आर्थिक सुधारणांची भाषा करायची आणि प्रत्यक्ष वागायचे अर्थ-निरक्षरासारखे हे आपल्याकडचे विद्यमान चित्र मार्गारेट थॅचर यांच्या काळात कधीही दिसले नाही. त्यांचे राजकारण आणि आर्थिक विचार हे विजेसारखे लख्ख आणि डोळे दिपवणारे होते..
जॉर्ज, इट्स नो टाइम टु गो वॉब्ली (जॉर्ज ही वेळ डगमगण्याची नाही) असा सल्ला १९९० साली इराकच्या सद्दाम हुसेनला कुवेतचा घास घेण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या थोरल्या जॉर्ज बुश यांना ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी दिला होता. सद्दाम हुसेनपासून कुवेत वाचवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध छेडावे की नाही हा आणि या प्रश्नावर बुश साशंक आहेत असा संशय आल्यावर थॅचरबाईंनी त्यांना ठणकावण्यास कमी केले नाही. या मार्गारेट थॅचर! स्वत:च्या भूमिकेवर कमालीची निष्ठा आणि आपल्या भूमिकेसाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी हे त्यांचे वैशिष्टय़. लोकप्रियतेची तमा न बाळगता जे योग्य वाटेल तेच करीन हा त्यांचा बाणा होता आणि तीच त्यांच्या राजकीय स्वभावाचीदेखील खासियत होती. वयाने सगळ्यात लहान लोकप्रतिनिधी आणि नंतर एडवर्ड हीथ यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री झाल्यावर थॅचरबाईंनी घेतलेला पहिलाच निर्णय त्यांच्या पुढच्या प्रवासाची दिशा दाखवणारा होता. त्या काळी ब्रिटनमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे दूध पुरवले जाई. सरकारने असले उद्योग सुरू केल्यावर जे होते तेच या योजनेच्या बाबतीतही झाले. भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन यामुळे या योजनेचा तोटा वाढत गेला आणि थॅचर यांच्यासमोर शाळांचे अनुदान की या योजनेसाठी मदत, हा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी थॅचर यांनी जनक्षोभाची तमा न बाळगता ही दूध योजना बंद करून टाकली. या निर्णयामुळे त्यांच्यावर इतकी टीका झाली की ‘थॅचर द मिल्क स्नॅचर’ (दूध पळवणाऱ्या थॅचरबाई) असेच त्यांचे नाव पडले. त्या टीकेने थॅचरबाई जराही बधल्या नाहीत आणि आपल्या निर्णयात त्यांनी जराही बदल केला नाही. समाज काय म्हणेल ते जाणून घेण्याच्या फंदात त्यामुळे त्या कधीच पडल्या नाहीत. समाज वगैरे असे काही नसते, हे त्यांचे विधान त्या वेळी फार गाजले. त्यांचे म्हणणे असे होते की, समाज म्हणून असे काही एकसंध नसते. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या उत्कर्षांसाठी स्वत: प्रयत्न करायचे असतात, ते करताना इतरांना, ज्यांना काही कारणांनी ही संधी नाकारली जात असते त्यांना ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायचे असतात. इतकी व्यक्तिकेंद्रित भूमिका थॅचरबाईंनी आयुष्यभर मांडली आणि प्राणपणाने जपली. समाजाच्या नावाने गळा काढणारे प्रत्यक्षात स्वत:चेच घोडे दामटत असतात हे वास्तव त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्या असल्या शब्दांना कधीच भुलल्या नाहीत. अर्थातच समाजवाद आणि साम्यवाद हे त्यांच्या टीकेचे विषय होते. समाजवादाची समस्या ही की आपल्याला इतरांच्या पैशांवर जगायची सवय लागते आणि इतरांचे पैसे आज ना उद्या संपतात, असे त्या ठामपणे म्हणायच्या. या त्यांच्या विधानांमागे आर्थिक विचारांची एक स्वच्छ दिशा होती आणि ती त्यांनी कधीही सोडली नाही. मी विचारांची बांधीलकी मानते, एकमताची वा सहमतीची नाही, असे सांगण्यास त्या कधीही कचरल्या नाहीत.
दुसऱ्या महायुद्धानंतर मान खाली घालून जगायची वेळ आलेल्या ब्रिटिशांची मान मार्गारेट थॅचर यांच्या काळात पुन्हा ताठ झाली, ही त्यांची मायदेशाला देणगी. ज्या वेळी हीथ यांचे सरकार काचकूच करू लागले आणि आर्थिकदृष्टय़ा धाडसी निर्णय घेण्याचे धारिष्टय़ त्यांच्याकडे नाही हे दिसू लागले तेव्हा थॅचरबाईंनी नेतृत्वाच्या स्पर्धेत उडी घेतली आणि हुजूर पक्षातल्या शिष्ट धेंडांना बघता बघता जमीनदोस्त केले. सुरुवातीला पुरुषी अहंकार मिरवणाऱ्या ब्रिटिश संस्कृतीतील इतर नेत्यांनी थॅचरबाईंच्या नेतृत्वास पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटले त्यांच्या आडून सत्तेची सूत्रे आपल्या हाती राखता येतील. पण ते जमले नाही. थॅचरबाई त्यांच्या अपेक्षापेक्षा किती तरी खमक्या निघाल्या आणि जे निर्णय घेण्याचे धाडस त्यांच्या पुरुषी सहकाऱ्यांना दाखवता आले नसते ते त्यांनी लीलया घेतले. सार्वजनिक उपक्रमांची समाजवादी झुंडशाही ज्या काळात निर्माण झाली होती त्या काळात या संकल्पनांना थॅचरबाईंनी एकहाती मूठमाती दिली. सरकारी गुंतवणूक ही उद्योगांसाठी वापरण्याचे काहीही कारण नाही, सरकारने फक्त उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम करावे ही त्यांची भूमिका होती. ती त्यांनी निष्ठुरतेने अमलात आणली. मग जग्वार हा लब्धप्रतिष्ठितांच्या मोटारींचा ब्रँड असो वा ब्रिटिश एअरवेज ही विमान कंपनी. या सगळ्या सरकारी मालकीच्या कंपन्यांचे त्यांनी धडाडीने खासगीकरण केले. आजमितीला हे सर्व सोपे वाटू शकेल, परंतु आपल्याकडे अजूनही एअर इंडिया या तोटय़ातील हवाई कंपनीशी राष्ट्रीयत्व जोडले जात असताना ऐंशीच्या दशकात हे असे निर्णय घेण्यास सिंहाचे काळीज लागते. ते थॅचरबाईंकडे होते. किंबहुना जरा जास्तच प्रमाणात होते. ज्या वातावरणात धडाडी हा गुण लैंगिकतेशी निगडित मानला जातो त्या काळात थॅचरबाईंचे वर्णन त्याचमुळे मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष असे केले जात असे. या धडाडीस विचारांच्या स्पष्टतेची जोड होती. १९८१ साली त्यांनी जेव्हा संरक्षणावरील अर्थसंकल्पात कपात केली त्या वेळी त्याचा चुकीचा अर्थ अर्जेटिनाचे लष्करशहा जनरल लिओपोल्डो गाल्टेरी यांनी काढला आणि फॉकलंड बेटांवर मालकी सांगण्याचा प्रयत्न केला. सत्तेवर येऊन त्या वेळी दोन वर्षेही न झालेल्या थॅचरबाईंनी या प्रसंगी आपल्यातील कमालीच्या नेतृत्वगुणाचे दर्शन घडवले आणि तब्बल आठ हजार मैलांवरच्या अटलांटिक पलीकडच्या बेटांवर आपल्या ४० हजार सैनिकांना पाठवून र्अजेटिनाचे दात घशात घातले. हा झाला त्यांचा देशांतर्गत मोठेपणा.
परंतु थॅचरबाईंच्या कर्तृत्वास आंतरराष्ट्रीय परिमाण आहे आणि ते अधिक झळाळते आहे. थॅचरबाई सत्तेवर आल्यानंतर साधारण १५ महिन्यांतच अमेरिकेत सत्ताबदल होऊन रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले आणि त्यानंतर चार वर्षांनी सोव्हिएत रशियाची सूत्रे मिखाईल गोर्बाचोव यांच्याकडे आली. मध्यमवर्गीय पाश्र्वभूमी आणि कडवा समाजवाद, साम्यवादविरोध वगळता तर रेगन आणि थॅचर यांच्यात समान काहीच नव्हते. थॅचर यांच्या वडिलांचे वाणसामानाचे दुकान होते तर रेगन यांचे वडील विक्रेते होते. तरीही जगाच्या दोन टोकांना असलेल्या या नेत्यांत एक वेगळाच बंध तयार झाला. रेगन हे थॅचरबाईंच्या तुलनेत बौद्धिकतेच्या बाबतीत डावे होते आणि लोकप्रियतेत उजवे, तरीही त्यांनी आपल्या नेतृत्वाची दोरी अप्रत्यक्षपणे थॅचर यांच्या हाती दिली. वास्तविक फॉकलंड बेटांच्या युद्धात अमेरिकेने ब्रिटनला साथ दिली नव्हती. तरीही ते मनात न ठेवता थॅचरबाईंनी अमेरिकेच्या रेगन यांना बरोबर घेतले. हे महत्त्वाचे अशासाठी की दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक महासत्तापण घालवून बसलेल्या इंग्लंडकडे त्या वेळी जगाचे बौद्धिक नेतृत्व आले ते केवळ थॅचर यांच्यामुळे. या बाईंचे मोठेपण असे की ज्या वेळी मिखाईल गोर्बाचोव हे सत्तेवरही आले नव्हते त्या वेळी त्यांच्यातील वेगळेपण पहिल्यांदा थॅचर यांनी हेरले आणि गोर्बाचोव यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करीत अमेरिकेस आपल्या मागे फरफटत नेले. हा शीतयुद्धाचा अत्यंत तप्त असा कालखंड. पण थॅचरबाईंनी आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर तो थंडपणे हाताळला. मग पुढे बर्लिनची भिंत कोसळली आणि सोव्हिएत युनियनचे विघटन व्हायला सुरुवात झाल्यावर जग हाताळणे सोपे झाले. याचा मोठा वाटा थॅचर यांच्याकडे जातो. वास्तविक जागतिक राजकारणात इतकी मुसंडी मारत असताना थॅचरबाईंसाठी परिस्थिती सोपी होती असे नाही. राजकीय विरोधाच्या जोडीला आयरिश रिपब्लिकन आर्मी -आयआरए-  या दहशतवादी संघटनेचा हिंसाचार ऐन भरात होता. बाई त्यांच्यापुढेही दबल्या नाहीत. एकदा तर त्यांच्या हॉटेलातच या संघटनेने मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला. नंतर काही तासांतच थॅचर यांच्या पक्षाचे अधिवेशन सुरू होणार होते. या हल्ल्यातून जिवानिशी वाचलेल्या थॅचरबाईंनी जणू काही घडलेच नाही अशा थाटात अधिवेशनाचे कामकाज सुरू केले. त्यांची ही कणखरता अलौकिक म्हणावी लागेल. राजकीय विरोधास आर्थिक परिमाण आले की विरोध अधिक तीव्र होतो. थॅचरबाईंच्या बाबत तसे झाले. तरीही त्या एकदाही बधल्या नाहीत. त्यांच्या आर्थिक धोरणांना तीव्र विरोध होऊ लागल्यावर त्यांचा हुजूर पक्षच घाबरला आणि धोरणे थोडी बदला अशी मागणी करू लागला. त्या वेळी थॅचर यांनी केलेले भाषण बाई काय होत्या हे समजावून सांगणारे ठरावे. अशा वेळी राजकीय नेते जी कोलांटउडी मारतात त्याचा दाखला देत आपल्या सहकाऱ्यांना बाई म्हणाल्या-  तुम्हाला अशी कोलांटउडी मारायची तर मारा.. द लेडी विल नॉट टर्न. इतक्या ठाम आणि आग्रही नेतृत्वाच्या म्हणून काही समस्या असतात. त्यातील महत्त्वाची म्हणजे अशा नेतृत्वाचे सहकारीदेखील इतकेच पोलादी नेतृत्वाचे असतील असे नाही. थॅचरबाईंच्या बाबत तसे घडत गेले. त्यात नंतर नंतर त्या दुराग्रहीदेखील होत गेल्या. दक्षिण अफ्रिकेचे नेल्सन मंडेला यांची तर त्यांनी एकदा संभावना दहशतवादी अशी केली.
ठामपणाच्या बाबतीत त्यांचे आपल्या इंदिरा गांधी यांच्याशी आपुलकीचे नाते होते. या दोघींत एक अदृश्य बंधही होता. पण तो तेवढाच. १९८४ साली मार्गारेट थॅचर आयआरएच्या दहशतवादी हल्ल्यातून वाचल्यावर त्यांचे अभीष्टचिंतन करणाऱ्यांत इंदिरा गांधी पहिल्या होत्या. परंतु दुर्दैव हे की त्यानंतर काही महिन्यांतच इंदिरा गांधीच खुद्द शीख दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेल्या. नंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनाही अशाच प्रकारे मरण आले. या दोन्ही वेळा थॅचर खूपच दु:खी झाल्या होत्या.
पुढे त्यांच्या राजकारणाची दिशाच बदलली. युरोपात सामायिक संघटनेचे वारे वाहत असताना थॅचरबाईंनी त्यास प्राणपणाने विरोध केला. त्या तत्त्वत: युरोपीय संघटनेच्या विरोधात होत्या आणि ब्रिटनने अशा संघटनेच्या जवळदेखील जाऊ नये असे त्यांचे मत होते. कठोरपणा ते कर्कश विरोध असे त्यांचे राजकारण बनले. त्यातूनच त्यांच्या स्वत:च्याच पक्षात त्यांच्याविरोधात बंडाळी झाली आणि थॅचरबाईंना पदत्याग करावा लागला. त्या वेळी आपला पराभव दिसू लागल्यावर त्यांनी राजीनामा जाहीर करून टाकला आणि नंतर अधिकृत निवासस्थानी त्यांनी पुन्हा पाऊल टाकले ते सामान हलवण्यासाठीच. संपूर्ण कारकिर्दीत त्या एक क्षण हळव्या दिसल्या त्या स्वपक्षीयांच्या वागण्यामुळे. पण तेवढय़ापुरत्याच. तुमच्या कारकिर्दीची कमाई काय, असे त्यांना नंतर विचारण्यात आले असता त्यांनी अत्यंत मिस्कील मिजासखोरीत उत्तर दिले :  टोनी ब्लेअर.
याचा अर्थ असा की थॅचरबाईंच्या हुजूर पक्षाच्या अर्थकारणाचीच कास पुढे मजूर पक्षाच्या टोनी ब्लेअर यांना धरावी लागली. आज देशोदेशींच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे अर्थकारण बऱ्याचदा एकाच दिशेने जाताना दिसते. मग ते अमेरिकेतील डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन असोत वा भारतातील काँग्रेस आणि भाजप. हे झाले थॅचरबाईंनी राजकारणास अर्थकारणाचा रेटा दिल्याने. जनतेला अथरषधाचा कडू डोस पाजावाच लागतो, असे त्या म्हणायच्या. त्या वागल्याही तशाच. हे अधिक महत्त्वाचे. आर्थिक सुधारणांची भाषा करायची आणि प्रत्यक्ष वागायचे अर्थ-निरक्षरासारखे हे आपल्याकडचे विद्यमान चित्र त्यांच्या काळात कधीही दिसले नाही. त्यांचे राजकारण आणि आर्थिक विचार हे विजेसारखे लख्ख आणि डोळे दिपवणारे होते.
त्यांच्या निधनाने ही वीज धरतीला मिळाली.