बोस्टन येथील हल्ल्यामागील सूत्रधारांचा छडा लावण्यात अमेरिकेस यश येईल यात शंका नाही. परंतु बोस्टनमध्ये काय झाले याचे आपणही विश्लेषण केल्यास बोस्टन अनुभवातून काय शिकता येईल, याची जाणीव आपल्याला होईल.
आंतरराष्ट्रीय दहशतवादास अनेक चेहरे आहेत आणि त्यातील कोणता चेहरा बोस्टन येथील बॉम्बस्फोटामागे आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. या शहरातील धावण्याची वार्षिक स्पर्धा अत्यंत लोकप्रिय असते. जवळपास पाच लाख प्रेक्षक या स्पर्धेसाठी बोस्टन येथे यंदा जमा झाले होते. तेथेच हा स्फोट झाला. किमान तिघांचे बळी यात गेले आणि दीडशेहून अधिक जखमी झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी कारवायांमागे दोन उद्दिष्टे असतात. एक म्हणजे छोटय़ा स्फोटानेदेखील अधिक बळी जातात आणि दुसरे म्हणजे दहशतवादी कृत्यांची परिणामकारकता कैकपटीने वाढते. बोस्टन येथे नेमके हेच झाले. अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांमागे प्रत्यक्ष बळी घेण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा असतो तो दुसरा उद्देश. याचे कारण असे की अशा प्रकारच्या घटनांमुळे जनतेच्या मनात उत्सव, महोत्सवांविषयी भीती तयार होते आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या सहभागावर होतो. तसा तो झाला की या उत्सवांमागील मूळ उद्दिष्टालाच तडा जातो आणि या सगळय़ामुळे अर्थव्यवस्था अधिकच अशक्त होण्यास हातभार लागतो. तेव्हा आधुनिक दहशतवादाचे उद्दिष्ट केवळ जीव घेणे वा अश्रापांना जायबंदी करणे एवढेच नाही; तर शत्रुपक्षाच्या अर्थव्यवस्थेस हानी पोहोचवणे हे आहे, हे समजून घ्यायला हवे. त्याचमुळे बोस्टन येथील स्फोटात तीनच बळी गेले असले तरी डाउ जोन्सचा औद्योगिक निर्देशांक हा तीनशेहून अधिक गुणांनी घसरला. आणि याचमुळे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तातडीने निवेदन करून अमेरिकी व्यवस्थेवरचा जनतेचा आणि जगाचा विश्वास उडू नये यासाठी प्रयत्न सुरू केले. अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आकार, त्या व्यवस्थेची अजस्र ताकद आदींमुळे तो देश दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर अधिक आहे हे मान्य केले तरी हीच ताकद अशा प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यास उपयोगी पडते याचाही विचार करावयास हवा. २००१ साली ९/११च्या हल्ल्यात न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे पाडण्यात दहशतवाद्यांना यश आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांवरील खर्चात अमेरिकेने प्रचंड प्रमाणात वाढ केली. आजमितीस तब्बल ७५०० कोटी डॉलर, म्हणजे जवळपास चार लाख १२ हजार ५०० कोटी रुपये, इतकी प्रचंड रक्कम अमेरिका फक्त गुप्तचर यंत्रणेवर खर्च करते. आपल्या संपूर्ण संरक्षण दलाचा वार्षिक अर्थसंकल्प लक्षात घेतला तर ही रक्कम दुपटीपेक्षाही अधिक आहे. ती देखील एकाच खात्याची. अमेरिका २००१ साली जेवढा खर्च गुप्तहेर यंत्रणेवर करीत होती, त्याच्या तुलनेत ही वाढ २५० टक्के इतकी प्रचंड आहे. सर्व मोठय़ा देशांकडून गुप्तचर यंत्रणेवर होणारी रक्कम एकत्र केली तरी अमेरिकेच्या जवळपासदेखील पोहोचणार नाही. जगभरात मिळणाऱ्या सर्व सुगाव्यांचे विश्लेषण करण्यासाठी ३३ इमारतींचे महाप्रचंड संकुल अमेरिकेने उभे केले असून संरक्षण दल मुख्यालयाच्या, म्हणजे पेंटागॉनच्या, पाच पट इतका आकार या कार्यालयांचा आहे. व्हाइट हाउस येथील अध्यक्षीय निवासस्थान आणि कार्यालयापेक्षा २२ पट मोठा आकार या मुख्यालयाचा आहे. यावरून अमेरिकेच्या तयारीचा अंदाज यावा. परंतु इतके सर्व असूनही दहशतवादी हल्ले होतातच, तेव्हा या तयारीचा उपयोग काय, असा खास भारतीय उपरोधिक सूर हे वाचून काही जणांकडून लावला जाईल.
त्यामुळेच अशा शंकासुरांनी आजच्या बॉम्बस्फोटानंतर बोस्टनमध्ये काय झाले याचे विश्लेषण करावयास हवे. ते केल्यास आपणास बोस्टन अनुभवातून बरेच काही शिकता येईल याची जाणीव होईल. हा स्फोट झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात वैद्यकीय तुकडय़ा घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना प्रत्यक्ष स्फोटाच्या ठिकाणीच वैद्यकीय उपचार देण्यास सुरुवात झाली. ज्या प्रमाणे वैद्यकीय मदत तत्क्षणी घटनास्थळी आली त्याच प्रमाणे सुरक्षा यंत्रणाही त्याच क्षणी कामाला लागल्या. त्यांच्यात कोणी काय करायचे यावरून वाद झाला नाही की हा स्फोट नक्की कोणी केला हे सांगण्याची घाई तेथील नेतेमंडळींना झाली नाही. आपल्याकडे असे झाले की राज्याच्या गृहमंत्र्यापासून ते केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत- व्हाया स्थानिक पोलीसप्रमुख- हे दहशतवादी संघटनेचे नावदेखील सांगून मोकळे होतात. घटना घडल्यावर त्यामागे असणारी संघटना ओळखण्याइतकी आपली मंडळी तयार असतील तर अधिक तयार राहून ती घटना ते टाळू का शकत नाहीत, असा प्रश्न आपल्या मंडळींचा हुच्चपणा पाहून पडू शकतो. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेत अध्यक्ष बराक ओबामा यांचे मंगळवारचे निवेदन पाहावयास हवे. इतकी प्रचंड ताकद, गुप्तचर यंत्रणा हाताशी असूनदेखील ओबामा यांनी कोणा एका संघटनेचे नाव घेणे सोडाच, परंतु कोणाकडे अंगुलिनिर्देशही केला नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष घटनास्थळी लगेच धाव घेण्याचा चॅनेलीय मोह जो आपल्याकडे दिसतो, तोही त्यांनी टाळला. याचे कारण अशा प्रकारचे हल्ले झाल्यावर काय आणि कसे वागायचे याचा कसून सराव त्या देशांतून केला जातो आणि त्यामुळे प्रत्यक्ष प्रसंग जेव्हा घडतो तेव्हा सगळेच त्यासाठी तयार असतात. सुरक्षा यंत्रणांवर विपुल खर्च केला जात असल्याने सुरक्षा सैनिक सुसज्ज असतात. मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर सर्व शहरभर कॅमेरे लावायचा निर्णय झाला. परंतु ते अद्याप लागू शकलेले नाहीत. जेथे लागले त्यातील बरेचसे निकामी झाले. तेव्हा अशा महत्त्वाच्या उपायांसाठी जो काही भांडवली खर्च करावा लागतो, तो करण्यात सरकार हात आखडते घेत नसल्याने तेथील पोलिसांना बंदूकरोधी जाकिटेच नाहीत असे कधीच होत नाही. याचे कारण इतिहासापासून शिकण्यात हे देश कधीच हयगय करीत नाहीत.
त्यामुळेच या घटनेचे वर्णन ‘भ्याड’ हल्ला वगैरे असे करण्याचे भारतीय पद्धतीचे दरिद्री सौजन्य दाखवण्याच्या फंदात ओबामा पडले नाहीत. परंतु या मागे जो कोणी, देश, व्यक्ती वा संघटना असेल त्याला याची किंमत पुरेपूर मोजावीच लागेल.. अमेरिका पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल.. हे सांगण्यास ते विसरले नाहीत. १९९३च्या फेब्रुवारीत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जेव्हा पहिल्यांदा, पण अयशस्वी, दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्यास जबाबदार असणाऱ्या युसुफ रामझी या दहशतवाद्यास अमेरिकेने पाकिस्तानातील रावळपिंडी येथे जाऊन जेरबंद केले. पुढे या युसुफचा गुरू ओसामा बिन लादेन यास २००१ मध्ये हे मनोरे पाडण्यात यश आले. तेव्हा त्यास जबाबदार असणाऱ्या ओसामास दहा वर्षांनी का होईना, अमेरिकेने थेट पाकिस्तानातील त्याच्या घरात घुसून टिपले. इतकेच काय, मुंबईत २६/११ झाल्यावर भारताच्या हाती अजमल कसाबखेरीज फारसे काही लागत नसताना अमेरिकी यंत्रणेने या कटाच्या सूत्रधारास, डेव्हिड हेडली यास, पकडून त्याच्याविरोधात खटलाही सुरू केला. २६/११चा हल्ला अमेरिकी भूमीवर नसतानाही अमेरिकेने त्यात लक्ष घातले, कारण मुंबईत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात काही अमेरिकी नागरिकांचा बळी गेला होता आणि जगात कोठेही अमेरिकनास कोणीही कसलीही बाधा आणली तर त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा आपणास अधिकार आहे असे अमेरिका मानते. त्यामुळे बोस्टन येथील हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांचा छडा लावण्यात त्या देशास यश येईल यात शंका नाही.
आधुनिक इतिहासात बोस्टनच्या चहा पार्टीस फार महत्त्व आहे. तत्कालीन राज्यकर्ते असलेल्या ब्रिटिशांच्या विरोधात १७७३ साली बोस्टन येथील रहिवाशांनी आंदोलन केले आणि इतिहासास नवे वळण लागले. प्रश्न इतकाच की आजच्या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेकडे पाहात जगणारे आपल्यासारखे देश स्वत:च्या वर्तमानाची दिशा बदलणार का?
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2013 रोजी प्रकाशित
बोस्टन आणि आपले वर्तमान
बोस्टन येथील हल्ल्यामागील सूत्रधारांचा छडा लावण्यात अमेरिकेस यश येईल यात शंका नाही. परंतु बोस्टनमध्ये काय झाले याचे आपणही विश्लेषण केल्यास बोस्टन अनुभवातून काय शिकता येईल, याची जाणीव आपल्याला होईल.

First published on: 17-04-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boston blast and our present