राष्ट्रीय राजकारणातील नरेंद्र मोदींच्या पुनप्र्रवेशामुळे भाजपचे कर्णधार राजनाथ सिंह आहेत की मोदी, असा नवा प्रश्न उपस्थित होणार आहे. यापुढे नागपूर, दिल्ली आणि मोदी अशा तीन रिमोट कंट्रोलवर राजनाथ सिंह यांना अध्यक्षपदाची वाटचाल करावी लागेल.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पक्षाचा सर्वोच्च नेता असतो, पण नाममात्रच. पक्षांतर्गत लोकशाही, सामूहिक निर्णयप्रक्रिया, नागपूरची आवड, दिल्लीतील प्रस्थापित नेत्यांचे अहंकार आणि लहानमोठय़ा नेत्यांच्या हेव्यादाव्यांच्या धुमश्चक्रीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाला स्वहित तर दूरच, अनेकदा पक्षहित जपणेही दुरापास्त होते. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर राजनाथ सिंह यांनी सव्वादोन महिन्यांनंतर जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ही ‘वैशिष्टय़े’ पुरेपूर प्रतििबबित झाली आहेत. आपले सहकारी निवडताना राजनाथ सिंह यांनी जुन्या खोडांना बाजूला सारून तरुण रक्ताला बऱ्यापैकी वाव दिला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत टीम राजनाथ सिंह देशातील मुख्य विरोधी पक्षाला साजेशी कामगिरी बजावेल काय, या प्रश्नाचे उत्तर कर्नाटक आणि त्यानंतर होऊ घातलेल्या पाच प्रमुख राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतरच मिळू शकेल.
वरकरणी पाहता राजनाथ सिंह यांची टीम तशी निरसच आहे. आपले पूर्वाधिकारी नितीन गडकरी यांच्या टीममधील काळाच्या ओघात अवांच्छित आणि अकार्यक्षम ठरलेल्या अनेक चेहऱ्यांना दूर करण्यात ते यशस्वी ठरले आहेत, पण त्यांना त्यापेक्षा जास्त तडजोडीही कराव्या लागल्या आहेत. भाजप आणि संघ परिवारातील ज्या शक्तींमुळे त्यांना दुसऱ्यांदा विनासायास अध्यक्षपद लाभले त्याची तात्काळ परतफेड करणेही त्यांना भाग पडलेले आहे. राजनाथ सिंह यांची कार्यकारिणी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्यावर नरेंद्र मोदी, सुरेश सोनी आणि अरुण जेटली यांचा दबाव असल्याचे स्पष्ट झाले होते. खुद्द मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश प्रशस्त करण्याची कर्तव्यपूर्ती करणे त्यांना भागच होते आणि त्याच वेळी मोदींच्या मर्जीतील ‘कुप्रसिद्ध’ अमित शाह, संघाचे सहसरकार्यवाह सुरेश सोनी यांचे खास प्रभात झा किंवा निष्क्रियतेचा ठपका बसूनही जेटलींचे समर्थन लाभलेले धर्मेद्र प्रधान यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लावण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. शिवाय अनेक नेत्यांना अनेक नावांवर आक्षेप होते. त्यातून कसाबसा मार्ग काढत संघ परिवारातील सर्व दबावगटांचे समाधान होईल, अशी टीम राजनाथ सिंहांनी तयार केली. पण राष्ट्रीय राजकारणातील नरेंद्र मोदींच्या पुनप्र्रवेशामुळे भाजपचे कर्णधार राजनाथ सिंह आहेत की मोदी, असा नवा प्रश्न उपस्थित होणार आहे. यापुढे नागपूर, दिल्ली आणि मोदी अशा तीन रिमोट कंट्रोलवर राजनाथ सिंह यांना अध्यक्षपदाची वाटचाल करावी लागेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपचा नवा ‘संघ’ स्थापन करताना खुद्द राजनाथ सिंह यांच्याच वाटय़ाला उपेक्षा आल्याचे त्यांच्या कार्यकारिणीतील नावांवरून दिसते. पक्षाच्या दहा सरचिटणीसांमध्ये राजनाथ सिंह यांच्या विश्वासातील केवळ राजीवप्रताप रुडीच पक्षाचे सरचिटणीस होऊ शकले. अन्य नऊ सरचिटणीसांमध्ये अनंतकुमार, रामलाल, थावरचंद गहलोत, जगतप्रकाश नड्डा आणि धर्मेद्र प्रधान आणि तापीर गाओ हे सहा जुने सरचिटणीस, तर मोदींच्या दबावाखाली अमित शाह, संघाची आवड म्हणून मुरलीधर राव आणि सर्वाची संमती लाभलेले वरुण गांधी अशा तीन नव्या सरचिटणीसांचा समावेश करण्यात आला. गडकरी यांनी आपल्या कार्यकारिणीत अनेक चेहऱ्यांना संधी दिली. पण गडकरींनी मोठी संधी देऊनही या लोकांनी अडचणीत सापडलेल्या गडकरींची साथ दिली नाही. गडकरी यांच्या पायउतार होण्यात सुरेश सोनी, रामलाल, अरुण जेटली, नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांची पडद्याआडची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्या वेळी गडकरींचा बचाव करण्यासाठी त्यांनी नेमलेले पदाधिकारी पुढे सरसावले नाहीत. तसे संकट आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी उद्भवणार नाही, याची राजनाथ सिंह पुरेपूर काळजी घेतीलच. पण भाजपमध्ये कधीही, कुठलाही पेच निर्माण होऊ शकतो. अशा स्थितीत राजनाथ सिंह यांची पाठराखण करण्यासाठी रुडी वगळता कुणी सरचिटणीस त्यांच्या मदतीला धावण्याची शक्यता कमीच आहे. मात्र मुख्तार अब्बास नकवी यांची उपाध्यक्षपदी, अनिल जैन, विनोद पांडे, त्रिवेंद्र रावत यांची सचिवपदी तसेच सुधांशू त्रिवेदी, विजय सोनकर शास्त्री आणि कॅप्टन अभिमन्यू यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करून आपला गडकरी होणार नाही, याचा राजनाथ सिंह यांनी बंदोबस्त केला आहे. नकवींना उपाध्यक्षपदी ठेवताना पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी शाहनवाझ हुसैन यांची फारशी वाढ होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे. अर्थात, पक्षाचे सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेतील उपनेते अशा बडय़ा जबाबदाऱ्या मिरविणारे बिहारचे रवीशंकर प्रसाद यांचे संघटनेतील ‘वलय’ संपुष्टात आणून शाहनवाझ हुसैन यांना ‘दिलासा’ दिला. प्रचंड वातावरणनिर्मितीअंती भाजप संसदीय मंडळात मोदी यांनी सहा वर्षांनी पुनरागमन केल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर प्रदेश आणि बिहारची सूत्रे दिली जातील, अशीही हवा तयार केली जात आहे. पण आपल्या गृह राज्याची सूत्रे मोदींच्या हाती सोपवून स्वत: कळसूत्री बाहुले बनण्याइतके राजनाथ सिंह दूधखुळे निश्चितच नाहीत. गडकरींच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष असलेले कलराज मिश्रा आणि विनय कटियार यांना वगळून त्यांनी उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणात आपल्याशिवाय कोणीही मजबूत होणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. भाजपच्या संघटनेत राजनाथ सिंहांनी महिलांना सक्षम होण्याची संधी दिलेली नाही. महत्त्वाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये एकाही महिला नेत्याला स्थान नाही. आजवर राजकीयदृष्टय़ा कुचकामी ठरलेले धर्मेद्र प्रधान यांना जेटलींच्या दबावाखाली सामावून घेताना मुरलीधर राव यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी महिलांसाठी असलेले एक सरचिटणीसपद संपुष्टात आणले. शोभेचे पद ठरलेल्या उपाध्यक्षपदावरून त्यांनी साठीतल्या ग्लॅमरस हेमा मालिनींसह करुणा शुक्ला, नजमा हेपतुल्ला, किरण घई यांना विश्रांती दिली आणि सरचिटणीसपदाच्या शर्यतीत असलेल्या उमा भारती, किरण माहेश्वरी आणि स्मृती इराणी या महत्त्वाकांक्षी महिला नेत्यांना लक्ष्मीकांता चावला आणि बिजया चक्रवर्ती यांच्यासोबत उपाध्यक्षाच्या पंक्तीत बसविले. पंधरा राष्ट्रीय सचिवांमध्ये पूनम महाजन आणि वाणी त्रिपाठी यांच्यासह ८ महिलांना स्थान दिले. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी लोकसभेवर निवडून आलेल्या सरोज पांडे यांची नियुक्ती करून स्मृती इराणींच्या ग्लॅमरची भरपाई केली. पण पक्ष संघटनेत आक्रमक उमा भारतींसह कोणत्याही महिला नेत्याचा दबदबा प्रस्थापित होणे कठीणच आहे.
