी केलेली नाही. आपण म्हणू ती आणि तीच पूर्व दिशा असाच त्यांचा पोलिसी खाक्या राहिलेला आहे आणि राजकारणात आल्यावरही त्या तसेच करू पाहतात. भाजपमध्ये येण्यासाठी मला आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा ही त्यांची अट होती. एरवी असे न करणाऱ्या भाजपने या वेळी मात्र बेदीबाईंची अट काहीही कुरकुर न करता मान्य केली. भाजपला या मुद्दय़ावर एक पाऊल मागे जावे लागले कारण दिल्लीत आणि एकंदर देशातही, बदलत चाललेले वातावरण. या वातावरणाची चाहूल भाजपला अलीकडेच नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील मेळाव्यातून मिळाली. पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाचा मेळावा. जनता त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होईल आणि गर्दी ओसंडून वाहील असे भाजपस वाटत होते. पण तसे झाले नाही. लाखभराची गर्दी अपेक्षित असताना कसेबसे चाळीसेक हजार जण जमले. या निरुत्साही अनुभवामुळे भाजप समर्थकांनी काळजी वाटून दिल्ली निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला.
त्यात त्यांना मिळून मिळाल्या कोण, तर किरण बेदी. नतद्रष्टपणाच्या बाबत त्यांची स्पर्धा होऊ शकते ती फक्त केजरीवाल यांच्याशीच. बेदी या केजरीवाल यांच्या एके काळच्या साथीदार. या दोन फांद्या आणि अण्णा हजारे हे मूळ खोड मिळून देशातील भ्रष्टाचार दूर करणार होते. या तिघांच्या मागे देशभरातील नवमध्यमवर्गातून तयार झालेला मोठा मेणबत्ती संप्रदायदेखील तयार झाला होता. परंतु केजरीवाल आणि बेदी या दोन फांद्यांनी प्रथम अण्णा हजारे यांचे या लढय़ातील मूळ खोड दूर केले आणि पुढे दोघेही अधिक मोठे कोण होणार, या मुद्दय़ावरून एकमेकांशी भांडत बसले. यात केजरीवाल अधिक चतुर. त्यामुळे ते पुढे गेले आणि बेदीबाई फुरंगटून बसल्या. दरम्यान, मोदी यांचा उदय झाला होता. या निमित्ताने नरेंद्रारती करून त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पण या असल्या केवळ उपद्रवमूल्य असलेल्या व्यक्तीस घेऊन डोकेदुखी वाढवण्यात मोदी यांना काहीही रस असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे बेदीबाई अडगळीत पडल्या. दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे पुनरुज्जीवन झाले. केजरीवाल आणि बेदी हे दोघेही एकाच मुशीतले. त्यामुळे बेदीबाईंच्या काटय़ाने केजरीवालांचा काटा काढता येईल अशा विचार मोदी, अमित शहा कंपनीने केला असावा. त्यात तथ्य निश्चितच असले तरी ‘घी देखा लेकिन बडगा नही..’ या उक्तीप्रमाणे भाजपने बेदीबाईंना घेऊन आपण काय डोकेदुखी ओढवून घेत आहोत, याचा विचार केला नाही. किंवा केजरीवालांना ठेचणे हे एकच लक्ष्य असल्याने याकडे भाजपचे दुर्लक्ष झाले असावे. परंतु जे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिसले नाही ते स्थानिकांना दिसले आणि परिणामी बेदीबाईंच्या विरोधात दिल्ली भाजपमध्ये चांगलीच हवा तयार होऊ लागली. आणि सोमवारी तर बेदीबाईंच्या प्रचार यंत्रणेच्या सूत्रधारानेच बाईंच्या हडेलहप्पी वागण्याचा निषेध करीत राजीनामा देऊ केला होता. अशी उघड नाराजी इतर अनेकांनी व्यक्त केली नसेल. पण ती तयार होत असून पक्षनेतृत्वाला त्याची दखल घ्यावी लागत आहे.
त्याचमुळे जवळपास सर्व केंद्रीय मंत्री, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, महत्त्वाचे नेते यांना पक्षाने निवडणुकीच्या कामात जुंपले असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने शहरभर अनेक मेळावे घेणार आहेत. एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीत पंतप्रधान इतका जीव ओतत असतील तर ही लढाई दाखवली जात आहे तितकी सोपी नाही हे लक्षात घ्यायला हवे. आता प्रचाराच्या उर्वरित काळात कडवटपणा वाढेल, आपविरोधात नवनवी प्रकरणे बाहेर निघतील वा अन्य फाटाफूट होईल. त्यातून या लढाईची तीव्रताच तेवढी दिसेल आणि बेदींमुळे आपचा भेद होणार की त्या भाजपभेदीच ठरणार हेही स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा