लेखक कुणासमोर तरी काहीतरी ‘सादर’ केल्यासारखा लिहू लागला की, साहित्यगुणांचं नुकसान होतं. हे निरीक्षण लाडक्या, प्रभावशाली, नोबेल विजेत्या वगैरे लेखकांबद्दल खरं ठरतं; तिथं ब्लॉग लेखक/ लेखिकांची काय कथा?
अनेकांना याचा राग येऊ शकतो. पण समीक्षा कोणाकडून होते आहे हे खरंच इतकं महत्त्वाचं असतं का? ती ‘असते’.. कोणी केली हे महत्त्वाचं नसतं.
उदाहरणार्थ, ‘स्वत:मध्येच डुंबत राहण्याच्या सवयीमुळे व्ही. एस. नायपॉल हे स्वत:चंच अर्कचित्र झालेले आहेत.. नायपॉल यांना अभिप्रेत असो वा नसो, पण (भाजप केंद्रात सत्तेवर असताना) ते हिंदू अत्याभिमान्यांचा ‘पोस्टर बॉय’ झालेले होते’- अशी वाक्यं अनिरुद्ध गो. कुलकर्णी यांनी २८ सप्टेंबर २००७ रोजी एका इंग्रजी ब्लॉग-नियतकालिकातल्या एका लेखावरल्या प्रतिक्रियेत लिहिलेली होती.
अनिरुद्ध कुलकर्णी यांचं हे निरीक्षण इतकं खरं आणि समीक्षकी होतं (किंवा नीट विचार करणाऱ्या कुणालाही नायपॉल यांच्याबाबत हेच वाटणं स्वाभाविक होतं,) की, दोनच महिन्यांपूर्वी मुंबईत गिरीश कर्नाड यांनी नायपॉल यांच्यावर केलेल्या टीकेत हे दोन मुद्दे होते. ती टीका गाजली आणि महत्त्वाची ठरली.
अर्थात, अनिरुद्ध कुलकर्णी यांची निरीक्षणं महत्त्वाची आहेत, हे काहीजणांना कळत होतंच. जाणकारांना तर नक्कीच कळत होतं. उदाहरणार्थ, आजच्या पिढीच्या फार लक्षात नसलेले पण आजच्या मराठी संस्कृतीवरला विश्वास कायम राहण्यासाठी फार उपयोगी पडणारे असे अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, कमल देसाई, सदानंद रेगे आदी साहित्यिकांचे ब्लॉग तयार करणारे अवधूत डोंगरे यांनी कधीतरी सप्टेंबर २००७ मध्येच अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या ‘सर्चिगफॉरलाफ’ या ब्लॉगला ‘महत्त्वाचा ब्लॉग’ म्हटलं होतं. अवधूत यांच्या त्या प्रतिक्रियेत मुद्दा वेगळा होता : अनिरुद्ध हे मराठी संस्कृतीतलं सत्त्व इंग्रजी ब्लॉगद्वारे जगासमोर आणत आहेत, असा. त्यावर ‘कुणीतरी हे करायलाच हवं होतं’ असं प्रत्युत्तर अनिरुद्ध यांनी दिलं. त्यातली विनम्रता जोखण्याचा नाद सोडल्यास, ‘जगासमोर’ म्हणजे कुणासमोर, याचा शोध घेता येतो. मग स्पिनोझा या तत्त्वज्ञाला स्मरून लिहिला जात असलेल्या ‘स्पिनोझा. ब्लॉगसे. एनएल’ या डच भाषेतील ब्लॉगचे कर्ते स्टान वर्डुल्ट यांनी विंदा करंदीकर गेले त्यानंतर ‘अनिरुद्ध कुलकर्णीच्या ब्लॉगमुळे मला हे कळलं’ असा उल्लेख केला आहे. ‘हे’ म्हणजे, स्पिनोझा आणि विंदा यांचा काय संबंध होता, ते. विंदांवर अनेक मराठी ब्लॉगरांनी लिहिलं आहेच, पण मराठीत- देवनागरी लिपीत- अवतरणं देऊन इंग्रजीत टिप्पणी करणारे अनिरुद्ध कुलकर्णी महत्त्वाचे ठरले. कारण त्यांनी खरोखरच जगाच्या दृष्टीनं मराठीतलं श्रेय शोधण्याचा प्रयत्न केला.
हा झाला एक भाग. अनिरुद्ध कुलकर्णी यांचं कविताप्रेम, त्यातही आजच्या जगाकडे पाहताना मर्ढेकरांबद्दल आस्था वाटणं आवश्यकच आहे असा त्यांचा (आग्रह नव्हे) सहजभाव, जी. ए. कुलकर्णी यांच्याबद्दल त्यांना असलेली ओढ, त्या ओढीची वा सहजभावी आस्थेची कारणं वेळोवेळी स्पष्ट करताना अनिरुद्ध कुलकर्णी यांचा दिसत जाणारा व्यासंग, म. वा. धोंड यांच्यासारख्या समीक्षकांबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळापूर्वक आदर.. असा पीळ  या ब्लॉगमधून दिसत जातो.
आता आणखी सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ : या ब्लॉगमध्ये सतत जाणवणारी, ब्लॉगलेखकाची विनोदबुद्धी!
ब्लॉग जरा विनोदी ढंगानं लिहिला की दिसली विनोदबुद्धी, असं असतं का?  
