आपला फायदा कशात आहे हे जाणणारा आणि मुख्य म्हणजे राजकीय नेत्यांकडून हा फायदा कसा पदरात पाडायचा हेही जाणणारा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग.. त्यामुळे प्रसंग निवडणुकीचा असो की अन्य कसला, अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत मध्यमवर्गाला चुचकारावंच लागतं. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हेच कसं दिसलं, हे सप्रमाण सांगणाऱ्या पुस्तकातून भारतीय राजकारणातली उत्तरंही मिळतात का?
मध्यमवर्ग हे प्रकरण हल्ली फारच मोठं झालेलं आहे. आणि त्याची गंमत अशी की चाळीत सामायिक संडास वापरणारा असो की अगदी उच्चभ्रू वस्तीत घराइतकीच रक्कम गाडी उभी करण्यासाठी खर्च करणारा असो.. सगळेच जण स्वत:चा उल्लेख मध्यमवर्गीय असाच करतात. म्हणजे अण्णा हजारेंच्या मागे असलेला मेणबत्ती संप्रदाय हाही मध्यमवर्ग आणि हा संप्रदाय ज्यांचा निषेध करत असतो तोही मध्यमवर्गच. हे असं कसं काय?
अमेरिकेतल्या निवडणुकांच्या निमित्तानं जेम्स काव्‍‌र्हिल आणि स्टॅन ग्रीनबर्ग या जोडगोळीनं याच प्रश्नाला हात घालायचा प्रयत्न केलाय ‘इट्स द मिडल क्लास स्टुपिड!’ या पुस्तकात. त्याचं शुद्ध भाषांतर ‘अरे, मूर्खा हा मध्यमवर्ग आहे!’ असं काहीसं होऊ शकतं. या वाक्यातनं जो अर्थ निघतो तोच या लेखकांना अभिप्रेत आहे, असं हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं. या वाक्प्रचाराचा उगम आहे २१ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत. १९९२ साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत बिल क्लिंटन यांनी त्या वेळचे  अध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांना आव्हान दिलं होतं. वास्तविक या थोरल्या बुशसाहेबांनी इराकवर हल्ला चढवला होता, कुवेतचा घास घेऊ पाहणाऱ्या सद्दाम हुसेन याला एकाच वर्षांपूर्वी रोखलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या बाजूनं अशी विजयी भावना तयार झालेली होती. त्यामुळे क्लिंटन यांना ही निवडणूक जड जाणार अशी चिन्हं होती. तर अशा पराभूत वातावरणात मतदारांचे वारे आपल्या बाजूने फिरवायचे कसे, या विवंचनेत क्लिंटन यांचा निवडणूक चमू होता. त्याच वेळी बुश यांचा संघ मात्र युद्ध विजय उन्मादात होता. त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं. अशा वेळी कशा कशावर अध्यक्ष बुश यांची कोंडी करता येईल, अशी चर्चा सुरू असताना क्लिंटन यांचे अन्य सल्लागार अमुक वाईट झालंय या काळात, तमुक बिघडलंय असं काही काही सांगत होते. काव्‍‌र्हिल हे ते ऐकत होता. ती सगळी चर्चा त्यानं ऐकली आणि एव्हढंच म्हणाला- ‘इट्स द इकॉनॉमी स्टुपिड’. त्याला म्हणायचं होतं हे की, या ज्या काही तक्रारी सांगितल्या जातायत त्या सगळ्याच्या मुळाशी अर्थव्यवस्था आहे.. हे आपण लक्षात घ्यायला हवं.
झालं! क्लिंटन यांच्या प्रचाराचं हे वाक्य हे घोषवाक्यच झालं. त्यामुळे रिपब्लिकन बुश यांच्या कळपातलं कोणी काहीही सांगायला गेलं, मिशीला तूप लावून आम्ही कसं काय युद्ध जिकलं.. वगैरे फुशारकी करायला लागलं की, क्लिंटन यांच्या गोटातनं एकच वाक्य उच्चारलं जायचं, ‘इट्स द इकॉनॉमी स्टुपिड’. म्हणजे तुम्ही युद्ध जिंकलेलं असू दे, सद्दामला यशस्वीपणे माघार घ्यायला लावली हे असू दे.. पण त्या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेची बोंब झाली आहे.. तेव्हा तुमच्या विजयाला काहीही अर्थ नाही.. महत्त्व आहे ते अर्थव्यवस्थेला. ‘इट्स द इकॉनॉमी स्टुपिड’ हे वाक्य इतकं प्रभावी ठरलं की सुरुवातीला हरतील अशी वाटणारी निवडणूक क्लिंटन सहजपणे जिंकले.
या वाक्प्रचाराचा जन्मदाता जेम्स काव्‍‌र्हिल यानंच हे नवं ‘इट्स द मिडल क्लास स्टुपिड!’ हे पुस्तक लिहिलंय. हा मूळचा माध्यमतज्ज्ञ. राजकीय निष्ठा म्हणाल तर डेमॉक्रॅट्स पक्षाला उघडपणे वाहिलेल्या. अमेरिकेत प्रसारमाध्यमांत हे बरं असतं, लोकं सरळ सरळ मी अमुक पक्षाचा आहे असं सांगून टाकतात. त्यामुळे न सांगता कोण कोणत्या पक्षाचं दुकान चालवतंय यावर आघाडय़ा उघडल्या जात नाहीत. जेम्स हा सीएनएनवर रीतसर कार्यक्रम करायचा. आणखीही काही वाहिन्यांसाठी, वर्तमानपत्रांसाठी तो लिहितो. त्यानं स्टॅन ग्रीनबर्ग यालाही पुस्तकासाठी जोडीला घेतलं. स्टॅन निवडणूक अभ्यासतज्ज्ञ आहे आणि अशा क्षेत्रातल्या मंडळींनी तटस्थ वगैरे राहावं अशी अपेक्षा असताना स्वत: हा डेमॉक्रॅटिक पक्षाचा समर्थक आहे. स्टॅन स्वत: क्लिंटन, जॉन केरी, अल गोर, इंग्लंडचे टोनी ब्लेअर वगैरे अनेकांना निवडणुकीवर सल्ले देत असतो.
तर हे दोघेही आता बराक ओबामा यांच्या निवडणूक यंत्रणेशी संबंधित होते. या निवडणुकीत अर्थव्यवस्था हाच मुद्दा होता. खरं तर ओबामा यांनी अल कईदाचा कडवा दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा नायनाट केला, प. आशियातल्या अनेक देशांत राजकीय उलथापालथ घडवून आणायला पडद्यामागून मदत केली वगैरे असलं तरी अमेरिकेत निवडणूक मुद्दा होता तो अर्थव्यवस्था हाच. ओबामा यांना आव्हान देणारे रिपब्लिकन पक्षाचे मिट रॉम्नी यांनीही अर्थव्यवस्था हाच मुद्दा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर अग्रक्रमाने घेतला होता. म्हणजे निवडणूक कशावर लढवायची यावरच जर परस्परविरोधी उमेदवारांचं मतैक्य होणार असेल तर मग विरोध उरतो कुठे?
तो उरतो तो अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत. या लेखकद्वयीनं हे दाखवून दिलंय की निवडणूक असो वा अन्य काही चुचकारावं लागतं ते मध्यमवर्गालाच. वास्तविक कोणत्याही आर्थिक सुधारणांचा वा प्रगतीचा फायदा याच वर्गाला होत असतो, कारण आपला फायदा करून घ्यावा अशा अवस्थेला हा वर्ग पोहोचलेला असतो. तरीही जेव्हा विद्यमान व्यवस्थेवर टीका करायची वेळ येते त्या वेळी हाच वर्ग ज्या वर्गाच्या पदरात फारसं काही पडलेलं नाही त्या वर्गापेक्षा अधिक जोरजोरात आपलं रडगाणं गात असतो. देश कसा रसातळाला चाललाय, आपलं काही खरं नाही, मध्यमवर्गाला कोणी कधी वाली नसतोच, भ्रष्टाचारानं सर्व व्यवस्थाच पोखरून टाकलेली आहे, बेरोजगारी किती वाढतीये.. आपल्या पोरांचं काय होणार कुणास ठाऊक.. वगैरे तक्रारवजा वाक्यं याच मंडळींच्या तोंडातनंच बाहेर पडत असतात. अमेरिकेत आताच्या निवडणुकीत नेमकं हेच घडलं. या सगळ्या प्रश्नांवर खरं तर रिपब्लिकन्स मिट रॉम्नी यांनी अगदी जोरात टाहो फोडला. रॉम्नी स्वत: अत्यंत o्रीमंत म्हणता येतील अशा वर्गातले. पारंपरिक म्हणता येतील अशा वर्गातले. वैयक्तिक आयुष्यात धर्म पाळणारे. सहकुटुंब चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाणारे. गरिबांचे हाल कसे कमी करता येईल याचा तपशील निवडणुकीत आवर्जून देणारे.
तरीही त्यांना मतदारांनी निवडणुकीत पाडलं. ते का? वास्तविक मतदानाच्या काळात अमेरिकेत बेरोजगारीचा दर आठ टक्के इतका वाढलेला. देशातल्या ५६ टक्के नागरिकांचं मत असं झालेलं की देश आता दिवाळखोरीतच जाणार. इतकं सगळं वातावरण प्रतिकूल झालेलं असतानाही मतदारांनी रॉम्नी यांच्या पारडय़ात आपली मतं टाकली नाहीत. असं का झालं?
काव्‍‌र्हिल-ग्रीनबर्ग या जोडगोळीच्या मते याचं कारण ‘इट्स द मिडल क्लास स्टुपिड!’ या दोघांचा युक्तिवाद असा की, ओबामा यांना अर्थव्यवस्थेबाबत जे काही करू पाहात होते त्यात पुरेसं यश नसेल मिळालं. पण आपल्याला.. म्हणजे अर्थातच मध्यमवर्गाला.. काय हवंय याची जाण तरी त्यांना आहे. त्या उलट रॉम्नी. त्यांची भाषा आहे गरिबांच्या कल्याणाची.. पण आपल्यासाठी.. म्हणजे इथेही अर्थातच अभिप्रेत मध्यमवर्ग.. ते काय करणार हे सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही. तेव्हा गरिबांच्या कल्याणाची भाषा करणाऱ्यापेक्षा मध्यमवर्गाच्या मागे उभा राहणाऱ्या ओबामा यांना आपण मतं देऊ या.. असा विचार समस्त मध्यमवर्गानं केला आणि ओबामा सहज निवडून आले.
यातला महत्त्वाचा भाग हा की, हे सगळं त्यांनी निवडणुकीच्या आधी लिहिलेलं आहे. म्हणजे ओबामा यांनी काय केलं तर ते निवडणूक जिंकतील अशी त्यांची मांडणी आहे. निकाल लागल्यावर आम्ही असं म्हणालोच होतो.. असं ते सांगत नाहीत. म्हणूनच ते महत्त्वाचं.
कुठेतरी वाटतंय हे ओळखीचं?
गेल्या निवडणुकीत सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरूनही ते अपयश दाखवून देणाऱ्यांचा पराभव झाला आणि त्या ‘अपयशा’स जबाबदार असणारे मनमोहन सिंग हेच पुन्हा सत्तेवर आले. हे कसं काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
उत्तर या दोघांनी देऊन ठेवलंय : ‘इट्स द मिडल क्लास स्टुपिड!’
(वि. सू. पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी लेखकाकडे चौकशी करू नये.)

पेपरबॅक
भारतात अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार इंग्रजी पुस्तकंही फक्त  पेपरबॅक आवृत्तीतच निघतात. आजही पुस्तकाच्या किमती १०० रुपयांखाली ठेवण्यासाठी काही भारतीय प्रकाशक पेपरबॅकचा मार्ग यशस्वीपणे वापरतात. लोकप्रिय पुस्तकाच्या चोरटय़ा मार्गानं आवृत्त्या काढून (पायरसी) त्या रस्त्यावर विकण्याचा धंदा जोरात आहे, त्यावर मूळ ‘पेपरबॅक’ आवृत्त्या  हे उत्तम प्रत्युत्तर ठरलं. सध्या महाराष्ट्रीय प्रकाशक मूळ मराठी पुस्तकांची इंग्रजी भाषांतरं बाजारात आणत आहेत, ती अन्य पेपरबॅक पुस्तकांप्रमाणे डेमी आकारात न निघता मराठी पुस्तकांप्रमाणे नेहमीच्या क्राउन आकारात निघतात.. अशाही पुस्तकांची दखल लोकसत्ता- बुकमार्कच्या ‘पेपरबॅक’ विभागात घेतली जाईल.

बुरख्याआडच्या स्त्रियांना इंग्रजीचं बळ ..
‘बुरख्याआडच्या स्त्रिया’(१९८७) च्या लेखिका प्रतिभा रानडे यांनी इंग्रजी पुनर्लेखन केलेलं, एकविसाव्या शतकापर्यंत नेणारं हे इंग्रजी पुस्तक.  मुस्लीम स्त्रियांची सद्यस्थिती अभ्यासण्यासाठी १९७० च्या दशकापासून रानडे यांचं ग्रंथवाचन आणि स्त्रियांशी प्रत्यक्ष संवाद आजही सुरू असल्याची साक्ष या पुस्तकातून मिळते. महाराष्ट्रातील तलाकपीडित स्त्रियांसह ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’नं केलेलं काम, त्यामागचे हमीद दलवाई, हुसेन जमादार यांचे विचार, १९८६ चा शहाबानो खटला आणि त्यानंतर राजीव गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत ‘आम्हा मुस्लीम स्त्रियांना भारताचे नागरिक मानता ना तुम्ही?’ असा सवाल करणाऱ्या मुमताज इनामदार.. अशा अनेकांबद्दल रानडे तपशिलानं सांगतात आणि वाचकाला एका वास्तवाचा जवळून परिचय करून देतात. हे वास्तव फक्त दु:खांचं नसून संघर्षांचंही आहे, हा विश्वास देतात. ‘एपिलॉग’मधून, रानडे यांनी ललितगद्य स्वरूपात व्यथा न मांडता अभ्यासाचा मार्ग कसा पुढे नेला, हेही जाणवतं. भारताबद्दल अभिनिवेशानं काही बोलणाऱ्या ग्लॅमरस पुस्तकांपेक्षा हे पुस्तक कैकपटींनी सरस ठरतं, ते अभ्यासू बैठक असूनही संवादाचा धागा न सोडण्याच्या हातोटीमुळे.
बिहाइंड द व्हेल – इन सर्च ऑफ ट्रथ : प्रतिभा रानडे,
परममित्र पब्लिकेशन्स- ठाणे, पाने : १४०, किंमत: १७५ रुपये.

Story img Loader