‘अंगारे’ हा १९३२ साली उर्दूमध्ये प्रकाशित झालेला प्रातिनिधिक कथासंग्रह त्या काळी अतिशय चर्चेचा आणि वादग्रस्त ठरला होता. या संग्रहातले तरुण कथाकार जीवनातील विविध समस्यांना ज्या प्रकारे भिडले होते, तसे त्यापूर्वी उर्दू कथेमध्ये कुणीही केले नव्हते. धर्म आणि समाजातील विसंगतींवर या कथांमधून सणसणीत कोरडे ओढले गेले होते. त्यामुळे धर्माचे ठेकेदार आणि स्वयंघोषित संस्कृतिरक्षक यांची माथी भडकली. त्यांनी या संग्रहावर बंदी आणण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी ब्रिटिश सरकारकडे तक्रार-अर्ज करण्यात आले. इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधातल्या इंग्रजाळलेल्या नास्तिक तरुणांनी हे जाणीवपूर्वक केलेले कटकारस्थान आहे, हा इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा अपप्रचार केला जाऊ लागला. शेवटी ब्रिटिश सरकारने १९३३ मध्ये या कथासंग्रहावर बंदी आणली. पण या संग्रहातील निर्भीडता, आविष्काराचा मनमोकळेपणा यावर बंदी घालणं कुणालाच शक्य नव्हतं. या संग्रहात सज्जमद ज़्‍ाहीर यांच्या पाच, अहमद अली यांच्या दोन, रशीद जहाँ यांच्या दोन आणि महमुदुज्ज़्‍ाफर यांच्या एक अशा एकंदर दहा कथांचा समावेश आहे. या संग्रहाने उर्दू कथेमध्ये नवे वळण आणले. त्यातून उर्दू कथेच्या नव्या परंपरेचा जन्म झाला. पुढे सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई यांनी ही परंपरा चालवली. या संग्रहामुळे जशी उर्दू कथेमध्ये नवी परंपरा सुरू झाली, तशी प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोशिएशनची स्थापनाही याच प्रेरणेतून झाली. या संस्थेचे इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो, प्रेमचंद, फ़ैज अहमद फ़ैज हे स्टॉलवर्ट सदस्य होते. आज या कथा तेवढय़ाशा स्फोटक वाटत नाहीत. पण त्यांचं महत्त्व केवळ ऐतिहासिक आणि नवी परंपरा सुरू करणाऱ्या कथा एवढय़ापुरतंच मर्यादित नाही, तर आविष्कार स्वातंत्र्याच्या आणि लेखकानं व्यवस्थेच्या दारावर कशा टाचा घासायला हव्यात, याचंही हा संग्रह उत्तम उदाहरण आहे. म्हणून या कथा साहित्याच्या इतिहासाच्या संदर्भात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उच्चाराच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. पण या संग्रहाचं परत उर्दूमध्ये पुनर्मुद्रण केलं नाही आणि या कथांचा हिंदी अनुवाद  तब्बल ६० वर्षांनी म्हणजे १९९० मध्ये प्रकाशित झाला; तर तब्बल ८२ वर्षांनंतर पुढील महिन्यात त्याचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित होत आहे. हिंदी अनुवादामध्ये मूळ वादाची माहिती देणारं स्वतंत्र परिशिष्ट जोडलं होतं. इंग्रजी अनुवाद व संपादन स्नेहल सिंघवी यांनी केला असून तो ‘अंगारे’ याच नावानं प्रकाशित होत आहे. हा संग्रह जरूर वाचावा असा आहे.