पत्रकारांना ब्लॉग राखणं कठीण नाही. त्यातही अनेक पत्रकार केवळ पूर्वप्रकाशित लिखाण ब्लॉगवर कटपेस्ट न करता स्वतंत्र ब्लॉगनोंदी करतात. पत्रकारांचे ब्लॉग लक्षवेधक असणं, हेही व्यवसायानुरूप साहजिक आहे. पण त्यापलीकडचा ‘स्वत:’ कुठे येतो? दुनियेशी संबंध- संपर्क ठेवणारी आणि शब्दांशी खेळणारी ही माणसं दिल की बात सांगताना मात्र सामान्य माणसांचं थेट अनुकरणच करतात की काय?
हो किंवा नाही यातलं एकच उत्तर अनुचित तर ठरेलच, पण परिचित पत्रकारांच्या किमान एक-दोन नोंदी यापेक्षा निराळय़ा अपवादात्मकरीत्या चांगल्या होत्या, याची आठवण अनेक ब्लॉगवाचकांना असेल. पत्रकारितेचा भाग म्हणून केलेल्या लिखाणापेक्षा निराळं स्वतला लिहिता येतं का?
मराठीसंदर्भात हा प्रश्न सध्या तरी महत्त्वाचा आहे. या प्रश्नामागे असलेली, ‘पत्रकारितेपेक्षा निराळय़ा जातकुळीचं लिखाण असायला हवं’ ही अपेक्षा योग्य ठरेल. (इंग्रजीत ब्लॉग-पत्रकारिता असा व्यवसाय होऊ शकतो आणि मराठीत तसं सध्या तरी होऊ शकत नाही, हे कटू वास्तवही त्यामागे आहे.) शिवाय, मराठी ब्लॉगविश्वात एवढय़ा संख्येनं पत्रकार आहेत ते फक्त त्यांना स्वत:चंच आयतं लिखाण तयार मिळतं म्हणून तर नाहीत ना, हाही प्रश्न धसाला लावण्याची ताकद त्या ‘व्यावसायांतर्गत लिखाणापेक्षा निराळय़ा जातकुळीचं लिखाण’ अपेक्षेत आहे. या पाश्र्वभूमीवर सुनील तांबे यांचा ‘मोकळीक’ आणि ज्ञानदा देशपांडे यांचा ‘बृहत्कथा’ या दोन ब्लॉगकडे आज पाहू.
तांबे यांच्या ब्लॉगवर ‘साधना’ साप्ताहिकातले त्यांचे अनेक लेख दिसतात, पण एरवी त्यांनी स्वत:चं लिखाणही भरपूर केलं आहे. गद्यकार म्हणून तांबे यांचं लिखाण स्पष्ट असतं, वाचकाला कुठेतरी नेणारं आणि आता तुमचे तुम्ही फिरा या विचारप्रांतात, असा विश्वास देणारं असतं. पण त्यांच्या ब्लॉगवर हल्लीच कविताही आहेत. गद्यात हेच अनुभव वाचताना ते अर्धेमुर्धे वाटले असते, म्हणून त्या कविता आहेत इतकंच. बाकी ब्लॉगवरल्या कवितांबद्दल कधी कुणी जाहीर मतप्रदर्शन करू नये, हा संकेत इथेही पाळणं इष्ट ठरेल. सत्यदेव दुबे यांच्यावरल्या मृत्युलेखात ‘नाटक हाच त्यांचा सेक्स होता’ असं विधान करणारे सुनील तांबे दुबेजींना केवळ दाद देत नाहीयेत.. ते कशाची तरी उत्तरं शोधताहेत आणि तो शोध पत्रकारीय कुतूहलातून आलेला आहे. तांबे यांचा आणखी एक ‘मृत्युलेख’ आहे- ‘कळते-समजते’ हा पत्रकारांची खबर देणारा-घेणारा ब्लॉग बंद झाला तेव्हा त्यांनी ‘हे इलेक्ट्रॉनिक लिटिल मॅगेझिन होतं’ असं निरीक्षण नोंदवलं आहेच, पण ‘दुष्कृत्यं करणारे, समाजविघातक विचारांचा प्रसार करणारे अनेकदा अनामिक राहू इच्छितात. त्यांच्या मार्गावरून सज्जन चालू लागले की असा करुण मृत्यू होतो. एका अश्रूचीही श्रद्धांजली त्यांना मिळत नाही’ असा शेवट करून तांबे यांनी चर्चेला तोंड फोडलं आहे. त्या ‘कळते-समजते’ ऊर्फ ‘बातमीदार’ या ब्लॉगचं लिखाण संयत होतं का, तरीही त्याच्या जाण्यानं काही नुकसान झालंय का, याबद्दल मतप्रदर्शन सुरू झालं. किंवा, ‘लोकांच्या प्रश्नांची, समस्यांची, वेदनांची पकड सामाजिक प्रसार माध्यमानं (सोशल मीडिया) घेतली, त्यामुळे क्रांतिकारी नसूनही सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद जनलोकपाल आंदोलनाकडे आली’ असा थेट आणि स्पष्ट निष्कर्ष वाचकाहाती देऊन तांबे यांनी ऑगस्ट २०११ मध्ये लिहिलेल्या लेखाचा शेवट होतो.. मतप्रदर्शन भरपूर, वैयक्तिक संदर्भही भरपूर, पण लोकांना ‘इक्विप’ करणं हा तांबे यांचा हेतू त्यांच्या शैलीला पुरून उरतो. स्वत:च्या अनुभवाशी प्रामाणिक असण्याचा धागा अजिबात न सोडता तांबे पत्रकाराचं कौशल्य वापरून ब्लॉगनोंदी लिहितात, हे स्वतंत्रपणे लिहिलेल्या नोंदी वाचताना नक्कीच दिसतं.
पत्रकारांच्या ब्लॉगलेखनात काही नवीन असतं की नाही, याचं सकारात्मक उत्तर या दोन ब्लॉगमधून शोधता येतं.. त्यापासून कुणाला प्रेरणाही मिळायला हरकत नाही, पण अभ्यास करावा लागेल.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचे पत्ते : http://dnyanadadeshpande.blogspot.in , http://moklik.blogspot.in
सूचना, प्रतिक्रियांसाठी : wachawe.netake@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा