त्याचे म्हणजे अनिल गोविलकर यांचे. त्यांच्या ब्लॉगचेही नाव ‘गोविलकरअनिल.ब्लॉग.इन’ असे आहे. ‘वाचनगाणे’ असे या ब्लॉगबद्दल इथे का म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र ‘तद्दन पत्रकारीय क्ऌप्ती’ यापेक्षा निराळंही असू शकेल.
हा ब्लॉग गोविलकरांनी दक्षिण आफ्रिकेतल्या वास्तव्यात सुरू केला. तिथले जगणे आणि त्यामुळे पडलेले प्रश्न यांचा हिशेब मांडणाऱ्या अगदी मोजक्या नोंदी आहेत खऱ्या, शिवाय गिरगावातल्या बालपणाविषयी आठ किंवा सहा भागांमध्ये नोंद. पण या ब्लॉगचा पिंड स्वत:बद्दल सांगण्याचा राहूच शकला नसता, इतपत गुणग्राहकता गोविलकरांकडे असल्याचे पुढल्या नोंदींमध्ये दिसते. विशेषत: २०१२ सालातल्या या नोंदींचे विषय आहेत गाणी – तीही रागदारी, जाझ, गझल आणि निवडक (गाजलेलीच असे नव्हे, निवडक) चित्रपटगीते, आणि अरविंद गोखले ते दि. वि. गोखले आणि जी. ए. कुलकर्णी ते गो. वि. करंदीकर (विंदाच, पण समीक्षा लिहिणारे) असे वाचन. दर्जाबद्दल खात्री असेल, तर काहीही वज्र्य नाही, असा पॅटर्न ब्लॉगनोंदींमध्ये उतरलेल्या पुस्तकांची यादी केली असता दिसेल, तरीही दांडगेच वाचन. म्हणजे प्रामुख्याने वाचन आणि गाणे या दोन छंदांना वाहिलेला हा ब्लॉग आहे. पण तेवढय़ावरनं लगेच शीर्षकात वाचनगाणे करून टाकायचे, असा प्रकार म्हणजे ब्लॉगलेखक गोविलकर यांच्यावर अन्याय ठरेल. त्यांच्या वाचनाचा ‘त्यांच्या’ गाण्याशी काही संबंध आहे का? किंवा, गाण्याचा वाचनाशी कसा काय आहे संबंध?
आहे, असे त्यांच्या ब्लॉगवरल्या काही जुन्या नोंदी सांगतात. संगीताचार्य अशोक दा. रानडे (जे हयात असते तर कालच्या रविवारी ७५ वर्षांचे झाले असते) यांच्या भेटीबद्दल कृतज्ञतेने लिहिताना गोविलकर यांनी ‘गद्यगीत’ असा शब्द वापरला आहे. हे गद्य आणि जीएंच्या ‘स्वामी’ या कथेबद्दलची नोंद असेल की मेहदी हसनच्या ‘रंजिश ही सही’ या गझलबद्दलची नोंद.. त्या नोंदींचा हेतू आणि त्यामागचा अनुभव एकाच श्रेणीचा आहे. पुस्तक वाचताना आणि वाचल्यानंतर त्या पुस्तकातल्या शब्दांच्या पलीकडले वाचन झाल्यावरचा अनुभव बऱ्याच जणांना येत असेल. गाण्यात जे मांडले गेले, त्याच्या आत जाण्याचा अनुभवही आणखी काही जणांना येत असेल. हे दोन प्रकारचे अनुभव नसून मूलत: एकच आहेत, असे मात्र फार थोडय़ा जणांनाच वाटत असेल. यासंदर्भात अनिल गोविलकर यांचा एक परिच्छेद जसाच्या तसा : शास्त्र समजायला अवघड तर नक्कीच असते परंतु जर का थोडा संयम आणि जागृतता दाखवली तर हेच शास्त्र आपण समजतो, तितके दुबरेध अजिबात नसते. किंबहुना, जरा इंटरेस्ट दाखवला तर जी दुबरेधता, प्रथम आपल्या मनाला ग्रासलेली असते, त्यामागील नेमका विचार उमगायला लागतो आणि त्यामुळे आपण उगाच कुठलेही गाणे ‘उत्तम आहे’ असा सरसकट शेरा मारायला धजावत नाही. शास्त्राच्या अति आहारी जाऊ नये, हा विचार योग्य आहे पण केवळ ‘शास्त्र’ म्हणून नाके मुरडण्याचे काही कारण नाही.
