परवाना असलेले शस्त्र बाळगणे यात काहीही गैर नाही, पण शस्त्राचे प्रदर्शन करणे हे पूर्णपणे चुकीचे व दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात मोडणारे आहे. भाजपचे स्टंटबाज मंत्री गिरीश महाजन यांना नेमका याचाच विसर पडलेला दिसतो. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याच्या नादात कधी बुलेटवर फिर तर कधी चहा टपरीवर बैठक मार अशी कृत्ये करून प्रसिद्धी मिळवणारे महाजन परवा मूकबधिरांच्या शाळेत बंदूक दाखवत वावरले. यावरून बराच गदारोळ उठल्यानंतर आणि विधिमंडळात गोंधळ झाल्यानंतरसुद्धा स्वत: महाजन व त्यांच्या मदतीला तत्परतेने धावून गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कृतीचे चालवलेले समर्थन आणखीच धक्का देणारे व भाजप हा इतरांपेक्षा कसा वेगळा पक्ष आहे, हेच सिद्ध करणारे आहे. परवाना असलेले शस्त्र सोबत बाळगण्यात गैर काय, हा महाजनांचा बचावच त्यांचा अपरिपक्वपणा दाखवणारा आहे. आपल्याकडे शस्त्र आहे हे एखाद्या गुंडाने दाखवणे एकदाचे समजून घेता येईल, पण मंत्र्यांनी दाखवणे समर्थनीय कसे ठरू शकते? मंत्रीच जर शस्त्रांचे प्रदर्शन करायला लागले तर सामान्य जनतेने विश्वासाने बघायचे तरी कुणाकडे आणि अशी दिखावेगिरी करून महाजनांना नेमकी कोणती प्रतिमा जनसामान्यांत निर्माण करायची आहे? आपल्या मंत्र्याकडे शस्त्र आहे हे बघून जनतेच्या मनात समाधानाची भावना निर्माण होते, असे महाजनांना अपेक्षित आहे काय, यांसारखे प्रश्न यातून निर्माण झाले आहेत. मंत्री असल्याने चोवीस तास सुरक्षेच्या गराडय़ात राहणाऱ्या महाजनांना शस्त्र जवळ ठेवावे इतपत कुणाची भीती वाटते, त्यांचा सुरक्षा यंत्रणेवर विश्वास नाही का, मंत्र्याचाच विश्वास नसेल तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय, असे अनेक प्रश्न या लंगडय़ा समर्थनातून निर्माण झाले आहेत. महाजनांचा सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास असेल तर त्यांनी शस्त्र बाळगणे ही शुद्ध स्टंटबाजी आहे असाच निष्कर्ष त्यातून निघतो. मंत्र्यांच्या या कृतीचे मुख्यमंत्र्यांनी केलेले समर्थनसुद्धा तेवढेच धक्कादायक आहे. मद्याच्या परवान्यातसुद्धा बाटली विकत घेणे, सोबत बाळगणे व सार्वजनिक ठिकाणे वगळून प्राशन करणे असे नमूद असते. उद्या एखाद्या मंत्र्याने मद्याची बाटली लोकांना दिसेल अशा स्थितीत सोबत बाळगली, पण प्याली नाही तर त्याचेही समर्थन मुख्यमंत्री करणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महाजनांच्या या स्टंटबाजीचा निषेध करताना राष्ट्रवादीचे कुलदीपक जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या आवारात खेळण्यातले शस्त्र दाखवत जो प्रकार केला तो या नेत्याची वैचारिक दिवाळखोरी स्पष्ट करणारा आहे. लोकशाहीतले पवित्र मंदिर या दृष्टीने विधिमंडळाकडे बघितले जाते. तिथे अशी टपोरेगिरी दाखवून आव्हाडांना नेमका कोणता संदेश राज्यातील जनतेला द्यायचा आहे? मुळात राज्यातल्या राजकारणानेच अगदी खालचा तळ गाठला आहे हेच या साऱ्या घटनाक्रमाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्राचा बिहार करण्यासाठी कोणत्याही गुंडांची गरज नाही. येथील राजकारणीच त्यासाठी पुरेसे सक्षम आहेत हेच या बंदूक प्रकरणाने दाखवून दिले आहे.
ठो-ठो अपरिपक्वपणा..
परवाना असलेले शस्त्र बाळगणे यात काहीही गैर नाही, पण शस्त्राचे प्रदर्शन करणे हे पूर्णपणे चुकीचे व दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात मोडणारे आहे.
First published on: 01-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp minister girish mahajan addresses kids with revolver tucked in belt