महाराष्ट्रात राजकारणाच्या यशाचा मार्ग सहकारी साखर कारखान्यातून जातो, तर देशाचा विविध संस्था वा राजकीय वारशातून. पण जगातल्या अनेक देशांचा ‘राज’मार्ग फुटबॉलच्या मैदानातून जातो. त्याचे आणि फुटबॉल जगतातले अनेक सुरस आणि चमत्कारिक किस्से असलेलं हे पुस्तक जागतिक राजकारण जाणून घेणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
‘यू विल बी निअरर टू गॉड बाय प्लेइंग फुटबॉल दॅन रीडिंग भगवद्गीता.’ – स्वामी विवेकानंद.
खेळातलं राजकारण हा विषय भारतीय वाचकांना नवीन नाही. परंतु बहुतांशी राजकारण हे त्या खेळापुरतं व आनुषंगिक लाभासाठी असतं. क्रिकेटच्या विविध समित्यांवर राजकारणी स्वत:ची वर्णी लावण्यासाठी किती उत्सुक असतात, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु एखादा खेळ संपूर्ण समाजावर व राजकारणावर कसा प्रभाव पाडू शकतो, हे आपल्याकडे पाहायला मिळत नाही. अपवाद फक्त अलीकडे सचिन तेंडुलकरला दिलं गेलेलं ‘भारतरत्न’ व त्यानंतरचा वाद. पण अशा घटना बऱ्याचदा तात्कालिक स्वरूपाच्याच असतात.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ. त्यामुळे जगातल्या अनेक देशांचं राजकारण या फुटबॉलच्या मैदानातून जातं. राजकारणात संधी मिळण्यासाठी फुटबॉल क्लबचा कसकसा वापर केला जातो, त्याचा समाजावर काय परिणाम होतो आणि यातून एका वेगळ्याच प्रकारचं जग कसं समोर येतं, हा एक रहस्यमय कादंबरीसारखा विस्मयचकित करणारा विषय आहे. अमेरिकेत फुटबॉलचं फार प्रस्थ नाही, तरीसुद्धा फ्रँकलिन फोर या अमेरिकन पत्रकारानं जगभर फिरून लिहिलेलं ‘हाऊ फुटबॉल एक्सप्लेन्स द वर्ल्ड?’ हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय आहे. यासाठी त्याने फुटबॉल जगतातील सर्व स्टेडियम तर पालथी घातली आहेत, तसेच या खेळाच्या माध्यमातून देशोदेशींच्या राजकारणाचा पट कसा घडत व उलगडत गेला याचीही अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. यासाठी पुस्तकात अनेक दाखले वाचायला मिळतात.
पुस्तकात एकंदर दहा प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण नव्वदच्या दशकामध्ये झालेल्या बाल्कन युद्धात फुटबॉलचा व फुटबॉलच्या चाहत्यांचा युद्धमाफियांकडून कसा वापर करण्यात आला याविषयी आहे. आर्कान हा सर्बियामधील क्लबचा समर्थक. त्याच्या समर्थकांचा वापर सर्बिया-बोस्निया-क्रोशिया यांच्यात जी युद्धं झाली त्यांमध्ये करण्यात आला. त्यांना बाल्कन युद्ध म्हटलं जातं.
फुटबॉल वर्ल्डकपला कितीही महत्त्व असलं तरी क्लब पातळीवरचा फुटबॉल हाच चाहत्यांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं अस्मितेचा विषय असतो. या पुस्तकातील सर्व प्रकरणं ही क्लब फुटबॉलविषयीच आहेत. त्यांचा वापर धूर्त राजकारणी व माफिया आपल्या फायद्यासाठी करून घेतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे फुटबॉल सामन्यांच्या वेळी जमणारा हजारोंच्या संख्येतील जमाव.
इटली याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्विओ बर्लुस्कोनी त्यांच्या शौकीन जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा राजकारणातील प्रवेश इटली व युरोपमधील बलाढय़ क्लब ए.सी. मिलान या क्लबमार्फत झाला. अवघड परिस्थितीत असलेल्या या क्लबला बर्लुस्कोनी यांनी जगभरातील मोठे खेळाडू मिळवत पुन्हा वैभव मिळवून दिलं व चाहत्यांचा विश्वास संपादन केला. राजकारणात पाय रोवण्यासाठी त्यांना याचा अर्थातच फायदा मिळत गेला. अजूनही ते क्लबच्या अध्यक्षपदी आहेत आणि त्यांचं क्लबच्या कामकाजात पूर्ण लक्ष असतं. याविषयीचा एक किस्सा गमतीशीर आहे. बर्लुस्कोनी  इस्रायलच्या दौऱ्यावर असताना इस्रायलचे पंतप्रधान शेरॉन यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मध्यपूर्व शांततेऐवजी डेव्हिड बेकहॅम व त्यांच्या क्लबविषयीच बोलणं पसंत केलं.
एका प्रकरणात इंग्रजांचं विचित्र आणि काहीसं हिंस्र प्रेम वाचायला मिळतं. आठवडाभर डॉक्टर, वकील म्हणून काम करणारे ब्रिटिश जंटलमन वीकेंडला फुटबॉल सामन्यांच्या निमित्तानं आपल्या हिंसक प्रवृत्तीचं दर्शन घडवतात. सामन्याच्या वेळी होणाऱ्या या हिंसाचाराला Hooliganism असं म्हटलं जातं. इंग्लंड, आर्यलडमध्ये हा हिंसाचार करणाऱ्या गुंडांची आत्मचरित्रं व त्यांनी केलेल्या हाणामाऱ्यांविषयीचं लेखन हा बेस्टसेलर साहित्य प्रकार आहे. क्लब्स बऱ्याच वेळा या टोळ्यांना उघड पाठिंबा देतात. आपल्या खेळाडूंना उत्साहित करण्यासाठी या टोळ्यांची वेगवेगळी गाणी व घोषणा असतात. त्यातून अत्यंत खालच्या दर्जाची वांशिक व धार्मिक टीका केली जाते. याचं एक उदाहरण म्हणजे स्कॉटलंडमधील सेल्टिक व रेंजर्स या क्लबमधील सामना. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या क्लब्सना धार्मिक रंग आहे. सेल्टिक हा कॅथलिक तर रेंजर्स हा प्रोटेस्टंट पंथाचा क्लब म्हणून ओळखला जातो. सामन्यांच्या वेळी एकमेकांच्या पंथांना नावं ठेवणारी गाणी दोन्ही गटांकडून म्हटली जातात. फुटबॉलमधील जागतिकीकरणाचा प्रभाव म्हणून दोन्ही क्लब्स जगभरातून विविध पंथांचे व धर्माचे खेळाडू विकत घेतात. परंतु त्यांचे चाहते प्रोत्साहनपर धर्मद्वेष पसरवणारी जुनीच गाणी म्हणतात. त्यामुळे प्रोटेस्टंट रेंजर्सकडून खेळणारा कॅथलिक खेळाडू- तोसुद्धा व्हॅटिकन सिटीमधला इटालियन- गोल मारल्याच्या जोशात चाहत्यांच्या कॅथलिक पंथाला व पोपला अर्वाच्य शिव्या देणाऱ्या गाण्यांवर नाचतो.
ब्राझील हे तर फुटबॉलवेडय़ांची गंगोत्रीच. तेथील मिरांडा हा एका क्लबशी संबंधित होता. त्याने मोठे आणि नामांकित खेळाडू आपल्या क्लबमध्ये आणून चांगलीच लोकप्रियता मिळवली. या जोरावर तो पुढे देशाच्या राजकारणात प्रभावी ठरला.
टोटेनहॅम नावाचा इंग्लंडमध्ये एक फुटबॉल क्लब आहे. हा पूर्वी ज्युईश लोकांचा क्लब होता. पण त्यातील सगळे खेळाडू काही ज्युईश होते असं नाही. पण या खेळाडूंना आणि त्यांच्या समर्थकांना ‘यीड’ (YIDD) या नावानं चिडवलं जाई. आणि हिटलर तुम्हाला अमुक-तमुक करेल अशी गाणीही म्हटली जात. ‘यीड’चा बोलीभाषेतला अर्थ ‘ज्यू माणूस’ असा आहे. परिणामी इंग्लंडच्या संसदेनं या शब्दावर गेल्या वर्षी बंदी घातली.
इराणमधील स्त्रियांमध्ये असलेल्या फुटबॉलच्या लोकप्रियतेविषयी एक प्रकरण आहे. त्यातून कडव्या धार्मिक राष्ट्रांमधील स्त्रियांच्या स्थितीवर चांगला प्रकाश पडतो. इराणमधील महिलांमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. पण त्यांना हे सामने स्टेडियममध्ये बसून पाहणं तर सोडाच, पण घरात पाहायलाही परवानगी नव्हती. आयातुल्ला खोमेनी यांनी सत्तेत आल्यावर स्त्रियांना घरामध्ये फुटबॉल सामने पाहायला परवानगी दिली. (फुटबॉलचे सामने पाहायला बऱ्याच स्त्रिया पुरुषांच्या वेशात जातात. यावर ‘ऑफसाइड’ नावाचा एक चित्रपटही आहे.)
असे अनेक सुरस, चमत्कारिक आणि अगतिक किस्से या पुस्तकात वाचायला मिळतात. ‘आफ्रिकन खेळाडूंचा रशियामधील थंडीशी व वंशद्वेषाशी सामना’, हे प्रकरण चाहत्यांच्या फुटबॉलप्रेमाविषयी बरंच काही सांगून जातं.
भारताला २०२० साली होणाऱ्या १७ वर्षे वयाखालील फुटबॉल वर्ल्डकपचं यजमानपद मिळालं आहे. वेंकिज ग्रुपचे बालाजी राव या पुणेकर उद्योजकांनी चार वर्षांपूर्वी इंग्लंडमधला ‘ब्लॅकबर्न रोव्हर्स’ हा मोठा क्लब विकत घेतला आहे.       न्या. गांगुली सध्या लैंगिक आरोपामुळे चर्चेत आहेत त्यामागे मोहन बगान हा भारतातील फुटबॉल क्लब आहे, असं मानलं जात आहे. न्या. गांगुली यांनी काही वर्षांपूर्वी मोहन बगानच्या विरोधात एक निर्णय दिला होता. त्यामुळे बगानच्या मॅनेजमेंटने संबंधित पीडित मुलीला मॅनेज करून गांगुलींच्या विरोधात बनाव केला, असा गांगुली यांच्यावतीने अलीकडेच न्यायालयात दावा करण्यात आला आहे. असो. हे थोडं विषयांतर झालं.   
थोडक्यात काय तर हे पुस्तक फुटबॉलविषयी असलं तरी ते केवळ फुटबॉल चाहत्यांसाठी नाही. जागतिक इतिहास, जागतिकीकरण व सामाजिक विषयांमध्ये रस असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे पुस्तक खिळवून ठेवतं. त्यामुळे ललितेतर पुस्तकांचं वाचन करणाऱ्या कुठल्याही वाचकाला हे पुस्तक आवडेल असं आहे.
हाऊ फुटबॉल एक्सप्लेन्स द वर्ल्ड :
फ्रँकलिन फोर,
प्रकाशक : रँडम हाऊस इंडिया, नवी दिल्ली,
पाने : २७२, किंमत : ५२५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा