‘आई-मुलांचे मासिक’ अशी एक ओळ ‘चांदोबा’ या मासिकाच्या अनुक्रमणिकेच्या पानावर असायची. पुढे ती गायब झाली. ‘येशीअँडमॉमी’ या नावाचा ब्लॉग हा ‘आई-मुलाचा ब्लॉग’ आहे. हे साम्य एवढय़ावर संपलं असतं तर बरं झालं असतं, पण आणखी एक साम्य आहे. चांदोबातल्या गोष्टी जशा नेहमीच्याच असूनही संस्कार करून जातात आणि असे संस्कार आपल्यावर ‘चांदोबा’नं केले होते (किंवा असलेले संस्कार अधिक घट्ट केले होते) हे न कळताच ‘चांदोबा’साठीचा हळवा कोपरा कायम असतो, तसं या ब्लॉगचं आहे. एका आईनं तिच्या मुलाबद्दल लिहिलेला ब्लॉग. त्याचं तिला आवडलेलं होमवर्क- जुन्या वह्या किंवा हस्तकलेच्या अभ्यासाचा भाग म्हणून केलेल्या वस्तू- फेकून देणं जिवावर येतंय म्हणून म्हणे हा ब्लॉग सुरू झाला (तसा उल्लेख आहेच, पण २०११ मधल्या काही नोंदींमध्ये थेट या मुलाचं होमवर्कच आहे आणि त्याच्या आईप्रमाणे ते वाचकालाही आवडू शकतं. होमवर्कच्या शिवाय आणखी काही इथं आहे. ताज्या नोंदी नोव्हेंबरात नाहीत, पण ऑक्टोबरच्या तिन्ही नोंदी बॉलीवूडशी संबंधित आहेत. हिंदी वा अन्य सिनेमांबद्दलच्या नोंदी इतरही आहेत, त्यातून सिनेमा हा आयुष्याचा एक घटक असल्याचं या आईनं मानलं आहे, हे लक्षात येतं. ‘(अमेरिकन वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमध्ये) सिनेमांची परीक्षणं खूप वाचली आहेत, परंतु मला काही सिनेमाबद्दल लिहिता येत नाही,’ अशी स्थिती या ब्लॉगरची झालेली आहे. तरीही प्रयत्न चालू आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’बद्दलची नोंद हे त्या चित्रपटाचं परीक्षण आहे, असं खुद्द लेखिकाही म्हणत नाही. न्यूयॉर्कचं त्या चित्रपटातलं दर्शन लेखिकेला पटलं नाही, म्हणून नोंद लिहिली गेली. अन्य चित्रपटविषयक नोंदींचा हेतू आठवणी किंवा आदर नोंदवणं, एवढाच आहे. या चित्रपटविषयक नोंदी म्हणजे ‘येशीअँडमॉमी’चं बलस्थान नक्कीच नव्हे. ‘स्व आणि स्वकीय’ हेच लेखिकेचं क्षेत्र आहे, त्यापैकी ‘स्व’ कशाकशाने प्रभावित होतो, याचा आलेख म्हणून फारतर अशा नोंदींकडे पाहता येईल आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितनं जो भारतात परतण्याचा निर्णय घेतला, त्यावरची नोंद यादृष्टीनं लक्षणीय ठरेल.
पुण्याला आईवडील, ठाण्याच्या वाडा तालुक्यात आजी आणि शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्य, अशी मुळं
हे असंच सगळं, ‘फेसबुकवर टाकणारे’ अनेक जण आज असतील. मुलाचं कौतुक व्हावं, असं कुणाला वाटणार नाही? कौतुक होतही असेल. पण ‘येशीअँडमॉमी’चं वैशिष्टय़ हे की, हा ब्लॉग कुणी वाचला पाहिजे, असं ब्लॉग लिहिणाऱ्या आईला वाटत नाही. मुलाच्या वर्गशिक्षिकेनं वाचला तरी पुरे, एवढंच वाटतं आहे. तसं तिनं एके ठिकाणी (२१ एप्रिल २०१२च्या नोंदीत) लिहिलंही आहे. या नोंदीवर, ब्लॉगच्या एकमेव वाचक (सबस्क्रायबर) आणि शिक्षिका पॉला मारा यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. पण एरवी या ब्लॉगला प्रतिक्रियाही नाहीत. ‘हा ब्लॉग नाहीतरी कुणीच वाचत नाही, म्हणून हे लिहितेय माझ्यापुरतं’ अशा इंग्रजी शब्दांतलं वाक्यच त्या नोंदीच्या सुरुवातीला आहे.
‘येशी’ कोण, याबद्दल वाचकाला कुतूहल वाटेलही, ते त्याचे भारतातले (गणपतीच्या दिवसांतले वगैरे) भरपूर फोटो पाहून शमेल, पण ब्लॉग महत्त्वाचा आहे, तो आईनं नकळत लिहिलेल्या पालकत्वाच्या अनुभवांसाठी. मुलाला तिनं एक गणित घातलं आणि ते त्याला आलं, अशी एक नोंद (२० मार्च २०१२) वाचण्यासारखी आहे. त्याच्या वयाच्या मुलांनी वाचू नये, अशी- धारुन रवीला समलिंगी रूममेटवर पाळत ठेवल्याबद्दल ६०० तास ‘समाजसेवे’ची शिक्षा, ही बातमी येशीनं पेपरात वाचलेली असते. तिची चर्चा नको, म्हणून ‘६०० तास म्हणजे किती दिवस? २४ नं नाही, नऊ ते पाच ही वेळ धरून कर गणित’ असं आव्हान आईनं त्याच्यापुढे ठेवलेलं असतं!
एरवी हा ब्लॉग म्हणजे मराठी ब्लॉगजगताचं वारं न लागलेलं एक अगदी सुट्टं पान आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा