अमृतसरच्या सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’साठी ब्रिटिश गुप्तहेरांचा सल्ला घेण्यात आला होता, ही गोष्ट एखाद्या गौप्यस्फोटाच्या थाटात ब्रिटनमधील एका खासदाराने जाहीर करावी आणि ब्रिटिश सरकारनेही त्याची लगेच उच्चस्तरीय चौकशी करावी, ही बाब वाटते तेवढी साधी नाही. गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानचे भूत पुन:पुन्हा उकरून काढण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याचाच पुढचा भाग म्हणून या घटनेकडे पाहता येईल. ऑपरेशन ब्लू स्टारला यंदा तीन दशके पूर्ण होत आहेत. सुवर्णमंदिरातील ती सैनिकी कारवाई, भिंद्रनवालेंचा त्यात झालेला मृत्यू, त्याचा सूड म्हणून झालेली इंदिरा गांधी, जन. वैद्य यांची हत्या, इंदिराजींच्या खुनानंतर उसळलेल्या दंगली, या सर्व घटना म्हणजे भारतीय राजकीय आणि सामाजिक मानसावर झालेला घाव आहे. या सर्वच घटना दुर्दैवी होत्या आणि शीखविरोधी दंगलींप्रमाणेच इंदिरा गांधी, जन. वैद्य आणि अशा असंख्य लोकांच्या हत्येची निर्भर्त्सना करावी तेवढी थोडीच आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. दंगलींमध्ये झालेल्या हत्याकांडाबद्दल जेवढे अश्रू आणि नक्राश्रूही ढाळले जातात, तेवढी संवेदना खलिस्तानवाद्यांनी मारलेल्या निरपराध लोकांबद्दल दाखविली जात नाही. वस्तुत: भारतालाच नव्हे, तर पंजाबलाही हा वेदनादायी इतिहास विसरायचा आहे. गेल्या ३० वर्षांत पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहिले, तरी ही बाब लक्षात येईल. परंतु शीखविरोधी दंगलींची, सुवर्णमंदिरातील कारवाईची जखम सातत्याने चिघळत ठेवण्यात अनेक राजकीय शक्तींचे हितसंबंध अडकले आहेत. खलिस्तानी हिंसक चळवळ ही पाकिस्तानची, खासकरून जन. झिया यांची निर्मिती होती. पण त्याला अमेरिकेचाही पाठिंबा होता. निक्सन आणि किसिंजर यांच्या तीव्र इंदिराद्वेषाचा तो परिणाम होता. पाकिस्तानच नव्हे, तर अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या भूमीवरून शीख अतिरेक्यांच्या उघड कारवाया सुरू होत्या. त्याविरोधात वारंवार तक्रारी करून, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाकडे गुप्तचर यंत्रणांच्या पातळीवर मदतीची मागणी करूनही या देशांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. बी. रमण यांच्या ‘द कावबॉइज ऑफ रॉ’ या रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिसिस विंग या भारतीय गुप्तचर संस्थेवरील पुस्तकात या बाबींवर तपशिलाने प्रकाश टाकण्यात आला आहे. इंदिरा यांची हत्या आणि कनिष्क विमानाचा स्फोट या घटनांनंतरच विदेशी गुप्तचर यंत्रणांना जाग आली आणि काही प्रमाणात त्यांचे साहय़ मिळू लागले. मात्र ऑपरेशन ब्लू स्टारच्या आखणीआधी रॉचे प्रमुख आर. एन. काव यांच्या विनंतीवरून ब्रिटनच्या एमआय-५च्या दोन अधिकाऱ्यांनी सुवर्णमंदिरात पर्यटक म्हणून जाऊन तेथील पाहणी केली होती. अर्थात ही सांगोवांगी गोष्टच आहे आणि बी. रमण यांनीच ती दिली आहे. रमण यांचे हे पुस्तक २००७ मधले. याचा अर्थ गेली किमान पाच वर्षे तरी ही ब्रिटिश गुप्तचरांच्या साहय़ाची बाब चर्चेत होती. तेव्हा त्या शिळ्या कढीला आपल्याकडे तरी आज ऊत येण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही ब्रिटनमधील तथाकथित गौप्यस्फोटानंतर आपल्याकडील शीख संघटनांनी आणि भाजपच्या अरुण जेटली यांच्यासारख्या नेत्यांनी हे काहीतरी पहिल्यांदाच समजले आहे, असा आव आणून ब्रिटिश आणि भारत सरकारकडून खुलासा मागितला आहे. याला राजकारणाचाच वास आहे. ब्रिटनचे मजूर पक्षाचे खासदार डॉम व्ॉटसन यांनी या मदतीवरून आरडाओरडा सुरू केला आहे. हेही पुन्हा तेथील शीख मतांचेच राजकारण आहे. या अशा मतांच्या राजकारणातूनच भिंद्रनवाले प्रवृत्ती जन्माला आली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती केली जात आहे, हे किमान भारतीयांनी तरी लक्षात घेण्याची गरज आहे.

Story img Loader