वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न करून इंग्लंडला गेलेली आणि संसार-मुलं यामध्ये रमलेली एखादी व्यक्ती कधीकाळी केवढं धाडस करू शकते, याचं हे पुस्तक एक उदाहरण आहे. यास्मीन रफी ही ती व्यक्ती. यास्मीन सामान्य गृहिणी, तरी चित्रपट पाहणं आणि गाणी ऐकणं हा त्यांचा ध्यास होता. बरं, जुनी हिंदी गाणी ऐकणाऱ्याची लता-रफी या जोडगोळीपासून सुटका नसते. असे हे रफी यास्मीन यांचे सासरे.  यास्मीन मामंजींना ‘अब्बा’च म्हणत.  अब्बांच्या गाण्यांनी नेहमीच भुरळ घातली. घरकाम करताना, मुलांचं कौडकौतुक करताना त्यांना पाश्र्वभूमीला अब्बांचा आवाज हवाच असायचा. रफी यांचं त्यांच्या आयुष्यातलं हे स्थान किती उत्कट आणि नादमय आहे, याची गुणगुण या चरित्रातून ऐकायला मिळते. रफी हे भारताचे नवे तानसेन आहेत, असं एकदा विख्यात संगीतकार नौशाद यांनी म्हटलं होतं. रफी यांनी त्यांच्या काळातील एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ओ. पी. नय्यर अशा अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. प्रेमगीतं, युगुलगीतं, कव्वाली, गज़्‍ाल, भजन, असे सर्व प्रकारांत त्यांनी गाणी गायली. त्यांना जाऊन आता तीस-बत्तीस र्वष झाली. आता इतक्या वर्षांनंतर यास्मीन या त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे.. तेही अपरिचित -घरगुती पैलूंवर भर देणारं! त्यांनी रफींचं एक व्यक्ती म्हणून रेखाटलेलं चित्र त्यांच्या आवाजासारखंच लोभस आहे. हे पुस्तक मूळ उर्दू- हिंदीत लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकासोबतच त्याचं इंग्रजी रूपांतरही प्रसिद्ध झालं. चरित्रलेखनाच्या फुटपट्टय़ा न लावता, केवळ आठवणी म्हणून हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला तर रफींच्या सुरासारखी लय साधता येईल. कारण रफ़ी.. नामही काफ़ी हैं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा