खरं तर अशा हत्यायंत्रांच्या कारवायांचा आनंद लुटणं वाईटच.. पण ही हत्या दस्तुरखुद्द ओसामा बिन लादेन याची आहे. ती करणाऱ्या अमेरिकेच्या विशेष कमांडोंपैकी एकानं तिची ही अद्भुत कथा लिहिली आहे. कमांडोंची काम करण्याची पद्धत आणि त्यांची कार्यशैली याची ही अंगावर काटा आणणारी कहाणी.. एका ‘हत्यायंत्रा’नंच सांगितलेली..
लष्करी इतिहासात काही काही कारवाई मोहिमा अजरामर झालेल्या आहेत. उदाहरणार्थ १९७६ साली इस्रायली जवानांनी केलेली युगांडामधल्या एंटेबी विमानतळावरची कारवाई किंवा १९९१ सालचं ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म. अशी अनेक सांगता येतील. यात ताज्या एका कारवाई मोहिमेची भर घालायलाच हवी. ती म्हणजे १ मे २०११ रोजी अमेरिकेच्या कमांडो पथकानं पाकिस्तानी भूमीत जाऊन केलेली ओसामा बिन लादेन याच्या हत्येची कारवाई.
अत्यंत धूर्त अतिरेकी, पूर्णपणे परकीय आणि ओसामा समर्थकांची भूमी आणि कोणतंही इलेक्ट्रॉॅनिक साधन वापरत नसल्यामुळे माग काढणं अशक्य असलेला ओसामा अशा परिस्थितीत ही कारवाई झाली. ती जर फसली असती तर त्यात फक्त कारवाईत सहभागी झालेल्या कमांडोजचाच अंत झालाय असं झालं नसतं. तिला राजकीय पदर होता, कारण वर्षभरात अमेरिकी अध्यक्षीय निवडणुका होत्या. जर ती फसली असती तर बराक ओबामा यांचा पराभव अटळ होता आणि तरीही सर्व प्रकारचे धोके पत्करून अमेरिकेच्या सील नावानं ओळखल्या जाणाऱ्या विशेष कमांडोजनी ही मोहीम हाती घेतली आणि आश्चर्यकारकपणे फत्ते करून दाखवली. त्याच मोहिमेची चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘नो इझी डे’ हे पुस्तक. मार्क ओवेन यानं केविन मॉरर याच्या साहय़ानं ते लिहिलं आहे. युद्धस्य कथा रम्यच असतात, पण गुंतागुंतीच्या युद्धाच्या अधिक रम्य असतात. किती, ते हे पुस्तक वाचल्यावर कळू शकेल, कारण ते लिहिलंय या मोहिमेचा जो सूत्रधार होता त्या मार्क ओवेननेच. वास्तविक मार्क ओवेन हे काही लेखकाचं खरं नाव नाही. त्याचं मूळ नाव मॅट बिसोनेट. ही मंडळी टोपणनावं घेतात, कारण त्यांना ती घ्यावीच लागतात. अमेरिकी लष्कराचा अभिमान असलेले हे स्पेशल कमांडो ज्या पद्धतीच्या कारवाईत सहभागी होत असतात ते पाहता त्यांना टोपणनाव घ्यावं लागणं हे साहजिकच आहे.
मार्क आयुष्यभर अमेरिकेच्या स्पेशल कमांडो पथकात होता. हे कमांडो हसत नाहीत. बोलत नाहीतच नाहीत. त्यांच्या मनाचा दगड झालेला असतो. भावनाशून्यता म्हणजे काय हे त्यांच्याकडून समजून घ्यावं किंवा गीतेतला स्थितप्रज्ञ पाहायचा असेल तर तो या कमांडोत सहज पाहायला मिळेल. आपण बरं आणि आपलं काम बरं ही त्यांची वृत्ती. इतकी ती त्यांच्यात मुरलेली असते की आपल्या हातातली बंदुकीची नळी आणि लक्ष्य याशिवाय त्यांना कशाचंही काहीही पडलेलं नसतं. तर अशा अवस्थेत मार्कनं बराच काळ घालवला. अमेरिकेच्या इराक सील या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अतिविशिष्ट अशा खास कमांडो पथकात तो दहा र्वष होता. इराक आणि अफगाणिस्तानात त्यानं बऱ्याच मोहिमेत भाग घेतला. अफगाणिस्तानात तर एका उंच ठिकाणी आo्रयाला असलेल्या तालिबान्यांना कंठस्नान घालण्याची जबाबदारी त्याच्या पथकावर होती. त्याचं वाचतानाही अंगावर काटा येईल असं वर्णन त्यानं केलंय. त्याची दोनेक जणांची तुकडी पोटावर झोपून अगदी मिलिमीटरनं अंतर पार करत तालिबानी राहिले होते त्या ठिकाणी पोचली आणि सगळेच्या सगळे झोपेतच टिपले गेले. या कारवाईची माहिती देऊन मार्क लिहितो: आम्ही कोणाला जिवंत वगैरे पकडायच्या फंदात पडत नाही.. थेट मारूनच टाकतो.. उगाच नंतर त्रास नको. मारूनच टाकलं की काही शिल्लक राहत नाही.. त्या अर्थानं मी काय आणि माझे सहकारी काय आम्ही किलिंग मशीनच आहोत.
म्हणजे हत्यायंत्र.. होकायंत्र असतं तसं हे हत्यायंत्र.
अन्य साऱ्या माणसांसारख्याच भावभावना असलेल्या हाडामांसाच्या माणसांची ही हत्यायंत्रं कशी बनतात? मार्क त्याच्या या पुस्तकातून या कमांडो प्रशिक्षणाचाही तपशील सादर करतो. आपण ही हत्या करतोय ते कोणासाठी.. हे योग्य की अयोग्य असे प्रश्न आम्हाला कधीही पडत नाहीत, असं मार्क सहजपणे सांगून जातो. म्हणजे रणांगणावर या मंडळींचा कधीही अर्जुन होत नाही. हे सगळं कशामुळे शक्य होतं? आमचं प्रशिक्षण इतकं चोख असतं की प्रत्यक्ष हत्येचा किंवा मरण्याचा असा कोणताही क्षण आला तरी हृदयात धडधड वगैरे प्रकार जरासुद्धा घडत नाहीत.. असं तो अनुभवाने सांगतो. ते सगळंच मुळात वाचायला हवं असं आहे. खरं तर साध्या सैनिकांचं प्रशिक्षणही तसं भावनाशून्यच असतं, पण त्यापेक्षाही अधिक कडवे असे हे कमांडो असतात. मार्क लिहितो: साधे सैनिक असतात ते दिवसभर तिथल्या जनतेशी बोलण्याचा वगैरे प्रयत्न करतात.. वेगवेगळ्या प्रकारे मन वगैरे वळवण्याचा ते प्रयत्न करतात.. शत्रुपक्षातल्यांना जिंकून घ्यावं अशी त्यांची इच्छा असते.. पण त्यांचं काम संपलं की आमचं सुरू होतं.. अंधार पडल्यावर. आम्ही जातो आणि सरळ ठारच करून टाकतो समोरच्यांना.
तेव्हा अशा या माणूस नावाच्या हत्यायंत्र पथकाकडे ओसामा बिन लादेनला टिपण्याची जबाबदारी दिली गेली. ती देताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हणे इच्छा व्यक्त केली होती की, शक्यतो ओसामा बिन लादेन याला जिवंतच पकडा म्हणून. ते ऐकल्यावर पहिल्यांदा मार्क आणि मंडळींच्या चेहऱ्यावरची माशी हलली म्हणे.. जिवंत ठेवायचंय, मग आमचं काम काय? या प्रश्नाने ही हत्यायंत्रं कावरीबावरी झाली होती, पण त्यांना त्यांच्याच पथक प्रमुखानं नंतर सांगितलं.. अध्यक्षांची इच्छा आहे.. हो म्हणा.. ती काही पाळायलाच हवी असं नाही..
ही सगळी पाश्र्वभूमी सांगून मार्क त्यांच्या सील पथकानं अबोताबाद इथं मोहिमेवर निघण्यापूर्वी केलेल्या तयारीची माहिती देतो, ती वाचल्यावर थक्क व्हायचंदेखील आपण विसरतो. मार्कनं लिहिलंय की, जेव्हा त्याला सांगण्यात आलं की ओसामा राहतोय त्या घराच्या अंगणावर किंवा गच्चीवर हेलिकॉप्टर थांबवून दोराच्या साहय़ानं खाली उतरायचं आणि ओसामाच्या खोलीत घुसायचं, तेव्हा त्यानं प्रश्न विचारला कोणत्या दरवाजातून. तेव्हा उत्तर देताना ही माहिती देणाऱ्या अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेनं ओसामा कोणत्या खोलीत झोपलेला असेल त्याची माहिती.. त्या खोलीला दरवाजे किती.. ज्या दरवाजातून प्रत्यक्ष आत शिरायचं तो दरवाजा आतल्या बाजूला उघडतो की बाहेरच्या इतक्या तपशिलासकट सादर केली. यावरून अमेरिका नावाच्या महाप्रचंड सुरक्षा यंत्रणेच्या ताकदीचा अंदाज यावा. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी ओसामाच्या घरासारखंच घर, आसमंत अमेरिकेत तयार करण्यात आला आणि त्याचा सराव या मंडळींकडून घोटून घेण्यात आला. त्यातला एक सराव पाहायला अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी अधिकारी जातीनं हजर होते.
ही कारवाई जेव्हा सुरू झाली तेव्हा लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. या मंडळींचं प्रशिक्षण इतकं चोख होतं की, असं काही होऊ शकतं ही शक्यताही त्यांनी गृहीत धरलेली होती. त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळणार हे जेव्हा नक्की झालं तेव्हा त्या चालकानं ते उजव्या कुशीवरच पडेल अशी व्यवस्था केली. त्या बाजूला हेलिकॉप्टरच्या शेपटाकडचा पंखा होता. तो आधी जमिनीवर..आणि त्यातही कुंपणावर आदळला.. आणि मगच ते हेलिकॉप्टर कोसळलं. त्यामुळे त्यातल्या सगळ्यांचा जीव वाचला.
इतका सगळा धोका पत्करून जेव्हा मध्यरात्री ही तुकडी ओसामाच्या खोलीत घुसली तेव्हा पहिला जो कमांडो आत गेला त्याने ओसामाला थेट गोळी घातली. मार्क लिहितो की, त्याला आठवलंही नाही शक्य झालं तर ओसामाला जिवंत पकडायचं असं सांगण्यात आलंय ते. पहिल्याच्या पाठोपाठ दुसरा कमांडो आत गेला तेव्हा त्याला लक्षात आलं की पहिल्याची गोळी ओसामाला लागलीये, तो जमिनीवर पडलाय.. पण तरी तो जिवंत आहे. तेव्हा त्या दुसऱ्या कमांडोने काय करावं? त्यानंही थेट गोळ्याच घातल्या आणि ओसामा गतप्राण झाला. आपण इतके आक्रमक आहोत की जिवंत कसं काय ठेवू शकतो कोणाला.. असाच प्रश्न त्यांना पडला.
ही मोहीम जेव्हा फत्ते झाल्याचा संदेश गेला आणि मेलाय तो खरोखर ओसामाच होता याची जेव्हा खात्री पटली तेव्हा या मोहिमेच्या सूत्रधारांत असलेल्या गुप्तहेर अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मार्कनं नोंदवलीये. इतकी जोखमीची कामगिरी यशस्वी झाली तर सगळ्यांना आनंद व्हायला हवा होता.. पण मार्क लिहितो.. ती सीआयएची अधिकारी, मेलाय तो ओसामाच आहे याची खात्री पटल्यावर ढसढसा रडली.
मार्कच्या या पुस्तकानं बरेच वाद झाले. त्याने सांगू नये इतका तपशील सांगितलाय का, असेही प्रश्न चर्चिले गेले.
पण वाचक या नात्याने त्या वादांचा आपल्याशी काय संबंध? उत्तम वाचनीय मजकूर आहे, तेव्हा तो वाचायलाच हवा. मार्कला तो सादर करण्यात या विषयातला तज्ज्ञ केविन मॉरर यानं इतकी उत्तम मदत केलीये, की वाचताना संपूर्ण प्रसंग समोर उलगडत जातात.. जणू आपण ते समोरच बघतोय..
खरं तर हत्यायंत्रांच्या कारवायांचा असा आनंद लुटणं वाईटच, पण..
(वि.सू.: पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी लेखकाकडे विचारणा करू नये.)
नो ईझी डे : द फर्स्ट हॅण्ड अकाउंट ऑफ द मिशन दॅट किल्ड ओसामा बिन लादेन
मार्क ओवेन आणि केविन मॉरर,
प्रकाशक : पेंग्विन
पाने : ३१६, किंमत : ४९९ रुपये.
बुक-अप : हत्यायंत्र
खरं तर अशा हत्यायंत्रांच्या कारवायांचा आनंद लुटणं वाईटच.. पण ही हत्या दस्तुरखुद्द ओसामा बिन लादेन याची आहे. ती करणाऱ्या अमेरिकेच्या विशेष कमांडोंपैकी एकानं तिची ही अद्भुत कथा लिहिली आहे. कमांडोंची काम करण्याची पद्धत आणि त्यांची कार्यशैली याची ही अंगावर काटा आणणारी कहाणी.. एका ‘हत्यायंत्रा’नंच सांगितलेली..
आणखी वाचा
First published on: 02-02-2013 at 04:56 IST
मराठीतील सर्व बुक-अप! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book up murderd weopen