‘ब्रोकन न्यूज’ हे पुस्तक ट्रान्केबार या प्रकाशनातर्फे ‘कादंबरी’ म्हणून २०१० मध्ये आलं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये ट्रान्केबारमध्ये मोठी गुंतवणूक असलेल्या ‘वेस्टलॅण्ड’नं हेच पुस्तक पुन्हा बाजारात आणलं. म्हणजे प्रकाशनाची तारीख हा निकष लावल्यास पुस्तक नक्कीच जुनं आहे. त्यावर आत्ता पुन्हा एकदा लिहिणं, हे एखाद्या शिळ्या बातमीसारखंच. ‘ब्रोकन न्यूज’चं मराठी भाषांतर ‘शिळी बातमी’ असं होऊ शकतं, अगदी तेच या पुस्तकाचं आता झालं आहे. पण आज आपण २०१३ च्या नोव्हेंबरअखेरीस हे पुस्तक वाचताना, ‘शिळी बातमी’ या शब्दप्रयोगाचा निराळा अर्थ या पुस्तकामुळे लक्षात येतो : शिळी असली तरी बातमीच, असा.. आणि बातमी शिळी होईपर्यंत आपल्याला माहीत होती की नव्हती? होती, तर मग आपण त्यानंतर काय घडलं, परिणाम काय झाले याचा विचार केला का? याबद्दल आत्मपरीक्षण करण्याचा एक क्षण आपल्यासमोर आहे, याची (पुसट) जाणीवसुद्धा होते.
‘शिळी बातमी’ या शब्दासोबत जी मन:स्थिती असू शकते, तिचा थेट संबंध या जुन्या पुस्तकाशी आणि त्याच्या कथानकाशी आहे.  
मीडियातल्या मुली. त्या कशा दिसताहेत, हे पारखूनच जणू त्यांना चित्रवाणीच्या वृत्तवाहिन्यांवर नोकरी दिली जाते, ही शिळी बातमी. मीडियातल्या मुलींना मिळणाऱ्या बढत्या किंवा त्यांचा होणारा उत्कर्ष खरोखरच बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो का अशी शंका घेण्याजोगी (त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी किंवा पुरुषी वरिष्ठांनी निर्माण केलेली) परिस्थिती, ही शिळी बातमी. याबद्दल खुद्द मीडियातच असलेल्या एका मुलीला जी काही कासाविशी वाटते, तिचं वर्णन या जुन्या पुस्तकात आहे.
मीडियातल्या एका मुलीचं ‘स्वखुशीनं’ झालेलं लैंगिक शोषण आणि त्याच्या परिणामी तिनं केलेली आत्महत्या, ही ‘ब्रोकन न्यूज’ला कथानक देणारी मोठी घटना. सुशील नावाच्या एका बॉसचं लग्न झालेलं असूनही त्याच्याशी असलेले संबंध पुढे जाऊ देणाऱ्या आणि आत्महत्या करते वेळी बहुधा गर्भवती असलेल्या या शोषित मुलीचं (कादंबरीतलं) नाव रश्मी. यापुढे ‘ब्रोकन न्यूज’ची कथानिवेदक नायिका रश्मीच्या आत्महत्येचं प्रकरण धसाला लावायचं ठरवते. रश्मी गर्भवतीच होती, हे सिद्ध झालेलं नाही. पण रश्मी ही नायिकेची मैत्रीण, आणि नायिकेला ठाम विश्वास आहे की रश्मीला सुशीलपासूनच दिवस गेलेले असताना त्यानं तिला अव्हेरलं, म्हणूनच तिनं जीवन संपवलं. म्हणजे ही आत्महत्या की खून?
खूनच, असं नायिका ठरवते. रश्मीच्या खुनाचं प्रकरण धसाला लावायचं, असा चंग बांधते. मीडियातल्या पुरुष वरिष्ठांचा पुरुषीपणा यापुढे चालू द्यायचा नाही, असं तिला मनोमन वाटत असतं.
या पुरुषीपणाचा थेट चटका नायिकेला बसलेला नाही. पण सौम्य म्हणावेत असे अनुभव आलेले आहेतच. निखिल नावाचा तिचा सहकारी, तिच्यासह जिन्यात सिगारेट पिताना ‘चल मी तुला मसाज करतो’ असं म्हणून तत्क्षणी आपल्या इराद्याची अंमलबजावणी सुरू करतो (आणि नायिकेला थोडं निवल्यासारखं, बरं वाटतं.) किंवा जानकी नावाची एक अगदी अननुभवी तरुण मुलगी ‘अंग’भूत गुणांमुळे पुढे ‘ग्लॅमर’ का काय ते कमावते आणि अकस्मात बॉसच्या मर्जीतली होऊन नायिकेच्याही पुढे जाते, असे आणि इतकेच सौम्य अनुभव. या पुस्तकाच्या पान १०३ वर तो प्रसंग घडतो.
प्रसंग असा की, नायिका जिथं नोकरीस आहे, त्या वृत्तवाहिनीची वार्षिक पार्टी. अर्थातच ‘मद्य’-रात्र उलटून गेल्यावरही चालू राहणारी. अशा पार्टीत ‘रंग भरल्यानंतर’ सगळेच पुरुष- मग ते बॉस असोत की तंत्रज्ञ.. जसे चेकाळतात आणि त्यांचे सर्वाचे डोळे जसे बुभुक्षित होऊ लागतात, तसं होत असतानाच पार्टी अध्र्यात सोडून आपली नायिका घरी निघून जाते.
का तर म्हणे एका स्पॉन्सर्ड शोच्या शूटसाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्याला जायचंय.
त्या पार्टीत रश्मीही असते. रश्मीचं आणि सुशीलचं भांडण होतं. चिघळतं.
रश्मीला सुशील थोबाडीत मारतो. रश्मी खाली पडते. हे सारं, नायिकेला दुसऱ्या दिवशी कळतं.
पार्टीत पुरुष कसे वागतात, हे नायिकेला माहीत आहे. रश्मी सुशीलमध्ये मनानं गुंतली आहे आणि सुशील मात्र आता तिला एकटं पाडणार, हेही नायिकेला माहीत आहे, त्यामुळे थोबाडीत मारणं, खाली पडणं वगैरे तिच्यासाठी फार धक्कादायक नाही.
धक्कादायक आहे ते, रश्मीलाच वरिष्ठांकडून ‘मद्यपान कमी करावे’ असा सल्ला मिळणं!
हा धक्का पचवण्याचं ठरवून, त्या वरिष्ठाशीच नायिका बोलते- चूक रश्मीची आहे, असंच वाटतं का तुम्हाला?
नाही नाही. तसं अजिबात नाही. आम्ही त्यालाही मोकळं सोडणार नाहीयोत – हे वरिष्ठांकडून मिळालेलं उत्तर.
पुढला अर्धा भाग हा नायिकेचीच गोष्ट. रश्मीनं आत्महत्या केल्यानंतर, हा खूनच कसा ठरतो हे मनोमन पटलेल्या नायिकेलाही नोकरी सोडावीच कशी लागते, याची गोष्ट. तिला नोकरी सोडावी लागते, कारण म्हणे मानसिक आजारांनी तिला ग्रासलं आहे!
त्यावर नायिका मग रीतसर उपचार घेते, असं वळण अगदी अखेरी-अखेरीस या कथानकाला मिळतं. कथेच्या प्रवाहात कदाचित शोभून जाणारं, परंतु एकंदर वास्तवाशी ताडून पाहिलं असता प्रतीकात्मक बाबींचा आधार घेऊन निराळाच अर्थ सुचवू पाहणारं- असं हे कथानकातलं वळण आहे.
नायिका खरोखरच मानसोपचार घ्यायला गेली का? तिथं म्हणे तिला तिच्याआधी मीडियात असलेल्या आणि बुद्धिमान अशी ओळख असलेल्या दोन मुली (आता त्या मोठय़ा बायका झाल्याहेत) भेटल्या. त्या दोघींनासुद्धा- जणू काही- मानसोपचारांचीच गरज आहे.
मग अगदी शेवटल्या प्रकरणात नायिका मानसोपचार घेऊन ‘बरी’ होते. मग ही ‘बरी झालेली, एके काळी मीडियात असलेली मुलगी’ आपणा वाचकांना सांगते..माझे सगळे सहकारी- विशेषत: पुरुष वरिष्ठ- फार चांगले आणि मदत करणारे होते.

अमृता त्रिपाठी स्वत: एका वृत्तवाहिनीवर अँकरपर्सन या पदावर होत्या. तिथलं जग अगदी जवळून पाहिल्यामुळेच, हे पुस्तक मीडियाबिडियात जाण्याची नि मोठ्ठं काही तरी करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या पोरसवदा वाचकांनी ‘धंदेशिक्षणा’चा भाग म्हणून वाचावं, इतके बारकावे त्यात आले आहेत. पण हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ नव्हतं आणि नाही. ‘ही माझी गोष्ट नाही’ असं लेखिकेनं कितीही सांगितलं, तरी मीडियातले पुरुष आणि स्त्रिया यांच्या वर्तनाबद्दलचा हा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
हे पुस्तक आधी कादंबरी म्हणून वाचताना, त्यातलं लिखाण फार गोंधळलेलं वाटलं होतं. नोव्हेंबर २०१३ मधल्या घटनाक्रमामुळे, त्या गोंधळलेल्या लिखाणाचा अर्थ नव्यानं कळण्याची शक्यता आहे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
लव्हर्स लाइक यू अँड आय : मीनाक्षी ठाकूर, पाने : २२४२७५ रुपये.
डेमॉन डेंटिस्ट : डेव्हिड विल्यम्स, पाने : २७२३५० रुपये.
द वन यू कॅनॉट हॅव : प्रीती शेणॉय, पाने : २७०२०० रुपये.
सीकामोर रो : जॉन ग्रिशम, पाने : ४००३५० रुपये.
आय अ‍ॅम लाइफ : श्रद्धा सोनी, पाने : १९२२५० रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
द सीज- द अ‍ॅटॅक ऑन ताज : अँड्रीयन लेवी, कॅथी स्कॉट-क्लार्क, पाने : ३४४४९९ रुपये.
आफ्टर-नून गर्ल- माय खुशवंत मेमॉयर्स : अमरिंदर बजाज, पाने : ४००३९९ रुपये.
आय स्वालोड द मून- द पोएट्री ऑफ गुलज़ार : साबा मेहमूद बशीर, पाने : २७२/३९९ रुपये.
ट्रान्सफॉर्मिग इंडिया : सुमंत्रा बोस, पाने : ३४८६९९ रुपये.
माही- द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन : शंतनू गुहा राय, पाने : २००२९५ रुपये.
सौजन्य – फ्लिपकार्ट.कॉम

Story img Loader