प्रख्यात दिवंगत लेखक भाऊ पाध्ये यांनी समाजाचं निरीक्षण खुलेपणानं आणि समपातळीवरून मांडलं म्हणून ते ‘ब्लॉगरांचे बाप’ ठरतात, असा उल्लेख गेल्या आठवडय़ाच्या ‘वाचावे नेट-के’मध्ये होता. त्यातल्या ‘समपातळी’बद्दल काही विनाकारण गैरसमज होण्याचा संभव आहे. शिवाय ब्लॉगर इतक्या प्रकारचे असतात की, नेमक्या कोणत्या प्रकारच्या ब्लॉगरांना पाध्ये पितृतुल्य वाटले पाहिजेत, हाही प्रश्न रास्त आहे.
तेव्हा खुलासा क्रमांक एक : माहितीपर लिखाण करणारे, ताज्या घडामोडींवर आपापल्या बुद्धीनं मतं मांडणारे – म्हणजेच ‘ललितेतर’ लिखाण करणारे ब्लॉगलेखक / लेखिका यांचं भाऊ पाध्ये यांच्याशी नातं नसलं तरी चालेल! जे ब्लॉगलेखक ललित लिखाण करतात वा करू पाहतात (आणि ज्यांना त्यांच्या सामाजिक- आर्थिक- सांस्कृतिक स्थितीमुळे सध्या गतकालीन ‘लाडके’ लेखक प्रिय असतात) त्यांचं नातं भाऊंच्या लिखाणाशी असू शकतं.
लाडक्या लेखकांना आपण कुणाचे लाडके आहोत हे माहीत होतं. भाऊ पाध्ये कुणाचेच लाडकेबिडके नाहीत, तरीही त्यांचं लिखाण महत्त्वाचं आहे. हा फरक ‘समपातळी’ समजून घेण्यासाठीही महत्त्वाचा ठरेल.
आपलं लिखाण कोण वाचणार आहे किंवा कोणी वाचावं, याबद्दलच्या अनेक ब्लॉगलेखकांच्या कल्पना स्पष्ट असतात. कोणत्या अन्य ब्लॉगलेखकाचं लिखाण वाचायचं, याहीविषयी अशीच स्पष्टता अनेक ब्लॉगलेखकांनी बाळगली असावी, असं त्यांच्या प्रतिक्रियांचा माग काढताना दिसून येतं. एखादा कळप किंवा ‘बिरादरी’ ज्या प्रकारे काम करते, तितपत परस्परसंबंध असलेले हे ब्लॉगलेखक एकमेकांसाठी लिहितात, एकमेकांची वाहवा मिळवतात.. ‘सं वो मनांसि जानताम्’ अशी ही ‘इक्वालिटी अमंग इक्वल्स’ पद्धतीची समपातळी असते; ती समीक्षकांनी आणि / किंवा हितचिंतकांनी आत्ता काहीही मतं व्यक्त केली तरी मराठी ब्लॉग क्षेत्रात आहे आणि पुढली काही र्वष तरी तशी राहणारच. पण इथं सांगणं एवढंच आहे की, भाऊ पाध्ये यांनी साधलेली समपातळी ही अशी नव्हती. लेखकरावांच्या लेखण्यांमधून निसटून गेलेल्या समाजाबद्दल लिहिताना भाऊ पाध्ये यांनी त्या समाजाचीच भाषा वापरली- तीही भाषेचा निराळा प्रयोग वगैरे म्हणून नव्हे, तर लिखाणाची गरज म्हणून! पाध्ये यांची भाषा लेखनद्रव्यातून (म्हणजे ज्याबद्दल लिहायचंय त्यातून) घडलेली होती. कुणा प्रेक्षकवर्गासाठी लिहायचंय म्हणून घडलेली नव्हती. समपातळी कुणाच्या संदर्भात, हे इथं स्पष्ट व्हावं.
अशा समपातळीची अपेक्षा ब्लॉगलेखकांकडून नक्कीच आहे. कारण हे लेखक जगण्याच्या आणि व्यवसायांच्या अनेक क्षेत्रांमध्ये विखुरलेले आहेत. ‘मी काही लेखक वगैरे नाही’ असं यातले अनेक जण / अनेक जणी स्वत:हून म्हणताहेत (‘लेखकां’बद्दलची त्यांची कल्पना आदर्शवत किंवा घृणायुक्त असू शकते हेही एक कारण असेल, तरीही-) त्यांना लिहावंसं वाटतं आहे. लेखकराव बनण्याची महत्त्वाकांक्षा नसणं हा गुण अनेक ब्लॉगरांमध्ये आहे. वर जे ‘आपला वाचकवर्ग आपल्यापुढे स्पष्ट आहे आणि आपण त्याच्याचसाठी लिहितो’ असा आरोप ब्लॉगरांवर करणारं विधान आहे त्याचा रागच अनेकांना येईल, याचंही सकारात्मक कारण हेच- ‘सर्वानीच आपलं लिखाण वाचावं’ असं ब्लॉगरांना वाटतं, हे आहे! पण ब्लॉग लिखाण पुस्तकांपेक्षा दुय्यम मानणाऱ्या वाचकांचा जमाना अद्याप सरलेला नाही, तोवर ब्लॉग लिखाण वाचणाऱ्यांचा कप्पा लहानच राहणार. तो कप्पा तसा राहू नये, ब्लॉग आणि पुस्तक असा जातिभेद न करता वाचनीय ते वाचनीयच, असं लोकांनी म्हणावं ही सदिच्छा एकदा मान्य केली की मग, ‘ आपल्याकडे सांगण्यासारखं काय आहे, हे आजच्या ब्लॉगलेखकांनी ओळखलं पाहिजे’ ही अपेक्षा रास्त ठरेल.
यापुढली पायरी म्हणून ‘काय सांगायला हवं,’ हे ब्लॉगलेखक / लेखिकांनी जाणलं तर आणखीनच चांगलं. पण स्वत:ची अनुभवसिद्धता कुठे आहे- जगाची कुठली बाजू स्वत:ला माहीत आहे, हे ब्लॉगलेखन करणाऱ्यांनी ओळखल्यास एकंदर मराठी ब्लॉगलेखनात वाचनीय भर पडेल, अशी चिन्हं गेल्या पाच वर्षांत झालेल्या ब्लॉग लिखाणातून दिसत आहेत. ‘ललित आत्मपर लेखन’ हा मराठी ब्लॉगलेखनाचा महत्त्वाचा प्रकार ठरला आहे. आता वेळ आली आहे ती आत्मपरतेचा उंबरठा ओलांडणारे ब्लॉगर अपवाद ठरू नयेत अशी.
‘आज हा अनुभव आला नि काल तो-’ अशा लिखाणातून ‘अनुभवसिद्धता’ दिसणं अशक्य आहे. मराठी-हिंदीतले एक संगीतकार-गायक होते ख्यातकीर्त, पण गावोगावच्या कार्यक्रमांत ते गाताहेत की रियाज करताहेत, असा प्रश्न ऐकणाऱ्यांना पडायचा; तसा प्रश्न ब्लॉगवाचकांना, ब्लॉगांवरल्या या अशा रोजमर्रा नोंदींमुळे पडू शकतो. त्यापुढे जाणारे, ज्यांचं ललित-लिखाण वाचनीय असतं असे काही ब्लॉगलेखक आहेत. त्या ब्लॉगरांच्या काही लेखमालिका, किश्शांपेक्षा कथा या प्रकाराशी अधिक जवळच्या असलेल्या काही नोंदी, हे आजही वाचनीयच आहे. यापैकी ‘वाचावे नेट-के’मध्ये आधी उल्लेख झालेली एक मालिका म्हणजे ‘आळशांचा राजा’नामक ब्लॉगरची ‘प्रांतांच्या कथा’.
आज विषय निघालाच आहे म्हणून ‘बोलघेवडा’ या ब्लॉगचा उल्लेख करायला हवा- आत्मपर ललित लिखाणाला ‘हे माझ्याकडे सांगण्यासारखं आहे’ अशा- अनुभवसिद्धतेतून आलेल्या- आत्मविश्वासाची जोड असेल, तर ब्लॉगवरल्या नोंदी वा मालिका वाचनीय ठरतात, याचा हा एक लक्षणीय नमुना. ‘बोलघेवडा’ या ब्लॉगचे लेखक रणजित चितळे यांना लष्करी पेशाचा अनुभव आहे. त्यांची तिथली ‘रँक’ वा अन्य तपशील ब्लॉगवर कटाक्षानं टाळण्यात आले आहेत. या ब्लॉगवरच्या अनेक नोंदी (ताज्या- २७ सप्टेंबरच्या नोंदीसहित) हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. या भूमिकेतून मराठीत चालू घडामोडींवर होणारं लिखाण कोणती मतं मांडणारं असतं, हे काही अपरिचित नाही. वृत्तपत्रांत वाचकांच्या पत्रव्यवहारातूनही अशी मतं मांडली जात असतात. मात्र ‘बोलघेवडा’कारांची ‘राजाराम सीताराम’ ही मालिका वाचनीय आहे. ती आत्मपर आहे आणि ललितही. लष्करात दाखल झाल्यानंतरच्या प्रशिक्षणातले हे अनुभव आहेत. जिवाची परीक्षा पाहणाऱ्या शिक्षा, अठरापगड प्रशिक्षणार्थीना असलेली प्रांतवाचक संबोधनं (मल्लू, बबुआ, बाँग वगैरे) आणि तरीही साधली जाणारी ‘एकात्मता’ अशा तपशिलांच्या पलीकडे- एका लष्करी मध्यमस्तरीय अधिकाऱ्याच्या मनाची घडण कशी होत असते याचं दर्शन ही मालिका घडवते, म्हणून ती वाचनीय ठरते. त्या लिखाणातली भाषा काही वेळा प्रयत्नपूर्वक समजून घ्यावी लागेल. ‘जीसी’ म्हणजे काय, याचा उलगडा चटकन होणार नाही. या ‘राजाराम सीताराम’ मालिकेच्या आधीची ‘सुरुवातीचे दिवस’ ही दोन भागांतली नोंद वाचल्यास पुढे वाचणे सोपे जाईल अशा सर्व अटी-तटी सांभाळूनही वाचावं, असं- ‘लष्करी संस्कार’ उलगडून सांगणारं लेखनद्रव्य या मालिकेत आहे.
आपली आजची चर्चा अनुभवसिद्धतेबद्दल सुरू असली, तरी ‘समपातळी’चा संदर्भ या मजकुराला होता. वाचकांना रिझवण्यापेक्षा ‘सांगणं’ हे लेखकानं लेखनद्रव्याशी समपातळी साधल्याचं लक्षण आहे. ते वर उदाहरणादाखल दिलेल्या लिखाणातूनही दिसतं, हे वेगळं सांगायला नको.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता:
http://bolghevda.blogspot.in
तुम्हाला वाचनीय वाटणाऱ्या ब्लॉगची सकारण शिफारस किंवा प्रतिक्रिया, सूचना पाठवण्यासाठी : wachawe.netake@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा