भारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे. पुढे गावागावांतून आठवडय़ातील ठरावीक दिवशी किरकोळ व्यापाराचा सामूहिक कार्यक्रम करण्याची प्रथा सुरू झाली. ‘हाट’ या शब्दाने ओळखला जाणारा कार्यक्रम बाजारहाट म्हणून पुढे प्रचलित झाला व आजही वापरात असलेला वाक्प्रचार म्हणून आपणा सर्वास परिचित आहे. प्रथमत: मालाची अदलाबदल, मग चलन-पैशांच्या बदल्यात मालाची किरकोळ विक्री, मग आठवडय़ाच्या बाजारातून स्थायिक दुकानांची मांडणी असे टप्पे पार करीत आज या किरकोळ व्यापाराची शहराशहरांत प्रचंड शहरात जणू जत्राच लागलेली असते. वस्तुभांडाराच्या रूपाने सुरू झालेली ही किरकोळ व्यापाराची जत्रा आज बहुमजली वातानुकूलित इमारतीमध्ये कायमस्वरूपी भरणारी जत्राच झाली आहे. वॉल मार्टसारखी किरकोळ दुकानांची साखळी १९६२ साली स्थापन झाली. सॅम वॉल्टनने लावलेले हे रोप आज वाढत जाऊन अमेरिकन भांडवली बाजारात १,३९,५०० कोटी रुपये मूल्य असणारे वृक्ष स्वरूपात दिसते आहे. भारतातही किरकोळीचा हा घाऊक बाजार वेगाने प्रगती करताना दिसत आहे. आज ही किरकोळीची बाजारपेठ ३,२०,४०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. वार्षिक १३ ते १५ टक्क्यांनी वाढणारा हा व्यापार २०१८-१९ पर्यंत ५,६८,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल असाही एक अंदाज आहे; पण पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतातील किरकोळ व्यवसाय वेगळ्या वळणावर आहे. आज भारतात जवळजवळ ९२% किरकोळ व्यापार हा विस्कळीत स्वरूपाचा आहे. या विस्कळीत स्वरूपात अगदी फुटकळ किराणामालाच्या दुकानापासून शहरातील थोडी मोठी पण व्यक्तिगत मालकीची दुकाने मोडतात; पण संघटित किरकोळी घाऊक व्यापार आता पाश्चिमात्य देशांच्या चालीवर भारतातही वाढीस लागला आहे. २००९ साली केवळ ९,३०० कोटी रुपयांचा असणारा हा व्यवसाय २०१२ साली २५,००० कोटी रुपयांच्या घरात होता, तर २०१९ सालापर्यंत तो ५६,९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

भारतात आज एका अंदाजाप्रमाणे किरकोळ व्यापाराची साधारण १.४ कोटी दुकाने आहेत; पण त्यातील ९६% दुकाने ही ५०० चौ. फुटांपेक्षा कमी आकाराची आहेत. जगभरातील किरकोळ व्यापारात भारत २०१२ साली पाचव्या स्थानावर होता, पण आज मात्र तो १४व्या स्थानावर घसरला आहे. परदेशी गुंतवणुकीचे सरकारी अस्थिर धोरण हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. ब्राझील, चिली, चीन, दुबई, टर्की यांसारखे देश हे या किरकोळ व्यापारात अव्वल स्थानांवर आहेत; पण भारतीय अर्थव्यवस्थेत होणारी वाढ आणि भारतीय लोकसंख्येत तरुण पिढीची होणारी वाढ, त्यांची पैसा खर्च करण्याची क्षमता इत्यादी सर्व गोष्टींचा विचार केला, तर या किरकोळ घाऊक व्यापाराची जोमाने वृद्धी होण्यास खूपच वाव आहे. आज भारतात २५ वर्षांच्या आसपास असणारे ५० कोटी तरुण-तरुणी आहेत. त्यांना लागणारे कपडे, डबाबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेये, भ्रमणध्वनी, जलद सेवा देणारी उपाहारगृहे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी चिन्हांकित उत्पादनांची विशेष मागणी कायम राहणार आहे. भारतातील १५ ते ५४ वयोगटातील काम करणाऱ्या ग्राहकांच्याही वेगळ्या गरजा आहेत. सतत वाढत असलेल्या त्यांच्या आमदनीमुळे आणि एकूणच बदललेल्या राहणीमानामुळे चैनीच्या वस्तू, चिन्हांकित कपडे, आरोग्य व सौंदर्य प्रसाधने इत्यादी गोष्टींची मागणी सतत वाढणार आहे. ग्रामीण बाजारपेठ आज किरकोळ घाऊक व्यापारात तर नवीन क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी शेतीविषयक सामग्रीचीच दुकाने असणाऱ्या ग्रामीण भागात चक्कर टाकली तर चकचकीत प्रदर्शन मांडून बसलेली कित्येक किरकोळ दुकाने आज भारतभर वाढतानाच दिसतात. किरकोळ व्यापारात भारतीय ग्रामीण किंवा आर्थिक निम्नस्तरावर आणखी एक क्रांती जगप्रसिद्ध झाली ती म्हणजे चहा, साबण, तेल इत्यादी वस्तूंची लहान वेष्टने. १०० रुपयांचा चहाचा पुडा घेणे या गरिबांना शक्य नसते, पण ५/५ रुपयांचा चहा, खोबरेल तेल, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तू दररोज घेणे त्यांना शक्य असते. या सर्व बदलणाऱ्या भारतीय बाजारपेठेच्या विभागामध्ये आणखी एका विभागाची लक्षणीय वाढ होत आहे व ती म्हणजे नव अतिश्रीमंतांची.
जागतिक संपत्ती अहवालानुसार २०१४ साली कोटय़धीश भारतीयांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी वाढ झाली. आशिया खंडात दुसरा क्रमांक! या लोकांना लागणारी सोमरसापासूनची विशिष्ट चिन्हांकित पेये, घर सजावटीचे वैशिष्टय़पूर्ण विशेष सामान, आरामदायी गाडय़ा, चैनीच्या वस्तू, सौेंदर्य प्रसाधने इत्यादी गोष्टींची किरकोळ बाजारपेठ जोमाने वाढते आहे. पूर्वी हेच लोक परदेशातून या वस्तू घेऊन येत; पण आज याच चैनीच्या वस्तू, चिन्हांकित उत्पादक भारतात बनवत आहेत व परदेशी लोक त्यांच्या किमतीमुळे भारतात येऊन खरेदी करून जात आहेत असे दृश्य पाहायला मिळते. ‘भारतात बनवा’ याचा हाही एक फायदा!
अर्थात किरकोळी घाऊक व्यापार म्हणजे फक्त इतरांनी बनवलेल्या वस्तू विकणे असा नाही, तर आज हे उद्योग स्वत:ची चिन्हांकित उत्पादने बाजारात व खास करून स्वत:च्या दुकानात विकत आहेत. साधे द्रव साबण, डाळी, रवा, मैदा, कणीक इत्यादी उत्पादने स्वत:च्या चिन्हांवर विकायची सध्या मोठी स्पर्धा लागली आहे; पण त्याचबरोबर जागतिक चिन्हांकित उत्पादनांना स्पर्धा देऊ शकतील असे नवनवीन चालींचे कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूही आज भारतीय संघटित किरकोळी घाऊक व्यापारी स्वत:च्या चिन्हांखाली बाजारात आणत आहेत. साखळीतील ४०-५० दुकाने व त्यात येणारे ग्राहक ही त्यांची मोठी आशादायक बाजारपेठ आहे. इतरांची उत्पादने विकण्यापेक्षा स्वत:च्या चिन्हांकित उत्पादनाच्या विक्रीतून साहजिकच नफा अधिक मिळतो व त्यामुळे अशा नवीन विक्री व विपणन तंत्रांनी ग्राहकांना आकर्षित करण्याचे कसबही या संघटित किरकोळी कंपन्या आत्मसात करीत आहेत. आपल्या दुकानांची संख्या सतत वाढती ठेवणे, त्या त्या शहरानुसार दुकानाचा आकार कायम ठेवणे, सतत नवीन आकर्षक सवलती देणे, वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडून ग्राहकांना खरेदीसाठी मोहवणे अशी अनेक तंत्रे या कंपन्या वापरताना दिसतात. किरकोळी घाऊक व्यापार आज भारतात प्रौढावस्थेकडे सरकत आहे. वसणारी व वाढणारी नवीन शहरे, त्यात वाढणाऱ्या बाजारपेठा, त्या बाजारपेठांत वाढणारे नवीन गट इत्यादी सर्वाशी जुळवून घेत या संघटित व्यापार उद्योगाला पुढे जायचे आहे. वाढीसाठी भरपूर वाव असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारही भारतीय किरकोळी घाऊक व्यापाराच्या बाजारात येण्यास उत्सुक आहेत. गेल्या दहा वर्षांत दोन-तीन जागतिक उद्योगांनी तसा प्रयत्नही केला; पण प्रत्यक्ष भारतात आल्यावर मात्र सरकारी अनुभवाने ग्रस्त होऊन हे उद्योग भारताबाहेर पडले; पण भारतीय बाजारपेठ इतकी आकर्षक आहे व बनते आहे की, हे सर्व जण परत भारतात येतील!
सरकारी परवाने व नियम ही या उद्योगाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. उद्योग करण्याची सुकरता यामध्ये भारताला आता खरेच आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. असंघटित किरकोळी व्यापाऱ्यांशी स्पर्धा करीत असतानाच आता त्यांना संगणकीय महाजालावर आलेल्या किरकोळी नवोद्योगांशी स्पर्धा करायला लागत आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट अशा स्पर्धकांना नफा बनवण्याची बिलकूल चिंता नाही, त्यामुळे वाटेल तशा सवलती देत अगदी पुस्तकांपासून ते दूरदर्शन संचापर्यंत व कपडय़ांपासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत प्रत्येक वस्तू हे नवोद्योग आपल्या आभासी दुकानांमधून विकत आहेत. स्वत: नफा करीत, नवीन दुकाने, वीज, भाडी, पगार, विमा असे अनेक खर्च सांभाळत या उद्योगाला आपला व्यवसाय करणे गरजेचे आहे व ते सोपे नाही. कुशल मनुष्यबळाची सतत असणारी चणचण, मालाची ने-आण करण्यासाठी असलेले खराब रस्ते, अतिशय वाईट शीत गोदामे, शेतीमाल खरेदी करताना असणारे जाचक जुने कायदे, एक ना दोन प्रचंड अडचणींतून मार्ग काढत फक्त पुढे वाढणाऱ्या मूल्याकडे पाहात हे उद्योग आज बाजारात ठाण मांडून बसले आहेत. आजच्या अशा बिनीच्या दोन किरकोळी घाऊक व्यापारी संघटनांची नावे व त्यांचे बाजारमूल्य बघितले की समजते या उद्योगाला एवढे कष्ट असूनही, धोके असूनही किती वाव आहे. फ्यूचर रिटेलला १९९८ ला सुरुवात झाली. आज १०२ शहरांमध्ये १.७ कोटी चौरस फुटांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे बाजारमूल्य आहे ५,६०० कोटी रुपयांचे. १९९२ साली सुरू झालेले शॉपर्स स्टॉप हे असेच दुसरे नाव. ३००० चौरस फुटांमध्ये सुरू झालेले साधे कपडय़ांचे दुकान आज ३० लाख चौरस फूट जागेवर किरकोळी घाऊक व्यापार करीत आहे. ३० लाख निष्ठावान ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या, ६०च्या वर दुकाने असलेल्या या कंपनीचे बाजारमूल्य आहे ३,४७५ कोटी रुपयांचे; पण आज भारतीय वस्त्रोद्योगापेक्षाही मोठय़ा असणाऱ्या, प्रचंड रोजगार उत्पन्न करणाऱ्या या किरकोळी घाऊक व्यापाराला उद्योगाचा दर्जा मात्र नाही. वस्त्रोद्योगाला मंत्री-मंत्रालय आहे, पण या उद्योगाचा केंद्रात कुणी वाली नाही. येणाऱ्या काळात कदाचित ही परिस्थिती बदलेल, स्पर्धा वाढेल, गुणवत्ता वाढेल व शेवटी या सर्वाचा सुजाण ग्राहकराजाला फायदा होईल, हीच अपेक्षा!

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट

दीपक घैसास

>  लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक    संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय        सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com

 

 

Story img Loader