गडकरींच्या टीममधील राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या व नवज्योतसिंग सिद्धू, आणि प्रवक्ते तरुण विजय यांचीही ‘उपयुक्तता’ संपुष्टात आली आहे. सोमय्या यांनी विविध विधानसभा निवडणुकांदरम्यान अतिसक्रिय भूमिका बजावली होती. त्यातून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे व्यावसायिक आणि राजकीय हितसंबंध उघड होऊनही काही अंशी गडकरींनाही त्यांच्या सक्रियतेचा फटका बसला. त्यामुळे सोमय्यांचा पत्ता कापला गेला आणि त्यांच्यामुळे ज्यांचा फायदा झाला तेही सोमय्यांचे पक्ष संघटनेतील पद वाचवू शकले नाहीत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजपच्या पराभवात हातभार लावणारे शांताकुमार आणि भगतसिंह कोशियारी यांचीही पक्ष संघटनेतील पत संपुष्टात आली. संसदीय मंडळात नितीन गडकरी, कोषाध्यक्षपदी पीयूष गोयल, पक्षाच्या प्रवक्तेपदी प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सचिवपदी श्याम जाजू आणि पूनम महाजन तसेच केंद्रीय निवडणूक समितीत गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांना स्थान देत राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील उपलब्ध राजकीय प्रतिभेला बऱ्यापैकी न्याय दिला आहे.
भाजपमधील अतृप्त आत्मे असा लौकिक असलेले यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी, जसवंत सिंह यांच्यासारख्या पक्षाचा अजेंडा हायजॅक करणाऱ्यांना राजनाथ सिंह यांच्याही टीममध्ये कोणतेही स्थान नाही. पण वादग्रस्त विधाने करून ही मंडळी ऐन निवडणुकीच्या मोसमात भाजपच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात, निवडणुकीच्या तोंडावर केलेली बंडखोरी त्यांना महागात पडेल आणि राम जेठमलानी वगळता इतरांच्या लोकसभा उमेदवारीवरही गदा येऊ शकते. त्यातच डॉ. सी. पी. ठाकूर यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड यशवंत आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी ‘वार्ता विघ्नाची’ ठरणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रसिद्धीमाध्यमांमध्ये अवाजवी प्रतिष्ठा लाभलेल्या या नेत्यांची प्रत्यक्ष संघटनेत एखादे पदही मिळविण्याची किंमत नसल्याचे पुन्हा दिसून आले आहे.
राजनाथ सिंह यांनी अशा तऱ्हेने पक्षातील घनकचऱ्याची बऱ्यापैकी विल्हेवाट लावून तरुण नेत्यांच्या समावेशाने तंदुरुस्त भासणारी टीम तयार केली असली तरी लोकसभा निवडणुकीचा विश्वचषकजिंकून आणण्याइतपत क्षमता भाजपमध्ये असेल काय, या प्रश्नाचे उत्तर आत्ताच मिळणे अवघड आहे. मे महिन्यात कर्नाटकात आणि त्यानंतर मध्य प्रदेश व छत्तीसगढ या राज्यांमध्ये भाजपची सत्ता शाबूत राखताना तसेच राजस्थान आणि दिल्लीमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिरावून घेताना राजनाथ सिंहांच्या टीमची खरी कसोटी लागणार आहे. गेली नऊ वर्षे विरोधात राहूनही चार्टर्ड विमानांच्या सुखासीनतेच्या अधीन झालेल्या टीम राजनाथच्या सदस्यांचे पाय पुढच्या नऊ महिन्यांतही जमिनीवर लागले नाहीत तर आगामी निवडणुकांमध्ये काय घडेल याचे भाकीत वर्तविणे फारसे अवघड ठरणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा