वेंडी डोनिजर यांच्या ‘द हिंदूज – अ‍ॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाविरोधात ‘शिक्षा बचाव आंदोलन’ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेने केलेल्या न्यायालयीन दाव्यामुळे संबंधित पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विनने या पुस्तकाच्या सर्व प्रती बाजारातून काढून घेण्याचे आणि शिल्लक प्रती नष्ट करून टाकण्याचे मान्य केले. या निर्णयावर मागील दोन आठवडय़ांत भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही तीव्र म्हणावे असे पडसाद उमटत आहेत. अनेक लेखकांनी या घटनेचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर खुद्द पेंग्विनचे लेखक असलेल्या आणि सार्वजनिक जीवनात एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुंधती रॉय आणि रामचंद्र गुहा यांनी या निर्णयाविषयी तीव्र नापसंती व्यक्त करणारे लेख लिहून या प्रकाशनसंस्थेने वरच्या न्यायालयात जायला हवे होते, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. निषेध वा नापसंती व्यक्त करणाऱ्या बहुतेक लेखकांना पेंग्विनचा निर्णय फारसा पसंत पडला नाही. त्यांच्या मते पेंग्विनने वरच्या न्यायालयात दाद मागायला हवी होती. विशेष म्हणजे नुकतेच ज्योर्तिमय शर्मा आणि सिद्धार्थ वरदराजन या पेंग्विनच्या दोन नामवंत लेखकांनी (यातील वरदराजन हे ‘हिंदू’चे माजी संपादक आहेत.) या निर्णयाचा निषेध म्हणून पेंग्विनने आपलीही पुस्तके बाजारातून काढून घ्यावीत असे पत्र लिहून कळवले आहे. तर आधी भारतीय कायद्याला खलनायक म्हणणाऱ्या वेंडी यांनी ५ मार्चच्या ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये ‘बॅन्ड इन बंगलोर’ असा लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी या पुस्तकासंदर्भात घेतल्या जाणाऱ्या दोन आक्षेपांना अतिशय समर्पक उत्तरं दिली आहेत. पहिला म्हणजे हे पुस्तक ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या उत्साहाने लिहिले आहे. दुसरा, हिंदूधर्मातील लैंगिकता रंगवली आहे. त्यावर वेंडी म्हणतात, मी ख्रिस्ती नाही, ज्यू आहे.. माझे पुस्तक धर्माबद्दल आहे लैंगिकतेबद्दल नाही. १९६० पासून हिंदू संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास करणाऱ्या वेंडी या ख्यातनाम अभ्यासक मानल्या जातात. त्यांच्या या पुस्तकाचे संदर्भ आजवर अनेक अभ्यासकांनी आपल्या लेखनात दिले आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. त्या म्हणतात, प्रकाशकाकडे फारच थोडय़ा प्रती शिल्लक होत्या. आणि ज्या प्रती दुकानांमध्ये उपलब्ध होत्या, त्या या निर्णयानंतर लगेच विकल्या गेल्या. हे पुस्तक ई-बुक स्वरूपात इंटरनेट विनामूल्य उपलब्ध आहे. आणि आजच्या इंटरनेटच्या जमान्यात कुठल्याही पुस्तकावर खऱ्या अर्थाने बंदी कोण आणू शकणार!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा