‘क्लाउडवॉचिंग’ नावाचा एक प्रकार असतो. त्यात हवामानशास्त्र वगैरे अजिबात येऊ न देता, फक्त ढगांच्या आकारांवरून, त्यांच्या संभाव्य घनतेवरून तो आकार कसकसा बदलत जाईल आणि तो ढग कोणत्या प्रकारचा असेल, याचा अंदाज बांधत पाहत राहायचं. अंदाज चुकतात किंवा बरोबर निघतात. हळूहळू सराव होतो. तसंच हेही..
ब्लॉग कसा लिहावा, हे सांगण्यासाठी ‘वाचावे नेट-के’ कधीच प्रयत्न करत नव्हतं. ब्लॉग कसा लिहू नये, हेही सांगण्यासाठीही नाही. ब्लॉगला प्रसिद्धी द्यावी किंवा ब्लॉगची अपप्रसिद्धी करावी, याहीसाठी नाही. जो काही प्रयत्न आहे तो, ‘ब्लॉग असे आहेत, असतात, असू शकतात’ याकडे बोट दाखवण्यासाठी आणि ब्लॉग कसा वाचावा, हे सांगण्यासाठी.
‘हँ, ढगात काय पाहायचंय? आणि तो कसा बदलेल याचा अंदाज आपण जमिनीवरनं कशाला बांधायचे?’ असं म्हणणारे बरेचजण असणारच. पण त्याबद्दल वेळ मिळाल्यास जरा नंतर बोलू.
इथे आज मात्र क्लाउडवॉचिंग निराळय़ा कारणासाठी आठवलं. मेघालयातून लिहिला जाणारा, मराठी माणसाचा इंग्रजी ब्लॉग. हा मेघालयातून ब्लॉग लिहिणारा मराठी माणूस स्वत:चं नाव गुप्त राखू इच्छितो. ‘कार्ल फॉन (स्पेलिंगनुसार व्हॉन) बेलिफ’ अशा टोपणनावानं लिहितो.
या कार्ल बेलिफांच्या ब्लॉगवर मराठी अगदी थोडं आहे. देवनागरी लिपीतलं मराठी तर त्याहूनही कमी. सहसा इंग्रजीत हा ब्लॉग लिहिला जातो आणि ते इंग्रजीही निराळंच.
निराळं म्हणजे कशापेक्षा निराळं? उदाहरणार्थ, आणखी एका महाराष्ट्रीय ब्लॉगरचा इंग्रजी ब्लॉग बघा. हा आहे विनय ठाकूर (याचे पूर्वज म्हणे उत्तर प्रदेशातले आहेत. पण हा महाराष्ट्रीयच). सरळ भाषा. अगदी सर्वासाठी. इंग्रजीचा पोत असा की इंग्रजी एरवी काहीच वाचलेलं नसलेल्या वाचकांनाही इथली इंग्रजी भाषा मात्र चटकन आपली वाटेल. शब्द इंग्रजी, वाक्यं > परिच्छेद> अख्खी नोंदच इंग्रजी.. पण लिहिणाऱ्याचं मन मात्र महाराष्ट्रीय, अशी लोभस सरमिसळ विनय ठाकूर यांच्या ब्लॉगवर आहे. ठाकूर कुठलाही आडपडदा न पाळता, ‘ओ माय गॉड हा चित्रपट मला आवडला व मी तो अनेकदा पाहिला..’ ‘हा चित्रपट म्हणजे सर्वच धर्मात ज्या अनिष्ट गोष्टी शिरल्या आहेत, त्यांच्यावरची टिप्पणी आहे’ आणि ‘सर्वच धर्मातल्या अंधश्रद्धा लवकर नाहीशा होवोत’ असे सरळपणे लिहितात. सामाजिक विषयांवरल्या नोंदी ठाकूर मनापासून लिहितात आणि ‘मी आस्तिक नाही वा नास्तिकही नाही’ असे त्यांनीच जाहीर केले आहे. मुलगा, भाऊ, पुतण्या, आई, यांचे उल्लेख कधी येतातही, पण नोंदींचे विषय सामाजिक आहेत, आणि ब्लॉगचं एकंदर स्वरूपही सामाजिक विषयांवरली स्वत:ची मतं, असंच आहे. प्रत्येक नोंदीखाली ‘तुमचा दृष्टिकोन समजून घ्यायला आवडेल’ असं वाक्य (नोंदीचाच भाग म्हणून) असतं. प्रतिक्रिया कमी आहेत. ठाकूर काही प्रतिक्रियांनी स्वत:च्या ब्लॉगचं यशापयश मोजायला बसलेले नाहीत. तो त्यांचा स्वभावही नसावा, कारण विषयांची हाताळणी इतकी संयत असते की, टोकाची मतं- मग वाद-प्रतिवाद वगैरे ठाकुरांच्या ब्लॉगवर जवळपास अशक्यच आहे.
आता यापेक्षा निराळय़ा भाषेतला, मेघालयातल्या त्या मराठीभाषक संगीतप्रेमीचा ब्लॉग. या ब्लॉगची भाषा इंग्रजी आहे खरी, पण या भाषेवर अन्य प्रभावही बरेच आहेत. १९८०च्या दशकापासून (किंवा आणीबाणीनंतर) इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे मनोरंजक शैलीतलं इंग्रजी स्तंभलेखन बहरत गेलं, त्याचा एक प्रभाव. खुशवंत सिंग हे त्याहून ज्येष्ठ स्तंभलेखक, त्यांचा ‘टेलपीस’ हा जणू संस्कार म्हणून या ब्लॉगनं जपला आहे. पत्नीला ‘मिस्सस’ असे भारतीय इंग्रजीत म्हणणे, स्वत:चा उल्लेख ‘वायएफ’ (युअर्स फेथफुली) किंवा ‘वायटी’ (युअर्स ट्रली) असा करणे.. इंग्रजी चित्रपट-नियतकालिकांतले गॉसिप कॉलमिस्ट स्वत:कडे जितके नि जसे महत्त्व घेतात तितके नि तसे अधूनमधून घेणे.. हे सारे प्रकार या ब्लॉगच्या रचनेचा महत्त्वाचा भाग आहेत. यातून ब्लॉगचा काहीसा नर्मविनोदी, पण आग्रही आणि आर्जवी असा ‘टोन’ ठरतो. हा ब्लॉग गॉसिप कॉलमइतका थिल्लर अजिबात नाही. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात लेखकाच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून (बहुधा जन्म १९५४ चा) ज्या काही आवडीनिवडी सिद्ध झाल्या आहेत, मतं पक्की झाली आहेत, त्यांचं दर्शन हा ब्लॉग घडवेल.
पंडित भीमसेन जोशी हे या ब्लॉगचं जणू आराध्यच- ब्लॉगचं नावच तर ‘इंद्रायणीकाठी’ आहे. मग कुठेतरी एकदा थेट दोन आलेख येतात. वर चढत जाणाऱ्या ‘कव्‍‌र्ह’च्या या आकृत्या आहेत. हवाई मैल आणि विमान अमुक उंचीवर नेण्याचं उद्दिष्ट, यांचं गुणोत्तर आहे हे- त्यापैकी एक आकृती आहे ती मेघालयात, शिलाँगला जाण्यासाठी किती कमी हवाई मैल अंतर असूनही केवढय़ा उंचीवर विमान जातं, याची. आता या आकृत्या कशाला काढताहेत ब्लॉगलेखक? तर त्यांना हे सांगायचंय की, भीमसेनजींचं कर्तृत्व हे असं, कमी वेळात उंची गाठणारं आहे. याखेरीज कोमल निषादला पंडितजी कसे कह्यात ठेवतात, उंचीवर नेऊन- खेळवून मग खाली कुठेतरी एका कोपऱ्यात बसायला सांगतात नि तोही निमूट बसतो, अशी वर्णनं या ब्लॉगवर अन्यत्र सापडतीलच. संगीत ऐकणाऱ्याचं भावविश्व आजकाल केवळ सुरांचं राहू शकत नाही. मार्केटमध्ये जे ब्रँड तयार झाले आहेत तेही त्याच्यावर आदळतच असतात आणि त्यांना ओळखणं, त्यांची ‘असलियत’ जाणणं, हेही काम कानसेनाला आताशा करावं लागतं. मेघालयातला मराठीभाषक इंग्रजी- ब्लॉगलेखक हे काम आवडीनं करतो. रॉबीदा, झाकीर यांना अनेकदा या ब्लॉगचे फटके खावे लागलेत.
पण फटके देण्यात धन्यता मानणारे जे ब्लॉगलेखक असतात, त्यांमध्ये या लेखकाची गणना एवढय़ामुळे होऊ नये! ‘येस्स’ किंवा ‘नो किडिंग मॅऽन’ असे शब्द इथं येतात, पण तेवढय़ानं तो ब्लॉगच थिल्लर ठरू नये. व्याकरणवाल्या रेन अँड मार्टिनपासून ते स्टोरी ऑफ फिलॉसॉफीवाल्या विल डय़ुरांपर्यंत कुणाला काय म्हणायचं आहे, ते या (मेघालयवासी, मराठी इ.) ब्लॉगलेखकाला माहीत आहे आणि जणूकाही, लेखकानं स्वत:ची शैली निर्माण करावीच अशा शिस्तीत हे भाषाभंजन सुरू आहे. ‘युअर्स ट्रली’ हे स्वत:वरला नर्मविनोद सहन करू शकणारे आहेत. त्यांची मतं मात्र ‘मिस्सस’प्रमाणे आहेत.. तिथं काही बोललेलं त्यांना चालणार नाही! भाषा कितीही नवी, तरुण असली तरी काही जुने संस्कार, जुने आग्रह या ब्लॉगमधून डोकावतात. दीमापूर, त्रिपुरा, मेघालयचा लहरी आणि अनाकलनीय पाऊस हा भूगोल या ब्लॉगवर उलगडतच राहतो, पण त्याचा प्राण स्थळवर्णनाचा नसतो. आपल्यासारखे(च) रसिक आपल्याला भेटावेत, ही या ब्लॉगमागची इच्छा असावी. यूटय़ूबवर हे प्रत्यक्षच ऐका म्हणत अनेक लिंक हा ब्लॉग देतो, मालिनी राजुरकर, सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं १९७७ वगैरे सालचं एखादं रेकॉर्डिग अशा विश्वात नेतो, एखाद्या जाणत्या परंतु उपेक्षित तबलजी- तबलागुरूची ओळख करून देतो आणि झुल्पी-झाकीरपंथी तबलजींना ‘वाजवतो’च. ‘चाबीवाला बैंक’ यांसारखे शब्द वापरून उखाण्यात बोलल्याप्रमाणे लिहिण्याचाही सोसच या ब्लॉगला आहे.. का नसावा? माझी भाषा ज्यांना कळेल तेच माझे मित्र, असा आग्रह ठीक, तर हा सोसही ठीक! आग्रह-आर्जवांचा मेळा पाहत वाचकानं जरा दूर जावं.. ठाकूर आणि ‘बेलिफ’ टोपणआडनावाचा ब्लॉगर यांची तुलना करण्याच्या फंदात अजिबात न पडता त्यांना एकत्र पाहावं.. इंटरनेटच्या आभाळात असे अनेक ब्लॉगर आहेतच, त्यांच्या- त्यांच्या ब्लॉगची म्हणून एक भाषा आहे आणि ढगांप्रमाणे त्यांचेही आकार बदलू शकतात.
ही ब्लॉगभाषेची मेघरूपे आपण पाहत राहायची. काय वाचावं, कसं वाचावं हे सांगणारं कुणीतरी मध्येच उपटलं, तर ऐकावं त्याचं. पण मध्येच उपटलेलं कुणीतरी अंतर्धान पावलं, तरी आपण आपलं पाहणं सुरू ठेवावं!
उल्लेख झालेल्या ब्लॉग्जचे पत्ते :
http://indrayanikaathi.blogspot.in
http://selfrealization-vinay.blogspot.in
निरोपासाठी ईमेल : wachawe.netake@expressindia.com

Story img Loader