‘सॅव्हेज हार्वेस्ट’मध्ये फाळणीचं अचूक प्रतिबिंब आहे. फाळणी म्हटलं की अपरिमित आणि अतोनात हिंसाचार आठवत असला तरी अहिंसेचं महत्त्वही फाळणीनंच पटवून दिलं. रक्तरंजित आणि द्वेष पसरवणाऱ्या फाळणीच्या आठवणींत अनेक प्रेमाच्या, आपुलकीच्या, मत्रीच्या, शेजारधर्माच्या गोष्टीही दडलेल्या आहेत.

इसी सरहद पे कल डुबा था सुरज होके दो तुकडम्े
इसी सरहद पे कल जख्म्मी हुयी थी
सुबह-ए-आझादी
ये सरहद खुन की, अश्कों की, आहों की,
शरारों की
जहाँ बोयीं थी नफरत और तलवारे उगायी थी।
स्वातंत्र्यासोबतच आलेल्या फाळणीचे वर्णन करणाऱ्या ख्यातनाम उर्दू कवी अली अहमद ज़ाफरी यांच्या कवितेच्या या ओळी. अवघ्या जगाच्या इतिहासातील िहसक अध्याय बनलेल्या भारताच्या फाळणीला ६६ वष्रे उलटली असली तरी तिच्या जखमा आणि वेदना अजूनही ताज्या आहेत. राजकीय नेत्यांनी आणि ब्रिटिशांनी आपल्या विवेकबुद्धीने नकाशावर आखलेल्या एका रेषेने रक्ताच्या असंख्य चिळकांडय़ा उडवल्या. धर्माच्या आधारावर केल्या गेलेल्या या विभाजनाने भारत आणि पाकिस्तानमधील हजारो निष्पापांचे बळी घेतले तर लाखो कुटुंबांना वाऱ्यावर सोडले. या फाळणीच्या असंख्य संहारक, रक्तरंजित, हृदयद्रावक आणि भयप्रद आठवणी पुढे वेगवेगळ्या माध्यमांतून उघड झाल्या. साहित्यविश्वही याला अपवाद नव्हते. कथा, कादंबऱ्या, कविता, लेख अशा या ना त्या प्रकारे फाळणीतील त्या रक्तपाताचे प्रतििबब साहित्यातून उमटत आले आहे. मात्र, प्रत्येक वेळी या विषयावरील नवे साहित्य वाचताना अंगावर काटा उभा राहतो आणि आपले रक्तही सळसळून उठते.
ख्यातनाम पंजाबी साहित्यिक मोिहदरसिंग सरना यांचे ‘सॅव्हेज हार्वेस्ट’ वाचतानाही हाच अनुभव येतो. सरना यांनी पंजाबीमध्ये लिहिल्या गेलेल्या ३० लघुकथांचा इंग्रजी अनुवाद असलेले हे पुस्तक.
फाळणीमुळे विस्थापित झालेल्या लाखो लोकांप्रमाणेच सरना यांनाही रावळिपडी सोडून दिल्लीत आश्रय घ्यावा लागला. रावळिपडी ते दिल्ली या प्रवासात त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या, ऐकलेल्या रक्तरंजित आठवणींचे प्रतििबब ‘सॅव्हेज हार्वेस्ट’मधील कथांमधून उमटले आहे. सरना यांच्या कथांमधील पात्रे काल्पनिक आहेत; पण ती पात्रे ज्या परिस्थितीतून गेली ती परिस्थिती वास्तवदर्शी आहे. त्या पात्रांनी जे भोगलं, अनुभवलं ते सत्यच वाटतं. याचं कारण सरना यांच्याच शब्दांत सांगायचं तर.. ‘‘त्या भीषण प्रवाहातून मीही विनासंरक्षण वाहून आलो. त्या भयानक िहसाचाराचा, कट्टरवादाचा आणि नृशंस कृत्याचा मीही साक्षीदार होतो. त्या कृत्यांनी माझ्या शरीरापेक्षा माझ्या मनावर अधिक आघात केला. माणुसकी आणि जीवनावरील माझा विश्वास उडाला आणि माझे आदर्श विचार लोप पावले..’’
फाळणीदरम्यानच्या दाहक अनुभवांचे चित्रण करणाऱ्या या लघुकथा अंगावर शहारे आणतात, पण त्यात ‘इतिहासा’सारखा कोरडेपणा अजिबात नसून भावनांची ओलसुद्धा आहे. दिना नावाच्या मुस्लीम लोहाराची ‘सॅव्हेज हार्वेस्ट’ ही पहिलीच कथा मनाला भिडणारी आहे. व्यवसायाने लोहार असला तरी दिनाचे मन शेतीत अधिक रमते. मात्र, १९४७च्या सुगीच्या दिवसात त्याला वेगळ्याच ‘कापणी’चा हंगाम पाहायला मिळतो. त्याची आडदांगट आणि माथेफिरू मुले गावातील िहदूंना मारण्यासाठी कुऱ्हाडी बनवण्यासाठी त्याला बळजबरीने भाग पाडतात. मुलांकडून मारला जाण्याच्या भीतीने दिना दिवसरात्र भट्टीत लोखंड ठोकून कुऱ्हाडी बनवतो. पण त्याने बनवलेल्या कुऱ्हाडी अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे सांगत त्याला बोल लावणारी त्याची पत्नी, बहिरी आणि आजारी असल्यामुळे बाहेरच्या जगात काय चाललं आहे, याची अजिबात कल्पना नसलेली त्याच्या शेजारची िहदू म्हातारी, त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्याच मुलांनी म्हातारीच्या नातीवर बलात्कार करून तिची केलेली हत्या यांमुळे त्याच्या अंतर्मनातील अग्नी भट्टीपेक्षाही अधिक तीव्रपणे पेटून उठतो. दिनाच्या या अंतर्मनातील संघर्षांचे मनाला भिडणारे चित्रण ‘सॅव्हेज हार्वेस्ट’मधून होते.
या पुस्तकातील अन्य कथाही हृदयस्पर्शी आहेत. मुस्लीम दंगेखोरांपासून आपल्या गावातील लोकांना वाचवण्यासाठी झटणाऱ्या गावचा प्रमुख चौधरी खुदाबक्श वरैच याचे प्रयत्न अपुरे पडतात आणि त्याचं गजबजलेलं गाव स्मशानभूमी बनतं. तरीही म्हातारा खुदाबक्श जिद्द सोडत नाही. गावात जो कोणी असेल त्याला सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी तो धावाधाव करतो. पण पिसाटलेल्या दंगेखोरांसमोर त्या म्हाताऱ्यावरही हल्ला होतो. खुदाबक्शच्या हतबलतेची कथा ‘अ व्हिलेज कॉल्ड लद्देवाला वरैच’मध्ये चितारण्यात आली आहे. या पुस्तकातील ‘बसंत द फूल’, ‘द बुचर’, ‘द क्रिमझन टोंगा’, ‘रूमर’ या कथांमधून क्रौर्य, अत्याचार, रक्तपात, राक्षसी वृत्ती, वासनांधपणा यांचे दर्शन घडते. ते सगळं वाचून आपल्याही मनाला ‘फाळणीच करायची होती तर स्वातंत्र्य दिलेच कशासाठी?’ असा प्रश्न पडतो. ‘माय प्रेशियस वन’मध्ये बरकती नेमकं हेच म्हणते. ‘किती वाईट दिवस आहेत हे? यापेक्षा ब्रिटिशांचं राज्य चांगलं होतं. त्यांच्या काळात पाखरूही पंख फडफडवू शकत नव्हतं. कशासाठी आपण नवा देश मागितला? हा पाकिस्तान आपल्याला मिळाला नसता तर बरं झालं असतं?’. बरकतीचे हे शब्द त्या वेळी दोन्ही देशांतील लाखो फाळणीग्रस्तांच्या मनातील विचार आहेत. स्वातंत्र्याने आनंदापेक्षा दु:ख दिले, सुखापेक्षा यातना दिल्या, शुभेच्छांपेक्षा अत्याचार दिले अशीच भावना फाळणीच्या दंगलींत सापडलेल्या प्रत्येकाची होती. हा निराशावाद, दु:ख, वेदना ‘सॅव्हेज हार्वेस्ट’मध्ये अचूकपणे उमटली आहे. पण, सरना यांच्या या कथा केवळ दु:खाच्या, वेदनेच्या आणि नराश्याच्या नाहीत. त्यांच्या प्रत्येक कथेला आशेची किनार आहे. धर्म हे िहसाचाराचे मूळ नाही. तो राजकीय लालसा, महत्त्वाकांक्षा आणि व्यक्तिगत हव्यास यांतूनच उसळतो, हे या कथा सांगतात. ‘द व्हिलेज..’मधला म्हातारा खुदाबक्क्ष असो की ‘माय प्रेशियस वन’मधील अली मोहम्मद असो, ‘सॅव्हेज हार्वेस्ट’मधील दिनाची पत्नी असो की आपल्याच काकाच्या तावडीतून एका अपहृत मुलीला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा शब्बीर असो.. ही सर्व पात्रं उद्याच्या नव्या दिवसाची आशा दाखवतात. असा दिवस जिथं धर्म जगण्याच्या आड येत नाही; जिथं माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असतो आणि जिथं सौहार्दानं जगणं हेच खरं जगणं असतं. सरना यांच्या कथांचा शेवट दु:खात होत असला तरी या कथा या नव्या उद्याकडे इशारे करतात. त्यामुळेच ‘होप’मध्ये आपल्या मुलांच्या मृत्यूनं दु:खी झालेला म्हातारा या जगावर हायड्रोजन बॉम्ब पडावा, अशी अपेक्षा करतो. तेव्हाच त्याची शेजारी महिला आपल्या नवजात जुळ्या मुलांना म्हाताऱ्याच्या मुलांची नावं ठेवून म्हाताऱ्याच्या मनातील कटुता आणि नराश्य दूर सारते.
सरना यांनी मूळ पंजाबीत लिहिलेल्या या कथांचा त्यांचे पुत्र नवतेज यांनी अप्रतिम अनुवाद केला आहे. या कथांमध्ये िहसाचार असला तरी त्यातील शब्दांमध्ये विखार दिसत नाही. त्यामुळे त्याला बटबटीतपणा आलेला नाही. ‘सॅव्हेज हार्वेस्ट’ हे फाळणीचं अचूक प्रतििबब आहे. फाळणी म्हटलं की अपरिमित आणि अतोनात िहसाचार आठवत असला तरी अिहसेचं महत्त्वही फाळणीनंच पटवून दिलं. रक्तरंजित आणि द्वेष पसरवणाऱ्या फाळणीच्या आठवणींत अनेक प्रेमाच्या, आपुलकीच्या, मत्रीच्या, शेजारधर्माच्या गोष्टीही दडलेल्या आहेत. सरना यांच्या कथा या गोष्टींना उजेडात आणतात.

सॅव्हेज हार्वेस्ट-स्टोरीज ऑफ पार्टिशन
मूळ लेखक- मोिहदर सिंग सरना,
इंग्रजी अनुवाद- नवतेज सरना,
रूपा पब्लिकेशन, नवी दिल्ली,
पाने : २४९, किंमत : २९५ रुपये.