एफबीआय आणि सीआयए. एक अमेरिकेची देशांतर्गत पोलिसी तपास आणि अंमलबजावणी यंत्रणा, दुसरी आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी संघटना. या दोघींचा संबंध एरवी एकमेकींशी येत नाही, तो गेल्या काही दिवसांत आला आणि सीआयएच्या प्रमुखांना एफबीआयच्या तपासामुळे पद सोडावं लागलं. या दोन यंत्रणांवरची पुस्तकं, अमेरिकी पत्रकारांनी लिहिलेली.. सुरक्षा यंत्रणा चालतात कशा, हे लक्षात येण्यासाठी वाचली पाहिजेत अशी. अभ्यासपूर्ण, त्यामुळेच अनेक सुरस गोष्टीदेखील खुल्या करणारी..
गेल्या आठवडय़ात अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेचे, म्हणजे सीआयएचे प्रमुख डेव्हिड पेट्रस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. झालं असं की, त्यांची एक चरित्रकार होती, पॉला ब्रॉडवेल नावाची, तिच्याच ते प्रेमात पडले. ही पॉला त्यांच्याबरोबर अफगाणिस्तानला वगैरे जायची. पेट्रस यांचं तिनं लिहिलेलं चरित्रही विख्यात आहे. पेट्रस अमेरिकी सैन्यदलाचे अत्यंत नावाजलेले लष्करी अधिकारी. त्यांच्या छातीवरची पदकं पेट्रस यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. अमेरिकेच्या अफगाणिस्तान आणि परिसरातील कारवाईचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. त्या परिसरात लष्कराची त्यांनी केलेली उभारणी ही संरक्षणतज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. ३७ वर्षांची त्यांची कारकीर्द गेल्या आठवडय़ात संपुष्टात आली.
त्यांचं हे पॉला प्रकरण उघडकीस आलं तेही योगायोगानं. पेट्रस यांच्याशी संबंधित अन्य एका महिलेला धमकीचे निनावी ई-मेल्स येत होते. त्यांचं प्रमाण फारच वाढल्यावर तिनं अमेरिकेच्या पोलिसांकडे, म्हणजे एफबीआयकडे, तक्रार केली. त्यावर एफबीआय शोध घेत असताना त्यातल्या काही ई-मेल्सचा एक कोन थेट पेट्रस यांच्यापर्यंत पोहोचला. मग एफबीआयनं पेट्रस यांच्या संगणकाची तपासणी केली. त्यात त्यांनी पॉला हिला पाठवलेली काही मेल्स मिळाली. पॉलाच्या संगणकाची तपासणी केली. तिच्या संगणकावर तिनं पेट्रस यांना पाठवलेले शेकडो मेल्स मिळाले. या टप्प्यावर मग पेट्रस यांनी कबुली दिली आणि ते पदावरनं पायउतारच झाले.
मुद्दा अर्थातच पेट्रस आणि पॉला का कोण ती, हा नाही, तर तिकडे पोलिसांना राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणाप्रमुखाच्या विरोधात चौकशी करता येते, हा आहे. म्हणजे आपल्याकडच्या हवालदाराने थेट सीबीआयप्रमुखाचीच चौकशी करण्याइतकं अशक्यप्राय ते आहे. अर्थात अशक्यप्राय आहे ते आपल्याकडे. तिकडे नाही. बिल क्लिंटन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी असतानादेखील एफबीआयचे तिथले हवालदार सहजपणे महासत्ताप्रमुखाची चौकशी करीत होते. तेव्हा पेट्रस प्रकरण गेल्या आठवडय़ात घडल्यावर माझ्या संग्रहातल्याच तीन पुस्तकांची आठवण झाली. तीनही अप्रतिम आहेत. सुरक्षा यंत्रणा चालतात कशा, त्या किती उत्तम/वाईट आहेत हे समजून घ्यायचं असेल तर ही तीनही पुस्तकं वाचायलाच हवीत आणि गुप्तहेर यंत्रणांची माहिती वगैरे वाचणं तसं रोचकही असतं. तेव्हा त्या अर्थानंही ही तिन्ही पुस्तकं अभ्यासेतर वाचकांनाही आनंद देतील.
यातलं पहिलं आहे ते द एफबीआय या नावाचं. ‘द एफबीआय : इनसाइड द वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल लॉ एन्फोर्समेंट एजन्सी’ असं त्याचं पूर्ण नाव. लेखक आहे रोनाल्ड केस्लर. हा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ यांसारख्या बडय़ा वृत्तपत्रांत शोध पत्रकार म्हणून काम करत होता. त्या अर्थाने रोजच्या बातमीचा विषय म्हणूनही त्याचा सुरक्षा यंत्रणांशी संपर्क येत होता. तिकडे बरेच चांगले पत्रकार रोजच्या पोटापाण्याच्या बातमीदारीत न वापरला गेलेला मजकूर पोटात ठेवून देत असतात. रोज कामाच्या धबडग्यात जी काही माहिती मिळत असते ती सगळीच्या सगळी काही बातमीत वापरली जात नाही. मग बातम्यांतून शिल्लक राहिलेल्या मजकुराला मुरवत मुरवत त्यातून बातमीपेक्षा किती तरी काळ जिवंत राहू शकेल अशा पुस्तकाची निर्मिती ते करतात. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखक हे पत्रकार असतात तिकडे. अशा काही चांगल्या पत्रकारांतला एक रोनाल्ड. विषयाचा पूर्ण आवाका आणि तो सादर करण्यासाठी जोडीला अभ्यास. त्यामुळे ‘एफबीआय’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालं आहे.
वास्तविक आपल्याकडेही o्रीकांत सिनकर, विनायक वाकटकर, रमाकांत कुलकर्णी वगैरे गुन्हेगारी, पोलिसांवर लिहिणारी मंडळी होऊन गेली. यांचं लिखाण वाचणं म्हणजे मजा असायची, पण ती फक्त गुन्हेगारी कथा वाचण्यापुरतीच मर्यादित राहिली. एका ठराविक वयात जसं प्रेमकविता वगैरे आवडतात, तसंच गुन्हेगारी, शौर्यकथाही आवडतात. त्या इयत्तेतून आपण वर गेल्यावर या अशा पुस्तकांचं वाचन मागे पडतं. कारण ऐतिहासिक दस्तावेज म्हणून हे लेखन काळावर उरून राहत नाही. केस्लर, बॉब वूडवर्ड वगैरे लेखकांचं असं होत नाही. ते पुढच्या काळासाठी म्हणून लिहीत असतात. केस्लर यांचं हे पुस्तक याची साक्ष देतं.
देशांतर्गत गुन्ह्यांचं तपासकाम आणि शिवाय अंतर्गत गुप्तहेर यंत्रणा असं दुहेरी काम एफबीआय करते. म्हणजे अमेरिकेला परदेशात हेरगिरी करायची असेल तर सीआयए आहे. देशातल्या देशात हेरगिरी करायची असेल तर ते काम एफबीआयचं, अशी ती विभागणी आहे. जवळपास शंभराहून अधिक वर्षांची जुनी ही यंत्रणा. तिच्या प्रवासात अनेक गमतीशीर, गंभीर असे प्रसंग आले. तिची स्थापना केली जे एडगर हूवर यांनी. म्हणजे त्यांच्या आधी ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अशा नावाची यंत्रणा होती. हूवर यांनी ती अधिक चांगली, कार्यक्षम करून त्यातून एफबीआय जन्माला घातली. त्यांतला त्यांचा वाटा इतका मोठा होता की, ते मरेपर्यंत या संघटनेचे प्रमुख होते. १९७२ साली ते गेले तेव्हा ७७ वर्षांचे होते. म्हणजे तोपर्यंत त्यांच्याकडे या यंत्रणेची सूत्रं होती. म्हणजे तब्बल ४८ र्वष ते या प्रचंड यंत्रणेचे प्रमुख होते. तेव्हा माणूस कसा असेल याचा अंदाज यावा. नवीन कोणी गुप्तहेर सेवेत लागला की, त्याची हूवर यांच्याबरोबरची पहिली भेट हे मोठं प्रकरण असायचं. या गुप्तहेरांनी कपडे कसे घालावेत, दिसावं कसं याबद्दल हूवर खूप चोखंदळ होते. आपले कर्मचारी ढेरपोटे असता नयेत, त्यांची कपडय़ांची जाण सुसंस्कृत असायला हवी, भाषेत मार्दव हवं.. अशा अनेक अटी त्यांच्या असायच्या. काही जणांवर ते केवळ तुंदिलतनू आहेत, जास्तच टकलू आहेत.. घामट आहेत या कारणांसाठी हूवर यांनी कारवाई केल्याचे दाखले आहेत. हस्तांदोलन करताना समोरच्याचे हात कोरडेच असायला हवेत यावर त्यांचा कटाक्ष असायचा. नंतर त्यांच्याबाबतीत अनेक दंतकथा बनल्या. हूवर राजकीय विरोधकांची गुप्त माहिती कशी जमा करतात, फोन कसे टॅप करतात वगैरे. त्यांची इतकी दहशत होती म्हणे एके काळी की, एखाद्या प्रकरणात हूवर चौकशी करतायत म्हटल्यावरच म्हणे गुन्हेगारांना धडकी भरायची. त्यांच्याविषयी असं लिहिलं गेलं होतं त्या वेळी की, एखाद्याला घाबरवण्यासाठी हूवर यांना काहीही वेगळं करावं लागत नाही. कारण हूवर म्हणजेच मूर्तिमंत भीती किंवा भीतीचं दुसरं नाव म्हणजे हूवर.
त्यांचा असा हा लौकिक का होता, हे या पुस्तकावरनं सहज कळावं. एखादी यंत्रणा सामथ्र्यवान का आणि कशी होते, हे समजून घेणं आवश्यक असतं. तसं केलं की आपणही कुठे कमी पडतो, ते कळायला लागतं. एफबीआय वाचताना या कमीपणाची जाणीव शब्दाशब्दांवर होते. आवश्यक असतं ती करून घेणं.
तेव्हा नुसतं एफबीआय वाचून चालत नाही. त्यासाठी सीआयए हेदेखील वाचावं लागतं. सीआयएवर अनेक पुस्तकं आहेत. माझ्याच संग्रही किमान पाच असतील. त्यातलं बॉब वूडवर्ड याचं ‘व्हेल : द सीक्रेट वॉर्स ऑफ सीआयए’ हे आधीच वाचलं होतं आणि त्याचा परिचयही बुक-अपमध्ये एकदा झाला होता. त्यात इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री सीआयएचं काम करत होते, असा उल्लेख आढळल्याने सीआयए नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेली आहे. त्याआधी सेमुर हर्ष या पत्रकारानं मोरारजी देसाई यांच्या संदर्भातही असा उल्लेख केल्यानं देसाई चिडले होते. त्यांनी हर्ष याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता, तेही आठवत होतं. तेव्हा सीआयएवर वाचणं हे फारच मजेशीर असतं. तेव्हा एफबीआय घेतलं तेव्हाच ‘द सीआयए अ‍ॅट वॉर : इनसाइड द सीक्रेट कॅम्पेन अगेन्स्ट टेरर’ हेही विकत घेतलं होतं. एफबीआयप्रमाणे त्याचाही लेखक रोनाल्ड केस्लरच आहे. वास्तविक त्यानं ‘सीआयए’ आधी लिहिलं. मग ‘एफबीआय.’
दुसरं महायुद्ध संपत असताना असलेल्या यंत्रणेतून सीआयएचा जन्म कसा झाला इथपासून ते २००३ सालच्या अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या इराकदहनापर्यंत या पुस्तकाचा आवाका आहे. सुरुवातीला या सीआयएच्या मंडळींना आपण कसं जगावर राज्य करण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत, हे कसं वाटायचं आणि ते शीतयुद्धाच्या काळात कसकशा आचरट मोहिमा आखायचे याचा गमतीशीर तपशील यात आहे. क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो हा अमेरिकेच्या आवडत्या शत्रूंपैकी एक. त्याला सत्तेवरून खेचण्यासाठी अमेरिकेनं- आणि त्यातही सीआयएनं- नाना उद्योग केले. एकदा तर सीआयएनं अशी गुप्त योजना आखली होती की त्यातून कॅस्ट्रोची दाढीच गळून पडणार होती. एकदा का दाढी गळाली की कॅस्ट्रोविषयी जनतेच्या मनात आदर राहणार नाही आणि मग त्याची सत्ता उलथणं सोपं जाईल, असा विचार या यंत्रणेनं केला होता. पण कॅस्ट्रोची दाढीही गळाली नाही आणि त्याला पदच्युतही करता आलं नाही. या आणि अशा अमेरिकेच्या सगळ्या साहसवादी उद्योगांचा धांडोळा यातून घेता येईल. अफगाणिस्तानात या यंत्रणेनं तालिबान्यांच्या विरोधात काय काय केलं, इराकमधल्या कारवायांचा तपशील असा बराच वाचनीय मालमसाला यात आहे.
एके काळी सीआयए ही महाराष्ट्राच्या राजकारणातल्या शरद पवार यांच्यासारखी होती आपल्याकडे. म्हणजे महाराष्ट्रात जसं काहीही झालं तरी त्यामागे पवार यांचा हात असल्याचं सर्रास बोललं जातं, तसंच जगात कुठेही काहीही घडलं तरी त्यामागे सीआयए असल्याचं सांगितलं जातं, पण ही यंत्रणा खरोखरच इतकी कार्यक्षम आहे का?
या उत्तरासाठी ‘लीगसी ऑफ अ‍ॅशेस: द हिस्टरी ऑफ द सीआयए’ हे वाचणं अत्यावश्यक. त्याचं वर्णन केवळ अप्रतिम असंच करायला हवं. टिम वेनर हा पुस्तकाचा लेखक आहे. टिम हा ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकात सीआयएसंदर्भात बातमीदारी करीत होता. जवळपास ३० हजार मूळ कागदपत्रं आणि तीनशेपेक्षा अधिकांच्या प्रत्यक्ष मुलाखती यांचा सबळ आधार या पुस्तकाला आहे. त्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढली आहे यात शंका नाही. त्याचबरोबर या विश्वासार्ह माहितीची मांडणीही टिम यानं मोठय़ा रसाळपणे केली आहे. आपल्या भोवतालचं जग समजून न घेताच सीआयए ते बदलायचा प्रयत्न कसा करते, याचा सुरस इतिहास यात आहे. शिवाय या यंत्रणेविषयी बाहेर कसं बरंच काय काय समजलं जातं आणि ते कसं काय अतिरंजित आहे हे या पुस्तकातून कळतं.
१९७१ साली हेन्री किसिंजर चीनला गेले असताना तिथले पंतप्रधान चौ एन लाय यांनी सीआयएच्या उद्योगांविषयी त्यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा किसिंजर म्हणाले, तुम्हाला वाटतीये तितकी काही ताकदवान यंत्रणा नाहीये ती. त्यावर चौ एन लाय म्हणाले, पण जगात काहीही झालं की त्यामागे सीआयए असल्याचं मानलं जातं. ते ऐकून किसिंजर म्हणाले, ते खरं असतं तर त्यांनाही ते आवडलं असतं.. पण दुर्दैवानं ते तसं नाहीये.
काही प्रमाणात किसिंजर यांचं खरंही असावं. कारण १९४९ साली सोव्हिएत रशियानं अणुस्फोट केला त्याचा या यंत्रणेला थांगपत्ता नव्हता. पुढे १९६३ साली सीआयएनं इराकात बाथ पक्षाला सत्तेवर येण्यासाठी मदत केली. याच पक्षाचा एक तरुण सदस्य होता. त्याचं नाव सद्दाम हुसेन. याच्या वळणवाकांचा अंदाज सीआयएला आला नाही. १९७३ च्या अरब-इस्रायली युद्धाचा वासदेखील सीआयएला आला नाही. १९७९ साली इराणमध्ये क्रांती होऊन अयातोल्ला खोमेनी सत्तेवर आले, ते कसे असतील याची कसलीही गंधवार्ता या सीआयएला नव्हती. कहर म्हणजे १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळून शीतयुद्धाचा अंत होत असताना सीआयएला डुलकी लागली होती. असे अनेक तपशील यात आहेत.
गंमत म्हणजे सीआयएचं दडपण फक्त जगात इतरांनाच असतं असं नाही. सत्तेवर येणाऱ्या अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षालाही या यंत्रणेच्या ताकदीविषयी, महत्त्वाविषयी गैरसमज असतात. यातल्या काहींना कळतं सीआयए किती पोकळ आहे ते. काहींना काहीच कळत नाही. ज्यांना कळतं ते सीआयएला कहय़ात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना कळत नाही, त्यांना सीआयए कहय़ात ठेवते.
सीआयएला आवरू पाहणारा अलीकडचा अध्यक्ष म्हणजे ड्वाइट आयसेनहॉवर. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांना लक्षात आलं, या बडय़ा सीआयएच्या घराचा वासा खूपच पोकळ आहे ते. हे समजल्यावर त्यांनी त्या वेळचे सीआयएचे प्रमुख अ‍ॅलन डल्लास यांना बोलावून फैलावर घेतलं. तुमच्यामुळे गेली आठ र्वष मला फक्त पराभवच सहन करावा लागलाय.. त्यामुळे मी मागे सोडून जातोय तो तुमचा हा राखरांगोळीचा वारसा.. असं ते डल्लास यांना म्हणाले.
    त्यालाही आता साठ र्वष होऊन गेली. यंदा ११ सप्टेंबरला लिबियातल्या बेंगाझी इथं अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला. तिथे सीआयएचा गुप्त तुरुंग होता म्हणून हा हल्ला झाल्याचं अगदी सुरुवातीच्या परिच्छेदात उल्लेख झालेल्या पॉला बाई म्हणाल्या होत्या म्हणे. त्यांना ही माहिती पेट्रस यांच्याकडून मिळाली का, याची चौकशी आता सुरू आहे. म्हणूनही त्यांना सीआयएचा राजीनामा द्यावा लागलाय.
थोडक्यात या राखेचा वारसा अजूनही पुसला गेलेला नाही.

१. द एफबीआय: इनसाइड द वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल लॉ एन्फोर्समेंट एजन्सी.
–  रोनाल्ड केस्लर.
प्रकाशक:  कॉर्गी बुक्स
पृ.: ६२८; किंमत: ९.९९ डॉलर
२. द सीआयए अ‍ॅट वॉर : इनसाइड द सीक्रेट कॅम्पेन अगेन्स्ट टेरर
– रोनाल्ड केस्लर
प्रकाशक :  सेंट मार्टिन्स ग्रीफिन, न्यूयॉर्क
पृष्ठे: ३७८; किंमत: १४ डॉलर
३. लीगसी ऑफ अ‍ॅशेस: हिस्टरी ऑफ द सीआयए
– टिम वेनर
प्रकाशक : अँकर
पृष्ठे: ७०२; किंमत: १३.९९ डॉलर

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
Story img Loader