पंजाबचा इतिहास हा पंजाबी हिंदू, पंजाबी मुस्लीम व शीख यांचा तर आहेच; पण दिल्ली व अफगाण राज्यकर्ते यांच्यातल्या राजकीय ओढाताणीचाही इतिहास आहे. दिल्लीचे दुबळेपण हे नेहमी पंजाबचे स्थैर्य धोक्यात आणणारे ठरले आहे.
भारताच्या इतिहासाची नाळ जेवढी पंजाबच्या इतिहासाशी जोडलेली आहे तेवढी इतर प्रांतांच्या इतिहासाशी नाही. पंजाब म्हणजे पंचनद्यांचा प्रदेश. अटक हे गाव पंजाबच्या पश्चिम सीमेवर आहे एवढे म्हटले तरी मराठी माणसांना या प्रदेशाच्या इतिहासाचे महत्त्व लगेच समजेल.
राजमोहन गांधी यांनी ‘पंजाब : अ हिस्टरी फ्रॉम औरंगजेब टू माऊंटबॅटन’ हा ग्रंथ लिहून अखंडित भारताच्या इतिहासावरच्या पुस्तकात भर घातलेली आहे. या संदर्भातील बहुतेक पुस्तके दिल्लीला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आहेत. विभाजनपूर्व पंजाब डोळ्यासमोर ठेवून फक्त त्याचा म्हणून इतिहास सांगणारी पुस्तके फारशी नाहीत. पंजाबचा इतिहास हा पंजाबी हिंदू, पंजाबी मुस्लीम व शीख यांचा तर आहेच; पण दिल्ली व अफगाण राज्यकर्ते यांच्यातल्या राजकीय ओढाताणीचाही इतिहास आहे. तो सांगताना पंजाबियत नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे काय, याचाही शोध लेखक घेतो.
दिल्लीचे दुबळेपण हे नेहमी पंजाबचे स्थैर्य धोक्यात आणणारे ठरले आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अनागोंदी निर्माण झाली. त्यात नादिरशहाच्या स्वाऱ्या झाल्या. या सगळ्या धामधुमीत मराठय़ांना हाताशी धरून मुघलांच्या वतीने राज्यकारभार करू पाहणाऱ्या अदिना बेग या पंजाबी सुभेदाराबद्दल बरीच माहिती या पुस्तकात आहे. हा माणूस स्वत:च्या कर्तृत्वाने वर आला होता. या प्रदेशात राज्य करण्यासाठी हिंदू, मुस्लीम व शीख असा एक तोल साधण्याचे कौशल्य त्याकडे होते. आपला सवतासुभा निर्माण करू पाहणाऱ्या शिखांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती, तरी त्यांच्याबरोबर काही गुप्त करार करून त्यांना एका मर्यादेत रोखले होते. अफगाणांना पंजाबबाहेर घालवण्याची जबाबदारी मात्र अदिना बेगने मराठय़ांवर सोपवली. हा कर्तृत्ववान पुरुष पानिपत युद्धाआधी मरण पावला.  पंजाबियत म्हणून जे काही असेल ते अदिना बेगने अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला.
१७९९ नंतरची ५० वर्षे शिखांची होती. पानिपतच्या लढाईत तटस्थ राहिल्याचा फायदा त्यांना झाला. दिल्लीतला ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी कॉलिन्स याने रणजित सिंगांचे गुण ओळखले होते. पंजाबमधल्या आपल्या हस्तकाकरवी अनेक शीख गटांना रणजित सिंगांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचा सल्ला दिला. रणजित सिंगांच्या दरबारात ब्राह्मण, खत्री व डोग्रा यांना स्थान होते. मुस्लिमांना ते मानाने वागवत आणि त्यांना सैन्यात स्थान होते. गोविंदगड किल्ला जिंकल्यानंतर रणजित सिंगांनी पानिपत युद्धात अब्दालीने वापरलेली दमदमा नावाची तोफ मोठय़ा अभिमानाने लाहोरला आणली. ती आजही तेथे आहे. रणजित सिंगांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी लाहोरच्या किल्ल्यात पार पडलेल्या तहनाम्याने दहा वर्षांच्या दिलीप सिंगने शिखांची सत्ता व संपत्ती कोहिनूर हिऱ्यासहित ब्रिटिशांच्या हवाली केली. हा सारा इतिहास खुशवंत सिंगांच्या ‘हिस्टरी ऑफ सिख्स’मध्ये आहे. त्याच्याशी परिचित असलेल्यांना ही पुनरावृत्ती वाटू शकते.
१८५७ च्या उठावात तुरळक घटना वगळता पंजाब शांत होता. मुस्लिमांना शिखांची सत्ता नको होती, तर शिखांना मुस्लिमांची सत्ता नको होती. हे एक त्या शांततेचे कारण होते. लॉरेन्स व निकोल्सन या अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपाय योजले व आपल्या अधिकाराचे भरपूर प्रदर्शन केले. काही दिवसांनी याच निकोल्सनने शीख पलटणीच्या मदतीने दिल्लीवरची बंडवाल्यांची सत्ता मोडून काढली.
नंतरच्या काळात लाहोर चांगलेच प्रसिद्धीला आले. सर गंगाराम हे नाव घेण्याजोगे व्यक्तिमत्त्व होते. राणीच्या राज्यात त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. लाहोरचे पोस्ट ऑफीस, मेयो स्कूल ऑफ आर्ट शहराचा मॉडेल टाऊन हा भाग ही या माणसाची निर्मिती. गंगाराम हॉस्पिटल हे गंगारामने दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले. मंटोच्या एका कथेत या हॉस्पिटलचा उल्लेख आहे. १८८२ ते १८८७ या काळात रूडयार्ड किपलिंगचा मुक्काम लाहोरला होता. भाषा व लिपी हा तेव्हादेखील वादाचा विषय होता. नंतरच्या साठ वर्षांत २०३ वर्तमानपत्रे वा मासिके निघत असत. बहुतेक सगळी उर्दूतून. त्यांचे मालक हिंदू होते. तुरळक काही पंजाबी व इंग्रजीतही होती. हिंदीचा समावेश फार नंतर म्हणजे १९१७ ला अभ्यासक्रमात करण्यात आला. त्याला विरोध झाला. हिंदीच्या बाजूचे आणि त्याला विरोध करणारे दोघेही आपापल्या भूमिका उर्दू वर्तमानपत्रातून मांडत. पंजाबी, मुस्लिम मुलं शाळेत गुरुमुखीतून लिहीत. रणजित सिंगांच्या काळापासून चालत आलेली ही पद्धत होती. खेडय़ात गुण्यागोविंदाचे वातावरण असे, पण शहरात तणावाचे प्रसंग येत. लाहोरामध्ये पंडित लेखरामच्या खुनाने वातावरण लगेच कलुषित झाले आणि हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांवर बहिष्कार टाकला. दयानंद, इस्लामिया व खालसा अशी तीन धर्मीयांची तीन वेगळी महाविद्यालये १८९२ पर्यंत निर्माण झाली. एक सरकारी कॉलेजही होते. राजकीय चळवळीत मात्र हिंदू-मुस्लीम बऱ्याचदा एकत्र असत. रामनवमी व मोहरम या मिरवणुकांमध्येदेखील एकमेकांना मदत करण्याची भूमिका असे. म्हटले तर एक, म्हटले तर वेगळे अशी परिस्थिती होती. बंगालच्या फाळणीचे परिणाम दूरवर झाले. त्याला हिंदूंकडून झालेल्या विरोधाने मुस्लिमांच्या मनात पहिल्यांदा शंकेची पाल चुकचुकली, असे लेखकाने लिहिले आहे. कृष्णा सोबती या प्रसिद्ध लेखिकेनेही असेच मत दिले आहे आणि ते विचार करण्याजोगे आहे.
गदर चळवळीच्या पाश्र्वभूमीवर लेखकाने जालियानवाला बागेची घटना पाहिली आहे. ही केवळ पंजाबच्या इतिहासातीलच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतली महत्त्वाची घटना. पण भीष्म सहानींच्या याच विषयावरच्या पुस्तकापेक्षा यात वेगळे काही नाही.  
पंजाब हा विषय आणि इक्बालांचा उल्लेख त्यात नसणे हे शक्य नव्हते. तारुण्याच्या उत्साहात त्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिले. पण नंतर ते युरोपला गेले आणि मुस्लिमांच्या मागासलेपणाचे त्यांना भान आले. मुस्लिमांनी युरोपकडून शिकण्यासारखे खूप आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर इक्बाल मुस्लिमांचे कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर ‘मुस्लीम हैं हम, सारा जहाँ हमारा’ असे ते लिहून गेले. मात्र ते स्वतंत्र पाकिस्तानच्या कल्पनेचे जन्मदाते नव्हते.
ब्रिटिशांनी केलेल्या पहिल्या शिरगणतीच्या वेळेला अनेक मुस्लिमांनी व शिखांनी आपला धर्म मुस्लीम जाट वा शीख जाट असा सांगितला. पण स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, हिंदू व शीख यांच्यात प्रत्येक प्रश्नाबाबत एकमत होणे अवघड होते. अनेक शतके हे समाज एकमेकांचे शेजारी होते तरी रेल्वे स्टेशनांवर हिंदू पाणी व मुस्लीम पाणी म्हणून वेगवेगळी सोय होती. कृष्ण बलदेव वेद यांच्या ‘गुज़्‍ारा हुआ ज़्‍ामाना’ या पुस्तकातही हे आलेले आहे. अशा स्थितीत सर्वाची एकत्र मोट बांधणे अवघड होते. पंजाबी जमीनदार हा एक चौथा घटक त्यात होता. ती म्हणजे युनियनिस्ट पार्टी, जी प्रामुख्याने जमीनदारांची होती. सर छोटू राम हे या पक्षातले एक महत्त्वाचे नाव. हे गृहस्थ जातीने जाट होते.  कवी इक्बालांशी त्यांचे जवळचे संबंध होते. १९४५ साली लाहोरात त्यांचे निधन झाले. २०१३ साली राजस्थानमधल्या गुजर व जाटांनी स्थापन केलेल्या पक्षाची प्रेरणा सर छोटू राम आहेत हे सांगितले तरी त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते.
१९४६ नंतर पंजाब, बिहार व बंगाल या प्रांतांत स्वातंत्र्य म्हणजे शाप वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली. केवळ स्थानिक गुंडांच्या टोळ्याच नव्हे, तर अनेक पोलीस अधिकारी व स्थानिक नेते दंग्यात सामील होते. या संदर्भात आकडेवारीपेक्षा जे फाळणी-साहित्य निर्माण झाले त्यातून त्या परिस्थितीचे भान जास्त येते. पंजाब अखंड ठेवून मुस्लीम व शिखांनी सत्तेत भागीदार व्हावे यासाठी लीग व शिखांच्या बैठका झाल्याचे लेखक लिहितो, पण त्याचा तपशील मात्र देत नाही.
अनेक वर्षे एकत्र राहून मुस्लीम शीख व हिंदू समाजात पुरेसा एकोपा निर्माण झाला नाही. पण त्याचबरोबर दोन्ही बाजूंच्या पंजाबी माणसाला एकमेकांबद्दल आत्मीयता आहे हे लेखकाचे म्हणणे खोटे नाही. फाळणीच्या हिंसाचारात भिन्नधर्मीयांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याच्या घटना पुस्तकात शेवटी दिल्या आहेत. अमृता प्रीतम, फैज़्‍ा अहमद फैज़्‍ा, सआदत हसन मंटो या सीमेच्या दोन्ही बाजूला आपुलकी असणाऱ्या साहित्यकारांचा सार्थ उल्लेख लेखक करतो. लाहोरच्या लिटररी सर्कलमध्ये जेव्हा मंटोने आपली ‘टोबा टेकसिंग’ ही गाजलेली कथा वाचून संपवली तेव्हा सभागृहात सन्नाटा पसरला. ऐकणाऱ्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी होते. काही क्षण असेच गेले, मग मंटोला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले, अशी आठवण सांगितली आहे. तेव्हा प्रत्येक समाजाला थोडा मोकळेपणा मिळाला तर परत एकत्र येण्याचा राजमोहन गांधींचा विश्वास अगदीच भाबडा नाही.
या पुस्तकात अभ्यासकांना नवे असे काही नाही. पण अखंड पंजाबला केंद्रस्थानी ठेवून त्याचा इतिहास लिहिण्याचा हा दृष्टिकोन नवा आहे.. नपेक्षा हा सगळा इतिहास वेगवेगळ्या गं्रथांत उपलब्ध आहेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाब – अ हिस्ट्री फ्रॉम औरंगजेब टू माऊंटबॅटन : राजमोहन गांधी
प्रकाशक : अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली,
पाने : ४००, किंमत : ६९५ रुपये.

पंजाब – अ हिस्ट्री फ्रॉम औरंगजेब टू माऊंटबॅटन : राजमोहन गांधी
प्रकाशक : अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली,
पाने : ४००, किंमत : ६९५ रुपये.