‘नादमय नादवेध’ या नोंदीत (२५ जून २०१२) गोविलकरांनी ही वाक्यं लिहिली आहेत. ‘नादवेध’ नावाच्या पुस्तकाबद्दलची ही नोंद. परंतु, पुस्तक सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी लिहिले आहे, एवढासुद्धा उल्लेख या नांेदीत नाही कारण पुस्तकाचे परीक्षण वा परिचय करून देणे, हा लेखकाचा हेतू नसावाच. त्याला मैफलीहून परतताना तेच राग, त्याच बंदिशी आपणही गुणगुणाव्यात, आपण गाणे ‘उमगायला’ लागावे आणि गायला येते म्हणून नव्हे तर उमगते आणि आपल्यापुरते उमलते, म्हणून समाधानी व्हावे, अशा दर्जाचा प्रामाणिकपणा या लिखाणामागे आहे. जीएंच्या बहुतेक कथा काव्याशी फार जवळचे नाते दाखवतात आणि ‘एखादे स्वगत, वैचारिक अनुभव किंवा अतितरल संवादातून गद्यात्मक मुक्त काव्याचा भास होत असतो,’ असे गोविलकर सांगतात. पुन्हा ‘संगीताचार्याचे गद्यगीत’ आठवते. हा आंतरसंबंध ओळखण्याची ताकद स्वत:च्या ऊर्मीमध्ये असेल, पण वाचनामुळे ती ताकद योग्यरीत्या मुखर होते. काही वेळा वाचक तिथवर जाऊ शकत नाही. अगदी क्वचित, लेखकही तपशिलांत अडकू शकतो. चिं. त्र्यं. खानोलकर हे कवी आणि असामान्य कादंबरीकारही होते याची आठवण करून देण्यासाठी ‘रात्र काळी घागर काळी’ या कादंबरीविषयी गोविलकर लिहितात. कवी आणि कादंबरीकार या खानोलकरांच्या बलस्थानांबद्दल या टिपणात स्पष्टपणे काही नाही. कादंबरीबद्दल बरेच आहे.
पुस्तक परीक्षण/ परिचय यांच्या काचातून गोविलकर मुक्त आहेतच, पण पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाबद्दलच सांगायचे आहे का, हे ठरवण्याऐवजी ते पुस्तकातला तपशील गुणगुणतात. ‘ओळख करून देण्या’पेक्षा नक्की पलीकडचे सांगण्यासारखे- तल्लखपणे आणि स्पष्टपणे त्यांना जाणवलेले आहे. ते वाचकापर्यंत पोहोचणारच, असा विश्वास ठेवता येईल अशी ताकद पुस्तकांविषयी नसलेल्या नोंदींमध्ये किती तरी वेळा दिसते. उदाहरणार्थ एका नोंदीत, इथे (दक्षिण आफ्रिकेत) लोकांना फक्त तालाची आवड आहे, त्यामुळे किती तरी गाणी लयीत असली, तरी त्या गाण्यांतदेखील तालाचा ‘भरमार उपयोग’ केला जातो आणि ‘गाण्याचा विचका’ होतो, असे लेखक नोंदवतो. तालाने लयीशी फटकून राहू नये हा आग्रह इतका स्पष्ट आहे की, काही महिन्यांनंतरच्या नोंदीत अवतरणारे ‘रंजिश ही सही’देखील त्या आग्रहातून सुटत नाही. पलीकडलं काही उमगण्याची आस कशी असते, याचे दुसरे उदाहरण आत्मपर नोंदी कशा स्वत:च्या पलीकडे जाता दक्षिण आफ्रिकेतच दोनदा लेखकाची गाठ चोर-गुंड टोळय़ांशी पडली आणि एकदा त्यांचा मार खाल्ल्यावर पुढे ‘मारू नका. काय हवे ते घ्या,’ म्हणत लेखक मनाने खचला. मात्र, ‘माझ्यावर असे प्रसंग ओढवले म्हणून संपूर्ण साऊथ आफ्रिकेला दोष देणे चुकीचे ठरेल. असे प्रसंग मुंबईत घडत नाहीत का? मग इथे मी कशी कारणमीमांसा करेन?’ असा प्रश्न लेखकाला पडला आहे.
कारणमीमांसा? अरे ब्लॉग लिहितोस ना तू? कशाला करत बसायचं कारणमीमांसा वगैरे.. इथं नुस्तं सुट्टायचं सुस्साट.. लेखक म्हणून आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी ब्लॉग हे एक साधन असतं, हे साधं तत्त्व पाळायचं इथं.. हे ज्यांना कळतं, त्यांचे ब्लॉग ‘चालतात’.
हा मित्रवत सलगीचा अनाहूत आणि वायफळ सल्ला अनिल गोविलकर यांना समजा कुणी दिलाच, तरी काही फायदा नाही, त्यांना ब्लॉग चालवायचा वगैरे नसावा. ‘तसे पाहिले तर’ ते ब्लॉगर नाहीतच.. लेखक आहेत आणि एखाद्या लेखकाचे वाचनगाणे सहजपणे लयीत सुरू असावे आणि लिखाण हे फार तर तालाप्रमाणे असावे, असे अनिल गोविलकर यांच्याबाबत झाले आहे.
या ब्लॉगलेखकाची शिफारस संवेद गाळेगावकर यांनी केली होती. गोविलकरांच्या नोंदींमध्ये शब्दसंख्या (अन्य ब्लॉगच्या तुलनेत) जास्त असते, पण तेच त्यांच्या शैलीला पूरक आहे, असे गाळेगावकर म्हणतात. खरे आहे ते; पण शैली न बदलता तपशिलांतून निवड करणे गोविलकरांच्या हाती आहे.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता :
http://govilkaranil.blog.com
सूचना, प्रतिक्रियांसाठी ईमेल :
wachawe.netake@expressindia.com
त्याचे वाचनगाणे..
त्याचे म्हणजे अनिल गोविलकर यांचे. त्यांच्या ब्लॉगचेही नाव ‘गोविलकरअनिल.ब्लॉग.इन’ असे आहे. ‘वाचनगाणे’ असे या ब्लॉगबद्दल इथे का म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र ‘तद्दन पत्रकारीय क्ऌप्ती’ यापेक्षा निराळंही असू शकेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2012 at 12:53 IST
मराठीतील सर्व वाचावे नेटके बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog govilkaranil