गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या मुंबईतील महागर्जना रॅलीत बोलताना भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी जनसागराची तुलना मुंबईच्या अरबी जलसागराशी केली, तेव्हा मुंबईवासीयांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण नक्कीच झाली असेल. मोदी यांच्या सभेला विक्रमी गर्दी झाली असली, तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व पाहिलेल्या मुंबईला गर्दीचे विक्रम नवे नाहीत. मोदी यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचा उल्लेखदेखील केला नसला, तरी िहदुत्वाचा नारा देत बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत गाजविलेल्या विक्रमी गर्दीच्या सभांमुळेच ते िहदुहृदयसम्राट ठरले होते. बाळासाहेबांच्या हयातीतच मुंबईत मोदी यांना ही उपाधी देण्याचा एक प्रयत्न भाजपने करून पाहिला होता, पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, हे भाजपच्या वेळीच लक्षात आले, आणि बाळासाहेब ठाकरे हेच हृदयसम्राटपदी कायम राहिले. आता त्याला बराच काळ उलटून गेला. बाळासाहेबांच्या पश्चात प्रथमच भाजपने स्वबळावर मुंबईत एवढी मोठी गर्दी जमविल्यामुळे आता मोदींचा हृदयसम्राटपदाचा मार्ग बहुधा मोकळा झाल्याची भाजपची भावना झाली असेल. त्यामुळेच, या सभेत बोलताना मोदींनादेखील आपण हृदयसम्राट झाल्याचा आनंद व्यक्त करण्यावाचून राहवले नसावे. केबलचालकांनी भले आपला चेहरा वाहिन्यांवरून दाखविला नसेल, पण आपण आता जनतेच्या हृदयात स्थान मिळविले आहे, असे मोदी यांनीच बोलून दाखविले. मुंबईत किंवा महाराष्ट्रात बिगरकाँग्रेसी पक्षांच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख अपरिहार्य असतो. त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी तो केला, पण मोदींनी मात्र शिवसेनेचा उल्लेखदेखील टाळला. खरे म्हणजे, रविवारची मोदींची सभा ही रालोआची आणि महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, भाजप-शिवसेना आणि रिपाइं यांच्या महायुतीची निवडणुकीचे रणिशग फुंकणारी सभा होती. कारण मोदी हे भाजपचे, पर्यायाने रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. असे असताना शिवसेना-रिपाइंच्या नेत्यांना व्यासपीठावरच नव्हे, तर सभास्थानीदेखील कोणतेच स्थान असू नये हे अनाकलनीय आहेच, पण मोदी यांनी या सहकारी पक्षांचा साधा उल्लेखदेखील करू नये, हे आणखीच अनाकलनीय आहे. या सभेत महाराष्ट्र सरकारवर मोदी यांनी टीकेची झोड उठविली, पण आपली जीभ चुकूनदेखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळणार नाही, याची जणू मोदी यांनी खबरदारी घेतली. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसदेखील सत्तेत आहे, आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत हा पक्ष राज्यात काँग्रेसहून कांकणभर सरसच आहे. पण मोदी मात्र काँग्रेसवरच बरसले. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा आणि शत्रुपक्षाच्या तंबूतील राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख टाळून मोदी यांनी राजकीय पंडितांना कोडय़ात पाडले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून राज ठाकरे यांच्या मनसेला वगळता येणार नाही, हे वास्तव आहे. तरीही महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या राजकीय भाषणात मोदींनी या पक्षाला स्पर्शदेखील केला नाही. राजकारणात कुणीच कुणाचाच कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्रदेखील नसतो, असे शरद पवार या जाणत्या नेत्याने म्हटलेच आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरची उद्याची गणिते कशी असतील, याची उत्तरे आजच ठरलेली नाहीत, हेही उघड आहे. काँग्रेसवरील टीका, राष्ट्रवादीबद्दल मौन, मनसेचा अनुल्लेख आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा विसर या मोदींच्या सभेतील ठळकपणे जाणवणाऱ्या बाबींना अनवधानाचे कारण असूच शकत नाही. उलट, मोदींच्या या खेळीमुळे या पक्षांच्या पंडितांना आपापले तर्कशास्त्र पणाला लावावे लागणार आहे. त्यासाठी पवार यांच्या आवडत्या शत्रू-मित्र सिद्धान्ताचाच आधार त्यांना घ्यावा लागणार आहे.