अनिरुद्ध कुलकर्णी यांचं लिखाण तर फक्त मुद्देच मांडणारं आहे. क्वचित त्यांच्या ब्लॉगवर व्यक्तिगत आठवणी निघतात त्या मुद्दा ‘स्वत:तून आलाय’ हे ठसवण्यापुरत्या. पण त्यांच्या ब्लॉगची लिंकच ‘सर्चिगफॉरलाफ’ अशी आहे आणि ब्लॉगच्या शीर्षकात ‘लूकिंग अ‍ॅट कार्टून्स, गेटिंग अलाँग’ असं म्हटलेलं आहे. ‘न्यूयॉर्कर’मधली जुनी व्यंगचित्रं, क्वचित आपल्या वसंत सरवटे यांची चित्रं, अशांच्या आधारे कार्टून्सकडे पाहण्याची संधी हा ब्लॉग वाचकाला देतो. राजकारण्यांवरली बूटफेक, पुण्यातला स्वाइन फ्लू, कुणीतरी कुठेतरी लिहिलेला लेख, कुणातरी महत्त्वाच्या साहित्यिकाचा जन्म/ मृत्यू दिन असं कोणतंही निमित्त या ब्लॉगच्या नोंदींना पुरतं. पण नोंदीची सुरुवात काहीही असली तरी बऱ्याचदा तिच्यातला मुद्दा माणूस आणि त्याचं आजचं जगणं समजून घ्यावं, या भूमिकेवर आधारलेला असल्याचं वाचकाला लक्षात येतं.
मराठी आणि इंग्रजी यांचं उत्तम वाचन, आकलन आणि त्यातून पुढे निर्माण झालेली मतं, असं हे ‘लोणी’ आहे.. हा ब्लॉग वाचलाच पाहिजे अशासाठी की, ब्लॉगलेखन तंत्राच्या नव्या शक्यता त्यातून लक्षात येतात. ‘नुकतंच कुणीतरी हे केलं’, ‘इतिहासात हा असं म्हणालाय’, ‘आता असं पाहा की (पुढे स्वत:चं मत किंवा थेट एखादं जुनं व्यंगचित्र)’ अशा टप्प्यांतून, अगदी उडय़ा मारत वाचकाला हे लिखाण वाचावं लागतं. उडी नेमकी एखाद्या विचारावरच पडत असल्यानं बरं वाटतं! कुसुमाग्रजांवरली नांेद ही अनिरुद्ध कुलकर्णी यांचे विचार किती मराठी आणि किती जागतिक आहेत, याचा एक उत्तम नमुना ठरेल.
जगाबद्दलचं आकलन आणि स्वत:ची मूल्यं हेच ब्लॉगलेखकाचं भांडवल ठरतं, हे लक्षात घेतल्यास हा ब्लॉग का महत्त्वाचा, हेही पटेल.
मुद्दा आकलनाचा आणि मूल्यांचा आहे.
लोण्यात चांगलं कोलेस्टेरॉल किती आणि वाईट किती, हे मोजलं नाही तरी लोणी चामट आहे की विरघळतंय, हे जिभेला कळतं. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी  इतक्या वर्षांत अनुभवलेल्या सांस्कृतिक आणि वैचारिक घुसळणीतून आलेलं हे लोणी विरघळणारं आहे.. याचं कारण, त्यात ‘किस्सेबाजी’, ‘सादरीकरण’, ‘स्व आणि स्वकीय यांचा उदोउदो’ असे हेतू नसून जग समजून घेण्यासाठी जगापुढे जाताना आपलं सांस्कृतिक गठुडं वेळोवेळी चाचपून पाहणं, एवढाच आहे.  या गठुडय़ात तुकाराम जसे आहेत, तशी न्यूयॉर्कर वा अन्य ठिकाणची आधुनिक नर्मविनोदी व्यंगचित्रंही आहेतच.
संस्कृती पुन्हा तपासून पाहणं, हा हेतू या ब्लॉगचा कसा काय, असा प्रश्न पडेल. इथं तर असलेली संस्कृतीच पुन्हा पुन्हा माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय, असं अल्ट्रा-बंडखोरांना वाटू शकेल. पण संस्कृतीनं धारण केलेल्या गोष्टींबद्दल प्रेम वा अनुभवजन्य ममत्व असणं आणि संस्कृती तपासून पाहण्याच्या हेतूनं आपल्या अनुभवांचाही निराळा अर्थ स्वीकारणं, असा मार्ग असू शकतो. उदाहरणार्थ, ‘अमर चित्रकथा’बद्दल अशाच एका निमित्तानं लिहिताना, ‘हे सत्यवती की शकुंतला की कुणाचंतरी चित्र पाहा’ म्हणून एक चित्र दाखवून पुढे हा लेखक म्हणतो : थँक्यू अमर चित्रकथा.. तुम्ही सस्त्या पोर्नपासून मला वाचवलंत!
का वाचवलं? कसं वाचवलं? कळलं नसेल तर अमर चित्रकथेतल्या वन-वासी शकुंतलेचं सदेह रूप आठवा किंवा पाहा..
नसेल कळलं तर सोडून द्या. लोणीसुद्धा पचायला जडच असतं काहींना. तसं असल्यास, बघूच नका हा ब्लॉग.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता : searchingforlaugh.blogspot.in
सूचना  वा  प्रतिक्रियांसाठी ईमेल :wachawe.netake@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा