कादंबरीकार ओऱ्हान पामुक यांची वाचकप्रियता ही काही केवळ तुर्कस्तानी कथानके वा तुर्कस्तानचे वास्तव-दर्शन यावर मोजली जात नाही. मानवी भावनांचे चित्रण ते तरलपणे करतात आणि सरळ गोष्ट न सांगतासुद्धा गोष्ट वाचकामध्ये भिनते, हे त्यांच्या कादंबऱ्यांच्या यशाचे दोन पैलू आहेत. हे दोन्ही पैलू ‘द सायलेंट हाउस’ या कादंबरीत दिसतात. अस्वस्थतेची सद्यकालीन रूपे आणि त्या अस्वस्थतेमागची कालातीत मानुषी कारणे या दोघांनाही स्पर्श करणारी ही कादंबरी आहे. ‘आम्ही असे (हिंसक कृत्य) करून दाखवू की जगाला आमची दखल घ्यावीच लागेल’ असे म्हणणारा हसन किंवा तुर्कस्तानातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची स्वप्ने पाहणारा आणि अख्खी सुट्टी बडय़ांच्या पोरांप्रमाणे पाटर्य़ा-डान्स यांत घालवू पाहणारा मतीन, तुर्कस्तानी इतिहास व परंपरांत इतकी शक्ती आहे की जगाच्या इतिहासामागे तुर्कस्तानच आहे, असे देशप्रेमातून नव्हे तर अभ्यासू वृत्तीच्या अतिरेकामुळे मानणारा फारुक, साम्यवादातल्या रोमँटिक आदर्शवादी प्रवाहाचा आधार शोधणारी निल्गुन, घरदार शाबूत राहिले, पण माणसे गेली आणि होती किंवा आहेत तीही माणसे आपली नाहीतच अशा विचित्र आयुष्यातून जाणारी ९० वर्षांची फातिमा आणि तिच्याकडे नोकरासारखेच काम करणारा, पण प्रत्यक्षात तिचा सावत्र मुलगा- तिच्या नवऱ्याचा दासीपुत्र- रिसेप अशा सहा पात्रांमध्ये घडणारी ही कहाणी. यातले प्रत्येक पात्र एकेका प्रकरणातून वाचकाशी बोलते. आपण काय केले, कुठून कुठे गेलो, कोणाशी काय संवाद झाला एवढे हे निवेदन साधे नाही. मनातले विचार मांडताना राजकीय परिस्थितीवरले भाष्य, आठवणींमधून गतकाळाचे दर्शन, इच्छा आणि आकांक्षांभोवती रुंजी घालणारे मनोगूज आणि त्यातून वाचकाला त्या पात्राची कणवच वाटेल इतकी त्याच्या अस्वस्थतेमागील निष्कपट कारणांची (शोकांतिकेच्या परिभाषेत, शोकांत अटळच का आहे याच्या कारणांची म्हणजेच ‘हॅमॉर्शिया’ची) स्पष्ट मांडणी, असे बरेच काही वाचकापर्यंत पोहोचत असते.
इस्तंबूलपासून जरा लांबच्या, पण आता इस्तंबूलचे उपनगर ठरत असलेल्या खेडय़ात फातिमा दुमजली जुन्या घरात वर्षांनुवर्षे एकटीच राहते आहे. तरुण-तुर्क विचारांचा तिचा पुरोगामी नवरा वारला आणि मुलाचेही त्याच असाध्य आजाराने निधन झाले, असा उल्लेख येतो. तेव्हापासून फारुक आणि मतीन हे फातिमाचे नातू आणि निल्गुन ही नात दूरच्या गावी राहतात. रिसेप या सावत्र मुलाकडून नोकरासारखीच कामे करवून घेताना फातिमा सारखी कुरकुरत असते. खाष्टपणाही करते. तिच्याच त्या जुन्या घरातील छोटय़ा खोलीत राहणारा रिसेप यातले काहीच मनाला लावून घेत नाही. तो बुटका आहे आणि उंची नसल्याने त्याला स्वत:चा संसारही थाटता आलेला नाही, हे त्याचे दु:ख आहे. त्याच्या भावाचा (दोघांचे वडील निरनिराळे, आई एक) संसार टेकडीवर गरीब वस्तीत आहे, तर फातिमाचे घर समुद्रकिनारी. त्या भावाचा हसन हा मुलगा. रिसेपचा पुतण्या. त्याने शिक्षण अर्धवट सोडले आहे आणि बापाप्रमाणेच तोही लॉटरीची तिकिटे विकतो आहे. आपल्या वसई- पालघरसारखे हे गाव आता वाढते आहे. त्यामुळे तुर्की चहाच्या टपऱ्यांसोबत आता येथे डिस्कोदेखील आले आहे. इस्तंबूलला नोकऱ्या करणारी पुरुषमंडळी, रात्री नऊ-साडेनऊला जेवणे झाली की बायकोला आइस्क्रीम खायला नेतात. अशा गावात, मे १९८० मध्ये फातिमाची तरुण नातवंडे सुट्टीत तिला भेटायला येतात, तेव्हापासून ही कादंबरी सुरू होते आणि प्रकरणे ३२, पानेही तीनशेच्या वर, असा पसारा असला तरी महिन्याभरात संपतेही.
कळकट, कोंदट झालेले फातिमाचे घर नातवंडांच्या येण्याने जरा उजळते. अर्थात, घर असे असल्याचे मोठय़ा फारुकला काही वाटत नाही, कारण तो आजोबांप्रमाणेच इतिहास-संशोधक असतो. त्यांच्याच खोलीत त्यांची पुस्तके धुंडाळून, तुर्कस्तानची खरी ओळख जगाला घडवून देण्याचा त्यांचा अशक्यप्राय महाप्रकल्प पूर्ण करण्यासाठी तो झटू लागतो. अमेरिकेच्छू मतीन जास्तीत जास्त वेळ या घराबाहेर काढतो आणि निल्गुनदेखील तिच्या आवडत्या रशियन कादंबऱ्या वाचत बसण्यासाठी घरी न थांबता जवळच्याच समुद्रकिनारी जाणे पसंत करते.
१९८०च्या सुमारास तुर्कस्तानात जे काही होत होते, त्याचे फायदे-तोटे या तिघा तरुणांना होत राहतात. त्या देशात १९८३ साली लष्करी उठाव झाला. त्यापूर्वी लोकांचा असंतोष मिळेल त्या वाटेने बाहेर पडत होता, असे हे वर्ष. कम्युनिस्ट अफगाणिस्तानात घुसण्यावर थांबणार नसून आपलाही घास घेतील, ब्रेझनेव्ह आणि कार्टरनेच तुर्कस्तानचे तुकडे करण्याची योजना आखली आहे, अशा अफवांवर लोकांचा विश्वास बसतो आहे. ‘जम्हूरियत’ या साम्यवादी वृत्तपत्राऐवजी ‘हूरियत’ हे इस्लामी दैनिक अधिक वाचले जाते. निल्गुन ‘जम्हूरियत’ वाचते, तर हसन ‘हूरियत’. ती स्वतंत्र विचारांची, थोराघरची, तर हा गरीब बापाचा आणि वस्तीतल्या पोरांच्या नादी लागून कडवा इस्लामवादी होणारा. सुंदर दिसणारी निल्गुन ही हसनची कधीकाळची बालमैत्रीण. तिच्यावर आता त्याचे एकतर्फी प्रेम आहे. ते ती झिडकारते. त्याची किंमत तिला मोजावी लागते. हिंसाचार हाच जगाला आपले म्हणणे ऐकायला लावण्याचा मार्ग, असे मानणारा हसनच ती किंमत वसूल करून घेतो आणि दूरची गाडी पकडून निघूनही जातो.. तो दिवस केवळ हसनच्याच नव्हे, तर त्याच्या अनेक मित्रांच्या आयुष्यात हिंसाचाराचा दिवस ठरलेला असतो. सात शहरांत बवाल करण्याची योजनाच असते. गाडी पकडण्यापूर्वी हसन अधाशीपणे पाहतो.. किती छापून आलेय आपल्या योजनेच्या यशाबद्दल.. बाराच ठार आणि निल्गुनबद्दल काहीच नाही, म्हणून तो काहीसा खट्टच होतो.
रगेल- हिंसक रेमेडोकेपणा असो की चढेल आत्ममग्नतेतून आलेला तिरस्कार, वैवाहिक जीवन नासविणारे दु:ख असो की बुटकेपणाचा न्यूनगंड, तऱ्हेवाईकपणा इतिहासप्रेमी असो की अमेरिकाधार्जिणा.. ही सारी वैशिष्टय़े दुसऱ्याला कमी-अधिक प्रमाणात दुखावण्यासाठी पुरेशी ठरतात आणि त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात ज्याचे त्याचे स्वभावगुण ज्याला-त्याला छळतच असतात, हा धडा वाचकापर्यंत पोहोचवण्यात लेखक ओऱ्हान पामुक हे यशस्वी होतात. मानवी अस्वस्थता कशातून यावी, याला धरबंध नाही. अस्वस्थता ही कालातीत प्रवृत्ती असली तरी तिची कारणे इतिहासाच्या कालखंडांगणिक निरनिराळी असू शकतात.. त्या बदलत्या अस्वस्थतेचा पामुक यांनी मांडलेला, वर्णिलेला हा इतिहास मात्र समकालीन आहे.
मूळ तुर्की भाषेत ही कादंबरी १९८३ सालीच प्रकाशित झाली होती. उण्यापुऱ्या तीन दशकांनंतर ती इंग्रजीत आली आहे. या २९ वर्षांत बरेच संदर्भ बदलले. साम्यवादी सोविएत संघराज्य नामशेष झाले आणि त्या विचारधारेकडे तरुण मंडळी जितक्या सहजपणे ३० वर्षांपूर्वी ओढली जात, तसे होईनासे झाले. मधल्या काळात इस्लामवादी हिंसाचार मात्र वाढला. इतका की, ‘आमची दखल जगाला घ्यावी लागेल’ ही हसनची दपरेक्ती या कादंबरीच्या तुर्की वाचकांना त्या वेळी जितकी बेअक्कल वाटली असेल, तितकी ती वाटणे ११ सप्टेंबर २०११ नंतर अशक्य झाले आहे. आणि हो, आपले पालघरही बदलते आहेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा