इंग्रजी प्रसारमाध्यमांनी या पुस्तकाचं कौतुकच केलं; पण ‘चांगलं’ असूनही हे पुस्तक कुठे फसतं, याबद्दल खरंखुरं कोणीतरी सांगण्याची गरज आहे.. हे परीक्षण त्याचसाठी!
एखादा नामवंत गवय्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत बऱ्याच दिवसांनी गाणार म्हणून कानसेनांनी गर्दी करावी, आणि या गायकाने झिंजोटी किंवा दुर्गासारखे राग सादर करताना मध्येच, ‘हीच हरकत एका जिंगलमध्येही आहे, कशी ती पाहा.. ’ किंवा ‘हाच राग रहमाननं एका गाण्यात कसा वापरलाय ऐका माझ्याकडून..’ असे प्रकार केले तर? तर श्रोत्यांचे जे काही होईल, तेच दिलीप डिसूझा यांच्या ‘फायनल टेस्ट : एग्झिट सचिन तेंडुलकर’ या पुस्तकाच्या वाचकांचे होऊ शकते! पण म्हणून, तो गायक तेवढय़ाने लहान ठरत नाही.. फक्त व्याख्यानात सांगण्याची माहिती गायकाने मैफलीत का मांडावी, हा श्रोत्यांचा सवाल असतो. हेच दिलीप डिसूझा यांच्या पुस्तकाचेही असेच!
लेखकाने पुस्तकासाठी उत्तम विषय निवडला आहे, ज्याबद्दल साऱ्यांनाच वाचायला आवडेल. पण माझ्याकडे किती अगाध ज्ञान आहे हे दाखवण्यातच डिसूझा यांनी धन्यता मानली असल्यामुळे सचिनचा अखेरचा सामना हा कुठेतरी झाकोळला गेला आहे. लेखक क्रिकेटमध्ये नक्कीच मुरलेला आहे, हे त्यांनी सांगितलेल्या दाखल्यांवरून नक्कीच समजते. त्यांच्याकडे उत्तम माहिती आहे, पण ती मांडण्याची ही जागा नक्कीच नाही, हे त्यांनी पुस्तक लिहिण्यापूर्वी ठरवायला हवे होते.
सचिनचा अखेरचा सामना हा क्रिकेट विश्वासाठी पर्वणीच होता. त्यामुळे मुखपृष्ठ वाचल्यावर कुणीही या पुस्तकाकडे आकर्षित होईल (‘पाहिल्यावर’ नव्हे, कारण मुखपृष्ठ काही खास मेहनत घेऊन केल्याचे जाणवत नाही). विषयही पुस्तक वाचायला भाग पाडू शकतो. म्हणून उत्कंठेने तुम्ही वाचू लागता.
‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या साप्ताहिकाने अपवादात्मक बाब म्हणून सचिनचा अखेरचा कसोटी सामना कसा होता, याचाही वृत्तान्त देण्याचे ठरवले आणि ते काम डिसूझा यांच्याकडे आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून पत्रकारांसाठीचे प्रवेशपत्र न मिळाल्याने कशी काळाबाजारातून तिकिटे घ्यावी लागली, हे सांगण्यासाठी त्यांनी काही पाने खर्च केली आहेत. त्यानंतर सामन्यापूर्वी झालेला सोहळा त्यांनी जसाच्या तसा रंगवण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये त्यांनी समालोचक रवी शास्त्री कसा काळा कोट घालून अवतरला आणि त्याने अश्विनशी कसा संवाद साधला, याचेही (नको इतके) वर्णन आहे. सचिनची छबी असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण त्या वेळी झाले होते, याही गोष्टीचा त्यांनी कीस काढला आहे. या साऱ्या वर्णनांतून त्यांना असे सुचवायचे आहे की, हा केवळ कसोटी सामना नसून सचिनचा निवृत्तिसोहळा होता! पण हेच खेळाबद्दल बोलूनही स्पष्ट करता आले असते, ती संधी त्यांनी गमावली.. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून वानखेडेसारख्या मैदानावर पहिली गोलंदाजी का स्वीकारली, हे त्यांनी मांडले नाही. कारण धोनीने जर फलंदाजी स्वीकारली असती, तर भारतीय संघासहित सचिनला दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती, पण यावर कोणताच प्रकाशझोत त्यांनी टाकलेला नाही.
पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव का, यावरील चिंतनात तीन पाने खर्च गेली आहेत. हे सांगताना ते मध्येच सामन्यात शिरतात आणि नकळतपणे शैलीचा गुंगारा देत पुन्हा भरकटतात. डॅरेन ब्राव्हो हा ड्वेन ब्राव्होचा भाऊ आहे, हे सांगताना ड्वेनची माहिती, किंवा आर. अश्विन गोलंदाजीला आल्यावर भारताच्या साऱ्या फिरकीपटूंची यादी लेखक मांडत जातो, ती काही काळ वाचावीशी वाटतेही, पण हा डोस अती होतो. त्यानंतर स्टेडियममध्ये ‘मॅक्सिकन वेव्ह’ सुरू झाल्यावर या प्रेक्षकीय लाटांचा इतिहासही लेखकाने मांडला आहे. हे सारे वाचनीय आहे; पण त्यासाठी त्यांनी पुस्तकाचा हा विषय निवडायला नको होता. पुस्तकाचा विषय ‘सचिनची अखेरची कसोटी’ हा असूनही त्याबद्दल थेट चर्चा इथे नाही.
उपाहाराच्या वेळी खेळाडू काय करत असतील हे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न तोकडा वाटतो. खेळाडूंच्या उपाहाराबाबत सांगताना मी फक्त सामोसे खाल्ले आणि मला मनाप्रमाणे शीतपेय कसे मिळाले नाही, हेदेखील लेखक सांगतो. पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात त्यांनी उपाहारानंतरचा खेळ मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याची सुरुवात त्यांना आशीष नेहराच्या २००३ मधील विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने का करावीशी वाटली, हे अनाकलनीय आहे. वेस्ट इंडिजच्या संघातील मार्लोन सॅम्युअल्सबद्दल बोलताना लेखक थेट कार्ल हुपर आणि रिचर्ड्सपर्यंत जाऊन पोहोचतो. शिवनारायण चंदरपॉलचा हा दीडशेवा कसोटी सामना होता, त्यामुळे लेखक त्याच्याही प्रेमात पडलेला दिसतो. चंदरपॉल कधी, कुठे, कसं खेळला या वर्णनांना सुरुवात होते आणि सामना हा मूळ विषय पुन्हा एकदा हरवतो. लेखकाने वेस्ट इंडिजचा डाव चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. अशा अनेक गोष्टींमधून लेखक किती हुशार, अनुभवी आहे हे नक्कीच समजते. पण विषयाला थेट हात घालत त्यांनी जर अन्य दाखले किंवा माहिती दिली नसती तर हे पुस्तक अधिक वाचनीय झाले असते. मध्येच बीसीसीआयची आयपीएल स्पर्धा, बंडखोर ठरलेली आयसीएल स्पर्धा याबाबत लेखक आपली मते मांडत जातो आणि पान पुढे करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही.
भारताचा सलामीवीर शिखर धवनचा उल्लेख करताना ते थेट सुनील गावस्कर यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. धोनीने चेतेश्वर पुजाराला चांगले स्थान दिले हे सांगत असताना धोनीने भारताला विश्वचषक कसा जिंकवून दिला, तो आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही कर्णधार आहे, अशी नको असलेली माहिती, जी क्रिकेटप्रेमींना ज्ञातच असणार, तीदेखील देतो.
पुस्तकाचा मूळ गाभा म्हणजे अखेरच्या सामन्यातली सचिनची फलंदाजी याकडे जेव्हा लेखक आपल्याला नेतो, तेव्हा त्याच्या अनुभवाची जाणीव आपल्याला झालेली असते, त्यामुळे सचिनविषयी लेखक आपल्याला आता काय सांगेल, याची उत्सुकता आपल्याला लागून राहते, पण अपेक्षाभंगाशिवाय अन्य काहीही पदरी पडत नाही. जेवढा लेखक अन्य खेळाडूंच्या बाबतीत लिहितो आणि दाखले देतो, तेवढे तो सचिनच्या बाबतीत देताना दिसत नाही.
स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याची मजाच वेगळी असते, तो आनंद लेखकाने अनुभवला असला तरी तो मांडताना हातचे काहीतरी राखून मांडल्यासारखा वाटतो. कारण ते वातावरण जसे अंगावर येते, तसे ते वाचताना येत नाही. व्याख्यानासाठी एक विषय ठरलेला असावा आणि त्यावर अधिक भाष्य न करता अन्य विषयांवर भाष्य करावे, असे काहीसे लेखकाचे झालेले आहे. पुस्तकाची मांडणी साधी आहे. पुस्तकामध्ये वापरलेली काही छायाचित्रे चांगली आहेत, पण त्यांना योग्य न्याय मिळालेला दिसत नाही. लेखकाला मुळात विषयावर लक्ष केंद्रित करता आलेले नाही आणि तिथेच हे पुस्तक भरकटते आणि फसते. जेव्हा काय लिहू नये हे समजते तेव्हाच जे लिहायचे असते तेच आपण लिहितो, पण तसे या पुस्तकाबाबत निश्चितच म्हणता येणार नाही. या पुस्तकामध्ये जे नसायला हवे होते त्याचा भरणा अधिक वाटतो आणि पुस्तकाचा मूळ विषय बाजूला राहतो. लेखकाने जर विषयावर लक्ष केंद्रित करत लिखाण केले असते तर ते अधिक प्रभावी ठरले असते. कारण आवडत्या विषयांच्या पुस्तकाची नशा अशी असते की एकदा हातात घेतले तर ते लवकर ठेवले जात नाही. पण या पुस्तकाचे मात्र तसे होत नाही. लेखकाकडे क्रिकेटचे ज्ञानभंडार आहे, पण ते विषयाला अनुसरून त्यांनी मांडले असते तर वाचण्यात नक्कीच रस राहिला असता, पण लेखक काही पानांनंतर सातत्याने आपला भ्रमनिरासच करतो. एकंदरीत तुम्हाला क्रिकेटबद्दल माहिती हवी असेल तर पुस्तक वाचू शकता, पण सचिनचा शेवटचा सामना कसा रंगला हे वाचायचे असल्यास या पुस्तकातून तुम्हाला फार काही मिळणार नाही. .. कारण तुम्ही भारतीय क्रिकेटप्रेमी आहात. शैली वा अवांतर माहितीपेक्षा, तुम्हाला खेळाबद्दल जास्त बोलायचे आहे!
‘फायनल टेस्ट : एग्झिट सचिन तेंडुलकर’
– दिलीप डिसूझा
रँडम हाउस इंडिया
पृष्ठे : २८८; किंमत : २९९ रुपये
*वानखेडे स्टेडियमवरील अखेरच्या कसोटीत बाद झाल्यानंतरच्या सचिनचे छायाचित्र नीरज प्रियदर्शी यांचे, एक्स्प्रेस छायाचित्र संग्रहातून.