मिशेल वेलबेक हा आधुनिकोत्तर फ्रेंच कादंबरीकार ६०-७०च्या दशकांत फ्रान्समध्ये झालेली सामाजिक-वैचारिक क्रांती पोकळ मानतो. आधुनिक माणूस समृद्ध झालेला नसून त्याची वाटचाल अधिकाधिक भंगुरतेकडे होते आहे असं सूत्र त्याच्या कादंबऱ्यांमध्ये दिसतं. त्याची सहावी कादंबरीही त्याच सूत्राचा पुढील आविष्कार आहे.

मिशेल वेलबेक हा फ्रान्समधील प्रसिद्ध, वादग्रस्त आणि लोकप्रिय लेखक आहे. १९९६ साली त्यानं पहिली कादंबरी लिहिली. जिचा अनुवाद ‘व्हॉटएवर’ नावानं प्रसिद्ध झाला. त्याच्या दुसऱ्या कादंबरीचं नाव आहे ‘आटोमाएझ’ आणि तिसरीचं ‘प्लॅटफॉर्म.’ या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये एकाकी नायक, कुटुंब किंवा नात्याचा अभाव, भौतिक साधनांमधून परिपूर्ण आनंद घेण्याची आणि शोधण्याची तीव्र इच्छा; त्याच जोडीला प्रवास, स्थळदर्शन आणि लैंगिकता यांच्या वर्णनानं अवकाश भरून काढला जातो. पण त्यानं नायकाच्या जीवनातील पोकळी भरून निघत नाही. त्याची वाटचाल निराशेकडे होते. वेलबेकची चौथी कादंबरी ‘लांजारोट’ ही आकाराने बरीच लहान आहे आणि तिचा बराचसा भाग ‘लांजारोट’ या ज्वालामुखी थंड होऊन बनलेल्या भागाच्या प्रवासाने व्यापलेला आहे. पाचवी कादंबरी ‘द पोसीबीलिटी ऑफ अॅन आयलंड’ ही सारे जग नष्ट झाल्यावर केवळ विज्ञानाच्या मदतीने जिवंत ठेवलेल्या मेंदूचं आणि आत्म्याचं स्वागत आहे. आपल्या मुलाखतीत आणि कादंबऱ्यांतही वेलबेक ६०-७०च्या काळात फ्रान्समध्ये झालेली सामाजिक-वैचारिक क्रांती पोकळ मानतो. आधुनिक माणूस समृद्ध झालेला नसून त्याची वाटचाल अधिकाधिक भंगुरतेकडे होते आहे असं सूत्र त्याच्या लेखनात दिसतं.

सोळा वर्षांत पाच कादंबऱ्या ही काही मोठी साहित्यसंपदा नव्हे, पण मिशेलच्या प्रत्येक कादंबरीनं समीक्षकांची दाद मिळवली आहे, वाद निर्माण केले आहेत. जॉन अपडाईकपासून ते जुलीयन बान्रेसपर्यंत अनेक समकालीनांनी मिशलेच्या कादंबऱ्यांवर परीक्षणं लिहिली आहेत. साहजिकच त्याच्या प्रत्येक कादंबरीची वाट पाहणारा मोठा वर्ग जगात आहे.
मिशेलची ‘द मॅप अँड द टेरीटरी’ ही सहावी कादंबरी. तिला ‘प्रिक्स गोंकोर्ट’ हा फ्रेच साहित्यातील मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या कादंबरीची पहिली आवृत्ती अडीच लाख प्रतींची होती. या कादंबरीच्या मलपृष्ठावर ‘अमुक लांबी-रुंदीची -जाडीची मिशेल वेलबेक यांची कलाकृती’ असं लिहिलं आहे. यात जेड मार्टनि या चित्रकाराची कहाणी आहे. वेलबेकच्या इतर नायकांप्रमाणे हाही एक अस्वस्थ आत्मा आहे. धनाढय़ आíकटेक्ट बापाचा हा मुलगा. त्याच्या आईने तो सहा महिन्यांचा असतानाच आत्महत्या केली आहे. सुरुवातीला तो मिशेलीन या फ्रान्सच्या परगण्यातील नकाशे आणि प्रत्यक्ष छायाचित्र यांतून कलाकृती निर्माण करतो. चित्रकारकिर्दीतला हा पहिला टप्पा लेखकानं छान रंगवला आहे. हळूहळू त्याची चित्रं विकली जातात, नावही होतं. मिशेलीनच्या टुरिझमसाठी प्रसिद्धीचं काम पाहणारी संस्था याचाही वापर करून घेते आणि त्यांची प्रतिनिधी वोल्गा ही जेडला भेटते.. त्याच्या प्रेमात पडते. या प्रेमातून शरीरसुखापेक्षा फारसं काही मिळत नाही. अनेकदा वेलबेकच्या कादंबऱ्यांमध्ये पोर्नोग्राफीच्या जवळ जाईल असे प्रच्छन्न लंगिक तपशील आढळतात. ते यातही आहेत. प्रत्यक्ष वोल्गा त्याला आपल्याबरोबर यायची विनंती करतो तेव्हा तो तिच्याबरोबर जात नाही. अत्यंत एकाकी पद्धतीने तो महिनोन्महिने स्टुडिओत काम करत राहतो. एके ठिकाणी मिशेल लिहितो- ‘त्या महिन्याभरात आपल्या कॅशियरला नाही म्हणण्याशिवाय कोणताही शब्द त्याने उच्चारला नव्हता.’
आपल्या कलेच्या आताच्या टप्प्यामध्ये जेड, ‘बिल गेट्स आणि स्टिव्ह जॉब्स हे इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजीची चर्चा करताना’ अशा शीर्षकाची चित्रं काढतो. त्याचे एक चित्र जेफ कून्स आणि डॅमियन हर्स्ट या समकालीन चित्रकाराबद्दल आहे. अफाट किमतीला ही चित्रं विकली जातात.. म्हणजे जवळ जवळ साठ लाख युरोंना. जेम्सच्या चित्रकलेचा प्रवास दाखवताना लेखक चित्रप्रदर्शनांच्या उद्घाटन पाटर्य़ा किंवा त्यांच्या परीक्षणांची टिपिकल भाषाही छानपकी रंगवतो. त्याच्या नव्या प्रदर्शनासाठी जेड नायकाला कॅटलॉग लिहायला पाचारण करतो. इथे या कादंबरीचा उत्तराधुनिक आणि स्मार्ट भाग सुरू होतो. नायकाला भेटायच्या प्रसंगाचं वर्णन करताना तो अस्ताव्यस्त, गबाळे कपडे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष अशी डिप्रेशनची दोन लक्षणं असल्याचं सांगतो. आणि अर्थात दोन्ही कादंबरीकारातही दिसतात.नायक त्यांना सांगतो की, महिनोन्महिने तो बिछान्यात पडून राहणं पसंत करतो. आणि तासन्तास फॉक्स चॅनलवरून कार्टून पाहतो. कॅटलॉग लिहायला त्यानं कबुली दिल्यावर प्रत्यक्ष प्रदर्शनापर्यंतचा प्रवास सुरू होतो. आणि एक दिवस अचानक नायकाचा खून होतो. अर्थातच तपासणीच्या कचाटय़ात जेडही सापडतो. लेखकाचं धड वेगळं करून त्याचा केवळ गळ्यावरचा भाग मध्यभागी ठेवून त्याच्याभोवती काहीतरी रचना खुन्यानं केलेली असते. ही रचना प्रसिद्ध चित्रकार जॅक्सन पोलोक या प्रसिद्ध चित्रकाराच्या सुरुवातीच्या कलेशी साम्य सांगणारी असते. पोलीस त्या दिशेनं शोध घेतात आणि अत्यंत वैशिष्टय़पूर्ण शौक बाळगणाऱ्या खुन्याला अटक होते.
अर्थात कादंबरी काही खुनाचा शोध सांगणारी रहस्य कादंबरी नाही. व्यापार आणि मार्केटिंगच्या ताब्यात गेलेलं नवं जग, अत्याधुनिक सोयींचा वापर करताना एकाकी होत गेलेला आधुनिक माणूस, प्रेमाचा अभाव आणि सुखवादी गोष्टींच्या मागे लागूनही शेवटी पदरी येणारी निराशा अशी अनेक कथानकं या कादंबरीत आहेत. आधीच्या कादंबऱ्यांत येणारी आधुनिक जगण्यातली भंगुरता हा त्यातील सर्वात प्रभावी घटक आहे. वडिलांशी असलेल्या त्याच्या नात्यात उबदारपणाचा अभाव आहे. मोजक्याच पात्रांचा अधेमधे होणारा संवाद सोडला तर कादंबरी म्हणजे घटनांची आणि मनोव्यापारांची आणि स्वत:शी केलेल्या लांबलचक संवादांची लांबलचक मालिकाच आहे. अनेक ठिकाणी अत्यंत प्रभावी असे तपशील आणि वर्णने येतात. एखाद्या शब्दावरून तात्त्विक चच्रेला सुरुवात करणं किंवा विश्लेषणात शिरणं हे या कादंबरीत अनेकदा घडतं.
एखादा काल्पनिक कलावंत निर्माण करताना त्याचा कलाप्रवास खरा तर वाटायला हवा आणि हे कादंबरीकारानं निश्चित साधलं आहे. यातील जेड मार्टनिचं व्यक्तिमत्त्व अनेक आधुनिक चित्रकारांशी समानता दाखवणारं आहे, विशेषत: जेफ कून्स आणि डॅमियन हर्स्ट यांच्याशी. मिशेलचं वर्णन करताना प्रसारमाध्यमांनी तयार केलेल्या प्रतिमेची खिल्ली उडवण्याची संधी त्यानं घेतली आहे. फ्रेंच आणि इंग्रजी नियतकालिकांतून मिशेलचं वर्णन ‘दारुडा आणि पॉलीटिकली अनकरेक्ट विधानं करणारा आणि इस्लाम द्वेष्टा’ असं वर्णन येतं. तरीही त्याच्या कादंबऱ्या आधुनिक जगाबद्दल काहीतरी नेमकेपणे सांगू पाहतात. भालचंद्र नेमाडे ज्या नायपॉलच्या वाक्याचा उल्लेख करतात ते वाक्य म्हणजे- ‘कादंबरी म्हणजे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. ते वेलबेकच्या या आणि इतर कादंबऱ्यांतही व्यवस्थित प्रत्ययाला येतं. वर्षांनुर्वष आणि चार-पाच शतकांहून अधिक काळ फ्रान्सनं आपली कला-साहित्यातील मक्तेदारी कायम ठेवली. विसाव्या शतकातल्या सिनेमासारख्या नव्या कलेतही त्यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला. आता उत्तराधुनिक कादंबरीमध्ये मिशेल वेलबेक हा त्यांचा नवा आव्हानवीर आहे. तो तसा का आहे, ते समजून घ्यायचं असेल तर ही कादंबरी वाचायला हवी.

द मॅप अँड द टेरीटरी : मिशेल वेलबेक,
इंग्रजी अनुवाद – गावीन बोड,
प्रकाशक : िवटेज,
पाने : २८८, किंमत : ४५० रुपये.

Story img Loader