बेरीज-वजाबाकी आणि गुणाकाराच्या गणितांना राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. केंद्रातील सत्ता-संपादनासाठी आवश्यक संख्याबळ जमविण्यासाठी सध्या सर्वच पक्षांचे असे बेरजेचे राजकारण सुरू आहे. १३ महिन्यांपूर्वी, नोव्हेंबर २०१२च्या मध्यात, भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून येड्डियुरप्पा यांना हटविले आणि हा निर्णय घेणाऱ्यांना धडा शिकविण्याच्या ईष्र्येनेच भाजपला रामराम करीत स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपने दक्षिणेत रोवलेला दिग्विजयाचा झेंडा येड्डियुरप्पा यांनी उतरविला. येड्डियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षामुळे विधानसभा निवडणुकीत पडझड झालेल्या भाजपपासून पुढे सत्ता तर दुरावलीच, पण प्रमुख विरोधी पक्षाचे स्थानही भाजपने गमावले. कर्नाटकातील वजाबाकीचे गणित चुकल्याची जाणीव आता भाजपला झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लिंगायत मतांचा मोठा गठ्ठा मिळविणारा आणि एकूण मतदानापैकी दहा टक्के मते खिशात घालणारा येड्डियुरप्पांचा कर्नाटक जनता पक्ष पुन्हा भाजपमध्ये विलीन झाल्याने, ११ महिन्यांपासून काळवंडलेले भाजपमधील काही चेहरे पुन्हा खुलले आहेत. कर्नाटकातील जातीच्या प्रभावशील राजकारणातील येड्डियुरप्पा ही ताकद गमावल्यास लोकसभेच्या आगामी निवडणुकाही जड जातील याची जाणीव झाल्याने येड्डियुरप्पांच्या पुनरागमनावर भाजप आणि त्यांच्या मातृसंस्थेतच एकमत झाले एवढाच या बेरजेच्या राजकारणाचा अर्थ आहे. भाजपचे नेते अनंतकुमार यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नेहमीच खुणावत असते, असे म्हणतात. पण त्याच खुर्चीवर येड्डियुरप्पांची सावली असल्याने त्यांच्या पुनरागमनास अनंतकुमार फारसे राजी नव्हते, अशीही चर्चा आहे. मात्र संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होरस्बळे यांच्या शिमोग्यातील घरातच राजनाथ सिंह यांनी येड्डियुरप्पा यांच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब केल्याने येड्डियुरप्पांच्या वाटेतील कंटकाकीर्ण मार्ग पुरता मोकळा झाला आहे आणि कोणतीही नाराजी आता या बेरजेचे गणित बदलू शकणार नाही हे स्पष्ट आहे. वजाबाकीच्या राजकारणामुळे गेल्या काही वर्षांतील गणिताची उत्तरे चुकल्याचे जाणवल्यानंतर, चुकांची दुरुस्ती करण्याची वेळ अनेकांवर आली होती. कल्याणसिंह, उमा भारती, सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाबाहेर पडून स्वबळ अजमावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वजाबाकीत भाजपबरोबरच त्यांचेही नुकसान झाले होते. त्यामुळे बेरजेच्या राजकारणातून ही चुकलेली गणिते दुरुस्त करून घेतली गेली. कर्नाटकात येड्डियुरप्पा यांच्याबाबतही तसेच झाले. दहा टक्केमतदान गमावल्याचे गणित वजाबाकीच्या राजकारणातूनच चुकल्याची जाणीव झाल्यानंतर भाजपने बेरजेचे राजकारण आपलेसे केले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येड्डियुरप्पा यांच्या प्रतिमेस धक्का लागलेला नाही, असा दावा त्यांचे समर्थक त्यांच्या पक्षाने मिळविलेल्या मतांचा हवाला देत करतात. येड्डियुरप्पा यांच्यामुळे कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुकीतील गणिते सोपी होतील, अशी भाजपची अपेक्षा असेल तर त्याचा मोबदला येड्डियुरप्पा यांना मिळणार हेही ओघानेच येते. केंद्रात सत्ता मिळाली, तर दक्षिण दिग्विजयाचे पहिले मानकरी ठरलेल्या येड्डियुरप्पा यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी भाजपमधील एक गट प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. आपण कोणत्याही अपेक्षेने माघारी परतलेलो नाही, असे येड्डियुरप्पा सांगत असले, तरी पक्षाच्या यशाचा वाटा येड्डियुरप्पांना कोणत्या स्वरूपात मिळणार हे त्यांनी त्यांच्या शिमोगा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली तर लगेचच स्पष्ट होईल. त्याबरोबरच, कर्नाटकच्या सत्तेच्या खुर्चीवरील त्यांच्या सावलीचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीतून ठरणार आहे आणि या खुर्चीचा भाजपमधील दावेदारही निश्चित होणार आहे.
‘दक्षिण दिग्विजया’चा दुसरा अध्याय?
बेरीज-वजाबाकी आणि गुणाकाराच्या गणितांना राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. केंद्रातील सत्ता-संपादनासाठी आवश्यक संख्याबळ जमविण्यासाठी सध्या सर्वच पक्षांचे असे बेरजेचे राजकारण सुरू आहे. १
First published on: 10-01-2014 at 03:35 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bs yeddyurappa returns to bjp