‘पार्टी विथ डिफरन्स’ असे स्वतचे गोडवे गाणाऱ्या भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागताच या पक्षाच्या बाह्य़रंगात बदलाची लक्षणे दिसू लागली आहेत. या बदलाचाच पहिला परिणाम म्हणजे, या पक्षाचे रूपांतर ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ मध्ये होऊ लागले. भाजपमध्ये सामूहिक नेतृत्वाचे वारे वाहू लागले असूनही आपणच पक्षाचा सर्वाधिकारी नेता आहोत, असे समजून बढाया मारणाऱ्यांच्या फौजा फोफावत चालल्या. त्यामुळे एकाने काहीतरी मतप्रदर्शन करावयाचे आणि त्याच्या परिणामांची जाणीव होऊ लागताच दुसऱ्याने त्यावर पांघरूण घालावयाचे किंवा त्यापासून अंतर राखावयाचे असे अनेकदा होत आले आहे. गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रातील टोलमुक्तीचा गजर करायचा, तर नितीन गडकरींनी टोलच्या अपरिहार्यतेचे सूर आळवायचे, हा त्यातलाच एक प्रकार. पण हे केवळ उदाहरणापुरतेच झाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खुद्द राजनाथ सिंह यांनी या सर्वावर मात केली आहे. भूतकाळात कधी जर कोणत्या चुका झाल्याच असतील, तर त्याबद्दल मुस्लिमांची माफी मागण्याची भाजपची तयारी आहे, असे सांगून राजनाथ सिंह यांनी आपल्या पक्षाचा चेहरा सध्याच्या लांगूलचालनी राजकारणापेक्षा वेगळा नाही, हे दाखवून दिले. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिमांचे आणि अन्य अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केल्याच्या आरोपाची राळ काँग्रेसवर उडवत भाजपने आजवर आक्रमक राजकारण केले. पण भाजपचे पायदेखील त्याच मातीचे आहेत, हेही राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यातून उघड झाले. लोकसभा निवडणुकांच्या निकालाची भाकिते आपल्या बाजूने झुकल्याचे दिसू लागल्यापासून हुरळून गेलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या डोळ्यासमोर आता केवळ २७२ हा आकडा नाचू लागला आहे. त्यासाठी अगदी लांगूलचालनाच्या राजकारणाने जाण्याचीही पक्षाची तयारी आहे, आणि झाल्यागेल्या चुकांसाठी मुस्लिमांची माफी मागून मोकळे झाले की मतांची बेगमी तरी होईल, असा मतांच्या राजकारणाचा डावही त्यातून स्पष्ट डोकावतो आहे. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या या केविलवाण्या राजनीतीची आता साऱ्या राजकीय वर्तुळात खिल्ली उडविली जाणार, असे दिसू लागल्याने भाजपच्या अन्य स्वयंप्रकाशी नेत्यांची झोप उडाल्याची चर्चा आहे. आपल्या एखाद्या ढळढळीत वक्तव्यानंतरही, ‘आपण तसे बोललोच नव्हतो’ किंवा ‘आपल्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता’ असे म्हणण्याचे निर्ढावलेपण केवळ राजकीय नेत्यांकडेच असते. राजनाथ सिंह किंवा त्यांचा पक्ष याला अपवाद ठरेल असे दिसत नाही. कदाचित, त्यांच्या या लांगूलचालनी वक्तव्याचे नवे अर्थ देशाला समजावण्याची कसरत आता पक्षाला करावी लागेल. जेव्हा जेव्हा, कळत नकळत, आमच्या पक्षाकडून चूक घडली असेल, त्याबद्दल मान झुकवून माफी मागण्याची आमची तयारी आहे, अशी ग्वाही देत सत्तेच्या संधीसाठी पदर पसरणारे राजनाथ सिंह यांनी भाजपच्या वेगळेपणाच्या दाव्याचा फोलपणाच उघडय़ावर आणला आहे. एकदा तरी संधी द्या, आम्ही अपेक्षापूर्ती केली नाही तर पुन्हा आमच्याकडे ढुंकूनही पाहू नका, अशी केविलवाणी विनवणीही राजनाथ सिंह यांनी मुस्लीम मतदारांना उद्देशून केली आहे. आपल्या पक्षानेदेखील याआधी चुका केल्या याची कबुली त्यांच्या या वक्तव्यातून डोकावत असताना, चुका केल्याबद्दल केवळ मुस्लिमांचीच नव्हे, तर देशाचीच माफी मागा, असा सल्ला कुणा राजकारणी नेत्याने दिला, तर त्याचे आता भाजपला वाईट वाटावयास नको. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन देत बहुसंख्याकांची मतेही मिळविली, पण मंदिर मात्र दृष्टिपथात नाही, याची आठवण नव्या मत-गठ्ठा नीतीमुळे मतदारांना झाली, तर भाजपला धक्का बसू नये..
भाजपचेही ‘गठ्ठे’..
‘पार्टी विथ डिफरन्स’ असे स्वतचे गोडवे गाणाऱ्या भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागताच या पक्षाच्या बाह्य़रंगात बदलाची लक्षणे दिसू लागली आहेत.
First published on: 27-02-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp no party with difference